सृजनशीलता आणि नावीन्य हे दोन शब्द आजच्या काळातले परवलीचे शब्द झाले आहेत. ‘क्रिएटिव्ह-इनोव्हेटिव्ह कल्चर’ कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील असतात तर मुलांमध्ये ‘क्रिएटिव्ह थिंकिंग’ रुजवण्यासाठी शाळा आणि पालक मार्ग शोधत असतात. परस्परपूरक असलेली सृजनशीलता आणि नाविन्यपूर्णता यांचा विकास साधण्यासाठी काय करता येईल,ते पाहुयात..
सृजनशीलता म्हणजे पारंपरिक विचारापेक्षा वेगळा विचार करणं आणि नावीन्यपूर्णता म्हणजे तो विचार प्रत्यक्षात आणणं.कशातून बनतं हे ‘क्रिएटिव्हिटी’चं रसायन?  शब्दकोशातली व्याख्या सांगते, ‘प्राप्त परिस्थितीमध्ये पूर्वीपेक्षा वेगळं, स्वतंत्र आणि उपयुक्त असं काहीतरी निर्माण करणं म्हणजे सृजनशीलता.’ अभिनव (ओरिजनल) कल्पना, संकल्पना, विचार सुचणे किंवा जुन्याच गोष्टीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणे यामागे सृजनशीलता असते.
सृजनशीलता ही एक अलौकिक अशी देवदत्त देणगी आहे, ती जन्मजात असते हा एक सर्वमान्य समज. त्यात तथ्य जरूर आहे. पण सृजनशील विचार करण्याची क्षमता कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाकडे जन्मजात असते. तिची जोपासना करावी लागते. ती वापरल्यामुळे वाढते, कौशल्यात रूपांतरित होते. अर्थात, कमी वापरली गेली तर खुंटते हे ओघाने आलंच. अभिजातता आणि सहज-सोपेपणा हा सृजनशीलतेचा गाभा असतो. स्टीव्ह जॉब्सच्या सृजनशील कल्पकतेतून अ‍ॅपलने अशक्य नावीन्यपूर्ण उत्पादनं काढली. त्या वेळी ती सामान्य माणसाच्या कल्पनेतही नव्हती एवढी ती अभिजात होती.  सहजोपयोगी असल्याने ती एवढी लोकप्रिय झाली, की नंतर त्यांच्या नसण्याची कल्पनाही करता येऊ नये. सृजनशील विचार जेवढा जास्त अभिजात, उपयुक्त, तेवढी त्या गोष्टीची गरजही जास्त. या उत्पादनांसाठी आपण काही खास वेगळं केलं आहे असं जॉब्सला मात्र वाटत नाही. एके ठिकाणी त्याने म्हटलं आहे, ‘सृजनशीलता म्हणजे फक्त गोष्टींना गोष्टी जोडत जाणं एवढंच असतं. त्यात जाणीवपूर्वक काहीच केलेलं नसतं. सृजनशील माणसाला कुठलीतरी गरज आतून जाणवते आणि त्यासाठी मार्ग काढताना ते सहजपणे घडून जातं.’ खुलं मन आणि चाकोरीबाहेरचा विचार हे सृजनशीलतेचे अविभाज्य घटक. चौकटीपलीकडचा विचार करण्यासाठी मनाची दारं उघडी हवीत, तसेच विविध प्रकारचा अनुभव गाठीला हवा. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आणि क्षमता हवी. म्हणजे त्या सगळ्याच्या जोडाजोडीतून (परम्यूटेशन्स : कॉम्बिनेशन्समधून) असंख्य नवनवीन पर्याय निर्माण होऊ शकतात. कर्मठ, बंदिस्त वातावरणामध्ये ‘क्रिएटिव्ह कल्चर’ निर्माण होणं अवघड असतं कारण तिथे नव्याचा स्वीकार करणारं खुलं मन असत नाही.
आपल्या विषयातलं ‘प्रावीण्य’ असणं ही सृजनशीलतेची आणखी एक गरज. त्याशिवाय आत्मविश्वासानं चाकोरीबाहेरचे निर्णय घेता येत नाहीत. शिवाय चौकटीबाहेरचा विचार ठामपणे मांडण्यासाठी जेवढा आत्मविश्वास लागतो, तेवढंच धाडसही लागतं. पूर्वी कधी न झालेल्या प्रयोगात अपयशही येऊ शकतं, हा धोका पत्करण्याची तयारीदेखील यामध्ये येते.
अपयश किंवा वैफल्य येतं तेव्हा सृजनशीलता जास्त गतिमान होते हे एक विशेष. ‘मला हे शोधलंच पाहिजे’ ही  सृजनशील माणसाची आतून आलेली गरज-पॅशन असते, जी सृजनशीलतेमागची प्रेरणा – ‘ड्रायिव्हग फोर्स’ बनते. एक दार बंद होतं तेव्हा पुन्हा स्वतंत्र विचार करून नव्या दाराचा शोध घ्यावाच लागतो. यातून आपोआपच समस्येकडे संधी म्हणून पाहता येणं, अपयशातून नवीन शिकत पुढे जाणं हे गुणधर्मदेखील रुजत जातात. या चक्रातून प्रयत्नांचं सातत्य निर्माण होतं.
क्रिएटिव्ह कल्चर रुजण्यासाठी खूप मूलभूत प्रश्नांकडे जाण्याची सवय करणं ही दिशा असू शकते. प्रत्येक मूल जर जन्मत:च कमीअधिक प्रमाणात सृजनशीलतेची देणगी घेऊन आलेलं असेल तर नंतर ती कुठे जाते? हा एक मूलभूत प्रश्न. अगदी लहानपणी, विचार करण्याची सुरुवात जिथे होते तिथे जाऊ या. शाळेत मुलं जे सूर्योदयाचं ठरलेलं चित्र काढतात, ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि खेडय़ापासून शहरापर्यंत एकसारखंच कसं असतं? ‘माझी आई’ हा निबंध सर्वासाठी एकच  कसा लिहून दिला जातो? या प्रश्नांसोबत कदाचित सृजनशीलता कशी संपते? याचं एक उत्तर सापडेल. अशा अगदी नेहमीच्या, रक्तात भिनलेल्या गोष्टींबद्दलही जेव्हा प्रश्न पडायला लागतील, तेव्हा त्यांची उत्तरं शोधताना, सुप्त क्रिएटिव्हिटी जागी होऊ शकेल.
सृजनशीलता छोटय़ा छोटय़ा गोष्टींतूनच पुढे जाते आणि ती संसर्गजन्य असते. हळूहळू रुजत, ‘क्रिएटिव्ह कल्चर’ ही जीवनशैली बनू शकते.
नीलिमा किराणे 
neelima.kirane1@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creativity process
First published on: 12-08-2015 at 04:49 IST