मुलांची समस्या ही आहे की ‘ते मुलगे आहेत’, असे एका युरोपीय मानसोपचारतज्ज्ञाने म्हटलेले आहे. ‘‘मुलग्यांबाबतचा भ्रम म्हणजे, ही पोरे टारगट, खोडकर, आडदांड असतात. ती पळापळ करणारी असतात. मोठय़ाने आरडाओरडा करतातच किंवा करणारच. एखादं कुत्रं त्यांच्याबरोबर असणार, ते सायकली दामटणार, अनेक धोके पत्करणार, हाराकिरी करणार, आणि हे सर्व ते करणारच. कारण ते मुलगे आहेत. मग या समजुतीतून वाढलेले मुलगे स्वत:विषयीच्या कल्पनेने अतिभारावलेले असतात. जिवावर बेतणारी धाडसी साहसे, त्याचबरोबर बाईक, मोटारगाडय़ा, सेक्स वगैरेंचे आकर्षण बाळगून, वरून आपण  निर्विकार असल्याचे दाखविणे म्हणजे ‘टफ-पुरुष’ असं त्यांना वाटू लागतं. त्यातून मग तो मुलगा नियम मोडणारा, शिक्षकांच्या मागे त्यांची टर उडवणारा, कुटुंबापेक्षा टवाळ मित्रांना जवळ करणारा, असा घडत जातो.’’ असे सुप्रसिद्ध अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विल्यम पोलाक यांचे म्हणणे आहे.

आपल्या ‘रिअल बॉइज’ या पुस्तकात मुलांविषयीच्या समाजाच्या अपेक्षा आणि त्यातून ‘बनलेले’ मुलगे याची सांगड घालताना ते वरील भाष्य करतात. मुलांविषयीच्या समाजाच्या अवास्तव आणि अतार्किक अपेक्षांचा एक बोजा घेऊन मुलगे वाढत असतात आणि अवाजवी मर्दानगीच्या कल्पनेमुळे पुरुषांमधील संवेदनशीलतेची घुसमट होत राहते, असे डॉ.पोलाक म्हणतात. डॉ. डॅन किंडलन आपल्या ‘रेजिंग केन’ या पुस्तकात याला दुजोरा देताना म्हणतात, ‘‘ते काय मुलगेच आहेत,’’ अशी विधाने करून मुलांचे विध्वंसक आणि उद्वेगजनक वर्तन क्षम्य करण्याचे काहीच कारण नाही. मुलगे त्यांच्या जीवनसंघर्षांला तोंड देताना पुरुष-पद्धतीचा वापर करतात, एवढेच त्यांना प्रेम, आधार व मार्गदर्शन करताना लक्षात ठेवायचे आहे. मुलांना चांगला माणूस बनायचे असते. म्हणून ‘मुलगाच तो’ अशा शेरेबाजीने त्याला चांगला बनण्यापासून मागे खेचू नका.’’ असे ते म्हणतात. पुरुष कसा असावा, त्याने कसं वागावं, याबाबत समाजात संभ्रम आहे. त्यांना दांडगटपणे वाढवलं पाहिजे, असं ठरवून पिढय़ान्पिढय़ा मुलगे वाढविले गेल्यामुळे, तो जणू एक अलिखित ‘बॉयकोड’ (मुलग्यांसाठीची वर्तन-संहिता) बनून गेलेला आहे.

