अलकनंदा पाध्ये -alaknanda263@yahoo.com          

‘‘प्रभाकर.. तुला कल्पना आहेच की, माझा अरुण पत्राच्या बाबतीत निष्काळजी आहे. तो मला पत्रच पाठवीत नाही. त्यामुळे इकडे माझा जीव टांगणीला लागलेला असतो. तू तुझ्या आईला खुशालीचे पत्र पाठवशील तेव्हा माझ्या अरुणची खुशाली सांगणारे फक्त दोन ओळींचे पत्र पाठवशील का रे?’’ जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या आईने कर्नल प्रभाकर सोमण यांना पत्राने कळवले खरे, पण ती चिठ्ठी अरुणकुमारांपर्यंत पोहोचली तेव्हा वेळ निघून गेली होती.. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सोमण यांच्या कन्या आशा सोमण फाटक यांनी सांगितलेल्या आठवणींवर आधारित..

mira road, Young college going girl, Dies, Tragic Two Wheeler Accident, accident in mira road, dies student in accident, two wheelar accident mira road, accident news,
दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

जनरल अरुणकुमार वैद्य यांची १ ऑगस्ट १९८३ रोजी भारतीय सैन्याच्या सर्वोच्च पदी म्हणजे सरसेनानीपदी नेमणूक झाली आणि अवघे भारतीय त्यातही खासकरून मराठी मन फारच आनंदून गेले होते. सगळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव चालू होता. मराठी माणसाची मान तर अधिकच उंचावली होती. पुण्याच्या एका खासगी कंपनीने आपल्या या पराक्रमी मराठी लढवय्याचे कंपनीतर्फे प्रत्यक्ष दिल्लीला जाऊन अभिनंदन करण्यासाठी एका खास माणसाची निवड केली होती.. ती व्यक्ती म्हणजे निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रभाकर सोमण.. जनरल वैद्यांचा सुमारे ४० वर्षांपासूनचा जिवाभावाचा मित्र.

मित्रासोबतच्या खूप साऱ्या आठवणींचे गाठोडे घेऊन कर्नलसाहेबांनी दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवेश केल्यापासून त्यांचे हात खिशातील एक जीर्ण पत्र पुन:पुन्हा चाचपून बघत होते. आपल्या मित्रासाठी ते पत्र म्हणजे अत्यंत अनमोल भेट ठरणार याची त्यांना खात्री होती. दिल्लीच्या दिशेने विमानाचा प्रवास सुरू झाला आणि त्यांना त्यांच्या आणि अरुणच्या मैत्रीचा प्रवास डोळ्यासमोर येऊ लागला. दोघांच्याही करिअरची सुरुवात ब्रिटिशांच्या सैन्यदलातून साधारणपणे एकाच वेळी म्हणजे १९४५ मध्ये झाली. सैनिकी शिक्षणासाठी आम्र्ड कोअर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये आठ महिने दोघेही रूममेट होते. आपसूकच मैत्रीचे बंध जुळत गेले.. उत्तरोत्तर दृढ होत गेले. दुग्धशर्करा योग म्हणजे दोघांनाही एकाच दिवशी इमर्जन्सी कमिशन मिळाले आणि त्यावरही कडी म्हणजे दोघांनाही पुन्हा एकाच रेजिमेंटला.. ‘रॉयल डेक्कन हॉर्स’ला एकाच दिवशी आणि एकत्रच पोस्टिंग मिळाले. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता तो. युद्ध अगदी निर्वाणीच्या टप्प्यावर येऊन ठेपले होते. दिवसागणिक गतिमान हालचाली वेग घेत होत्या. ब्रिटिश सैन्यातील ‘रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंट’ त्या वेळी ब्रह्मदेशात म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध युद्धात सक्रिय होती. ज्यात कर्नलसाहेब आणि अरुणकुमार प्रथमच सहभागी झाले होते.

