राजेंद्र श्रीकृष्ण भट

शहरात झाडे लावण्यासाठी जागा मिळणे कठीणच, पण खिडकीच्या ग्रिलमध्ये किंवा गॅलरीत विविध आकारांच्या कुंडय़ा मांडून त्यात रंगीबेरंगी फुले फुलवता येतात. नीट निगा राखल्यास फुलांनी बहरलेला आपला सज्जा लक्षवेधक ठरू शकतो. गॅलरी किंवा खिडकीत कोणती फुलझाडे लावता येतील, हे पाहू..

हॉलीहॉक : भेंडीच्या झाडासारखी उभी वाढ असणारे आणि पावसाळ्यात सहज वाढणारे हॉलीहॉक हे झाड बिया रुजवून वाढवता येते. त्याच्या बियांपासून पुन्हा रोपे तयार करता येतात.  विविधरंगी खोडांवर चिकटून येणारी, वाटी एवढय़ा आकाराची फुले खूप छान दिसतात.

पिटुनिया : अतिशय छान फुले असणारे हे झाड लटकवलेल्या कुंडय़ांतही लावता येते. ही झाडे जास्त काळ व खूप फुले देतात. बी अतिशय बारीक असते. मातीत फार खोल लावू नये.

पॅन्सी : फुले व झाडेही छोटीच असतात, मात्र फुले अतिशय आकर्षक असतात. जास्त पावसाळी प्रदेश व काळ सोडून व बाकी ठिकाणी वर्षभर लावता येतात. थंडीत जास्त बहरतात.

एक्झोरा : अनेक वर्षे टिकणाऱ्या या झाडांची पानेही सुंदर असतात. या झाडाला विविध रंगांत आणि गुच्छात वर्षभर फुले येतात व ती खूप काळ टिकतात. याची लघुरूपेसुद्धा उपलब्ध आहेत.

जास्वंद : अतिशय आकर्षक, मोठी, वेगवेगळ्या रंगांची फुले येणाऱ्या जाती उपलब्ध आहेत. भरपूर ऊन असणाऱ्या जागी जास्वंद फार छान वाढते. पाने चमकदार असतात. या झाडाला जवळपास वर्षभर फुले येतात. हवाई जास्वंदीच्या अनेक जाती मिळतात. याला मिलिबग म्हणजेच पिठय़ा ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव होतो. श्ॉम्पूच्या पाण्याची फवारणी केल्यास ही कीड नियंत्रणात राहते.