अशा या ‘बॉयकोड’ने मानवी जीवनात प्रवेश केव्हा केला असावा, हे समजण्यासाठी आपल्याला अतिप्राचीन समाजव्यवस्थेवर थोडा दृष्टिक्षेप टाकावा लागतो. पितृत्व अनेक शतके मानवी जीवनात अज्ञात असल्यामुळे, प्रथमत: मातृ-गण संस्कृती जगभर होती हे आता मान्य झालेले संशोधन आहे. मातृगणामध्ये एकीकडे मातांबरोबर राहणारे मुलगे आणि दुसरीकडे, या गणव्यवस्थेला झुगारणारे आणि गणाबाहेर साहसी, स्वैर, संघर्षमय जीवन, स्वतंत्र टोळ्या निर्माण करून जगण्याची आवड असणारे मुलगे म्हणजेच पुरुष, असा हा पुरुषवर्ग दोन गटांत विभागलेला दिसतो. पण स्त्री-वर्गात, मूल हवे असणाऱ्या स्त्रियांचे गण आणि मूल नको असणाऱ्या स्त्रियांच्या स्वैर टोळ्या असे दोन तट आपल्याला कोणत्याच काळात आढळत नाहीत. स्त्री व पुरुष यांच्यामध्ये हा फरक असण्याचे कारण म्हणजे, मातृत्व भावना ही स्त्रियांमध्ये जन्मजात असणारी भावना आहे. स्त्री माता होवो वा न होवो, मातृत्व भावनेचा तिच्यामधील परिपोष हे तिच्या ठायीचे प्राकृतिक वरदान आहे. त्यानुसार ती जन्मत:च शरीररचना, मेंदूची जडणघडण, हार्मोन-पातळ्या यामध्ये तरतुदी घेऊन येते. याउलट पुरुषाला ‘पितृत्व’ माहीत करून घेतल्यानंतरच पितृभावना निर्माण होते आणि मग पित्याची सहृदयता त्याला प्राप्त होते. या पितृस्थानापर्यंत पुरुषाला नेण्यासाठी, आणि ते पितृत्व त्याला निभावता येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संवेदनेच्या संस्कारांची सुरुवात पुरुषाच्या बालवयापासून होणे, आपल्या पूर्वजांना आवश्यक वाटले असावे.

जैविक पितृत्व ज्ञात झाल्यानंतर, रानटी जीवनातील टोळीग्रस्त पुरुषाचा हिंस्रपणा, क्रौर्य कमी करण्यासाठी त्या काळातील जमातींना पुरुषांवर पितृत्वाचे संस्कार करण्यासाठी कोणते व किती प्रयास पडले, त्याची उदाहरणे संशोधक मलिनोव्हास्की आपल्या ‘दि सेक्सुअल लाइफ ऑफ सवेजेस’ या पुस्तकातून देतो. मानवी जीवनाचा पहिला कालखंड हा अशा प्रकारे पुरुषावर पितृत्वाचे संस्कार करण्यात गेला असेल, पण नंतरच्या पिढीत जन्म घेणारे मुलगे, पुढे पितृत्व स्वीकारणार आहेत, हे समजून पित्याचे ममत्व आणि त्याचे कणखर पुरुषत्व याचा कुठे तरी मेळ घालण्याचे प्रयत्न तत्काळात मुलांबाबत सुरू झाले असावेत. शिकार व शत्रुसंघर्ष ही कामगिरी पूर्वीप्रमाणे पुरुषाला करता यावी म्हणून त्याचा कणखरपणा, धाडस व साहसीपणा जपणे हे मानवी-संस्कृतीला महत्त्वाचे होते. पण त्याचबरोबर तो जबाबदार, प्रेमळ पिता म्हणूनही हवाच होता. अर्थात, या दोन्हींचा मेळ घालण्याचा मानवी संस्कृतीचा प्रयत्न म्हणजेच ‘बॉयकोड’! परंतु प्रत्यक्षात हा ‘बॉयकोड’ प्रेमळ पितृत्वाकडे कमी झुकलेला आणि अवाजवी मर्दानगीवर जास्त भर देणारा असा होत गेला, अशी तक्रार डॉ. पोलाक करीत आहेत.

मानवी जीवनाच्या बौद्धिक, भौतिक प्रगतीनुसार बदलताना स्त्री-पुरुषांना स्वत:ची वर्तनमूल्ये बदलावी लागली. त्यातही टोळीप्रिय पुरुषामध्ये ‘माणूस’ म्हणून करावे लागणारे बदल, विशेष प्रयत्नाने घडवावे लागले आणि आजही ती गरज कायम आहे. त्या तुलनेत मानवी संवर्धनाशी जिची शारीरिकता जोडलेली आहे, अशा स्त्रीमध्ये भौतिक बदलांनुसार होणारे मानसिक बदल हे त्या मानवी-संवर्धन, संगोपनाला जोडून होत राहिले. म्हणून, शेकडो शतकांतून बदलत गेलेली स्त्री, आपल्या अपत्याला आजही समर्पित असते. पण अपत्याचा पितृसहवास हा त्या अपत्यासाठी आणि पुरुषासाठी किती उपयुक्त आहे, हे पुरुषावर ठसविण्याचा प्रयत्न आजदेखील इतक्या शतकांनंतर करावा लागतो.

