वेगवेगळ्या सुंदर ठिकाणांवरून प्रवास करताना, एखाद्या ठिकाणी आपली पावलं थबकावित, पावलं थबकली तेच प्रवासातलं सर्वोच्च शिखर वाटावं, असं काहीसं किशोरीताईंच्या गाण्याबाबतीत माझं झालं. त्यांचं गाणं ऐकू लागल्यानंतरचा बराच काळ असा होता की मला त्या गाण्याशिवाय दुसरं काहीच ऐकावंसं वाटत नव्हतं. हा मला माझ्याबद्दलचा नवीनच शोध होता. ‘दुसरं काही ऐकावंसं वाटत नाही’ हे सांगून मित्रमत्रिणींचा रोषदेखील पत्करला मी. ‘नकळता पाऊले मम राहिली इथे थबकुनी’ हे जाणवल्यावर दुसरं काही ऐकण्याचा प्रयत्नदेखील केला मी. परंतु तो निष्फळ ठरला आणि मी किशोरीताईंच्याच गाण्याकडे परतलो. ते गाणं ऐकल्यापासून मी त्याच स्वरांवर थबकलो आहे तो आता बहुधा कायमचाच..

थबकावं अशी अभिजातता, सकसता, अस्सलपण, भावसौंदर्य, बुद्धिचातुर्य आणि इतरही काही मोलाचं, जे शब्दांतून जाणण्यापेक्षा तो स्वर ऐकून अनुभवावं, असं आहे त्या स्वरात. काळाच्या ओघात वाहून न जाणारं, तकलादू, क्षणभंगुर नौटंकीच्या वादळवाऱ्यातसुद्धा, दीपस्तंभासारखं योग्य दिशा दाखवणारं काहीतरी चिरस्थायी आहे त्या गाण्यात. किशोरीताईंच्या भूप, यमनसारख्या सदैव दिसणाऱ्या अथांग अवकाशातच नव्हे तर मालिगौरा, हंसकिंकिणीसारख्या, अधूनमधून दर्शन देणाऱ्या अवकाशातसुद्धा मुक्तपणे विहरता येतं. हे सिद्ध स्वरांचं सामर्थ्य. अशा स्वरातला एक षड्जसुद्धा माझ्यासारख्याला आयुष्यभर पुरतो. नव्हे, पुरता नं गवसल्यानं, पुरूनही खूपसा उरतो.

१० एप्रिल, २०१४ ला त्यांच्या जन्मदिनी किशोरीताईंना भेटलो तेव्हा भेट म्हणून अत्तरं घेऊन गेलो होतो. वेगवेगळ्या सुगंधांच्या आठ – दहा कुप्यांचा संच होता तो. खरंतर मी किशोरीताईंना काय भेट देणार? आपण अत्तरं द्यावी की नाही? ‘भिविविती रे लाख शंका’ अशी स्थिती असतानाच. ‘‘हा उमेश देशपांडे. पुण्यातल्या मफलीनंतर येऊन तुम्हाला भेटला होता. ‘भेटायचं आहे’ म्हणून तुमची पूर्वपरवानगी घेऊन, पुण्याहून आला आहे.’’ अशी आठवण देत नंदिनीताईंनी किशोरीताईंना माझी ओळख करून दिली. मी किशोरीताईंना नमस्कार करून जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हिंमत एकवटून तो अत्तरांचा संचही दिलाच. मी पॅरिसमध्ये घेतलेली ती अत्तरं त्यांना दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘किती छान भेट आणलीस. मला देवघरात माझ्या देवांसाठी अत्तरं लागतातच. आता परत कधी जाणार आहेस फ्रान्सला?’’ हजरजबाबी उत्तरं देणं वगरे काही मला फारसं जमत नाही. परंतु तो दिवस औरच असावा. मी त्यांना चटकन म्हणालो ‘‘तुम्ही म्हणाल तेव्हा, खास तुमच्यासाठी अत्तरं आणायला म्हणून जाईन.’’ त्या खूश होऊन हसल्या.

