वर्षांचे दिवस, दिवसांचे तास, तासातील सेकंद.. हा सारा वेळ लहान-थोर, गरीब-श्रीमंत अशा साऱ्यांच्या वाटय़ाला सारखाच येतो. असं असून एखाद्याजवळ प्रचंड वेळ असतो. डोंगराएवढी कामं तो उभी करतो. एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडतो, तर काहींना कशासाठीच वेळ नसतो. अभ्यासाला वेळ नाही. घरच्यांशी बोलायला वेळ नाही. छंद जोपासायला वेळ नाही. असं का बरं होत असावं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचं कारण एकच, वेळेचं व्यवस्थापन त्यानं नीट केलेलं नसतं. असं व्यवस्थापन करणं म्हणजेच आपण उठणार कधी, झोपणार कधी आणि जागेपणी कोणकोणत्या गोष्टी, किती वेळ करणार याचा आराखडा तयार करणं. प्रत्येकाचा आराखडा वेगळा असतो. हाती असलेल्या २४ तासांपैकी तुम्ही अभ्यासाला, विश्रांतीला, वैयक्तिक कामांना, करमणूक, छंद इत्यादींना किती वेळ देणार, हे ठोस ठरवायला हवं. यापैकी प्रत्येक गोष्टच
महत्त्वाची असते.
साधारणपणे असं म्हटलं जातं की, पहाटे वाचन, पाठांतर करावं आणि रात्री लिखाणाचा अभ्यास करावा वगैरे वगैरे. फक्त बदललेल्या जीवनशैलीत या साऱ्या जुन्या गोष्टी तंतोतंत पाळता येतातच असं नाही, पण प्रयत्न करायला हवा. ‘अभ्यास करणार’ असं नुसतं मोघम ठरवून चालत नाही, तर अभ्यास करणार म्हणजे नेमकं काय करणार- वाचणार, लिहिणार, पाठ करणार, प्रोजेक्ट पूर्ण करणार याचं निश्चित नियोजन केलेलं असावं.
सणवार, उत्सवाचे दिवस, सुट्टय़ांचा कालावधी, परीक्षा.. यावेळेस आपल्या वेळापत्रकात नक्कीच बदल होणार हे लक्षात ठेवा. म्हणूनच कोणतंही काम ‘नंतर करू’ म्हणत ते रेंगाळत न ठेवलेलंच उत्तम.
शाळा- महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवासात किती वेळ जाणार याचा आधी अंदाज घेतलेला बरा. तेवढा वेळ खरंच देणं योग्य ठरेल का, याचा विचार करा. कुणीतरी शिफारस केली म्हणून लांबचे महाविद्यालय न निवडता जवळची संस्था निवडणं श्रेयस्कर. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो. त्याखेरीज प्रवासाचा ताण, शीण व खर्च यांतूनही सुटका होते. अभ्यासात यश मिळवणं हे बव्हंशी तुमच्यावर अवलंबून असते हे लक्षात ठेवायला हवं.
वेळापत्रक बनवताना बैठे खेळ, छंद, मैदानी खेळ, योगासनं यासाठी जरूर वेळ राखून ठेवा. तन-मन तंदुरुस्त राहण्यासाठी, तणाव दूर व्हायला यामुळे मदत होते. या गोष्टी करताना जी कौशल्यं आपण शिकतो ती अभ्यासाकरताही
उपयोगी ठरतात.
टीव्ही पाहू नका असं कोणीच म्हणणार नाही, पण केव्हा पाहणार आणि कोणते कार्यक्रम पाहणार हे ठरवणं महत्त्वाचं आहे. तुमचं नजीकचं ध्येय आणि दीर्घकालीन ध्येय याच्याशी सुसंगत कार्यक्रम जरूर पाहा. पण वेगवेगळ्या मालिका, कार्टून्स, मोबाइल गेम्स यातून काय मिळणार, हे तपासा. रोजच्या बातम्या व वृत्तपत्रवाचन यासाठी जरूर वेळ द्या. जी गोष्ट टीव्हीची, तीच इंटरनेटची. कोणत्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टी एकाच वेळी करता येतात
ते पाहा.
आपल्याला दिवसभरात जी कामं करायची आहेत त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन कोणत्या गोष्टीला किती व केव्हा वेळ द्यायचा हे ठरवा. महत्त्वाच्या गोष्टी ‘प्राइम टाइम’मध्ये करा. हा प्राइम टाइम कदाचित प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. कुणाला पहाटे उठून कामं उरकण्यात उत्साह वाटतो तर कुणाला रात्री निवांतपणे काम करणं पसंत असतं. तेव्हा आपलं वेळापत्रक व ‘बॉडी क्लॉक’ लक्षात घ्या, इतरांशी तुलना करू नका किंवा इतरांची नक्कल करण्याचाही प्रयत्न करू नका.
वेळ वाचवणाऱ्या गॅझेट्सचा जरूर वापर करा, पण त्यांचा अतिवापर केल्याने तुमच्या इतर कामांवर, कौशल्यांवर तर विपरित परिणाम होत नाही ना, हे लक्षात घ्या. उदा. झेरॉक्स केलेल्या नोट्स वापरायच्या की स्वत:च्या हस्ताक्षरातील नोट्स लिहून त्याच्या सहाय्याने अभ्यास करणे श्रेयस्कर ते ठरवा.
एकच लक्षात घ्या, एकदा वाया गेलेला वेळ परत भरून काढता येत नाही. तेव्हा सतत काहीतरी करत राहा.

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on time management
First published on: 11-11-2015 at 04:14 IST