डॉ. नीलम रेडकर

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण म्हटले जाते. वाढत्या वयामुळे शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बदल होतात आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी होत जाते. त्यामुळे जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लस दिली जाते. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी होते किंवा काही आजार टाळण्यास मदत होते. म्हणूनच जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजारांसाठी लसीकरण प्रभावी उपाययोजना आहे.

प्रत्येक पालक आपले मूल आजारी पडू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतात. लहान मुलांच्या लसीकरणाची योजना सर्वत्र यशस्वी झाली आहे. लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठांनाही काही आजार होऊ  नयेत लसीकरणाची आवश्यकता असते. परंतु ज्येष्ठांच्या लसीकरणाचे महत्त्व अजून लोकांना पटलेलं नाही .

आयुर्मान वाढल्यामुळे ६०च्यावर वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. न्यूमोनिया, फ्लू यांसारख्या आजारांमुळे श्वसनाचा त्रास होतो आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते. काही रुग्णांना तर कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवावे लागते. ज्येष्ठांमध्ये न्यूमोनिया होण्याचे तरुणांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच न्यूमोनियामुळे मृत्यू होणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाणही २० टक्क्यांइतके आहे. फ्लू व न्यूमोकोकल या जंतूंमुळे होणारे शवसनाचे आजार लसीकरणामुळे आटोक्यात आणणे शक्य आहे. आजार होऊ नयेत म्हणून लसीकरण करणे अत्यंत उपयुक्त व कमी खर्चीक योजना आहे. लसीकरणामुळे ज्येष्ठांमध्ये आजाराचे प्रमाण आणि तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ  शकते. मात्र  लसीकरण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. ज्येष्ठांनी कोणते लसीकरण करणे गरजेचे आहे याबद्दल जाणून घेऊ या.

इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोकोकलची लस

वयाच्या साठीनंतर इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोकोकलच्या जंतुसंसर्गाची शक्यता अधिक असते. म्हणूनच खालील आजार असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींनी या दोन्ही लस घेणे आवश्यक आहे.

* मधुमेह

* दम्याचा आजार

* हृदयरोगामुळे ज्यांचे हृदयाचे कार्य कमी झाले आहे

* यकृताचे आजार

* मूत्रपिंडाचे आजार

इन्फ्लुएन्झाची लस

इन्फ्लुएन्झाचे विषाणू जनुकीय बदलामुळे दरवर्षी बदलतात. त्यामुळे दरवर्षी नवीन लस उपलब्ध केली जाते. ही लस दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीस घेण्याची गरज असते.

न्यूमोकोकलची लस

ही लस दोन प्रकारची आहे. एका प्रकारच्या लसीमध्ये न्यूमोकोकल जिवाणूंचे १३ सिरोटाइप्स आहेत तर दुसऱ्या प्रकारच्या लसमध्ये २३ सिरोटाइप्स आहेत. आधी १३ सिरोटाइप्सची आणि नंतर २३ सिरोटाइप्सची लस दिली जाते. दोन्ही लसी एक वर्षांच्या अंतराने घेतल्यास न्यूमोकोकल जिवाणूंमुळे होणाऱ्या गंभीर न्यूमोनियचे प्रमाण कमी होऊ  शकते.

धनुर्वात आणि घटसर्पची लस

ज्यांनी लहानपणी धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्पची लस पूर्णपणे घेतली आहे. त्यांनी वयाच्या ६५पर्यंत दर दहा वर्षांनी ही लस घेणे आवश्यक आहे.

हार्पिन होस्टर किंवा नागिनीची लस

६० वर्षांनंतर नागीण होण्याचा धोका जास्त असतो. या आजारात मज्जातंतूंना इजा झाल्यामुळे भयंकर वेदना होतात. म्हणूनच ही लस घेणे आवश्यक असते. ज्यांची रोगप्रतिकारक प्रणाली इतर आजारांमुळे दुबळी झाली आहे, त्यांनी ही लस घेऊ  नये.