शेवटी पितृभावना ही पुरुषाला ‘मनुष्यत्वाकडे’ नेणारी एक आशा आहे. ती भावना त्याच्या सहृदय व्यक्तिमत्त्वाचा एक हिस्सा असतो. माणसाचे हे व्यक्तिमत्त्व घडविण्यात हार्मोन्सचा मोठा वाटा असतो. स्त्री-पुरुषातील टेस्टस्टेरोन हे हार्मोन दोघांना एकूण ऊर्जा देणारे हार्मोन आहे. ही ऊर्जा बाहेर पडताना धाडस, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, सत्ताकांक्षा, कणखरपणा, जोश-उत्साह, आत्मविश्वास, आक्रमकता, अहंकार, ईर्षां, विजयाची भावना, सूडभावना, आव्हानप्रवृत्ती, बेपर्वाई, उतावीळपणा अशी विविध रूपे ती धारण करते. पुरुष ही विविध रूपे स्त्री-तुलनेत जास्त वेळा आणि तीव्रतेने दाखवतो, कारण त्याच्यामध्ये टेस्टस्टेरोन हार्मोन स्त्रीपेक्षा बऱ्याच प्रमाणात जास्त असते.

याचा अर्थ, ‘बॉयकोड’ ठरवताना पुरुषाच्या शरीरघटनेनुसार असणारे, मूळ पुरुषी-गुणधर्म ( स्त्रीच्या मातृधर्माप्रमाणे) ‘बॅकग्राऊंडला’ राहणारच आहेत, हे पहिल्याप्रथम लक्षात घ्यावे लागेल. अर्थात पुरुषांमधील आक्रमकता पूर्णत: जाईल अशी अपेक्षा व्यर्थ आहे. त्याचबरोबर पुरुषी-कणखरता किंवा त्याचे धाडस, हे संकटांचा सामना करण्यासाठी मानवी जीवनात उपयुक्तही आहे. म्हणून मग पुरुषांमधील ही आक्रमकता नियंत्रणात कशी राहील, ही ‘बॉयकोड’ची महत्त्वाची जबाबदारी ठरते. याकरिता मुलाचा आक्रमकपणा एका बाजूला वाढणार नाही, असं भवतालिक वातावरण व संस्कार हवेत आणि दुसरीकडे किमान आक्रमकता व साहसी कृत्यं करण्याचा प्रयत्न तो करणारच आहे, हे गृहीत धरावं लागेल. मग त्याच्या अशा साहसाच्या परिणामांची त्याला जाणीव करून देऊन, त्या ऊर्जेला त्याला बाहेर टाकता येईल, अशा सुरक्षित शारीरिक साहसी कसरती, सर्व प्रकारचे मैदानी खेळ, जिमपार्कचा नियमित वापर, एरोबिक्स व्यायामपद्धती, तालबद्ध नृत्य-वाद्य शिक्षणाला प्रोत्साहन, कुस्तीस्पर्धाना वाव, बॉक्सिंगचा सराव वगैरेंमध्ये मुलांच्या शारीरिक ऊर्जेला गुंतवणे आवश्यक आहे. जेव्हा मुलांना मैदानं उपलब्ध नसतात किंवा पालक त्यांना तिथे आवर्जून नेत नाहीत, तेव्हा मुलगे घरात काही मोडतोड करून, त्रागा करून किंवा शेजारी मित्रांशी मारामाऱ्या करून ती ऊर्जा बाहेर टाकू पाहतात.

डॉ. किंडलन म्हणतात, ‘‘मुलांना हिंमत म्हणजे काय, असा प्रश्न विचारला तर ते शौर्याच्या गोष्टी बोलू लागतात. आपल्यापेक्षा शरीराने अवजड असणाऱ्या व्यक्तीची भीती न बाळगता त्याला जमीन दाखवता येणं म्हणजे ‘हिंमत’, अशी व्याख्या लोकप्रिय चित्रपटांतून दाखवली जात असते. ज्याला कधी कुणाचं भयच नाही तो हिंमतबाज, अशी मुलांची समजूत असते आणि तसं बनण्याचा ते प्रयत्न करीत राहतात.’’ असं निरीक्षण

डॉ. किंडलन नोंदवितात. ‘हिंमत’ शब्दाला इंग्रजीत ‘करेज’ असा शब्द आहे. त्याबाबत मार्क ट्वेन हा विचारवंत म्हणतो, ‘‘करेज म्हणजे भीतीशी सामना करण्याची क्षमता, करेज म्हणजे भीतीवर मात करता येणं. पण ‘करेज असणं’ म्हणजे ‘भीतीच नसणं’, ही समजूत चुकीची आहे.’’ स्वत:ला हिंमतबाज समजणारेही मनातून घाबरत असतात. हे आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे.

