शेफ नीलेश लिमये- nilesh@chefneel.com

पावसाळ्यामध्ये मासळी बाजारात फेरी मारलीत चिंबोऱ्या, शिंपले, कालवे, बोंबील हे भरपूर प्रमाणात दिसतील. आजचं शिंपल्यांचा सॅलड थोडं वेगळं आहे.

साहित्य

*  १०-१२ शिंपले

*  २ चमचे व्हिनेगर

*   ५-६ लसणाच्या पाकळ्या

*   पातीचा कांदा

*  १ टोमॅटो

*  १ सिमला मिरची

*  अर्धा ग्लास व्हाइट वाइन

*  मीठ-मिरपूड

*  १ चमचा तेल

कृती

सर्वात आधी भांडय़ात पाणी उकळत ठेवा. त्यात व्हिनेगर घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात शिंपले घाला. ५-८ मिनिटे शिजवल्यावर त्याचे कवच उघडतात. ते एका चाळणीत काढून घ्या आणि थंड पाण्याखाली गार करा. उघडलेले कवच सोलून टाका. दुसऱ्या शिंपल्यातील गर बाजूला ठेवा. लसूण ठेचून घ्या. टोमॅटो आणि सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून घ्या. कांदापात चिरून घ्या.

एका भांडय़ात तेल गरम करून त्यात लसूण, कांदा, सिमला मिरची छान परतून घ्या. सगळ्यात शेवटी शिंपले घाला. आता पॅनमध्ये जरा अवसडा म्हणजे टॉस करा. यावर मीठ-मिरपूड पेरा. आता याच भांडय़ात व्हाइट वाइन घाला. गरम भांडय़ात वाइन टाकल्यावर मस्त चर्र्र असा आवाज येईल. तोच यायला हवा. हे सॅलड गरमागरम खा किंवा थंड झाल्यावर खा. केव्हाही खाल्लं तरी झक्कास लागणार. सोबत मस्त दोस्तांची कंपनी असू द्या. लक्षात ठेवा. चवीने खाणार त्याला देव देणार!

शिंपले घेताना नेहमी काळजी घ्यावी की त्याचे कवच बंद असावे. उघडलेले शिंपले कधी घेऊ नये. शिंपल्यावरची माती स्वच्छ धुऊन घ्यावी.