जी. ए. कुलकर्णींनी राम गणेश गडकऱ्यांना मराठीतल्या मयसभेचे जनक म्हटलं होतं. बाकीबाब- बोरकरांची कविता वाचताना नेहमी वाटतं, की बोरकरही मराठी काव्यसृष्टीतल्या एका मयसभेचे जनक आहेत. जीवनाचे अतिशय झळझळणारे रंग आणि आकार त्यांनी टिपले आणि कवितेतून त्यांची एक डोळे दिपवणारी मयसभा निर्माण केली. निसर्गातले आणि जीवनातले लहानमोठे घटक आणि प्रसंगही रूप-रस-गंध, नाद आणि स्पर्श या सगळय़ा संवेदनांनी भोगत आणि भोगवीतच बोरकरांच्या कविता आल्या. अनुभवाच्या भोवतीचे अर्थपुंज भावात विरघळलेल्या त्या संवेदनांनी भारले गेले आणि एक विलक्षण मंदिर, तरल असं वातावरण निर्माण झालं. बोरकरांच्या कवितेतली स्त्री त्या अद्भुत वातावरणातून अवतरली.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
election campaign, Sharad Pawar, NCP, vidarbha, nomination rally, amar kale, wardha, lok sabha election 2024
शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून, या’ ठिकाणी होणाऱ्या रॅलीत राहणार उपस्थित

स्त्रीचं ‘अवतरणं’ असा शब्द हेतूपूर्वकच वापरला आहे. त्यांच्या कवितेतली स्त्री त्यांच्या भोवतीच्या वास्तवातून उठलेली नाही. ती त्यांच्या प्रतिभेनं घडवलेल्या मुशीतून बाहेर पडली आहे. प्रेम, निसर्ग आणि संगीत यांनी बनलेली मूस. जिथे कधी सृष्टी प्रेम होते तर कधी प्रेमच सृष्टी होते. कधी संगीत प्रेम होते तर कधी प्रेमच संगीत होते. एकमेक होऊन हे तिन्ही फुलतात, दरवळतात आणि त्या सुगंधानं मनाला चढणारी जी धुंदी असते तिचं दुसरं नाव असतं स्त्री!

बोरकरांच्या कवितेतली स्त्री मुख्यत: प्रेयसी आहे. पत्नी किंवा गृहिणी म्हणूनही ती समोर येते, पण मुळात ती ठायीची प्रेयसीच आहे आणि बोरकरांच्या लेखी प्रेम हे एक जीवनाचं सर्वव्यापी, शक्तिमंत असं मूल्य आहे.

बोरकरांना कवितेचा साक्षात्कार झाला तोच मुळी प्रेमसाक्षात्काराच्या क्षणी. ते पोर्तुगीज शाळेत शिकत असताना जिन्यावरून खाली येणाऱ्या एका मुलीनं मागून त्यांचे डोळे अलगद झाकले आणि मग त्यांच्या गालावर ओठ टेकून ती निघून गेली. बोरकरांनी म्हटले आहे, की तेव्हापासून त्यांच्या कानशिलाच्या तारा ज्या झणझणत राहिल्या त्या अखेपर्यंत तशाच झणझणत राहिल्या आणि तीच झणझण किंवा बोरकरांचाच शब्द वापरायचा तर तीच झिणझिण त्यांच्या कवितेत उतरत गेली.

ही कविता आहे स्वप्नांची कांती ल्यालेली. ताल-सूर-रंग-गंधात घोळलेली. संपन्न अशा प्रतिमांनी बहरलेली. बोरकर ज्या काळात भरभरून कविता लिहीत होते, त्याच काळात मर्ढेकर यंत्रयुगातली नवी कविता लिहीत होते. संपूर्ण नवी भाषा, नवी प्रतिमासृष्टी, नवी जीवनदृष्टी आणि नवा, अगदी नवा- अपारंपरिक आशय! त्यांच्या कवितेतली स्त्री त्यांच्या भोवतालच्या वास्तवातून आली होती. ‘अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग। कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग’ असं ते प्रेयसीला विचारत होते, कारण त्यांच्या भोवताली काव्यात्मतेला, तरलतेला, स्वप्नमधुरतेला सर्वस्वी प्रतिकूल असंच जग होतं. ‘हाडबंडले अशा बायका विणीत बसल्या चिमणे जीवन’ अशा स्त्रिया त्यांना महानगरातून दिसत होत्या. त्यांचंच दर्शन त्यांच्या कवितेतून होत गेलं.