‘दि जेनेटिकल हॅण्ड’ या पुस्तकाचे ऑस्ट्रेलियन लेखक डॉ. क्रेग हेसल म्हणतात, ‘‘आपले भोवताल, अनुभव, आठवणी हे आपल्या जीन्सच्या व्यक्त (एक्स्प्रेस) होण्यावर परिणाम करीत असतात आणि त्यातून न्युरोट्रान्समीटरचे निर्माण होत राहते. न्युरोट्रान्समीटर ही केमिकल्स आहेत, ज्याद्वारे ब्रेन-सेल्स (न्युरोन्स) एकमेकांशी संवाद-संपर्क करतात. गर्भाशयातील घडामोडी, जन्मानंतरचे संगोपन, जीवनातील बऱ्या-वाईट घटना यामुळे या न्युरोट्रान्समीटरमध्ये बदल होत असतात. मेंदूच्या ज्या अमिग्दल भागातून मानवी भावनांचे नियंत्रण होत असते, तो ‘ओव्हर स्टिम्युलेट’ झाल्यास त्याचा मेंदूमधील आकार वाढतो.’’ असे डॉ. हेसल म्हणतात, ते इथे महत्त्वाचे अशासाठी की, बालपणी ओढवणारी बरी-वाईट परिस्थिती आणि त्या परिस्थितीत बालकावर होणाऱ्या संगोपन-संस्काराचे सातत्य हे दोन्ही, ज्या अर्थी व्यक्तीच्या न्युरोट्रान्समीटरमध्ये बदल आणून, जीन्सचे कोडिंग व मेंदूमध्ये काही दूरगामी आणि मूलगामी फरक घडवू शकतात, त्या अर्थी बालमनावर होणारे संस्काराचे व परिस्थितीचे परिणाम पूर्ण दुर्लक्षिण्याइतकेही कमी महत्त्वाचे नाहीत, हे लक्षात येते. थोडक्यात, पुरुषातील अंगभूत आक्रमकता कमी पातळीवर राहण्यासाठी, त्याचे संगोपन ‘मुलगा’ म्हणून कठोरतेने आणि बेफिकिरीने न होता, ते जाणीवपूर्वक ममतेच्या संस्कारातून सातत्याने व्हायला पाहिजेत, असा त्याचा अर्थ आहे आणि ‘बॉयकोड’कडून ती अपेक्षा आहे.

मुलाला ‘पुरुष’ बनविण्याचा ध्यास तसा मुलगे वयाने दोन-तीन वर्षांचे झाल्यापासून आपल्याकडे असतो. मुलाने दंगामस्ती करणं, उंचावरून साहसी उडय़ा मारणं, मोडतोड करणं याचं माता-पिता, आजी-आजोबा यांच्याकडून ‘तो मुलगा’ म्हणून सर्वादेखत कौतुक होत असतं आणि या त्यांच्या पाठिंब्यामुळे, लहान मुलगे असा आडदांडपणा अजाणतेपणी सातत्याने करीत राहतात. त्यातून पुढे त्यांनी आरडओरडा करणं, उद्धट उत्तरे देणं, वडीलधाऱ्यांना न जुमानणं, स्वत:ला सिद्ध करण्याच्या भरात दुसऱ्याला कमी लेखणं, संयम गमावणं, जिवावर बेतणारं धाडस करणं आणि त्यातून आपल्या ताकदीची प्रौढी मिरविणं. अशा चढत्या क्रमाने मुलगा ‘पुरुष’ म्हणून वाढतो. मुलाला ‘अशा प्रकारे’ वाढवण्याबाबत डॉ. पोलाक नापसंती व्यक्त करीत आहेत. वास्तविक मुलाने समजूतदार वर्तन दाखविल्यास त्याचं आवर्जून कौतुक होणं आवश्यक आहे. मुलाच्या वेदनेकडे, भीतीकडे दुर्लक्ष केले तर तो ‘टफ’ बनेल अशीही समजूत आहे. मुलीच्या दुखापतीबाबत धावपळ केली जाते आणि मुलाकडे तितकेसे लक्ष दिलं जात नाही. तो रडू लागला, घाबरू लागला तर त्याचे ‘हसं’ केलं जातं. त्याची तुलना मुलीबरोबर केली जाते आणि काही कळण्यापूर्वीच लहान मुलगे आपल्या भावना दडपायला शिकतात, आपलं दुखणंखुपणं लपवू लागतात आणि पुढे ‘मर्द’ कल्पनेचे खोटे मुखवटे चढवून त्यांना ‘पुरुष’ बनावं लागतं. मग भविष्यात जिथे त्यांनी हळुवारता दाखवायला पाहिजे, जुळवून घेतलं पाहिजे, त्याबाबत त्यांना संकोचाची किंवा वर्चस्वाची भावना ग्रासून राहते. उलट पुरुषाने जिथे-तिथे कठोरता प्रदर्शित करणं म्हणजेच आदर्श पुरुषत्व असा भ्रम तयार होतो. वास्तविक, मुलांना संवेदनशील बनवण्यासाठी त्यांच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून त्यांना लहान मुलं सांभाळण्याचं काम देता येतं. जवळच्या वृद्ध लोकांच्या मदतीसाठी त्यांना पाठवता येतं, छोटय़ा घरकामात मदतीला घेता येतं, इथे वडिलांची घरकामातील भागीदारी मुलग्यांसाठी फार महत्त्वाची ठरते. पाळीव प्राण्याच्या जोपासनेतूनही मुलग्यांमध्ये जबाबदारीची जाणीव आणि सेवेची आवड, ममत्व निर्माण होत असते.

