News Flash

इवलीशी सहल

रिसॉर्टमधील झणझणीत झुणका-भाकरीचे जेवण आम्हाला बोलावतच होते.

सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या, अचानक ठरवून सहलीला आलेल्या,

चित्रा वैद्य

सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या, अचानक ठरवून सहलीला आलेल्या, पण देहभान विसरून गात होतो, नाचत होतो, हसत होतो, खिदळत होतो.. इवल्याशा सहलीनेच वर्षभराचा उदंड उत्साह आम्ही गाठीशी बांधला. आता दिवाळी-दसऱ्याचे पाहुणेरावळे काय किंवा नातवंडांशी खेळणे काय किंवा नवरे मंडळींचे चिवडा-भजीसकट ‘पथ्यपाणी’ सांभाळणे काय, संसाराशी दोन हात करायला आम्ही आनंदाने सज्ज झालो..

आमचा एक पंधरा-सोळा जणींचा, जिवलग अशा मैत्रिणींचा कंपू म्हणजे ग्रुप आहे. सगळ्या समविचारी, पन्नाशीच्या वरच्या, साठीच्या आसपासच्या. महिन्यातून एकदा म्हणजे दुसऱ्या बुधवारी आम्ही जिला जमेल तिच्या घरी जमतो, एखाद्या ठरवलेल्या विषयावर चर्चा करतो, माहिती मिळवतो. उगाच वायफळ गप्पा न मारता काही प्रबोधन व्हावे, ज्ञानात भर पडावी,  हा त्याच्यापाठचा हेतू. उत्साहाने आम्ही आमच्या या कंपूचे नामकरणसुद्धा केले आहे – ‘विदिशा’. विचारांना दिशा देणारी शाखा!

एकदा मात्र आमच्या विचारांनी वेगळेच वळण घेतले. आमच्यापैकी काही जणींनी सहलीला जायची टूम काढली. महिन्यातून एकदा जमतोच कुणाच्या तरी घरी, त्याऐवजी जाऊ या ना कुठे तरी जवळपासच सहलीला. पुण्याच्या आसपास निसर्गरम्य ठिकाणांची काही कमी नाही. सकाळी जायचे, दिवसभर मस्त मजा करायची, सहलीचा आनंद लुटायचा आणि संध्याकाळी आपापल्या घरी परत. सगळ्यांना ही कल्पना फारच आवडली. गौरीने लगेच पुढाकार घेतला. गिरीवनच्या रस्त्यावर एक मस्त रिसॉर्ट आहे, तिथल्या मॅनेजर तिच्या ओळखीचा होत्या. ‘ऑफ सीझन’ही होता त्यामुळे बुकिंग आणि बसची व्यवस्था पटकन झाली आणि एका बुधवारी भल्या पहाटे आम्ही विदिशाकुमारी सहलीला निघालो.