बोरकर गोव्याचे. गोव्याचा संपन्न रंगबहुल निसर्ग त्यांच्याभोवती होता. समुद्र आणि पुळणी, नावा आणि तरी, माड आणि पोफळी- शंभर वर्षांपूर्वीचा तो गोवा! फ्रेंच आणि पोर्तुगीज संस्कृतीच्या प्रभावाखालचं वातावरण! मर्ढेकर जेव्हा महानगरात माणसांना येणारी मुंग्यांची कळा अनुभवत होते, त्या वेळी बोरकर मुक्त बहरलेल्या निसर्गात रेंदेरांची गाणी ऐकत आणि घरा-दारात घुमणारे भजनाचे सूर आठवत-आळवत स्वस्थपणे जीवनाचा रस चाखत वाढले होते. मराठी कविताविश्वानं एकाच काळात दोन ध्रुवांवरच्या या दोन कवींच्या कवितांचं वैभव अनुभवलं.

बोरकरांवर गोव्याच्या निसर्गाचा जसा गाढ परिणाम आहे, तसा भारतीय तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक परंपरांचाही आहे. घरात सात पिढय़ांची भजनी परंपरा होती. सगळे संतकवी आणि सोहिरोबा अंबिये यांच्यासारखे वास्तव्यानं आणि काळानं जवळचे असणारे पदकार कवीही शब्दांच्या वाटेवर जवळून ओळखीचे झाले होते. त्या परंपरेत स्त्री म्हणजे निर्माणशक्ती होती. जगाला जन्म देणारी शक्ती. सृष्टीचे नाना विभ्रम हे तिचेच होते. भोवती उतू जाणारं लावण्य तिचंच होतं. सगळं विश्व म्हणजे तिचाच मत्त विलास होता. भोग आणि त्याग या एकाच भावाच्या दोन बाजू होत्या. त्यांच्यात द्वंद्व नव्हतंच. त्यामुळे बोरकरांची कविता प्रेयसीला आवाहन करते ती मातीचा हेतू ज्योती लावून पूर्ण करण्यासाठी.

ये, हे सखि, मातीचे आश्वासन घेउनि ये

प्रीतीवर विश्वासुन उन्मनमन होउनि ये

ये दिठीत, ये मिठीत, भेट पेट घेत जरा

शत ज्योतींमधुनि करू मातीचा हेत पुरा

सखीसह ज्योती लावायच्या त्या गात्रागात्रातून. शरीर हे बोरकरांसाठी त्याज्य नाही. उलट ‘शरिराच्या तृष्णेविण रस कुठला प्रीतीला?’ असा प्रश्न ते नि:संकोचपणे विचारतात. पोर्तुगीज संस्कृतीनं बहाल केलेला प्रणयातला मोकळेपणा बोरकरांनी भारतीय संस्कृतीत सहज मुरवला आणि स्त्रीच्या बाबतीतलं एक नवंच अध्यात्म जन्माला आलं. अतिशय मुक्तपणे स्त्रीच्या प्रणयाचा, शृंगाराचा स्वीकार आणि त्यातूनच जीवनाच्या परम अर्थाचा होणारा साक्षात्कार- बोरकरांची कविता या साक्षात्काराच्या धुंद अनुभवाची कविता आहे.

