दादरी दुर्घटना, पुरस्कार वापसी, रोहित वेमुला आत्महत्या आणि दलित अत्याचार आदी घटनांनी मोदींना धक्के जरूर बसले, पण प्रतिमेला फार तडे गेले नाही. कारण त्या वैचारिक लढाया होत्या आणि त्यात अंतिमत: उजवे वरचढ ठरले होते. पण नोटाबंदीचा रोकडा निर्णय थेट आम आदमीलाच भिडणारा. म्हणून तर नोटाबंदीविरुद्ध आकाशपाताळ एक करणाऱ्या राहुल गांधींनी जनतेची नस प्रथमच अचूकपणे पकडल्यासारखी वाटतीय. वाऱ्याची दिशाही किंचितशी बदलल्यासारखी वाटतीय. पण.. 

‘वाराणसी में मोदीने आरजी की खिल्ली उडाई. दूसरी ओर जौनपूर की सभा में जब मोदी मुर्दाबाद के नारे लगे तो राहुल गांधी ने उन्हें रोका. बडम कौन हुआ? मोदीजी राहुल के सामने छोटे दिखाई देने लगे हैं. शिवनगरी, कबीर और तुलसी की कर्मभूमि बनारस में पीएम ने अपने को राहुल से बहुत बौना साबित किया..’

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे ‘पप्पू’ असल्याची प्रतिमा घट्ट बनली असताना राहुल यांच्यासमोर मोदीच खुजे असल्याचे म्हणणारा हा कोण वेडगळ माणूस, असा सहज प्रश्न पडेल. पण हे कोणा येरागबाळ्याचे विधान नाही. ते आहे लालूप्रसाद यादवांचे. हेच लालू, ज्यांचा राहुल टोकाचा द्वेष करतात. हेच लालू, ज्यांचा फोन घेण्यासही राहुल तयार नसतात. हेच लालू, जे खासगीमध्ये राहुल यांची यथेच्छ टिंगलटवाळी करत असतात. अशा ‘खूँखार’ राजकारणी असलेल्या लालूंकडून एकदम राहुल यांच्या कौतुकाचे ट्वीट येऊ लागल्याने अनेकांना आश्चर्यच वाटले. लालूंच्या कौतुकाचे निमित्त होते नोटाबंदीविरोधात राहुल यांनी देशभर उडविलेल्या राळेचे.

मोदींच्या व्यक्तिगत भ्रष्टाचाराच्या बुलेटप्रूफ पुराव्यांनी ‘भूकंप’ करण्याची भाषा करून राहुलनी मोठी खळबळ उडवून दिली होती. पण प्रत्यक्षात तो फुसका बार निघाला. बिर्ला-सहारा आदी कंपन्यांवरील छाप्यांमध्ये मिळालेल्या डायऱ्यांत नवे काही नाही. याप्रकरणी प्रशांत भूषण यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने एकदा नव्हे, दोनदा भिरकावलीय. बेभरवशाच्या पुराव्यांवर चौकशीचे आदेश देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने त्यांना खडसावले. तरीही राहुल यांनी मोठा गाजावाजा करून तेच आरोप करणे हास्यास्पद होते. गंमत म्हणजे, याच डायऱ्यांवर विश्वास ठेवल्यास मोदींबरोबरच काँग्रेसचीही लक्तरे निघतील. कारण त्यात शीला दीक्षितांपासून दिग्विजयसिंहांपर्यंत अनेकांची नावे आहेत. स्वाभाविकपणे या ‘भूकंपा’नंतर डोंगर पोखरून उंदीर काढणाऱ्या राहुल यांची नव्याने थट्टा चालू झाली. आपल्या विश्वासार्हतेचे मातेरे राहुल यांनी यापूर्वीही अनेकवेळा करून घेतलंय. धरसोडपणाचा स्वभाव, कथित ‘पप्पू’पणाची खरी-खोटी उदाहरणे, राजकीय अपरिपक्वतेने चुकलेल्या निर्णयांची मोजावी लागलेली किंमत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची झालेली नीचांकी कामगिरी, काही पोरकट विधाने तर काही वेळा हास्यास्पद कृती.. असली सगळी अवसानघातकी पाश्र्वभूमी असतानाही लालूंसारख्या धूर्त, चाणाक्ष, वाऱ्याची दिशा ओळखता येणाऱ्या नेत्याने मोदींच्या तुलनेत राहुलचे तोंडभरून कौतुक करणे लक्षणीय आहे. आणि राहुल यांचे कौतुक करणाऱ्यांत लालू एकटे नाहीत. खासगीत भाजपची अनेक मंडळीही राहुल यांना हळूहळू गांभीर्याने घेऊ लागल्याचे जाणवते. भले मंत्री व खासदार त्यांची जाहीरपणे टिंगलटवाळी करीत असले तरी.. म्हणून तर राहुल काहीही बोलले तरी प्रत्युत्तरासाठी भाजपची सारी यंत्रणा धावायला लागते. विरोधकांची दखलसुद्धा न घेणे ही मोदींची खासियत. अरिवद केजरीवाल दररोज कोकलत असतात; पण मोदींनी अद्याप केजरीवालांमधील साधा ‘क’सुद्धा उच्चारलेला नाही. धोरणांच्या भाषेत याला अनुल्लेखाने मारणे असे म्हणतात. मोदी त्यात माहीर. पण अशा मोदींना वाराणसीमधील सभेत राहुल यांची दखल घ्यावी लागली. भली ती टिंगलटवाळीच्या भाषेत असेल. पण त्यांचे शब्द फार महत्त्वाचे होते, ‘एक युवक नेता हल्ली बोलायला शिकलाय..’