ममत्व भावनेबाबत अलीकडील काळात बरंच लिहिलं गेलं आहे. अमेरिकन बायोलॉजिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट डॉ. थेरेसा क्रेन्शावच्या म्हणण्यानुसार, ‘‘ममत्व, संवेदना आणि प्रेमभावना निर्माण करणारे हार्मोन ‘ऑक्सिटोसिन’ हे असून, दोन व्यक्तींच्या स्पर्शामधून मेंदूला संदेश जाऊन, मेंदूकडून ते रक्तात सोडलं जातं. म्हणून जन्मल्यावर मातेचा ममत्वाचा स्पर्श बालकाला मिळणं हे महत्त्वाचं असतं. तो जितका जास्त मिळेल, त्यावरून बालकाच्या ऑक्सिटोसिन हार्मोनची भविष्यातील कृतिशीलता ठरते.’’ याबाबत, डॉ. विल्यम पोलाक म्हणतात, ‘‘माता आणि तिचं ममत्व हे मुलाच्या जीवनात मुलीच्या जीवनाइतकीच महत्त्वाची कामगिरी बजावीत असतं. मुलाच्या भावनिक जीवनात सर्वाधिक गुंतलेली त्याच्या आयुष्यातील पहिली स्त्री ही त्याची माता असते. तिच्या प्रेमाने मुलगे दुर्बळ बनण्याऐवजी, ते प्रेम मुलाला प्रत्यक्षात मानसिक-भावनिक कणखर (स्ट्राँग)बनविणारे असते. त्याला अवलंबित करण्याऐवजी माता हा मुलासाठी सुरक्षेचा मजबूत पाया असतो, ज्याच्या भरवशावर मुलगे, बाहेरील जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मुलगा हा ‘मुली’सारखा बनणार नाही, याची ती काळजी घेते. त्याचे पुरुषत्व, त्याचा मानसन्मान आणि चारित्र्य घडविण्याची क्षमता मातेमध्ये असते. ज्यामुळे स्वत:ला पुरुष म्हणून अनुभवताना, मुलाला आत्मविश्वास वाटतो. मात्र तरीही मातेच्या प्रेमाने तो ‘मम्माज बॉय’ बनेल या भीतीने कुटुंबीय आणि समाज त्याला सहा-सात वर्षांपासूनच मातेपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत अयोग्य आहे,’’ असं ते म्हणतात. अशा प्रकारे सात वर्षांपासून ते १४ वर्षांपर्यंत मुलग्यांवर त्यांच्या मातेपासून लादलेलं तुटलेपण ही त्यांच्या आयुष्यातील कायमस्वरूपी कमतरता बनून राहते. दुसऱ्याला जोडून घेण्याची, तडजोड करण्याची क्षमता मातेकडून शिकण्याची, त्यांची त्या वयातील संधी ते अशा पद्धतीच्या चुकीच्या व पारंपरिक ‘बॉयकोड’च्या कल्पनेमुळे गमावून बसतात. त्यातून पुढे आपली माता, बहिणी, मैत्रिणी आणि पत्नी यांच्याकडून होणाऱ्या भावनिक परिपोषणाचं महत्त्व पुरुषाला समजता येत नाही.

