25 January 2020

News Flash

काविळीपासून जपण्यासाठी..

यकृताच्या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे कावीळ होय.

|| डॉ. विनय थोरात, यकृतविकारतज्ज्ञ

पावसाळा आला की दूषित पाणी आणि उघडय़ावरचे अन्नपदार्थ खाण्यात आले असता होणारा आजार म्हणजे कावीळ, एवढी सर्वसाधारण माहिती आपल्याला असते. मात्र, या काविळीचे अनेक गंभीर प्रकार आहेत. बदलती जीवनशैली, आहारातील फास्टफूडचा समावेश, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे कावीळ होते. अल्कोहोलसारख्या व्यसनातून, दूषित सुईचा वापर करून काढल्या गेलेल्या टॅटूमुळेही कावीळचा संसर्ग पसरतो आणि तो जीवघेणाही ठरू शकतो. कावीळबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून २८ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड हिपेटायटिस डे’ म्हणून साजरा केला जातो.

यकृताच्या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे कावीळ होय. यकृत विकाराच्या प्रत्येक रुग्णाला कावीळ होत नाही, तसेच प्रत्येक कावीळ रुग्णाला यकृताचा आजार नसतो. त्यामुळेच यकृताच्या आजारात कावीळ का होते हे प्रथम जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी यकृताचे आजार का होतात याचा विचार प्रथम करावा. एखाद्या धडधाकट, हिंडत्याफिरत्या व्यक्तीला अचानक ताप येतो, उलटय़ा होतात. एक-दोन दिवसांत त्याचे डोळे पिवळे होतात. लघवीचा रंगही पिवळा होतो आणि त्याचा आजार कावीळ असल्याचे समजते. ही अचानक होणारी कावीळ आहे. अशा प्रकारच्या कावीळचे सर्वसाधारण कारण म्हणजे जंतुसंसर्ग हे होय. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई हे काविळीचे सर्वात सामान्य प्रकार आहेत. पिण्यात आलेले दूषित पाणी, दूषित किंवा उघडय़ावरचे पाणी वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ यांच्यामुळे कावीळ होते. दूषित पाण्यातून शरीरात गेलेले विषाणू यकृतापर्यंत पोहोचतात आणि यकृताला इजा पोहोचवतात. त्यामुळे ताप येतो, उलटय़ा होतात, अचानक होणारी ही कावीळ तितक्याच लवकर बरी होते, कारण मुळात रुग्णाचे यकृत निरोगी असते. जीवनशैलीतील बदलांमुळे यकृताचे आरोग्य बिघडल्यानेही कावीळ होण्याचा धोका असतो.

टॅटू आणि हिपेटायटिस बी

टॅटू करण्यासाठी वापरली जाणारी सुई ही ‘हिपेटायटिस बी’ची प्रमुख संसर्गवाहक ठरते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. टॅटू करणाऱ्या कलाकाराची वैद्यकीय साक्षरता अत्यल्प असते. टॅटू करण्यासाठी वापरली गेलेली सुई एकाच वेळी अनेक रुग्णांसाठी वापरली असता त्याचे काय दुष्परिणाम होतात याची कल्पना त्या कलाकाराला नसणे स्वाभाविक आहे. मात्र बाह्य़रुग्ण विभागात येणारे, टॅटू काढलेले अनेक नागरिक ‘हिपेटायटिस बी’चे रुग्ण असल्याचे निष्पन्न होते. हिपेटायटिस बी या आजाराचे गांभीर्य मोठे आहे, कारण ९० टक्के रुग्णांचा हा आजार पूर्ण बरा होतो, मात्र ज्या ५ टक्के रुग्णांचा हिपेटायटिस बी बरा होत नाही त्यांच्या शरीरात तो आयुष्यभर राहतो. त्यातून यकृताचा संसर्ग, यकृताचा कर्करोग असे अनेक धोके संभवतात.

डेंग्यू आणि कावीळ

डेंग्यू हा आजार गेल्या काही वर्षांत भारतात प्रचंड वाढत आहे. डेंग्यूमध्ये कावीळ होण्याचे प्रमाणही मोठे आहे. डेंग्यूचे विषाणू यकृताच्या पेशींवर हल्ला करतात. त्यातून कावीळ, यकृत निकामी होणे हे प्रकार घडतात. डेंग्यू आणि कावीळ यांच्या एकत्र संसर्गामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याचा संभव असतो. हिवतापामध्येही (मलेरिया) कावीळ होण्याचे प्रमाणही मोठे आहे, मात्र योग्य वेळी उपचार मिळाले असता त्यातून रुग्ण बरे होऊ शकतात.