बसमध्ये बसलो आणि ‘हर हर महादेव’च्या थाटात ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘उंदीरमामा की जय’चे नारे लावत गप्पा मारायला सुरुवात झाली. एकच दिवसाची इवलीशी ती आमची सहल, पण तिचे जमवता जमवता कसे सगळ्या विदिशाकुमारींच्या नाकीनऊ येत होते हे ऐकून करमणूकच झाली. शोभाच्या घरी नेमके बुधवारीच सकाळच्या गाडीने काही कामानिमित्त तिचे थोरले दीर आणि जाऊबाई येणार असल्याचे आयत्या वेळी कळले. शोभाने मग पहाटे चार वाजताच उठून त्यांच्या सकाळच्या नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवली आणि निघाली सहलीला. निमाच्या पतीला सकाळपासूनच म्हणे ‘कसंसंच’ होत होतं. ‘‘अहो, या पंचवीस नंबरच्या गोळ्या खा आणि त्यानं बरं नाही वाटलं तर दुपारी परत दुसरा डोस घ्या. संध्याकाळी तर मी येतेच आहे ना घरी’’, निमाने त्यांची कशीबशी समजूत काढली नि निघाली सहलीला. उषाची तिसरीच तऱ्हा! ‘‘अगं, काल रात्री इतक्या उत्साहाने सहलीची तयारी करून झोपले तर मेलं कुशीवर वळताच येईना, रात्रभर तळमळत होते. पण मनाशी मात्र ठरवलं, सहलीला जायचं म्हणजे जायचं.’’ पुढच्या कोपऱ्यातल्या सीटवर, बरोबर आणलेल्या उशीवर काळजीपूर्वक पाठ टेकवत उषाने तिला सहलीचे कसे वेध लागले होते ते सांगितले. नैनाचा नातू नेमका बुधवारीच तिच्या घरी शाळेतूनच परस्पर येणार होता. तिच्या सूनबाईंनी आधीपासूनच शाळेच्या बस ड्रायव्हरलासुद्धा सांगून ठेवले होते. आता आली का पंचाईत! नैनाने मग सूनबाईंना घाबरत घाबरतच आमच्या सहलीविषयी सांगितले. ऐन वेळी सगळा कार्यक्रम बदलावा लागला, पण नैनाच्या सूनबाईंनी हसत हसत होकार दिला. दुधावरची साय अशी हलकेच सूनबाईंच्या कपात सोडण्यात आमच्या नैनाताई हुशारच आहेत! अंजलीचा पाय तर दोन आठवडय़ांपासून प्लास्टरमध्ये होता, पण सहलीचे नाव काढताच एका पायावर तयार झाली पठ्ठी. बरोबर वॉकरपण घेऊन आली बया. मी बुधवारी सहलीला जाणार ऐकून माझ्या नवऱ्याला तर हर्षवायूच झाला. ‘‘रिटायर झाल्यापासून रविवार एन्जॉय करायची मजाच खतम झाली बघ. चला आता बाकीच्या (रिकामटेकडय़ा) मित्रांना बुधवारीच घरी बोलावतो. मस्त धमाल येईल.’’ आनंदाने शीळ घालत तो घरभर फिरला. किचनमधल्या शेल्फवर ठेवलेल्या चकणा आणि चिप्सच्या पाकिटांकडे स्नेहभरी नजर टाकीत फ्रिजचे दार उघडून आत डोकावला. फ्रिजचे दार बंद करताना तर स्वारीच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी फसफसून आला होता! थोडक्यात काय तर प्रत्येक विदिशाकुमारीची, सहलीची पूर्वतयारी ही अशी न्यारी होती.

गप्पा मारता मारता रिसॉर्ट कधी आले ते कळलेच नाही. पाहता क्षणीच आम्हाला ते रिसॉर्ट, तिथला निगुतीने राखलेला बगिचा, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर सगळं खूपच आवडले. गरमागरम पोहे, खमंग बटाटेवडे, आलं घातलेला चहा असा मस्त नाश्ता आमच्यासाठी तयारच होता. मॅनेजरबाई स्वत: जातीने आमच्यासाठी हजर होत्या. त्यांचे दोन मदतनीस आमच्या सेवेसाठी अदबीने लगबग करीतच होते. त्यांच्यापैकी एकाने जवळच एक सुरेख तलाव असलेल्या रम्य जागेचे नाव सांगितले. जेवण तयार होईपर्यंत सहज तेथे जाऊन येता येईल असे त्याने सुचवल्याबरोबर आम्ही लगेच निघालो.

अध्र्या तासातच आम्ही त्या तलावापाशी पोचलो. जसजशी बस त्या ठिकाणाजवळ येत होती तसतसा हवेतला सुखद गारवा, आजूबाजूच्या हिरवळीतला ताजेपणा आणि एकूणच आसमंतातील प्रसन्नता अधिकाधिक जाणवू लागली. बस तलावापासून काही अंतरावर ड्रायव्हरने थांबवली आणि आम्ही एकेक करत सगळ्या जणी डोक्यावरच्या टोप्या सावरत उतरलो. इतका वेळ बसच्या आतमध्ये जाणवलेली प्रसन्नता आता बाहेर आल्यावर अंगात भिनू लागली! ‘‘काय मस्त वाटतंय गं इथे!’’, ‘‘पुण्याच्या खरं तर इतक्या जवळचे हे ठिकाण, पण इथल्या हवेतच इतका ताजेपणा आहे नाही!’’, ‘‘ए मला तर अगदी नाचावंसंच वाटतं.’’ सगळ्या विदिशाकुमारींचा नुसता चिवचिवाट सुरू झाला. लक्ष्मीने तर ‘पंछी बनू उडके फिरू मस्त गगनमे’ची सुरेख तान घेत स्वत:भोवती एक छानशी गिरकी घेतली. मी हलकेच तिचा हात पकडला. दुसरा हात शुभदाने पकडला आणि बघता बघता एकमेकींच्या हातात हात गुंफीत आम्ही गोल कडं केलं. अंजली वॉकरच्या तालावर दुडक्या चालीने गोलाच्या मधोमध येऊन उभी राहिली आणि एकापाठोपाठ एक, जशी आठवतील तशी मराठी, हिंदी गाणी आम्ही गाऊ लागलो. लय पकडून नाचू लागलो. आपल्याच धुंदीत गोल गोल फिरत राहिलो. त्या निळ्याशार तलावाजवळ, हिरव्यागार वनराईमध्ये फक्त आम्ही आणि आम्हीच विदिशाकुमारी होतो! सगळ्या पन्नाशीच्या पुढच्या, अचानक ठरवून अशा अडनिडय़ा दिवशी (बुधवारी) सहलीला आलेल्या, पण देहभान विसरून गात होतो, नाचत होतो, हसत होतो, खिदळत होतो. थोडय़ा दूरवर उभ्या असलेल्या आमच्या बसचा चालक तर केव्हाच ‘डाराढूर पंढरपूर’ पोचला होता.