मातेप्रमाणं पित्याचंही मुलांच्या जीवनातील महत्त्व सांगताना, ‘ब्रिंगिंग अप बॉइज’ या पुस्तकाचे लेखक डॉ.जेम्स डॉब्सन म्हणतात, ‘‘आईचं आणि वडिलांचं महत्त्व मुलाच्या जीवनात वेगवेगळं असतं. बालवयात मुला-मुलींना मातेची गरज एकसारखीच असते, तरी माता ही मुलीसाठी आयुष्यभराची स्त्री-प्रतिमा असते. इथे मात्र मुलाला बदलावं लागतं. तो त्याला आवश्यक असणारी पुरुष-प्रतिमा वडिलांमध्ये शोधू पाहतो. त्याकरिता मुलाबरोबर वडिलांची भावनिक गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. म्हणून वडिलांचं वर्तन त्याच्याशी तुटक असता कामा नये. मुलींच्या तुलनेत कुटुंबात दुर्लक्ष होणाऱ्या मुलाला, मातेच्या प्रेमाबरोबर वडिलांचा आधार, संवेदनशीलता, ममत्व हे मिळणं, आवश्यक असतं.’’ याबाबत, डॉ. किंडलन म्हणतात, ‘‘मुलगा चार-पाच वर्षांचा झाला की त्याला पित्याबरोबर असण्याची ओढ निर्माण होते. वडिलांचं निरीक्षण व अनुकरण करायला आवडतं. त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांच्या बरोबरीने काम करणं, ज्यामधून वडिलांची जवळीक त्याला लाभत असते. ‘मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या जवळच आहे’ असं वडिलांनी म्हणावं, याकरिता मुलगे आसुसलेले असतात. पण शिबिरात आलेल्या प्रौढ पुरुषांनी, ‘‘आपल्या वडिलांनी आपल्याला ‘आय लव्ह यू’ असे म्हटलेलं कधीच आठवत नाही, अशी खंत व्यक्त केली.’’ प्रेमळ आणि जबाबदार पिता आणि त्याचप्रमाणं योग्य पुरुष-शिक्षक मुलाला लाभणं, ही यशस्वी ‘बॉयकोड’साठीची पायाभूत गरज आहे.

लहान वयात, प्रेम, संवेदना, सौजन्य यापासून अशा पद्धतीने फारकत केले गेलेले मुलगे, हे पुरुष म्हणून, मधल्या काही सहस्रकात कुटुंब, अर्थ, राजकारण, धर्म, प्रसारमाध्यमं यांच्या सत्तेवर आल्यामुळे, पुरुषाला घडविण्याचं काम गेली अनेक शतकं, अशी मानसिकता असणाऱ्या पुरुषांच्या हातात गेलेलं आहे. स्त्रीवर्गाकडे त्याची फक्त अंमलबजावणी आली. स्त्री-जातीला त्यापासून सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. ‘मातेला मुलापासून तोडणं,’ ही त्याचीच एक सुरुवात म्हणावी लागेल. तसेच मुलग्यांसमोर समंजस, विचारी पुरुषाची प्रतिमा अभावानेच ठेवली गेली. ‘पिता’ म्हणून बहुसंख्य पुरुषांची भूमिकासुद्धा मुलग्यांबाबत फारशी सकारात्मक आढळत नाही. ‘बॉयकोड’समोरील या अडचणी पुरुषांच्या कायम समस्या बनून राहिल्या. ‘बॉयकोड’ समाजहिताचा का बनला नाही, त्यामागे अनेक कारणं उत्क्रांतीच्या ओघात आहेतच. परंतु यामध्ये सर्वात ठळक कारण म्हणजे समाजव्यवस्थेचा बनलेला पुरुषप्रधान चेहरा, ज्यामध्ये पुरुषाला जन्म देणाऱ्या मातेला काही ठरवण्याचा अधिकारच उरला नाही, हे आहे.

