सध्याचे युग हे इंटरनेटचे आहे. एकीकडे इंटरनेट आपल्या दैनंदिन व्यवहारांपासून कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त ठरत असताना मनोरंजनाचे सशक्त माध्यम म्हणूनही त्याकडे पाहिले जाऊ लागले आहे. भारतासारख्या देशात गेल्या काही वर्षांत वाढलेली वेबचॅनेलची संख्या आणि लोकप्रिय होत असलेल्या वेबमालिकांचे प्रमाण पाहता अधिकाधिक प्रेक्षक ऑनलाइन मनोरंजनाकडे वळत आहेत. मात्र, अजूनही ऑनलाइन मनोरंजनाचे प्रमुख साधन स्मार्टफोन हेच आहे. बहुतांश मंडळी स्मार्टफोनवरूनच हे चॅनेल आणि त्यावरील मालिका पाहत असतात. मात्र हे ‘पर्सनल’ मनोरंजन ‘कौटुंबिक’ मनोरंजन बनवण्याची संधी देणारी अनेक साधने बाजारात उपलब्ध झाली आहेत.

टीव्हीवरून ऑनलाइन मालिका पाहण्यासाठी विविध पर्याय असतात. स्मार्ट टीव्ही, ब्लू रे प्लेअर किंवा इंटरनेटशी जोडता येणारे गेमिंग कन्सोल हे तुम्हाला ऑनलाइन मनोरंजनाचे दालन खुले करून देतात. मात्र, याहीपेक्षा स्वस्त पर्याय म्हणजे ‘मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस’. अ‍ॅमेझॉन फायर स्टिक, गुगल क्रोमकास्ट यासारख्या उपकरणांबाबत आता बऱ्याच जणांना माहिती आहे. मात्र, त्याहीपलीकडे आणखी अशी उपकरणे आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन मनोरंजनाचा लाभ घेऊ शकता. सध्या प्रचलित असलेल्या ‘मीडिया स्ट्रीमिंग’ उपकरणांत अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही, अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही, अ‍ॅपल टीव्ही, गुगल कास्ट आणि रोकू हे प्लॅटफॉर्म अग्रेसर आहेत. यातील गुगल कास्टचा अपवाद वगळता बहुतांश उपकरणांच्या माध्यमातून टीव्हीवर पाहून मेनू हाताळता येतो तसेच त्यासाठी स्वतंत्र रिमोट कंट्रोलही पुरवण्यात येतो. ‘गुगल कास्ट’च्या वापरासाठी मात्र, तुम्हाला मोबाइल, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागते. अर्थात ही सर्व उपकरणे ऑनलाइन मनोरंजनाची पुरेपूर सेवा देतात.

अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही

ऑनलाइन मनोरंजन टीव्हीवरून पाहण्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन फायर स्टिक’ हे सध्या सर्वाधिक वापरले जाणारे उपकरण आहे. अ‍ॅण्ड्रॉइडच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बदल करून विकसित करण्यात आलेल्या ‘फायरओएस’ या प्रणालीच्या माध्यमातून ‘फायर स्टिक’ काम करते. अ‍ॅमेझॉनच्या स्वत:च्या प्राइम मीडिया, इन्स्टंट व्हिडीओ आणि प्राइम म्युझिक या वाहिन्या आहेत. त्यासाठी वार्षिक सभासद शुल्क भरून या वाहिन्या पाहता, ऐकता येतात. ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील अनेक मालिका सध्या नेटिझन्समध्ये लोकप्रिय आहेत. याखेरीज नेटफ्लिक्स, यूटय़ूब, व्हीयू टीव्ही, ऑल्ट बालाजी यांसारख्या शेकडो वेबवाहिन्या डाऊनलोड करून त्या पाहण्याची सुविधाही ‘फायर स्टिक’ देते.

किंमत : ३९९९ रुपये.

गुगल कास्ट

‘गुगल कास्ट’ किंवा ‘गुगल क्रोमकास्ट’ हे ऑनलाइन स्ट्रीमिंगची सेवा पुरवणाऱ्या पहिल्या उपकरणांपैकी एक आहे. त्यामुळेच की काय, त्याची हाताळणी काहीशी गुंतागुंतीची आहे. ‘क्रोमकास्ट’चे उपकरण टीव्हीला जोडल्यानंतरही तुम्हाला मोबाइल किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातूनच ‘गुगल कास्ट’द्वारे टीव्हीवर कार्यक्रम पाहता येतात. या उपकरणाला रिमोट नाही, हाही एक तोटा आहे. शिवाय ‘क्रोमकास्ट’चे स्वतंत्र अ‍ॅपही नाही. मात्र, याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे, या माध्यमातून तुम्ही काहीही थेट ऑनलाइन पाहू शकता. किंमत : २९९९ रुपयांपासून पुढे.

‘रोकू’

‘रोकू’ स्ट्रीमिंग स्टिक प्लस हे उपकरण अजूनही भारतात फारसे वापरले जात नाही. मात्र, हे उपकरण तुम्हाला मनोरंजनाचे असंख्य पर्याय देते. या उपकरणाच्या माध्यमातून ‘रोकू चॅनेल स्टोअर’ वापरून तुम्ही हजारो वाहिन्यांचा आनंद घेऊ शकता. यात अ‍ॅमेझॉन इन्स्टंट व्हिडीओ, हुलुप्लस, नेटफ्लिक्स, स्लिंग टीव्ही आणि ट्विच यांसारख्या वाहिन्यांचाही समावेश आहे. याखेरीज बातम्या, हवामान, क्रीडा या क्षेत्रांतील घडामोडींचे अपडेटही तुम्हाला या उपकरणाच्या माध्यमातून टीव्हीद्वारे पाहता येते.       किंमत : ४९९९ रुपयांपासून पुढे.

अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही

‘गुगल कास्ट’च्या मर्यादा दूर करून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने आणलेले उपकरण म्हणजे ‘अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही’. अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही म्हणजे एक टीव्हीच असून त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. नावानुसार अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर उपलब्ध असलेले मनोरंजनाचे सर्व अ‍ॅप तुम्ही अ‍ॅण्ड्रॉइड टीव्हीवरून वापरू शकता. नेटफ्लिक्स या सर्वात लोकप्रिय वेबवाहिनीवरील मालिका ‘फोर के’मध्ये उपलब्ध करून देणारे अ‍ॅण्ड्रॉइड टीव्ही हे पहिलेच माध्यम आहे.