असे म्हणतात की आयुष्यात आव्हाने जरून स्वीकारावी आणि ती पेलून स्वतला सिद्ध करावे. अनेकजण आव्हाने स्वीकारण्यास तयार नसल्याची कुरबुर समाजात अनेकदा पाहायला मिळते. मात्र सध्या समाजमाध्यमांवर आव्हानांना चांगलेच पेव फुटले आहे. विविध आव्हानांचे आवाहन करण्याचा वेगळाच ट्रेन्ड समाजमाध्यमावर मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे. त्याविषयी..

काळानुसार प्रयोगशील तंत्रज्ञानाने मानवाची अनेक कामे सुखकर केली. यामध्ये इंटरनेटच्या साथीने समाजमाध्यमाचा जन्म होऊन इंटरनेट वापरकर्ते फेसुबक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टासारख्या विविध अ‍ॅप्लिकेशनकडे वळले. बहुतकाळ खिळवून ठेवून मनोरंजनात्मक असे अ‍ॅप वापरण्यास अनेक जण दिवसाचा बराच वेळ घालवू लागले. मात्र खऱ्या अर्थाने अपारदर्शक अशा या अ‍ॅप्लिकेशन चालक कंपन्यांना व्यवसाय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक बदल करावे लागले. यापैकीच एक बदल असणाऱ्या ‘चँलेज’ या सतत ट्रेन्डी राहणाऱ्या पिल्लास जन्माला घातले.

सध्याची तरुणाई असे वेगवेगळे चँलेज स्वीकारून समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे. समोरच्या व्यक्तीने दिलेले चॅलेंज (आव्हान) स्वीकारून ते पूर्ण केल्याच्या आनंदात चॅलेंज स्वीकारणारी व्यक्ती मोठी धन्यता मानते. आठवडय़ागणिक समाजमाध्यमाच्या या बाजारात विविध चॅलेंजचे ट्रेन्ड येत असून हे चँलेज मोठय़ा प्रमणावर व्हायरल होत आहेत. अशा काही अधिक चर्चिल्या जाणाऱ्या आणि तरुणांकडून केल्या जाणाऱ्या ट्रेन्डीची दखल घेतली जाते.

सुरुवातीला काही वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये आइस बकेट चॅलेंजचे पेव फुटू लागले. स्वतच्या अंगावर बर्फाच्या खडय़ांनी भरलेली बादली ओतून त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर टाकणे, असे हे आइस बकेट चँलेज. अल्पावधीतच अमेरिकेतील आबालवृद्धांपासून अनेकांनी हे चॅलेंज पूर्ण केले. अगदी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही हे चॅलेंज स्वीकारत त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर टाकली होती. भारतातही हे चॅलेंज अनेक जणांकडून करण्यात आले. मात्र शरीरासाठी अनेकदा घातक ठरू शकणाऱ्या या चॅलेंजमुळे अनेकांनी हे चॅलेंज वेगळ्या पद्धतीने करण्यास सुरुवात केली. हे नवं चॅलेंज म्हणजे ‘राइस बकेट चॅलेंज’. बर्फाच्या खडय़ाने भरलेल्या बादलीऐवजी तांदळाने भरलेली बादली स्वतच्या अंगावर ओतून घेऊन खाली ठेवलेल्या प्लास्टिकच्या चटईवर जमा झालेले तांदूळ भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना दान करणे असे हे नवे ‘राइस बकेट चॅलेंज’ प्रसिद्ध होऊ लागले. त्यानंतर महिन्यागणिक नवनवे चॅलेंज व्हायरल होऊ लागले.

बॉटल फ्लीप, योगा चॅलेंज, फिटनेस चॅलेंज यांसारखे विविध चॅलेंज अल्पावधीतच अधिक लोकप्रिय झाले आणि सध्या साडी ट्वीटर, वयोवृद्ध चेहरा दर्शवणारे फेस अ‍ॅपसारखे चॅलेंज मोठय़ा प्रमाणावर व्हायरलही होत आहेत. या सर्व चॅलेंजमध्ये एखादी व्यक्ती तिचे चॅलेंज पूर्ण करून झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला ते चॅलेंज देते. अशा प्रकारे ही चॅलेंजची साखळी सुरू राहते. त्यामुळे खऱ्या आयुष्यातले ठाऊक नाही, पण समाजमाध्यमांवरच्या ‘आव्हानांचे आवाहन’ मात्र फारच जोर धरू लागले आहेत.

युटर्न मूव्हमेंट चॅलेंज

युटर्न मुव्हमेंट चॅलेंज हे चॅलेंजच्या दुनियेतले एक स्तुत्य असे चॅलेंज म्हणावे लागेल. या चॅलेंजद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक असा क्षण इतरांशी शेअर करायचा असतो जो तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. एखादी गोष्ट करत असताना त्यात काही कारणास्तव खंड पडतो आणि ती गोष्ट तुम्हाला मध्येच सोडावी लागते मात्र पुढील काळात तुम्ही काही कारणाने पुन्हा ती अर्धवट सोडलेली गोष्ट करायला लागता. ती गोष्ट आणि ती गोष्ट पुन्हा करण्यास सुरूवात करण्यास भाग पाडणारी घटना इतरांना सांगणे म्हणजे युटर्न मूव्हमेंट चॅलेंज.

