करिअरच्या वेगवेगळ्या नवीन वाटा शिक्षणक्षेत्रात रूढ होत असताना फार पूर्वीपासून प्रशासकीय सेवेसाठी तरुणांना आकर्षित करणारे क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा. प्रशासकीय सेवेत राहून व्यवस्था उत्तम राखण्यासाठी काहीतरी योगदान असावे हा हेतू घेऊन काही मंडळी स्पर्धा परीक्षांची दारे ठोठावतात. सामाजिक प्रतिष्ठा, लाल दिव्याची गाडी या सगळ्याच्या आकर्षणामुळे या स्पर्धा परीक्षा तरुणांना खुणावत असतात. खासगी क्षेत्राच्या नोकरीतील असुरक्षितता, अन्य नोकरीच्या पर्यायांविषयी असलेला माहितीचा अभाव व बेरोजगारीतून गमावलेला आत्मविश्वास मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत केली जात आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतरही तरुण काय करतात, याचा घेतलेला आढावा..

अहो म्हणूनच स्पर्धा परीक्षा देतो..

काही तरुणांना खासगी क्षेत्रात नोकरी मिळाली असली तरी अधिकार आणि सुरक्षा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सरकारी नोकरीच्या तुलनेत खासगी क्षेत्रात अधिकार फारसे मिळत नाहीत. सरकारी नोकरीत एकाच वेळी दहा ते पंधरा हजार जणांचे आयुष्य बदलण्याची संधी मिळते. ही गोष्ट खासगी क्षेत्रात होत नाही. खासगी क्षेत्रामध्ये कामाचा ताण असतोच याशिवाय चांगल्या पगाराची दुसरी नोकरी मिळाली तर लगेच पाऊले त्या नोकरीकडे वळली जातात. या कारणामुळे असे काही तरुण सरकारी सेवा आयोगाच्या परीक्षांना प्राधान्य देतात. सरकारी सेवा ही देशामध्ये चांगल्या गोष्टी घडविण्याचे साधन आहे असे वाटणारा एक वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र हा तरुण वर्ग प्रामुख्याने यूपीएसीसारख्या परीक्षांकडे वळतो. यूपीएससी परीक्षा देण्यामागे ‘अधिकार’ हे महत्त्वाचे कारण आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये नेमक्या काय काय रोजगाराच्या संधी आहेत हेही अनेकांना माहीत नसते. त्यामुळे यूपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या व्यतिरिक्त शासनाच्याच अखत्यारित येणाऱ्या अन्य पर्यायांची माहिती तरुणांना नसते. देश बदलण्याची इच्छा, खासगी नोकऱ्यांमधील असुरक्षितता या कारणामुळेही स्पर्धा परीक्षांचा पर्याय तरुण निवडत आहेत.

उद्योग क्षेत्राविषयीची असलेली जागरूकता कमी..

उद्योग क्षेत्रात काहीतरी भरीव करण्याचे धाडस अजूनही समाजात फारसे रुळलेले दिसत नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्राची जागृती होणेही समाजाकडूनही तितकेच होणे अपेक्षित आहे. इतर नोकरीच्या संधींना समाजानेही तितकी प्रतिष्ठा मिळवून देणे अपेक्षित असते. ती प्रतिष्ठाच इतर नोकरीच्या संधींना मिळत नसल्याने स्पर्धा परीक्षा देऊन प्रतिष्ठा आणि अधिकार मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा देणारा एक तरुणांचा गट हा पर्याय निवडत आहे.

नोकरी नाही..

कित्येक वर्षे नोकरी मिळत नसल्याने अपयश पचवणारा पण समाजासमोर त्याची वाच्यता होऊ नये यासाठी स्पर्धा परीक्षांचा पर्याय निवडणारे तरुणही आहेत. बेरोजगारीतून आत्मविश्वासात गमावत चाललेले तरुण स्पर्धा परीक्षा देत राहतात. कुणी विचारलेच ‘काय मग सध्या काय चाललंय’ तर निदान स्पर्धा परीक्षा देत असल्याचे सांगून प्रश्न विचारणाऱ्या समाजाला गप्प तरी बसवता येते, अशी स्पर्धा परीक्षा देण्यामागे काही तरुणांची मानसिकता आहे.

तरीही हार मानणार नाही..

एका बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीमध्ये असोसिएट या पदावर कार्यरत असलेला यशवंत देसाई सांगतो, स्पर्धा परीक्षा हे माझे सुरुवातीपासूनचे स्वप्न होते. त्यामुळे या सध्या करत असलेल्या कामाचा कंटाळा आला म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा माझा उद्देश नाही. सुरुवातीला आर्थिक गरज म्हणून आणि कालांतराने आवड म्हणून मी माझे सध्याच्या क्षेत्रातील काम आनंदाने करत आहे. मात्र शासकीय सेवेत काम करणे ही इच्छा मी फार पूर्वीपासून उराशी बाळगून आहे आणि त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. दिवसाचे तास विभागले तर अभ्यासाला वेळ काढता येतो. त्यानुसार मी अभ्यासाचे नियोजन करतो. तसेच वेळ मिळेल तेव्हा वृत्तपत्राचे व अवांतर वाचन यावर भर देतो. गेल्या चार वर्षांपासून यूपीएससीची तयारी करतो आहे आणि आतापर्यंत चार वेळा परीक्षेला बसलो आहे. त्यातील दोन परीक्षा पास केल्या आहेत.

स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करून खासगी क्षेत्राकडे वळलेली ऐश्वर्या गिते सांगते, थॉमसन रॉयटर्स या कंपनीसोबत म्हणून काम करताना स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या तयारीचा उत्तम उपयोग झाला. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच ठरवले होते की काही ठरावीक वेळा परीक्षेसाठी बसल्यानंतर पुढील करिअरचा मार्ग स्वीकारायचा. माझ्या अभियांत्रिकी शिक्षणानंतर मी ताबडतोब स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले. या तयारीत मी मुख्यत: जगभरातील दैनंदिन घटना, वृत्त यांची माहिती त्याबाबतीतील मते यांच्या वाचनावर भर दिला. मला लोकांसाठीच्या योजना, कार्यक्रम यासाठी काम करायचे होते म्हणून स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार मी केला. आज मी ज्या क्षेत्रात काम करते आहे त्या क्षेत्राने माझ्या माहितीत आणि विकासात भर टाकली आहे.

काही तरुण-तरुणांनी हे या प्रवासात हार मानणारे नाहीत. त्यांनी शिक्षणाचा घेतलेला कधीही न टाकण्याचा निर्धार या वेळी बोलून दाखवला आहे, हेही तितकेच उल्लेखनीय

ग्रामीण भागात एमपीएससी परीक्षा प्राधान्याची..

मराठवाडय़ाकडील भागात एमपीएससी परीक्षा देण्याकडे तरुणांचा जास्त कल आहे. भाषा हे त्यामागील मुख्य कारण. मराठी भाषेत ही स्पर्धा देता येत असल्याने ग्रामीण विभागातील तरुणांना त्याचा फायदा होतो. भारतीय पातळीवर स्पर्धा परीक्षा देण्याच्या तुलनेत महाराष्ट्र पातळीवर स्पर्धा कमी असते. याशिवाय ग्रामीण भागात शासकीय अधिकाऱ्यांचा आदर खूप मोठय़ा प्रमाणात असतो. या भावनेतून मुंबईच्या तुलनेत ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा देण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी तुलनेने कमी आहेत. प्रतिष्ठा नाही. या कारणामुळे स्पर्धा परीक्षा देण्याकडे तरुणांचा कल आहे.