कर्नलसाहेबांच्या डोळ्यासमोर तरळला आवेशाने पहिल्या लढाईतील स्वत:ची मर्दुमकी सांगणारा तरुण अरुणकुमार.. आयुष्यात प्रथमच शत्रूशी प्रत्यक्ष लढून संध्याकाळी त्यांच्या हार्बरमध्ये परतलेला अरुण पहिल्यावहिल्या पराक्रमाने प्रत्यक्ष अनुभवाने प्रचंड उत्तेजित झाला होता. अमेरिकन बनावटीच्या शर्मन टँकमध्ये एक छोटासा हलगनर म्हणून अरुणला पाठवल्यावर लढाईत खूप सारे शत्रू फार जवळून त्या टँकमधून प्रथमच त्याच्या नजरेस पडले होते. त्यातील कित्येकांना त्याने अचूक टिपले. ते सारे वर्णन मित्र प्रभाकरला म्हणजेच कर्नलसाहेबांना कथन करताना तो अक्षरश: तहान-भूक, वेळ-काळाचेही भान विसरला होता. युद्धातील तंत्रे, डावपेचांवर दोघांच्या तासन्सात चर्चा चालत. अरुणचा मूळचा पिंडच लढवय्याचा. म्हणूनच तर त्याच्या घराण्यातील इतरांसारखे शासकीय सेवेतील उच्चपद भूषवण्याची परंपरा त्याने मोडली होती आणि रणभूमीला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले होते. युद्धासंबंधी कुठल्याही विषयावर उत्साहाने बोलणारा, वाटेल ते साहस करायला सदैव उत्सुक असणारा अरुण एका गोष्टीसाठी मात्र प्रचंड अनुत्साही असायचा. या बाबतीत मात्र दोन मित्रांचे विचार दोन टोकांचे होते. कर्नलसाहेब युद्धभूमीवर असले तरीही कुटुंबीयांविषयी त्यांना कायम काळजी असायची. म्हणूनच ते शक्य असेल तिथून घरच्यांशी पत्राद्वारे संपर्क ठेवीत. त्याउलट अरुणला पत्रे, चिठय़ाचपाटय़ा लिहिण्याचा प्रचंड कंटाळा असे. त्यामुळे घरच्यांशी पत्रव्यवहार या विषयावर दोघांमध्ये सतत मतभिन्नता असे.

..पत्राची आठवण आल्यासरशी त्यांनी स्वत:चा खिसा पुन्हा चाचपून पाहिला.. युद्धकाळात शत्रुपक्षाकडून भारतातील रसदीचे मार्ग बंद झाल्यामुळे जवानांची पत्रे महिनोन्महिने घरी पोहोचेनाशी झाली. तसेच घरूनही काही खुशाली समजणे कठीण होऊन बसले. अशाच एका बिकट परिस्थितीत अरुणची काहीच खुशाली न समजल्याने त्यांच्या आईने फारच बेचैन होऊन कर्नलसाहेबांना पत्र पाठवले. ज्यात त्यांनी लिहिले होते की, ‘‘प्रभाकर.. तुला कल्पना आहेच की, माझा अरुण पत्राच्या बाबतीत फारच निष्काळजी आहे. तो कित्येक दिवस मला पत्रच पाठवीत नाही. त्यामुळे इकडे माझा जीव टांगणीला लागलेला असतो. तुझी पत्र लिहायची चांगली सवय मला माहितेय आहे, तेव्हा यापुढे जेव्हा केव्हा तू तुझ्या आईला खुशालीचे पत्र पाठवशील तेव्हा माझ्या अरुणची खुशाली सांगणारे फक्त दोन ओळींचे पत्र तू तरी पाठवशील का रे? जन्मभर आभारी राहीन मी तुझी.’’ एका आईच्या वेडय़ा मायेच्या आठवणीने त्यांना गलबलून आले.

दुसरे महायुद्ध संपले. भारताला स्वातंत्र्य मिळाले. दोघेही मित्र यापुढे आता भारतीय सैन्यदलातून आपल्या देशासाठी.. स्वतंत्र भारतासाठी चीन आणि पाक युद्धात पराक्रम गाजवत राहिले. मात्र दोघांच्या युद्धभूमी वेगळ्या झाल्या. दोघेही एकमेकांपासून मनाने नाही, पण शरीराने दुरावले तरीही मैत्र अतूट होते. कालांतराने प्रभाकर ले. कर्नलपदावरून निवृत्त झाले आणि जात्याच अत्यंत हुशार असा त्यांचा दोस्त अरुणकुमार कर्तबगारीच्या जोरावर सरसेनानी झाला. त्यासाठीच तर त्याचे अभिनंदन करायला ते दिल्लीला निघाले होते.