अत्तराचाच संदर्भ असणारी, प्राजक्ताच्या फुलांवरची माझी एक कवितापण, मी त्या अत्तरांसोबत दिली होती. त्या कवितेचा खरं किशोरीताईंशी काही संबंध नव्हता. ती त्यांना वाचून दाखवायची माझी हिंमतही नव्हती. त्यामुळे मी ती नुसतीच अत्तरांच्या बॅगेत खाली ठेवली होती. ती लगेच इतर उपस्थितांमध्ये वाचली वगरे जाईल अशी कल्पनाही मला नव्हती. त्यामुळे नंदिनीताईंनी अचानक ती वाचायला सुरुवात केल्यावर माझ्या डोक्यात काय काय विचार आले? किशोरीताईंना कविता देतो आपण? तीदेखील त्यांच्याशी संबंधित नसलेली? काय म्हणतील किशोरीताई? रागावल्या तर?  पण विचार करेपर्यंत कविता वाचून झालीसुद्धा आणि ती बहुधा किशोरीताईंना आवडली असावी कारण त्या नुसतं ‘छान’ म्हणून न थांबता म्हणाल्या ‘‘परवा ‘कोवासजी’ ला माझं गाणं आहे. तू ये.’’ आपण आपल्या दैवताला घाबरत दिलेली भेट त्या दैवतानं स्वीकारावी, ती त्यांच्या दैवतासाठी त्यांना कशी महत्त्वाची वाटते हे सांगत आणि अशा आमंत्रणाचा कृपाप्रसाद देत आपल्यावर प्रसन्न व्हावं! ‘अवघा तो शकुन’ हाच असावा बहुधा. मी नंदिनीताईंना म्हणालो ‘‘त्या मफिलीचा पास-तिकीट कुठून घेऊ?’’ नंदिनीताई म्हणाल्या ‘‘पास, तिकीट काही नको. आलास की दरवाज्यावर सांग,  ‘किशोरीताईंनीच बोलावलंय म्हणून.’’ मी आपला ‘‘बरं, येतो आता’’ म्हणून निघालो तर नंदिनीताई म्हणाल्या ‘‘जेवल्याशिवाय जायचं नाही.’’ मी ‘‘पुण्याला जायचंय, उशीर होईल’’ वगरे कारणं द्यायचा प्रयत्न केला परंतु ‘‘किशोरीताईंच्या वाढदिवसाला आल्यावर न जेवता परतताच येत नाही’’ हे ऐकावं लागलं आणि मग नंदिनीताईंनी आग्रहानं वाढलेल्या पुरणपोळ्यांचं जेवण झालं. त्यात ‘‘तू पुणेकर असल्यामुळे पुरणपोळ्यांच्या आग्रहाला तुला नाही म्हणताच यायचं नाही’’ असा नवीनच नियम नंदिनीताईंनी लादला. (हे मुंबईकर असं उगीचच कधीही कुणाचं पुणेरीपण काढतात आणि कधी शस्त्रासारखं तर कधी ढालीसारखं वापरतात.) अर्थात ‘नाही’ काय म्हणतो म्हणा मी – हॉलमधल्या झुल्याजवळ, खुद्द किशोरीताई बसल्या होत्या, जातीनं लक्ष देत, पंगत व्यवस्थित चालू आहे ना पाहात.

जेवण आटोपल्यावर मी किशोरीताईंना नमस्कार करून निरोप घेऊ लागलो तर त्यांनी ‘‘तू काय करतोस?’’ अशी आपुलकीनं चौकशी केली. आता खरी पंचाईत. चरितार्थ चालवण्यासाठी जी नोकरी करतो त्याबद्दल कौतुकानं सांगावं असं काहीच नव्हतं. मग मी त्याबद्दल काहीच बोललो नाही. फक्त ‘‘मी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकलो आहे आणि चाली करण्याची आवड आहे’’ इतकंच सांगितलं. त्यावर ‘‘मग मला ऐकवशील चाली कधीतरी?’’ हा पुढचा प्रश्न आला. मी आपला एकाच वेळी स्वर्गात आणि पेचात. ‘‘हो ऐकवेन की’’ म्हणालो आणि निरोप घेऊन निघालो. नंतर दोन वर्षांत ध्वनिमुद्रित केलेल्या काही चाली त्यांना ऐकवाव्यात, असं वाटलं परंतु हिंमत झाली नाही.

१३ एप्रिलला, पहाटण्याआधीच मी पुण्याहून निघालो. संपूर्ण प्रवासात माझा एकच विचार चालू होता. ‘‘सकाळच्या वेळची मफल आहे. ललत, तोडी, अहीर भरव, ललत-पंचम, बिभास, गुणकली आणि इतरही काय काय चालेल. परंतु किशोरीताई, आज ‘हुसनी तोडी’ गा, प्लीज किशोरीताई, प्लीज’’. मनातल्या मनात हा जप करतच मी सकाळी सहा-साडेसहाला कुलाब्याला पोचलो.

