|| अमित सामंत

पूर्व युरोपातील ऑस्ट्रिया, हंगेरी, स्लोव्हाकिया, सर्बिया या देशांना समुद्र किनारा नाही. पण डेन्यूब ही या भागातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. या नदीत आणि युरोपातसुद्धा झँडर मासे मोठय़ा प्रमाणात आढळतात. झँडर मासे पकडणे हा युरोपातील फिशिंग गेममधला महत्त्वाचा भाग आहे. झँडर माशाचे वजन १० किलो ते २२ किलो भरते. या माशामध्ये कमी हाडे आणि भरपूर रुचकर मांस असल्यामुळे हा मासा युरोपियन लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा

अविभाज्य भाग आहे. इथल्या मॉल्समध्ये झँडर फिश फिलेट्स मिळतात. फिलेट्स म्हणजे माशाच्या हाडाला समांतर कापलेले माशाचे तुकडे. हे तुकडे तळून किंवा बेक करून खाल्ले जातात.

स्लोव्हाकियाची राजधानी ब्राटिस्लाव्हाला डेन्यूब नदी काठच्या एका रेस्टॉरंटमध्ये झँडर फिश उत्तम मिळतात. एका डिशमध्ये बटरमध्ये तळलेला माशाच्या फिलेटचा आयताकृती तुकडा आणि सोबत उकडलेले बटाटे, गाजर, मटार आणून दिले जाते. मासा लुसलुशीत आणि चवीला चांगला असतो. त्यात काटे नसल्याने मासे खाण्याची सवय नसलेल्यांनाही तो सहज खाता येतो. युरोपच्या भटकंतीत झँडर फिश एकदा खाऊन बघायलाच हवा.