दिल्लीला पोहोचल्यावर एके काळी सहजी भेटू शकणाऱ्या अरुणना, त्यांच्या खास जिवलग रूममेटला भेटणे आता सहजशक्य राहिले नव्हते. स्वत: माजी सेनाधिकारी असूनही अत्यंत अभेद्य असे सुरक्षाकवच पार करूनच त्यांना आता अरुणना, भारताच्या सरसेनानीला भेटता येणार होते. ती व्यवस्था पाहूनच त्यांना मित्राच्या पदाच्या जबाबदारीची जाणीव झाली. त्यांच्या भव्यदिव्य कार्यालयात प्रवेश केल्यावर दोघांची नजरानजर झाली आणि त्या क्षणी.. बाजूच्या कर्मचारी वर्गादेखत अरुणकुमार त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी प्रभाकरना कडकडून मिठी मारली.. वय, हुद्दा सारे सारे त्या मिठीत विरघळून गेले. त्या स्पर्शातून दोघांनाही जाणवत होता फक्त वर्षांनुवर्षे अव्याहत चालू असलेल्या निर्लेप मैत्रीचा ओलावा, आपलेपणाची ऊब. काही क्षणानंतर दोघांनाही सभोवतालाचे भान आल्यावर प्रभाकर यांनी खिशातून जपून आणलेले जीर्णावस्थेतील ते ‘खास’ पत्र अरुण यांच्याकडे सोपवले. गोंधळून त्यांनी ते उघडले.. तेच पत्र.. जे त्यांच्या आईने प्रभाकरना पाठवलेले होते. ज्यात त्यांनी अरुणची काळजी व्यक्त करून त्याला खुशाली कळवण्यास विनवले होते. ते जीर्ण पत्र वाचताना अरुण यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव प्रभाकरना बरेच काही सांगून गेले. ते अमूल्य पत्र खिशात ठेवताना त्या निधडय़ा सेनानीचे ओलावलेले डोळे प्रभाकरच्या चाणाक्ष नजरेने अचूक टिपले. साहजिकच होते ते, कारण सरसेनानी झालेल्या लेकाचे कौतुक करायला ती माऊली आज हयात नव्हती.

जड पावलाने मित्राचा निरोप घेऊन बाहेर पडताना मित्राच्या कर्तबगारीने एकीकडे कर्नलसाहेबांचा ऊर भरून आला होता, पण त्याच वेळी देशातील तंग वातावरणाने, आजूबाजूच्या अप्रिय घटनांमुळे मित्राच्या काळजीने त्यांच्या काळजात कुठे तरी लकलकले. एका पराक्रमी आणि खंबीर सेनाधिकाऱ्याच्या चेहऱ्यामागचा माणूस मित्राच्या काळजीने आत कुठे तरी धास्तावत होता. आजूबाजूच्या सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा म्हणजेच एके काळच्या त्यांच्या सहकाऱ्यांचा निरोप घेताना, ती काळजी त्यांच्या शब्दांत, स्वरात उतरली, ‘‘सांभाळा माझ्या मित्राला..’’ असे म्हणून कर्नलसाहेब तिथून बाहेर पडले.

परंतु तसे घडायचे नव्हते. दुर्दैवाने भारताची सुरक्षा यंत्रणा त्यांच्या मित्राला सांभाळू शकली नाही. सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईसाठी शीख अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर जनरल अरुणकुमार वैद्य हे नाव अग्रस्थानी राहिले. त्यासाठी येणाऱ्या सततच्या धमक्यांनी त्यांचे मनोधैर्य मात्र कधी डळमळले नाही. सेवानिवृत्तीनंतर दिल्ली सोडून आपल्या कुटुंबासोबत निवृत्त जीवन जगण्याच्या हेतूने पुण्यात स्थायिक होऊ पाहणाऱ्या जनरल वैद्यांची खलिस्तानी अतिरेक्यांनी १० ऑगस्ट १९८६ रोजी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली. देशांतर्गत कलहाने, धार्मिक विद्वेषाने कर्नलसाहेबांच्या मित्राचा बळी घेतला होता. परकीय शत्रूपासून आपल्या देशबांधवांचे रक्षण करण्यात संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या आपल्या अतुलनीय पराक्रमासाठी एकदा नव्हे तर दोन वेळा ‘महावीर चक्र’ तसेच ‘परम विशिष्ट सेवा पदक’ मिळवणाऱ्या भारताच्या एका शूरवीर सुपुत्राचा मृत्यू एका माथेफिरूने केला होता. या जिव्हारी जखमेचा सल कर्नलसाहेबांना त्यांच्या मृत्यूपर्यंत खुपत राहिला..

chaturang@expressindia.com