मफल निमंत्रितांसाठीच असल्यानं एका गृहस्थांकडून दरवाज्यातच ‘‘आपण कुठून आलात?’’ ही विचारणा झाली. नंदिनीताईंची आज्ञा तंतोतंत पाळत मी म्हणालो, ‘‘मला किशोरीताईंनीच बोलावलंय’’. ते गृहस्थ म्हणाले ‘‘आपण इथे थांबा. मी विचारून येतो. मला नाव विचारून आत गेलेले ते गृहस्थ, काही मिनिटात परत आले आणि म्हणाले ‘‘या. आत येऊन बसा. थोडय़ा वेळातच मफल सुरू होईल.’’ मी हॉलमध्ये जाऊन बसलो. गॅलरीमध्ये सर्वत्र, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मध्ये काढलेले फोटो लावले होते. ते सर्व फोटो, माझी विचारणा करणाऱ्या त्या गृहस्थांनी, बिभास आमोणकरांनी काढले होते. काही वेळातच किशोरीताई आल्या. तानपुरे जुळू लागले. माझा ‘हुसनी तोडी’चा जप चालू होताच. आणि काय! खरोखरच ‘हुसनी तोडी’चीच आलापी सुरू झाली. मुळात किशोरीताईंचा स्वर आणि श्रुतींची लव लेऊन येणारं गाणं वेगळ्या जगात नेणारं. त्यात पुन्हा इतर रागांप्रमाणेच हा रागदेखील किशोरीताईंकडून ऐकण्याचा अनुभव दुसऱ्या जगात नेणारा. जिथून परतावंसं वाटूच नये अशा जगात. आपल्या मनातल्या मूळच्या निर्मळ स्वरांवर साचलेली मळभं दूर करून, त्या स्वरांना, स्वराकृतींना निरंजन करणारा. त्यात खुद्द किशोरीताईच ‘निरंजन कीज्ये’ असं आळवू लागल्यावर काय विचारता? (बंदिशीच्या या ओळी ‘निरंजन की जय’ आहेत असं नंतर वाचनात आलं. पण त्या ओळी ऐकल्यापासून, मला त्या ‘‘निरंजन कीज्ये’ वाटायच्या आणि त्यांचं ते प्रार्थनास्वरूपच मला अधिक भावायचं आणि अजूनही भावतं.)

किशोरीताईंनी मफिलीत ‘हुसनी तोडी’ गावा असं मला वाटणं आणि त्यांनी तोच राग आणि तीच बंदिश सादर करण्यासाठी निवडलेली असणं हा – टेलिपथी की काय म्हणतात तसला – प्रकार अनेकजण कधी न कधी अनुभवत असतात. परंतु तोच प्रकार आपल्या जिवीच्या गोष्टीबाबत घडला की त्याचं मोल, कसं आणि किती वर्णावं! गाणं सुरू झाल्यावर पुढचा तास-दीड तास मी आपला त्या किशोरीस्वरातून उलगडत जाणाऱ्या विश्वात ‘मन मुक्त’ विहरत होतो, निरंजन होत होतो..

मफल संपल्यावर किशोरीताईंना भेटून नमस्कार केला. मला मफिलीला बोलावल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ‘‘गाणं खूप सुंदर झालं’’, म्हणालो तर त्या म्हणाल्या, ‘‘आवडलं का?’’ त्र्याऐंशी वर्षांच्या त्या महान स्वरार्थरमणीनं माझ्यासारख्या छत्तीस-सदतीस वर्षांच्या एका सामान्य चाहत्याला हा प्रश्न विचारावा! मी ‘‘खूप आवडलं’’ या पलीकडे काय उत्तर देणार? परंतु आज थोडं सविस्तर सांगतो – किशोरीताई, तुमच्यामुळे, गाणं कसं ऐकावं? काय ऐकावं? का ऐकावं? हे समजलं. नकळत वाट चुकलेल्याला, अगदी नकळतच अलगद बोटाला धरून, योग्य वाटेवर आणून ठेवणारं, निरंजन करणाऱ्या स्वरमार्गावर नेणारं तुमचं गाणं. त्या स्वरमार्गावर निर्धास्तपणे तुमच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न करत राहायचं, त्या ‘देही असोनि विदेही’ प्रवासात खुद्द तुम्हीच ‘निरंजन कीज्ये’ अशी प्रार्थना करत असताना आमचा ‘प्राण खुळा’ त्या चिरंतन स्वरांमध्ये बुडून जाणारच. तुमचे निरंजन स्वर आम्हालाही सदैव निरंजन करत राहणार..

– उमेश देशपांडे

umesh_deshpande@yahoo.com

chaturang@expressindia.com