विषयाची आवड म्हणून अथवा  उपयुक्ततेच्या दृष्टीने वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शिकाव्याशा वाटणाऱ्या  अभ्यासक्रमांची ओळख या साप्ताहिक सदरातून करून दिली जाईल.  कुणीही सहज करू शकतील.. अशा  काही अभ्यासक्रमांची ओळख!
देशातल्या मोबाइलधारकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या वाढत्या मोबाइलधारकांमुळे एक वेगळ्या प्रकारची संपर्कक्रांतीही आपण अनुभवत आहोत. या मोबाइल क्रांतीत वेगवेगळ्या करिअरची बीजे रोवली गेली आहेत.
यंत्र मग ते कोणतेही असो, ठराविक कालावधीनंतर त्याच्या बारीकसारीक तक्रारी सुरू होतात. मोबाइलसुद्धा याला अपवाद नाही. स्मार्ट फोनच्या बहुविध उपयुक्ततेमुळे आपण फोनवर बरेच अवलंबून असतो. अशा वेळी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण हे प्रत्येकाला उपयुक्त ठरू शकते.
अल्पशिक्षित मात्र मोबाइलच्या यंत्रणेची जाण आणि आवड असलेल्यांना याकडे रोजगार कमावण्याचे साधन म्हणूनही बघता येईल. आजही जितक्या प्रमाणात मोबाइलधारक वाढत आहेत, तितक्या प्रमाणात मोबाइल दुरुस्ती करणारे व्यावसायिक वाढत आहेत, असे मात्र दिसत नाही. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती आणि देखभाल या कामाला आजही मोठी मागणी आहे.  
मोबाइलची मूलभूत माहिती असेल आणि मोबाइल यंत्रणेला समजून घेण्याची आवड असेल तर या अभ्यासक्रमाकडे तुम्हाला नक्कीच वळता येईल. ‘मोबाइल दुरुस्ती आणि देखभाल’ नावाचे  प्रशिक्षण मुंबईच्या शासकीय मुद्रण तंत्र संस्थेने सुरू केले आहे. हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम असून तो नववी उत्तीर्ण अशा कुणालाही करता येईल. हे प्रशिक्षण सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज दोन तास दिले जाते. या प्रशिक्षणाचे शनिवार- रविवार खास वर्गही भरवले जातात.
या प्रशिक्षणात टच स्क्रीन, नोकिया, एल.जी, सॅमसंग व इतर मोबाइलच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण मिळते. सॉफ्टवेअर आणि गेम लोडिंग कसे करायचे हेही शिकवले जाते. मोबाइलधारकांना भेडसावणाऱ्या चाìजग, अनलॉकिंग, डिस्प्ले, बॅटरी, की-पॅड, पॉवर ऑन – ऑफ या समस्यांचेही निराकरण करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.  मोबाइलचे भाग बदलणे, दुरुस्ती करणे, सिमकार्ड, मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स, असेंिब्लग, डिअसेंब्ली आदी बाबीही या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
पत्ता- प्राचार्य, शासकीय मुद्रण तंत्र संस्था, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, डॉ. डी. एन. रोड, छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर, मुंबई- ४००००१.
ज्यांना अशा पद्धतीचे रीतसर प्रशिक्षण घेणे शक्य होणार नाही, त्यांनी आपल्या अवतीभवती मोबाइल देखभाल व दुरुस्ती केंद्राचा शोध घेऊन तिथे काही दिवस उमेदवारी करायला हवी. असे केल्याने या व्यवसायात शिरण्याचा आत्मविश्वास नक्कीच प्राप्त होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile repairing
First published on: 07-01-2015 at 02:02 IST