सध्या चॅलेंजची दुनिया आहे. समाजमाध्यमावर विविध चॅलेंज येत असतात. मलाही या चॅलेंजचा भाग होयला आवडत असते. मात्र कोणतेही चॅलेंज स्वीकारताना केल्या जाणाऱ्या चॅलेंजची पूर्णपणे शहानिशा करायला हवी. एखादे चॅलेंज जर आपण समाजमाध्यमावर प्रसारित करणार असू तर आपण स्वीकारलेल्या चॅलेंजचे आणि ते करण्याविषयीच्या पद्धतीचे जरूर भान असायला हवे असे अभिनेता सुयश टिळक याने सांगितले. मी काही दिवसांपूर्वी यूटर्न मूव्हमेंट चॅलेंज स्वीकारले. अनेकदा चाहत्यांना अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या आयुष्यातील यूटर्न मूव्हमेंट काय हे जाणून घ्यायला जरूर आवडत असते. मीही असाच प्रयत्न केला. समाजमाध्यमावर माझ्या आयुष्यातला यूटर्न मूव्हमेंट इतरांशी शेअर केला. या विविध चॅलेंजमुळे अनेकदा विविध आठवणी जाग्या होत असतात. चॅलेंज करताना एक वेगळाच आनंद असतो.

– सुयश टिळक, अभिनेता

टेन इयर्स चॅलेंज

तुमचा दहा वर्षांपूर्वीचा फोटो आणि दहा वर्षांनंतरचा फोटो हा एकत्रित समाजमाध्यमावरून शेअर करणे म्हणजे टेन इयर्स चॅलेंज. अतिशय सुप्रसिद्ध ठरलेले हे चॅलेंज अनेकांनी स्वीकारले होते.

बॉटल कॅप चॅलेंज

सध्या बॉटल कॅप चॅलेंज फारच लोकप्रिय होत आहे. समोर ठेवलेल्या बाटलीचे झाकण पायाने किक मारून बॉटल न पाडता उघडणे असे हे बॉटल कॅप चॅलेंज. विविध नट-नटींपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमावर प्रसारित केल्या.

बुक चॅलेंज

सात दिवस केल्या जाणाऱ्या या चॅलेंजचा स्वीकार अनेकजण करत आहेत. इतर कोणतेही चॅलेंज न स्वीकारणाऱ्या व्यक्ती हे चॅलेंज जरूर स्वीकारतात. खासकरून ज्यांना वाचनाची आवड आहे अशा व्यक्ती. या चॅलेंजमध्ये दररोज एक याप्रमाणे सात दिवस तुम्ही वाचलेल्या पुस्तकाच्या कव्हरचा (पृष्ठ) फोटो तुम्हाला इतरांशी समाजमाध्यमावरून शेअर करायचा असतो. फोटोच्या खाली पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव आणि त्या पुस्तकाविषयी अवघ्या दोन ओळीत तुम्हाला आकर्षक पद्धतीने लिहायचे असते.

हे चॅलेंज करताना एक वेगळाच आनंद आहे. मला पूर्वी इतिहासाची पुस्तके आवडायची आता मी चरित्रात्मक पुस्तके वाचण्यावर भर देतो. आणि या सर्व पुस्तकांच्या कव्हरचे (पृष्ठ) फोटो समाजमाध्यमावरून इतरांशी शेअर करण्यात एक वेगळाच आनंद आहे. बुक चॅलेंजसारखी वेगळी चॅलेंज ही वाचनसंस्कृती वाढण्यास पूरक ठरत असल्याचे शैलेश पाटील याने सांगितले.

– शैलेश दिनकर पाटील

प्रथमेश माईन या तरुणाने नुकेतच बॉटल कॅप चॅलेंज केले. समाजमाध्यमावर विविध प्रकारचे चॅलेंज करायला आवडत असून ते चॅलेंज मी करत असतो. बॉटल कॅप चॅलेंजची फारच चर्चा होती मीदेखील हे चॅलेंज स्वीकारले. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये पायाच्या किकने समोर ठेवलेल्या बॉटलचे झाकण उघडले नाही. मात्र तिसऱ्या प्रयत्नात झाकण उघडले गेले. मी त्याची चित्रफीत बनवून माझ्या मित्रांना पाठवली असे प्रथमेशने सांगितले. ट्रेन्डी असणारे एखादे चॅलेंज पूर्ण करून त्याची चित्रफीत मित्रांना दाखवणे यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. मित्रांकडूनही त्याचे कौतुक होते आणि एखादे चॅलेंज पूर्ण केल्याचे समाधान वाटत असल्याचे प्रथमेश माईन याने सांगितले.

– प्रथमेश माईन

ट्रेन्डमुळे विविध चॅलेंज स्वीकारायला आवडते. आपला एखादा दहा वर्षांपूर्वीचा फोटो आणि दहा वर्षांनंतरचा फोटो हे समाजमाध्यमावर टाकण्यात एक वेगळाच आनंद आहे. काहीसे मनोरंजनात्मक पण तितकेच जुन्या आठवणीत घेऊन जाणारे दहा वर्षांपूर्वीचे फोटो समाजमाध्यमावर टाकल्यानंतर अनेक आठवणी जाग्या करत असल्याचे वैष्णवी वैद्य हिने सांगितले.  मी काही दिवसांपूर्वी माझा दहा वर्षांपूर्वीचा आणि दहा वर्षांनंतरचा फोटो टेन इयर्स चॅलेंज म्हणून समाजमाध्यमावर प्रसारित केल्याचे तिने सांगितले.

– वैष्णवी वैद्य

संकलन- ऋषिकेश मुळे @rushikeshmule24