पुरुषपरंपरेच्या प्रभावाखाली तयार झालेल्या पुरुषसंहितेचा प्रचार, समर्थन आणि संस्कार करण्यात ज्यांनी कायम पुढाकार घेतला, त्या प्रसारमाध्यमांवर नेहमी पुरुषांची सत्ता राहिली. धार्मिक पोथ्या, धार्मिक प्रवचनं, कीर्तनं, काव्यं, कथानकं, नाटकं अशी पुरुषलिखित आणि पुरुषांनी केलेल्या हिंसेची, कारस्थानाची महती सांगणारी प्राचीन माध्यमं पुरुषांच्या हातात होती. आजही तीच स्थिती आहे. विशेषत: चित्रपट आणि टी.व्ही.सारखी माध्यमं, पुरुषांच्या आक्रमकवृत्तीचं सर्वाधिक आणि गौरवशाली प्रदर्शन करताना आढळतात. तेव्हा किशोरवयीन आणि तरुणांमधील टेस्टस्टेरोन हार्मोनची पातळी वाढते, मर्दपणा दाखवण्याची ऊर्जा वाढते आणि असे मुलगे सहजच छळ-प्रवृत्तीकडे, हिंसेकडे ओढले जातात. त्यात पुन्हा मुलगे वयात येता येता, त्यांच्यामध्ये येणाऱ्या लैंगिक जाणिवेबाबत त्यांना मार्गदर्शन होण्याची जी गरज आहे, त्याबाबत जबाबदारीने कोणीच काही करणारे नसते आणि ती जाणीव सहजपणे मर्दानगीच्या कल्पनेशी जोडली जाते. मुलाला याबाबत वडिलांकडे मोकळे होता येईल असं त्यांचं नातं घडायला पाहिजे. त्याशिवाय मुलांच्या हातातील मोबाइल, त्यावर प्रसारित होणाऱ्या पोर्न फिल्म्स यांनी एकूणच ‘बॉयकोड’ कधीचाच संपवून, पुरुषसंहितेतील अवास्तव मर्दानगीच्या व पुरुषार्थाच्या कल्पना विकृत केलेल्या दिसत आहेत. रॅगिंग आणि बलात्कारातही मर्दानगी वाटण्याची भावना आहे. मर्दानगीच्या अशा घातक कल्पनेमुळे ‘माणूस की पुरुष’ अशी चढाओढ असल्याप्रमाणं, पुरुषांचं भावविश्व, त्यांचं मैत्र-नातेसंबंध, वैवाहिक-जीवन आणि त्यांचं स्वत:चं जगणंसुद्धा असमाधानकारक आणि अशांत झालेले जाणवतं. त्यामध्ये पुरुषसमाजाचं आणि वैयक्तिक पुरुषाचंसुद्धा, सहजपणे लक्षात न येणारं असं, प्रचंड नुकसान आहे. मुलाला ‘कठोर’ बनविण्याच्या संस्कारामुळे, पुरुषाला आवश्यक असणाऱ्या मन:स्वास्थ्याची जागा ही अतार्किक आव्हानं आणि बदला घेण्याच्या अस्वस्थ मानसिकतेने घेतलेली दिसते. त्यातून एकटेपणा, नैराश्य, व्यसनं आणि विकृती याच्या आहारी जाण्याचं पुरुषांचं प्रमाण चिंताजनक आहे आणि अशा रीतीने पुरुषाने मानसिक स्थैर्य गमावल्याचे गंभीर परिणाम हत्या, आत्महत्या आणि सार्वजनिक हिंसेच्या, अत्याचाराच्या स्वरूपात आजवर कुटुंबव्यवस्थेला, समाजाला आणि मुलग्यांना भोगत राहावे लागलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांच्या समस्यांवर उपाय शोधण्यातही अपयश आलेलं आहे.