‘इता इता पाणी, गोल गोल राणी’पासून ते ‘झिंग झिंग झिंगाट’पर्यंत एकही गाणे गायचं आम्ही शिल्लक ठेवलं नाही. अगदी पोटभर गाऊन घेतलं. नाचता नाचता केव्हा बालपणात शिरलो ते कळलेच नाही. लक्ष्मीने एके काळी शाळा-कॉलेजामधून नृत्य स्पर्धा गाजवल्या होत्या हे आताच्या तिच्या पदन्यासावरूनसुद्धा कळत होते. वंदनाने गाण्याचा रियाझ करायचे तर केव्हाच सोडून दिले होते, पण आवाजातला तो मुरलेला गोडवा, सुरांवरील ते प्रेम काही लपत नव्हते. सगळी गाणी म्हणून झाली, शेवटी कुणी तरी ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,’चा सूर लावला आणि नाचता नाचता आम्ही अगदी सपशेल दमलो. एकेक करत तेथेच हिरवळीवर एकेकीने बसकण मारली. अति श्रमाने सगळ्या जणी तेथेच पहुडल्या. डोळे अलगद मिटले गेले. पण मन आणि शरीर मात्र पिसासारखं हलकं झालं होतं. बरोबर आणलेल्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या करत थोडय़ा वेळाने आम्ही बसमध्ये चढलो. रिसॉर्टमधील झणझणीत झुणका-भाकरीचे जेवण आम्हाला बोलावतच होते.

इतका वेळ थकलेले आवाज बसमध्ये पुन्हा बोलके झाले. ‘‘काय भन्नाट नाचलो गं आपण आणि गायलोसुद्धा!’’, ‘‘किती वर्षांनी आपण असे मोकाट सुटलो. मस्त वाटतंय.’’ सगळ्यांचा कलकलाट चालू होता.

‘‘खरंच किती छान कल्पना आहे ही सहलीची. वर्षांतून एकदा तरी असे पट्टमैत्रिणींनी जमावं, जवळपासच रम्य ठिकाणी जावं आणि बेभान होऊन नाचावं-गावं, मनावरचा सगळा भार, सगळ्या काळज्या, सगळी कर्तव्ये, सगळे व्यवहार थोडा वेळ विसरून जावं आणि ताजंतवानं होऊन जावं परत आपल्या पुण्यनगरीत!’’, शोभानं मन मोकळं केलं.

‘‘हो नं! उद्या आता नातवंडांना मी सांगणार आहे आजची आपली धमाल. जमलं तर प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखवीन आपल्या दांडगाईचं’’, हातवारे करीत नैना हसत सुटली.

इवल्याशा सहलीनेच वर्षभराचा उदंड उत्साह आम्ही गाठीशी बांधला. आता दिवाळी-दसऱ्याचे पाहुणेरावळे काय किंवा नातवंडांशी खेळणे काय किंवा नवरे मंडळींचे चिवडा-भजीसकट ‘पथ्यपाणी’ सांभाळणे काय, संसाराशी दोन हात करायला आम्ही विदिशाकुमारी आनंदाने सज्ज झालो आहोत! सगळ्या जणींनी स्वत:च्या पाठीवर कौतुकाची थाप मारून घेतली..

chiitraanov@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 1:01 am

Web Title: article about picnic of 50 plus group of women
Next Stories
1 जुगारातून सुटका?
2 मराठी मुलांनी मराठीतूनच शिकावे
3 आधारवड
Just Now!
X