अनेक कारणांमुळे आज अनेक जण एकेकटे राहतात. हे एकटेपण कधी निराश करणारं तर कधी भीतिदायकही असू शकतं. त्यावर उपाय आहे तो ‘एकी’सारख्या ग्रुपचा. २५ ते ८० वयोगटातील अनेक जणी आज ‘एकी’मध्ये आहेत. पैशांची देवाणघेवाण नाही की उपदेशाचे डोस नाहीत. आहे ती फक्त सहसंवेदनेनं एकमेकींचं एकटेपण ‘साजरं’ करणं. एकटेपणा विसरायला लावणारं ‘एकी’चं बळ असंच वाढत राहायला हवंय..

मनीषानं वयाच्या २०-२२ व्या वर्षी दूरच्या नात्यातील विवेकशी प्रेमविवाह केला होता. तिचं कामाचं ठिकाण घरापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे तिचे आई-वडील त्यांच्या जवळच असणाऱ्या दुसऱ्या घरी राहायला गेले आणि विवेक-मनीषा त्या घरी राहू लागले. विवेक को-ऑपरेटिव्ह सोसायटींचे हिशोब ठेवण्याचे काम करीत असे. जाऊन-येऊन तो काम करू लागला. विवेक मुळातच आळशी. त्यात त्याच्या लक्षात आलं की, पत्नी मनीषा नोकरी करतेय. राहायला घर आहे. मग नोकरीची वणवण कशाला करायची? लगेच त्याने मनीषाला आपला विचार सांगितला. अर्थातच तिने नकार दिला. ‘‘तू घरी बसून काय करशील? आताच पैसे कमविण्याचे दिवस आहेत. आणि मूल झाल्यावर माझ्या पगारात सर्व संसार चालणं कठीण होईल. तेव्हा तू नोकरी सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.’’ विवेकनं तिचं न ऐकता सर्व कामे बंद केली. रिकाम्या वेळात हळूहळू दारू आली. मित्र आले. नंतर दोघांची भांडणं सुरू झाली. मारहाण होऊ लागली आणि मनीषानं त्याला घरातून हकलून दिलं. तिचा स्वाभिमान तिला परत आई-वडिलांकडे जाऊ देईना. तिचं सगळं बालपण त्याच घरात, त्याच वस्तीत गेल्यामुळे तिला वाटलं, एकटं राहणं काही अवघड नाही. पण हळूहळू असंख्य प्रश्न उभे राहिले. आजूबाजूचे लोक, ‘दुसरं लग्न कर’ चा सल्ला वारंवार देऊ लागले. बिलं भरणं, घराची दुरुस्ती, गुंतवणूक ही कामं नोकरी करून करता करता दमछाक होऊ लागली. नेहमी सणावारी आईकडे जाणं मनाला पटेना. एक ना दोन हजार अडचणी. एकदा तिच्या मनात विचार आला ‘मी एकटी राहणारी असले तरी माझ्यासारख्या बऱ्याचजणी एकटय़ा असतील, त्यांना मी एकत्र आणलं तर सर्वाचंच एकटेपण संपेल. एकमेकींना सुख-दु:खात मदत करता येईल. सणवार आनंदात साजरे करता येतील. नाटक-सिनेमा, सहली यांचासुद्धा आनंद घेता येईल.. एक कल्पना आकार घेऊ लागली.
तिने तिच्या माहितीतील एकेकटय़ा राहाणाऱ्या ३-४ जणींना ही कल्पना सांगितली आणि त्यांनी ग्रुप सुरू केला. तो यशस्वी होतोय, हे त्यांच्या लक्षात आल्यावर तिनं एका वृत्तपत्रात लहानशी जाहिरात दिली आणि त्यात दिलेल्या दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं. दोन दिवसांत २५-३० जणींनी संपर्क साधला. भेटीची वेळ, स्थळ वगैरे गोष्टी ठरल्या. प्रत्यक्षात १५ जणी आल्या. त्यांना खरोखरीच चांगल्या आणि अडचणीच्या वेळी उपयोगी पडणाऱ्या, एकटेपणा विसरायला लावणाऱ्या मैत्रिणींची गरज होती. आणि तिथेच, त्याच दिवशी ‘एकी’ ग्रुपची स्थापना झाली. ग्रुपमध्ये नाव नोंदणीकरिता कोणतीही फी आकारणी नको असं ठरलं. एकमेकींशी पैशाचा व्यवहार करायचा नाही, एकमेकींची खोलात जाऊन चौकशी करायची नाही. गतकाळ विचारायचा नाही. असे काही नियम घालून घेतले. पण जर कोणाला आपलं दु:ख हलकं करण्याकरिता काही सांगावंसं वाटलं तर तिचं म्हणणं ऐकून घ्यावं, तिला धीर द्यावा, जमेल ती मदत करावी असा पुढे आलेला विचार सर्वानी मान्य केला. दूरध्वनी क्रमांकाची यादी सर्वाना वाटली गेली. मग भेटी-गाठी ठरवल्या जाऊ लागल्या. वाढदिवस कौतुकाने साजरे केले जाऊ लागले. मैत्रिणी खरेदीसाठी एकत्र जाऊ लागल्या. ग्रुप मोठा होऊ लागला. २००४ मध्ये परत एकदा वृत्तपत्रातून जाहिरात दिली गेली. त्यातून पुन्हा काही मैत्रिणी मिळाल्या. यावेळची गंमत म्हणजे पन्नाशीच्या आतल्या बऱ्याच जणी आल्या. आता तर ‘व्हॉॅट्स अॅप’ ग्रुप तयार झालाय. त्यावरून एकमेकींशी संपर्क साधणं सहज सोपं झालंय.