डॉ. पोलाक म्हणतात त्याप्रमाणं, बॉयकोडची पुरुषांच्या अतिप्रभावाखालून सुटका करायची असेल आणि त्यातून संस्काराचा समतोल साधायचा असेल, तर पहिल्याप्रथम मुलाला मातेपासून दूर करायचा प्रयत्न होता कामा नये, हे खरंच आहे. पण मातेचा हात सोडून मुलाला बाह्य़ जगात पाऊल केव्हा तरी ठेवावंच लागतं, तेव्हा त्या जगातील, बऱ्या-वाईट वास्तवावर नियंत्रण कोणाचं असेल? एकतर्फी ‘जागतिक महिला दिनाचे’ मेळावे भरवून काही साध्य होणारं नाही. जगभर एखाद्या साथीप्रमाणे फैलावत चाललेल्या हिंसा, क्रौर्य आणि विकृती याविरोधात मुलांसाठी ‘बॉयकोड’ची आखणी एकसारख्या धोरणाने ठरवण्यासाठी ‘जागतिक पुरुष दिन’ अस्तित्वात येणं आता गरजेचं आहे. त्यामागे जागतिक हिताची भावना हवी. अशा ‘बॉयकोड’चा विचार होताना मग आपोआप स्त्री-पुरुष संबंध, विवाह, घटस्फोटाचे परिणाम, स्त्रियांची परिस्थिती, अनाथ बालकं, गरिबी हे त्यामागील सर्व छुपे प्रश्न ढवळून वर येतील. तसे ते येण्याची गरजही आहे, कारण तरच ‘बॉयकोड’ वास्तवाला धरून येईल. जागतिक पातळीवर विचार करताना राष्ट्र, धर्म यांच्या सीमा ओलांडून हा विचार जेव्हा सर्व मुलग्यांबाबत करता येईल, तेव्हाच तो ‘माणसाचा’ विचार म्हणून टिकून राहील. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर साजरे होणारे ‘पुरुष-दिन’ हे स्त्रियांविरोधात ओरड करणारे ‘फॅड’ बनविण्यापेक्षा, स्थानिक विभागातील मुलग्यांचे प्रश्न कशामुळे निर्माण होतात, याचं चिंतन करण्यासाठी त्याचा उपयोग झाल्यास ते अधिक समाजोपयोगी होईल. त्यातून जे सत्य उलगडत जाईल, त्यामुळे मग स्त्री-पुरुषांनी एकमेकांवर अन्याय करण्याचा प्रश्नसुद्धा टोक गाठणार नाही.

शिवाय स्थानिक पातळीवर, पालकांनी मुलांबाबत कोणता दृष्टिकोन ठेवावा, शिक्षकांनी काय भूमिका घ्यावी, चित्रपटांनी कोणती मूल्यं पाळावीत, दूरचित्रवाणीवर काय दाखवू नये आणि शासनाने त्याकरिता कोणत्या सोयी व कायदे करावेत वगैरे क्षेत्रांना समज येण्याची गरज आहे. कारण या सर्व क्षेत्रांचा आजवरचा गैरप्रभाव मातांसह सर्वावर आहे. मुलगा म्हणजे ‘आपोआप वाढणारा’ घटक नाही, हे लक्षात घेता यायला पाहिजे. पालक, शिक्षक, चित्रपट, दूरचित्रवाणी, शासन या घटकांना पहिल्याप्रथम याकरिता मुलग्यांबाबत सहृदयतेची व जागरूकतेची भूमिका घेता यायला हवी आहे. पण ज्यांना तशी कधी सवयच नाही, त्यांनी, मुलांबाबतच्या सदोष मानसिकतेतून स्वत:ला मुक्त करण्याचा प्रयत्न आपापल्या पातळीवर कसा करता येईल ते पाहायला हवं. पालक आणि शिक्षक यांच्या एकत्र सभेतून काही धोरणं ठरवता येऊ शकतात. शिक्षक हे पालकही असतात, तेव्हा त्यांची भूमिका फारच महत्त्वाची ठरते. विविध विभागांतील ‘पुरुष-दिन’ साजरे करणारे गट, पालक-शिक्षक गट आणि महिला-गट एकत्र येऊन ‘बॉयकोड’ मागे एक प्रामाणिक ताकद उभी राहू शकते. ‘जागतिक बॉयकोड’ धोरण आलेच तर त्याचा दिशादर्शक म्हणूनही खूप उपयोग होऊ  शकतो.  सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न ठेवता सर्व स्तरांतील मुलांबाबत एकच एक विचार करता आला पाहिजे,  तर आणि तेव्हाच ‘बॉयकोड’ समाजाकडून गंभीरपणे घेतला जाईल.

शेवटी डॉ. किंडलन म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘मुलग्यांच्या मानसशास्त्रानुसार, त्यांना अनुकूल असणारी स्थिती म्हणजे आपण सर्व जण त्यांची कदर करतो, त्यांच्यावर प्रेम करतो, ते एकटे नाहीत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, याचा त्यांना दिला जाणारा शाश्वत दिलासा, त्यांना नैसर्गिकपणे चांगला माणूस घडवीत असतो.’’

– मंगला सामंत

mangalasamant20@gmail.com