फुलल्या लाख कळय़ा

स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या गं उकळय़ा

असा तो विलक्षण अनुभव, रूप-स्पर्श-गंध-रस सगळय़ा ऐंद्रिय संवेदनांचं मिळून एक रसायन तयार होतं या अनुभवात आणि ते रसायन झोकून जीव धुंद होतो. अर्थात, बोरकरांची धुंदी ही रतीच्या रसरसलेपणातून उमललेली विरक्तीची धुंदी आहे. प्रेयसीच्या देहावर उत्कट प्रेम करतानाच तिच्या आत्मिक शक्तींना स्पर्श करीत एका उन्नत पातळीवर पोचणारी धुंदी आहे. गोव्याची रंगीत लावण्यमय सृष्टी आणि लॅटिन संस्कृतीचा परिचय यांचा संयोग भारतीयांच्या आत्मदर्शनात झाला आणि त्या संगमात न्हालेली स्त्री बोरकरांच्या कवितेतून समोर आली. ‘जपानी रमलाची रात’ ही त्यांची कविता म्हणजे त्याच स्त्रीचा सर्वेद्रियांना रोमांचित करणारा रतिरंग उधळणारी कविता. शारीर प्रणयाचे अनेक विभ्रम, त्यातली उत्कटता, धुंदी आणि प्रेरक प्रसन्नता-तृप्तीचा टिळा लागलेली ही कविता त्यांच्या प्रणयसंकल्पनेचं दर्शन घडवणारी प्रातिनिधिक कविता आहे.

बोरकरांच्या लेखी स्त्री ही जीवनभाविनी आहे. पोषक, वत्सल अशी तर ती आहेच. ‘माझ्या गोव्याच्या भूमीत गडय़ा साळीचा रे भात। वाढी आईच्या मायेने सोनकेवडय़ाचा हात’ असा तिच्या समृद्ध वात्सल्याचा अनुभव आहे. ‘कधी कधी वज्रदीप्ती तुझा अर्धामुर्धा शब्द। क्षणी उजळून जाई माझे युगांचे प्रारब्ध’ असा तिच्या शक्तिमत्तेचा प्रत्यय आहे आणि ‘मन तव, चंद्रापरि करि सोबत, जेथे संचित नेते गं। चराचरातून प्रेमळपण तव हासत जवळी येते गं।’ अशी तिच्या प्रेमाची शरीरनिरपेक्ष व्यापक जाणीवही आहे.

बोरकरांसाठी स्त्रीचं प्रेम ही एक सोपानकल्पना आहे. देहापासून चढत चढत जीवांच्या एकरूपतेपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आहेत त्या. बोरकर त्या सोपानावरून सरळ प्रेमिकांच्या यक्षभूमीतच पोचले. ग्राम्य किंवा अश्लील न होता शृंगाराचा निरभ्र विलास कसा, तो त्यांच्या कवितेनं दाखवला. स्त्रीचं बाहय़ रूप पुसूनच टाकलं आणि तिची उन्मुक्त सुंदर चैतन्यशक्ती तेवढी जागी ठेवली.

ती शक्ती मात्र अशी की डोळय़ांची पापणी हलली तरी त्रिभुवन डळमळेल. मात्र प्रियाच्या नजरेला नजर मिळाल्यावर डोळे जमिनीला खिळतात आणि दोन हृदयं एकरूप होऊन जग पुन्हा सावरतं.

तव नयनांचे दल हलले गं

पानावरच्या दंवबिंदूपरि त्रिभुवन हे डळमळले गं

तारे गळले, वारे ढळले

दिग्गज पंचाननसे वळले

गिरि ढासळले, सुर कोसळले

ऋषि, मुनि, योगी चळले गं!

हृदयी माझ्या चकमक झडली

नजर तुझी धरणीला जडली

दो हृदयांची किमया घडली

पुनरपि जग सावरले गं!

बोरकरांचा स्त्रीच्या सामर्थ्यांवरही विश्वास आहे आणि तिच्या प्रेमावरही. घरावर दिवा लागतो ती तिचीच पुण्याई असते. ती दोन दिवसांसाठी गेली तरी घर पोरकं होतं, एवढंच नव्हे तर तिच्या प्रेमानं भरून गेलेला जन्म सरतानाही तिच्या हातानं ओढलेलं पाणी गंगाजळासारखं मुखात घ्यावं, तिच्या घरचं तुळशीचं पान जिभेवर ठेवलं जावं, तिच्या मांडीवर मस्तक असावं, तिच्या ओठांचा निरोपाचा स्पर्श वाळल्या ओठांना व्हावा- अशी इच्छा करतात बोरकर!