या ग्रुपचा सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे सगळ्याजणी आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र आहेत. त्यामुळे पैशांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज कुणालाच नाहीए. हवीय ती मैत्री. आपलेपण. कोणत्याही स्वार्थाशिवाय होणारा संवाद. जे ‘एकी’मध्ये भरपूर आहे. ग्रुपमध्ये एक डॉक्टर आहे. ती सर्वाची नियमित वैद्यकीय तपासणी कमी दरात करून घेते. शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षिकांनी आपल्यासाठी एक काम ठरवूनच घेतलंय. त्या आजूबाजूच्या गरीब-गरजू मुलांचा अभ्यास घेतात. कोणी कॅटरिंगचं काम करतात. व्यवसाय म्हणून ते हे करतातच, पण ‘एकी’ ग्रुप जेव्हा जेव्हा सहलीला जातो तेव्हा तेव्हा जेवणाखाण्याची सोय त्यांच्याकडेच असते. कोणी बँकेतून निवृत्त झाल्यात त्या इतरांच्या पैशाचे व्यवहार-गुंतवणूक या गोष्टींसाठी मदत करतात. या सगळ्या अशा एकत्र आल्याने ना आता कुजकी बोलणी ऐकवणाऱ्या, सतत सल्ले देणाऱ्या नातेवाईकांची गरज पडत ना उपकारांच्या भावनेतून मदत करणाऱ्यांची!
‘एकी’मुळे प्रत्येकीला सशक्त मदत मिळते आहे. बीनाताई बी. एम्. सी.मधून निवृत्त झालेल्या. पतीच्या मागे त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगलं शिक्षण दिलं, त्याला चांगली नोकरी मिळाली. आता सून आणावी असा विचार केला आणि अचानक त्यांच्या अंगावर पांढरे डाग दिसू लागले. मुलाला मुली सांगून येईनात. तो आईला दोष देऊ लागला. भांडणं सुरू झाली. त्या कंटाळून गेल्याच पण नंतर नंतर त्याचं रौद्र रूप पाहून मुलाचीच भीती वाटू लागली. त्यांनी ‘एकी’ला जवळ केलं. आणि आपली कर्मकथा सांगितली. आमच्यातील एकजण वकील आहे. एका रविवारी आम्ही तिच्या घरी गेलो. मुलाला नीट समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यानं उद्धट उत्तरं दिली. ‘‘तुमचा यात काही संबंध नाही; आमच्या घरगुती गोष्टी आहेत. तुम्ही सगळ्या निघून जा.’’ आमच्या वकील मैत्रिणीने मग त्याला तिच्या भाषेत समज दिली. तेव्हा त्यानं सांगितलं की, ‘‘मी एका मुलीशी लग्न ठरवलं आहे. ती मुलगी म्हणते, आईला वृद्धाश्रमात ठेवलंस तरच मी तुझ्याशी लग्न करेन.’’ त्यावर आमच्या वकील मैत्रिणीनं त्याला बजावलं की, राहातं घर आईच्या नावावर आहे. तेव्हा तूच येथे राहू नकोस. दोन महिन्यांची मुदत त्याला दिली गेली. त्या काळात त्यानं आईला त्रास दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्याला तिनं बजावलं. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर असा काही परिणाम झाला की तो मुलगा तर नीट वागायला लागलाच पण त्याच मुलीशी लग्न होऊनही आज ते तिघंही आनंदात आहेत. ‘एकी’चा पाठिंबा तिला नसता तर त्यांनी एकटीनं काय केलं असतं?
‘एकी’ची अशी मदत मैत्रिणींना नेहमीच होते. मुंबईत डेंग्यू पसरू लागला होता. एकीला, रिमाला अचानक ताप भरून आला. ती एकटीच राहात असल्यानं ताप आल्याबरोबर तिने ग्रुपमधल्या डॉक्टर मैत्रिणीला, वैशालीला फोन करून कळवलं. तिनं लगेच तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं. रक्ताचा नमुना तपासला गेला आणि डेंग्यूचं निदान झालं. डॉक्टर वैशालीनं स्वत:चं क्लिनिक दोन-तीन दिवस बंद ठेवलं आणि २४ तास रिमाबरोबर राहून तिची सेवा तर केलीच पण वेळोवेळी डॉक्टरांशी बोलून तिच्या उपचारांकडे लक्ष दिलं. रिमा पूर्ण बरी होईपर्यंत तिला फोन करून इतरांनी त्रास देऊ नये म्हणून दिवसातून ३-४ वेळा ‘व्हॉॅट्स अॅप’ ग्रुपवर तिच्या प्रकृतीची प्रगती कळवत राहिली. रिमाला घरी पोहोचवून तिच्यासाठी मदतीची सोय करून मगच ती स्वत:च्या घरी गेली. स्वत:चे क्लिनिक बंद ठेवून, नुकसान सोसून मैत्रिणीच्या आजारपणात तिला सर्वतोपरी मदत करणारी डॉक्टर फक्त ‘एकी’मध्येच असू शकते, असं आम्हाला वाटतं.