थोडक्यात यापूर्वी हेटाळणी करणाऱ्या राहुलना प्रतिस्पर्धी म्हणून मोदींनी प्रथमच अप्रत्यक्षरीत्या स्वीकारलंय. हे खूप महत्त्वाचं आहे. अचानकपणे राहुल किमान काही जणांना तरी गंभीर नेते वाटू लागले असतील, जर त्यांच्या नेमक्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची फौज चवताळून उठत असेल आणि सरतेशेवटी मोदीही त्यांच्याबद्दल बोलत असतील, तर याचा अर्थ काय मानावा?

किंचितसा, दुबळा.. पण तरीही लक्षणीय असू शकणारा ‘टर्निग पॉइंट’?  वाऱ्याची दिशा बदलण्यास किंचितसा प्रारंभ तर झाला नाही ना..?

अडीच वर्षांपासून मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी राहुल आणि विरोधकांनी सोडलेली नाही. दहा लाखांचा सूट असो किंवा अदानी-अंबानी असो. परदेश दौरे असो किंवा काश्मीरमधील चिघळलेली परिस्थिती असो.. मोदींना तसा फरक पडला नाही. दादरीची दुर्घटना, त्यानंतरचा असहिष्णुतेचा वाद, पुरस्कारवापसी, कन्हैयाकुमारच्या ‘आझादी’चे नाटय़, रोहित वेमुलाची आत्महत्या, गोहत्येवरून दलित अत्याचार अशा देशाला धक्का देणाऱ्या घटना घडल्या. मोदी सरकार बॅकफूटवर गेले. पण मोदींच्या प्रतिमेला फार तडे नाही गेले. या ठिकाणी दुसरे सरकार असते तर त्याची काही धडगत उरली नसती. एवढे प्रहार होऊन मोदींचा करिष्मा टिकून राहण्याची दोन मुख्य कारणे होती. एक म्हणजे, मोदी आणि आशा हे समीकरण अद्याप टिकून आहे आणि दुसरे म्हणजे २०१४च्या त्सुनामीत उद्ध्वस्त झालेल्या विरोधकांच्या विश्वासार्हतेमध्ये अजूनही प्राण फुंकले गेलेले नाहीत. विरोधकांकडे थोडी विश्वासार्हता असती आणि दमदार नेतृत्व असते तर रोहित आत्महत्या, दादरी, पुरस्कारवापसी, गोहत्येवरून दलित अत्याचारांसारख्या स्फोटक प्रकरणांनी त्यांनी मोदींच्या खुर्चीला सुरुंग लावले असते. पण हे सगळे विषय पडले वैचारिक स्वरूपाचे. आम आदमीला ते फारच मर्यादित अर्थाने भिडणारे. शिवाय वैचारिक संघर्षांच्या त्या धारदार लढायांमध्ये अंतिमत: उजवे वरचढ ठरले.

