दिशा खातू

वसंत ऋतूमध्ये उत्साह, जल्लोषात रंगांची उधळण करत धुळवड आणि होळीचा सण साजरा केला जातो. हा रंगोत्सव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, शत्रुत्व विसरून एकत्र येण्याचा दिवस असे म्हटले जाते. कालानुरूप रंगोत्सव खेळण्याची पद्धत बदलत गेली. रंगपंचमीचे इव्हेन्टमध्ये रूपांतर झाले. तर रंगपंचमीचे पावित्र्य लोप पावून त्याला धांगडधिंग्याचे स्वरूप आले. चुकीच्या प्रकारे वृक्षतोड केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास, रासायनिक रंगांचे प्रदूषण, फुगे मारण्याची विकृती फोफावली. या सर्व गदारोळात सणांचे पावित्र्य आणि सामाजिक भान तरुणांकडून जपले जात आहे. ही तरुणांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगोत्सव साजरा करत आहेत.

विशेष मुलांसमवेत होळीचा आनंद

मिताली नाईक आणि तिचे मित्रमैत्रिणी होळी सण अपंगत्व आलेल्या विशेष मुलांसमेवत साजरा करतात. गेल्या ४ वर्षांपासून आम्ही खास मुलांसोबत होळी खेळत आहोत. एकूण १० जण आहोत. मुंबई आणि ठाण्यातील संस्था आणि निवासी शाळांमध्ये जातो, असे मितालीने सांगितले. सुरुवातीची दोन वर्षे आम्ही सगळे एकत्र एकाच संस्थेत जात असू मग मात्र आम्ही दोन गट केले मध्य आणि पश्चिम असे. त्यात पाच-पाच जण त्यांच्या सोयीनुसार विभागले. होळीला दोन संस्थांना भेटी देतो. त्यांसाठी घरगुती गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी, लाडू वगैरे आणि रंग घेऊ न त्यांच्या सोबत खेळतो. त्यांची संस्था पाहतो, काम कसे करतात हेही पाहतो. तसेच त्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो, असे मितालीने सांगितले. त्यांनतर सायंकाळी दादरला दोन्ही गट एकमेकांना भेटतो. रंग खेळतात, खव्वयेगिरी करतात आणि मग घरी जातात. तिकडून आणलेल्या वस्तू कुटुंबीयांना होळीची भेट म्हणून देतात, तेव्हा त्यांनाही आनंद होतो.

पाण्याविना धुळवड

होळीत पाण्याचा अपव्यय होतो. राज्य दुष्काळात होरपळत असताना एकीकडे पाण्याचा होणारा अपव्यय तरुणाईला खटकतो. त्यामुळे अश्विनी आणि प्रथमेश महाले या दोघा भावंडांनी आपल्या संकुलात पाणीविना धुळवड हा उपक्रम मागच्या वर्षीपासून सुरू केला आहे. पूर्वी संकुलातील सर्वजण एकत्र येऊ न रेन डान्स, पाण्याची हौद बनवत असत, फुगे मारत होते. मात्र इतर जिल्ह्यातील लोकांकडे पिण्याचेही पाणी मिळत नाही त्यांचा विचार करून हा दोघांनी मागच्या वर्षी पासून पाणी न वापरता होळीचे आयोजन केले. नृत्य-संगीत, खेळ आणि कोरडे रंग अशा प्रकारे होळीत रंगत आणली. फक्त पाण्याचा अपव्यय करूनच धम्माल होळी खेळता येत असे नाही हे त्यांनी दर्शवून त्यामुळे आता दरवर्षी कोरडी होळी खेळण्याचा निर्णय संकुलातील सभासदांनी घेतला आहे, से अश्विनीने सांगितले.

घातक रंगांचा नाद नको

होळीसाठी वापरले जाणारे रंग हे घातक असतात. अनेकांचा त्याची इजा होते. त्यामुळे पर्यावरणस्नेही रंग ही संकल्पना पुढे आली आहे. तरुणाई अशा पर्यावरणस्नेही रंगाबाबत जास्त आग्रही आहे. माझ्या महाविद्यालयातील एका मित्राचा डोळा धुळवड खेळताना रसायनयुक्त रंग लावल्यामुळे गेला. तेव्हापासून मी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी धुळवड वेगळ्या पद्धतीने खेळायचे ठरवले, मुकुंद कुलकर्णीने म्हटले. संकुलातील धुळवडीच्या कार्यक्रमात थोडे अधिक पैसे खर्च करून पर्यावरण पूरक रंग आणले, फुगे न वापरण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्ही सर्वांसाठी चित्रकला, रांगोळी अशा रंगांशी निगडित स्पर्धा ठेवतो. यात आम्ही संकुलातील भिंती सुद्धा रंगवतो. मागच्या वर्षीपासून तर रंग बनवण्याची कार्यशाळा ठेवली होती. त्यात प्रत्येकाने स्वत: रंग बनवले होते. यंदाही असा उपक्रम राबवणार असल्याचे मुकुंदने सांगितले.

होळीची यात्रा

रंगाच्या बाजारू उत्सवात मूळ सणांची संकल्पना नामशेष होऊ  लागली आहे. तरुण मंडळींना सण त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्ट खूपदा माहितीच नसते. ती अशाच परंपरेने का साजरी होती आणि नेमकी परंपरा काय हेदेखील माहिती नसते. त्यामुळे आता तरुण पारंपरिक होळी सणाकडे वळू लागले आहेत. त्यापैकीच एक आहे, गौरव म्हापुसकर. जेव्हा त्याने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीवरील विविध ठिकाणची होळी पाहिली तेव्हा त्याला वाटले की आपल्याला आपल्या देशातील विविधतेबद्दल माहितीच नाही. त्यावेळी त्यांना त्याच्या मित्रांनी ठरवले की आपण किमान होळी तरी वेगवेगळ्या राज्यांतील रहिवाशांसह साजरी केली पाहिजे. सर्वप्रथम २०१७ सालच्या होळीला कोकणात गेलो होतो. तिकडचा शिमगोत्सव पाहता आला. मुंबईतील चाकरमानी हमखास या सणाला त्यांच्या गावी परततात. तसेच तिथल्या सजवलेल्या पालखी घरोघरी जातात आणि सायंकाळी पालखी खांद्यावर घेऊन नाचवतात ते पाहणे खूप छान असते. हा पारंपरिक नृत्यप्रकार असतो. तसेच जाकडी नृत्य करतात. काही गावकरी यानिमित्ताने घरी पूजा ठेवतात आणि त्यात खेळ ठेवतात. त्यात पारंपरिक नाटुकले, कथा, गाणी सादर करतात हे पाहण्याचा आनंद काही वेगळाच होतो, असे गौरवने सांगितले. मागच्या वर्षी कोलकाता येथे जाण्याची संधी मिळाली. तेथे लहान मुले केशरी रंगाचे कपडे घालतात, मुली केसात सुगंधी फुले-गजरा माळतात. पारंपरिक ढोल-ताशाच्या पथकासह पारंपरिक गाणी, नृत्य करत मुख्य रस्त्यांवर यात्रा काढली जाते.