ट्रिपटिप्स : परदेशी चलनातील व्यवहार

परदेशातील भटकंतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पैसे खर्च करताना वापरावं लागणारं त्या त्या देशांतील चलन

(संग्रहित छायाचित्र)

आत्माराम परब

परदेशातील भटकंतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पैसे खर्च करताना वापरावं लागणारं त्या त्या देशांतील चलन. त्यासाठी आपण ज्या देशात जाणार आहोत त्यांचे चलन भारतातच रूपांतरित करून घेणे किंवा अमेरिकी डॉलर्स सोबत घेऊन संबंधित देशात गेल्यानंतर त्यांचे रूपांतर त्या देशाच्या चलनात करणे, हे पर्याय आहेत. बहुतांश देशांमध्ये रूपांतरणात अमेरिकी डॉलर्सना भारतीय चलनापेक्षा योग्य भाव मिळतो. युरोपमध्ये युरो हे चलन वापरले जाते. पण युरोपातील सर्वच देशांमध्ये ते स्वीकारले जात नाही. स्वीडन, फ्रान्स अशा काही देशांमध्ये तेथील स्थानिक चलनच वापरावे लागते. कार्डावरून व्यवहार करणे सोयीस्कर असेल तर फोरेक्स कार्ड हा उत्तम पर्याय आहे. हल्ली अनेक बँका अशा प्रकारचे कार्ड देतात. हे कार्ड प्रीपेड असल्यामुळे जेवढे पैसे त्यावर भरले असतील तेवढेच पैसे तुम्हाला वापरता येतात. ज्या देशात आपण पर्यटनास जाणार आहोत त्या देशाच्या चलनात असे पैसे भरता येतात. पर्यटनाहून परत आल्यावरदेखील त्या कार्डावर पैसे शिल्लक असतील तर ते परत भारतीय चलनांमध्ये (त्या दिवशीच्या विनिमय दरात) रूपांतरित करता येतात. असे कार्ड वापरण्याचा फायदा म्हणजे त्याचा हिशेब ठेवणे शक्य होते. आपली नेहमीची डेबिट, क्रेडिट कार्ड वापरली तर त्यावर अधिभार लागतो, तो फोरेक्स कार्डाना लागत नाही. सध्या बाजारात एक नवीन फोरेक्स कार्ड आले असून त्याद्वारे १६० देशांच्या चलनांत व्यवहार करता येतात. आणि भारतात आल्यावर भारतीय रुपयांमध्ये शिल्लक पैसे मिळवता येतात. ही खासगी सुविधा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on foreign currency transactions