असावीस पास, जसा स्वप्नभास

जीवी कासावीस झाल्याविण,

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल

भुलीतली भूल शेवटली

जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे

सर्व संतर्पणे त्यात आली

‘हियर इज अ स्टार ऑन होरायझन – क्षितिजावर नवा तारा चमकतो आहे.’ बोरकरांची कविता प्रथम ऐकली तेव्हा कवी भा. रा. तांबे उत्स्फूर्तपणे उद्गारले होते. तो त्यांच्या कवितेचा देखणा तारा पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी रसिकांच्या माथ्यावर झगमगत राहिला. कवी मनमोहनांना त्यांच्या कवितेची विलक्षण भुलावण कायम आश्चर्यचकित करत राहिली. त्यांनी लिहिलं होतं,-

याची कविता कशानं लिहिली गेली असेल?

नंदलालाला निळे करून झाल्यावर उरलेला रंग याला शाई म्हणून मिळाला असावा.

त्या शाईनं बोरकरांच्या कवितेतला आशयच कृष्णरंगाचा करून टाकला. जणू लीलाधर आणि योगेश्वर दोन्हीही. रंगले ते असे, इतके धुंद आणि बेभानपणे की वाटलं आता हे बुडाले, आणि असं वाटेपर्यंत नि:संग होऊन सगळ्यातून दूर होत चालू लागले. पण अशा नि:शंक विश्वासानं की या जगाच्या पलीकडे ‘ती’ त्यांच्यासाठी आहेच!

ऐल रंगांचे उडाले, पोचलो मी पैलकाठी

थांबली होतीस गे तेथेहि तू माझ्याचसाठी

१९८४ मध्ये बोरकरांचं निधन झालं. ते दिवस पावसाचे होते. जुलै महिन्यांतला धुवाँधार पाऊस. बोरकरांचा लाडका पाऊस. ‘गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले, शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले’ असं वातावरण. क्षितिजावर भरतं आलेलं. धरती लाजण  झालेली आणि पाऊस साजण झालेला.  मनात गाणं ओलावून थरथरत असलेलं. सृष्टीला पाचवा महिना – श्रावण अजून लागलेला नव्हता. ‘मातीतूनि खिदळे पाणी, पाण्यातूनी फुटती गाणी’ असा शृंगारात पुन्हा बहर आणणारा पाऊस नव्हता तो. मल्हारच्या तानेसारखा मात्र होता. सरसरत गंभीरपणे कोसळणारा. बोरकरांच्या डोळ्यांत तो मृत्यूसारखा घनदाट भरून होता. अखरेचे क्षण मोजत होते ते. जवळ सुनीताबाई देशपांडे होत्या. बोरकरांनी त्यांना कविता म्हणायला सांगितली. त्यांची आवडती कविता –

समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा म्हैना

वाकले झाडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते

आकाश दिवे लावित आली कार्तिक नौमीची रैना

 

कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू

मयूरपंखी, मधुरडंखी उडाली गोरटी मैना

लावण्य जातसे उतू, वायाच चालला ऋतू

अशाच वेळी गेलीस का तू करून जिवाची दैना

ती कविता ऐकता ऐकता बोरकरांची शुद्ध हरपली. मग ते परत शुद्धीवर आलेच नाहीत. कदाचित् त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे स्त्रीचं तेच उन्मद सुंदर रूप चिरंतन झालं असेल.