पण नोटाबंदीने लढाईचे रूपच पालटलंय. आतापर्यंतच्या लढाया वैचारिक होत्या आणि त्याच्याशी सामान्यांना फारसे देणेघेणे नव्हते. पण नोटाबंदीचा निर्णय थेट सामान्यांना भिडणारा. त्यांच्या दैनंदिन जीवनावर, पोटापाण्यांवर प्रभाव पाडणारा. आतापर्यंत पोपटासारखे नोटाबंदीचे समर्थन करणारे, स्वत:ला रांगेत उभे राहावे लागल्यानंतर नोटाबंदीविरोधात कडवटपणाने बोलू लागले. मोदींच्या ५० दिवसांची मर्यादा संपत आली असताना बँका-एटीएमसमोरील रांगा कमी होत नसल्याने संयमाचे रूपांतर तीव्र नाराजीमध्ये होऊ लागलेय. त्यातच रिझव्‍‌र्ह बँक दररोज नियम बदलत आहे. अशा वेळेला पंतप्रधानांच्या कपडय़ांप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँक दररोज नियम बदलत असल्याचे राहुल यांचे नेमके विधान अचूक लक्ष्यभेद करणारे ठरले.

४० कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून मोदींनी राहुल यांची टिंगलटवाळी केली. पण त्यावर राहुल यांची प्रतिक्रिया तितकीच अचूक होती. ‘टिंगलटवाळी जरूर करा; पण माझ्या प्रश्नाचे उत्तरही द्या,’ हे त्यांचे प्रत्युत्तर अगदी मोदींच्या ‘तटस्थ समर्थकां’नाही मनोमन पटले. त्यातूनच राहुल आपल्या अडचणी मांडत असल्याचे अनेकांना वाटू लागल्यास नवल नाही. अलीकडील त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादांमध्ये लक्षणीय भर पडल्याचे काँग्रेस सूत्रधारांचे निरीक्षण आहे. सामाजिक माध्यमांवरील प्रतिसादही उत्साहवर्धक आहे. भूसंपादन विधेयकावेळी राहुल यांनी जनतेची अचूक नाडी जवळपास पकडली होती; पण मोदींनी लगेचच माघार घेतल्याने ते हात चोळत बसले. पण नोटाबंदीवरून राहुल यांना जनतेची अचूक नाडी पुन्हा एकदा गवसल्याचे जाणवतेय.

पण यावरून लगेचच राहुल हे मोदींना आव्हान देण्याच्या स्थितीपर्यंत पोचल्याचा निष्कर्ष काढणे म्हणजे सूतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार होईल. मोदींशी आमने-सामने करण्यासाठी राहुलना खूप अंतर कापावे लागेल. मोदी कसलेले खिलाडी आहेत आणि त्यांच्यासमोर राहुल ‘आता कुठे तरी बोलायला लागलेत.’ शिवाय मोदींच्या पोतडीत अफाट गोष्टी. कधी कोणती ‘जादू’ बाहेर काढतील, याचा नेम नाही. ‘हेडलाइन मॅनेजमेंट’ तर त्यांचा हातचा मळ. एका झटक्यात शेतकऱ्यांची कर्जे माफ केली किंवा जनधन खात्यांची ‘दिवाळी’ केली किंवा प्राप्तिकरांमध्ये भरघोस सवलती दिल्यास राहुल यांना हात चोळत बसावे लागेल भूसंपादन विधेयकाप्रमाणे. याउपर त्यांची लोकप्रियता अजून शाबूत आहे आणि जनमताला (पब्लिक नॅरेटिव्ह) आपल्याला हवे तसे वळविण्याची त्यांच्यात जबरदस्त क्षमता आहे. मुंबई-पुण्यातील झंझावाती सभांमधून त्याची झलक पुन्हा एकदा दिसली.

२०१४ मधील मोदींच्या त्सुनामीत काँग्रेससह विरोधकांच्या ठिकऱ्या उडाल्या. त्यातून कोणीच नीट सावरलेले नाही. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. अशा स्थितीत (मोदी) लाटेत सापडल्यापासून हेलकावे खाणाऱ्या राहुल यांना नोटाबंदीच्या रूपाने भरभक्कम ओंडका सापडलाय. त्याला घट्ट पकडून ते (२०१९ पर्यंत) किनारा गाठू शकतील? का टपून बसलेला ‘शार्क’ राहुल यांच्या डोळ्यादेखत अचानकपणे झडप घालून तो ओंडका गिळंकृत करेल?

वाऱ्याची दिशा समजण्यासाठी आणखी वाट पाहणे अधिक श्रेयस्कर.

santosh.kulkarni@expressindia.com