औषधांमुळे होणारी कावीळ

वेदनाशामक गोळ्या, प्रतिजैविके (अ‍ॅण्टिबायोटिक) औषधे, एचआयव्ही, मधुमेह, क्षयरोग यांवरील काही ठरावीक औषधे कावीळ निर्माण करतात. सुमारे पंधरा टक्के रुग्णांना होणारी कावीळ औषधांमुळे होते. त्यामुळे डॉक्टरांकडे उपचारांसाठी गेल्यानंतर रुग्णाने यापूर्वी झालेले आजार, घेतलेली औषधे, नियमितपणे सुरू असलेली औषधे इत्यादी माहिती काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे. डॉक्टरपासून काहीही लपवून ठेवू नये. कावीळकारक औषधे बदलून क्षयरोग किंवा एचआयव्हीवरील उपचार पुन्हा सुरू करणे शक्य असते, मात्र त्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांमध्ये संवाद हवा.

अल्कोहोल आणि कावीळ

चार-पाच वर्षे दररोज अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तींनाही कावीळ होते. मात्र अल्कोहोल घेणे बंद केले तरी ही कावीळ आटोक्यात येत नाही. सततच्या अल्कोहोल सेवनामुळे यकृतात असलेल्या अर्धमेल्या पेशी वाचतील की नाही याचे निदान करता येत नाही. मात्र त्या वाचल्या तर रुग्ण बरा होण्याची शक्यता संभवते.

जनजागृती गरजेची

कावीळवर रामबाण उपाय जनजागृती हाच आहे. त्यासाठी प्रशासनाकडून योजना राबवल्या जाणे आवश्यक आहे. नागरिकांना होणारा पाणीपुरवठा शुद्ध, स्वच्छ आहे की नाही, विकले जाणारे अन्न स्वच्छ पाण्यात तयार होते की नाही यावर प्रशासनाचे लक्ष असायला हवे. गरीब लोक पोटापाण्यासाठी शहरात येऊन खाद्यपदार्थ विक्री करतात. ‘हायजिन’ हा विषय त्यांना माहिती असण्याची शक्यता नसते. त्यासाठी त्यांना स्वच्छतेचे निकष, त्याची गरज समजावणे ही प्रशासनाने आपली जबाबदारी मानली तर निम्मे प्रश्न सुटतील. अस्वच्छ अन्न किंवा पाण्यातून कॉलरा, टायफॉईड हे आजार पसरतात हे जसे लोकांना ज्ञात झाले आहे त्याप्रमाणे कावीळबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे.

कावीळ आणि उपाय

कावीळ झाली असता घरगुती उपाय करू नयेत. कावीळ होण्याचे कारण काय याचा शोध डॉक्टरांच्या निदानातून झाल्यावर औषधोपचार सुरू करा. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई प्रकारांतील कावीळ एक ते दोन आठवडय़ांत बरी होते, तिच्यासाठी कोणत्याही उपचारांची गरज नसते. मात्र हे निदान डॉक्टरांनीच करणे आवश्यक आहे. या प्रकारात कोणत्याही पथ्यपाण्याची गरज नाही. यकृताच्या निकामी झालेल्या पेशींचा पुन्हा विकास होण्यासाठी सर्व प्रकारचा आहार घेणे आवश्यक असते.

उपचारांपेक्षा प्रतिबंध हवा

बदलती जीवनशैली हे कावीळ आणि अनेक रोगांमागचे मुख्य कारण आहे. व्यायाम करणे, आहारातील अतिरिक्त कबरेदके कमी करणे, पुरेशी झोप घेणे, व्यसनाधीनतेपासून दूर राहणे ही निरोगी आयुष्य जगण्याची सूत्रे आहेत. तसे केल्यास अनेक दुर्धर आजारांपासून लांब राहणे शक्य आहे. आजारी पडून औषधोपचार आणि शस्त्रक्रियांवर लाखो रुपये खर्च करावे, की नि:शुल्क असलेले आरोग्यदायी बदल अंगीकारून स्वस्थ राहावे हा निर्णय प्रत्येकाच्या हाती आहे.

काविळीचे प्रकार

रक्तातून पसरणाऱ्या कावीळमध्ये हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी हे मुख्य प्रकार आहेत. रक्तसंक्रमण हे हिपेटायटिस सी होण्यामागचे मुख्य कारण होते, मात्र बदलत्या काळानुसार रक्ताची सुरक्षितता तपासणारे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे हिपेटायटिस सी होण्याचा धोका अत्यंत कमी झाला आहे. अमली पदार्थाच्या सेवनासाठी होणारा असुरक्षित इंजेक्शन्सचा वापर हेदेखील हिपेटायटिस सी पसरण्यामागील मोठे कारण आहे. विशेषत: ईशान्य पूर्व भारत आणि पंजाबसारख्या ठिकाणी कावीळचा हा प्रकार मोठय़ा प्रमाणात दिसतो. कान टोचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गनचे र्निजतुकीकरण न केल्यानेही या हिपेटायटिसचा संसर्ग पसरतो. अशा प्रकारचा संसर्ग झालेले रुग्ण अनेकदा आढळून येतात.

शब्दांकन : भक्ती बिसुरे

First Published on July 23, 2019 2:45 am

Web Title: world hepatitis day 2019 mpg 94
Next Stories
1 वजनात घट
2 आलेपाक
3 नटराजासन
Just Now!
X