स्त्रीच्या भूमिकेतूनही बोरकरांनी संतसारणीने काही गौळणी लिहिल्या आहेत. त्यांच्या कविदृष्टीतली स्त्री  आहे ती मात्र  ग्राम्य नव्हे, पण उद्दिपक, उन्मादक-सगळय़ा सौंदर्यसंवेदनांना उधाण आणणारी! कधी उत्कट, मनोज्ञ अशी कविश्रद्धा होऊन येणारी! कधी विदग्ध, तरल भावजाणिवेला संपन्न करणारे स्वप्नसुखद रंग ल्यालेली आणि कधी तृप्तपणे सायीच्या हातांमध्ये आईचा स्पर्श घेऊन आलेली!

आजचा आपल्या भोवतालचा कालखंड बोरकरांसारख्या धुंद, स्वप्नांनी मंतरलेल्या कवितांचा कालखंड नाही. वास्तव फार विकृत, फार प्रतिकूल झालेलं आहे. वास्तवातली स्त्री तर शारीर-मानस पातळीवर जशा तशा सामाजिक-सांस्कृतिक पातळीवरही फार वेगळय़ा वाटा चालू लागली आहे. अशा वेळी बोरकरांच्या कवितेतल्या ऐंद्रिय (Sensuous) प्रतिमांमधून अवतरलेली स्त्री जवळची कशी वाटावी? त्यांच्या रसगर्भ अंत:संगीतात घोळलेल्या तिच्या विभ्रमांची मोहिनी कशी पडावी?

पण तरीही, कधी तरी, कुठे तरी वास्तवाचं भान विसरून प्रेमी जीव जेव्हा आयुष्याच्या मयसभेत पाऊल ठेवतील आणि काही काळ रसमधुर शृंगाराचा धुंद आनंद अनुभवतील, तेव्हा बोरकरांच्या कवितांमधला आशय त्यांच्या अनुभवातून दरवळत जाईल. मराठी कवितेनं त्या वेळी बोरकरांना उत्स्फूर्तपणे मनोज्ञ दाद दिली असेल यात शंका नाही.

रतनअबोलीची  वेणी माळलेली

आणि निळ्या – जांभळ्या वस्त्रालंकारांत

संध्येसारखी बहरलेली तूं

तळ्याकाठच्या केवडय़ाच्या बनांत

आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस

तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर

हा भुलावणा सप्तरंगी सोहळा

असा सर्वागांनी फुलारलाच नसता.

 

आपल्याच नादांत तू

पाठ फिरवून परत जातांना

तुझीं पैंजणपावले जीवघेण्या लयींत

तशीं पडत राहिलीं नसतीं

तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून

कातरवेळची कातरता

आज अशी झिणझिणत राहिलीच नसती.

 

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने

जाईजुईच्या सांद्र-मंद सुगंधाचा लळा

सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास

तर उमलत्या फुलपाखरांची

आणि मुक्याभाबडय़ा जनावरांची

आर्जवी हळुवार भाषा

इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.

 

तू कशामुळे माझी जिवलग झालीस

तें खरेंच मला आता आठवत नाही;

पण मला तोडतांना

समुद्राकाठच्या सुरूंच्या बनांत

मिट्ट काळोखांतून चंद्रकोर उगवेपर्यंत

तू मुसमुसत राहिलीस

हें मात्र अजून मी विसरूं शकलेलों नाही.

त्या वेळचीं तुझी ती आसवें

अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेलीं आहेत.

तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस

तर माझ्या शृंगाराचा अशोक

आज करुणेच्या आरक्त फुलांनी

असा डवरलाच नसता

 

तू तेव्हा आकाशाएवढी विशाल

आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण

निराशा मला देऊन गेली नसतीस

तर स्वत:च्याच जीवन – शोकांतिकेचा

मनमुराद रस चाखून

नि:संग अवधूतासारखा

मी या मध्यरात्रीच्या चांदण्यांत

असा हिंडत राहिलोंच नसतों

 

तूं केवळ माझी प्रेयसी नव्हतीस:

माझी सशरीर नियति होतीस.

तसें नसतें तर आज जो काय मी झालों आहें

तो झालोंच नसतों.

(‘कांचनसंध्या’  संग्रहातून साभार, मौज प्रकाशन)

 

– डॉ. अरुणा ढेरे

aruna.dhere@gmail.com