राजेंद्र श्रीकृष्ण भट

 

आहारात समाविष्ट करता येतील आणि आरोग्याला हितकारक ठरतील असे विविध कंद बाल्कनीत पिकवता येतात. काळे करांदे, भुरे करांदे, कोनफळ, गोरादु असे बोरस्वरूपात वाढणारे कंद कुंडीत लावता येतात. कोनफळ सोडून बाकी सर्वाना वेलीवरसुद्धा बटाटय़ासारखी फळे येतात.

मुळा वर्षभर पाण्याच्या २ लिटरच्या बाटलीत लावता येतो. मुळा पांढरा (लांब), लाल (लांब), लाल (गोल), लांब अर्धापांढरा व अर्धा लाल, वरचा मुळा, म्हणजे ज्याच्या शेंगांची (डिंगरी) भाजी करतात, अशा अनेक प्रकारच्या मुळ्यांचे बी बाजारात मिळते. बाटलीच्या तळाचा भाग कापून, झाकणाला छोटे भोक पाडून ही बाटली उलटी टांगून त्यात आपण मुळा लावू शकतो. एका बाटलीत २-३ बिया लावाव्यात. अशा अनेक बाटल्या आपण टांगून ठेवू शकतो. मुळा ४५दिवसांत काढता येतो. गाजरही अशाच पद्धतीने लावता येते, मात्र आपल्याकडे ते फक्त थंडीत उगवते. त्याचे बी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लावावे.

बीट मातीतील क्षार काढून घेत असल्यामुळे एक-दोन वर्षांनी प्रत्येक कुंडीत बीट लावावेत. त्यामुळे मातीतील क्षार निघून जातात. बिटाचे बी व पालकाचे बी सारखेच दिसते. बी पेरल्यापासून बीट तयार होण्यासाठी तीन महिने लागतात.

पसरट टबसारख्या कुंडीत आळू चांगला वाढतो. थोडी सावली असल्यास पाने फार छान होतात. अळू तीन प्रकारे वापरता येतो.  मातीमध्ये ओलावा व सेंद्रिय घटक जास्त असणे आवश्यक आहे. फक्त बागेत उंदीर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. अळूच्या झाडावर किमान एक दोन पाने ठेवावीत. सर्व पाने कापल्यास पुढील पाने लहान येतील.

सर्वच कुंडय़ांत लसणीच्या पाकळ्या लावाव्यात. त्यामुळे झाडांवर कीड येत नाही आणि त्याच्या पातींचा वापर रोजच्या चटणीत करता येतो. प्रत्येक कुंडीत लसणाच्या ८-१० पाकळ्या सहज लागू शकतात.

बहुतेक सर्वच कंद पिकांना कीड, तुलनेने कमी लागते, पण रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ट्रायकोडर्मा व्हिरिडी व सुडुमोनस यांपैकी कोणतीही जैविक बुरशी ५ग्रॅम/ प्रति लि. पाण्यातून फवारल्यास अनेक रोग नियंत्रणात राहतात.