मधूनमधून एकमेकींना भेटणं, खरेदी, खादाडी याचबरोबर नियमित सहलींना जाऊन ‘एकी’ दिवसेंदिवस घट्ट होते आहे. ज्यांना जमणं शक्य आहे त्या एकत्र जमतात. ज्यांना नाही जमत त्या त्याच्या वर्णनावरून खूश होतात. सध्या मुंबई आणि परिसरातील ‘एकी’ मध्ये अगदी २५ ते ८० वर्षांपर्यंतच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे तरुणींना वयोवृद्धांच्या अनुभवाचा फायदा होतो तो प्रौढांना त्यांच्याबरोबर अधिकाधिक तरुण वाटत रहातं. पण ‘एकी’ मुळे अनेकींचं वय अगदी दहा-वीस वर्षे कमी झालंय. कारण त्यांना बोलायला, मोकळं व्हायला मैत्रिणी मिळाल्या आहेत.
तीन महिन्यांपूर्वीच सगळ्याजणी भेटल्या होत्या. केरळची ट्रिप खूपच मस्त झाल्याने खुशीत होत्या. त्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू असं प्रत्येकीला झालं होतं. आशा जंगमने अगदी सगळ्यांना परवडेल अशा थोडक्या रकमेमध्ये आयोजित केली होती ट्रिप. तीसुद्धा राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ आणि रुचकर जेवण, वेळेवर नाश्ता, असं सगळं पुरवून! तिला मदत करणाऱ्या वंदना, मृणाल आणि मंदा यांना सर्वानी मनापासून धन्यवाद दिले. अनेकींची विमान प्रवासाची हौस फिटली होती. मुंबई ते कोची विमान प्रवास सर्व मैत्रिणींनी खूप एन्जॉय केला. एकटय़ा असताना या ट्रिपची जी मजा लुटली ती कुटुंबासोबत त्यांना नसती लुटता आली. कोचीन पाहून झाल्यावर मंडळी आली मुन्नारला! पण मध्ये गुरुवायुरला जाताना बसमध्ये केलेली धमाल, ती तर बालपण, शाळा-कॉलेजातील दिवस, सर्वाची आठवण करून देणारी ठरली. गाणी, गप्पा, खाणं-पिणं, व्हॉट्स अॅपवरील विनोद, इतकंच नाही तर सध्याचं देशातलं वातावरण, राजकारण एक का दोन? शेकडो गोष्टींचा आनंद लुटला. मुन्नारच्या दोन दिवसांच्या मुक्कामात निसर्गाच्या मनसोक्त उधळणीचा डोळ्यांचे पारणे फिटेपर्यंत आस्वाद घेतला. हिल- स्टेशन म्हणून ओळखले जाणारे टेक्काडी- तेथील हाऊस बोटीवर काढलेली रात्र तर आयुष्यभर लक्षात राहील, असं आवर्जून सांगत होत्या सगळ्या एकमेकींना. हे सगळं ‘एकी’मुळेच कळलं, पाहायला मिळालं, असा सगळ्यांचाच विश्वास आहे. अगदी मनात येईल ते केलं. ते वागणं आठवून आज हसू येतंय् पण ते सर्व करतानाचा अनुभव विलक्षण होता, अशीच सगळ्यांची भावना होती.
असे आनंदाचे प्रसंग कधी जुळवून आणले जातात कधी अचानक ठरतातही. ते करताना सगळ्यांची ‘एकी’ असली तर कामे सुलभ रीतीने पार पडतात. विमान, ट्रेन यांचं बुकिंग, चांगली आणि स्वस्त हॉटेल्स शोधणं, टूरवर असताना एकमेकींचं सामान उचलणं, हवा बदलामुळे होणाऱ्या आजारपणात देखभाल करणं अशी अनेक कामं सगळ्याजणी अगदी आनंदानं आणि जबाबदारीनं करतात.
केरळच्या सहलीच्या आनंदात तीन महिने कसे गेले कळलेच नाही आणि एके दुपारी नंदाचा फोन आला. तिचा आवाज खोल गेला आणि रडवेला वाटला मला. तिनं सांगितलं, घरातच कार्पेटमध्ये पाय अडकून ती पडलीय. पाठीवर पडल्यामुळे उभं राहाणं जमेना. फोन पण लांब होता. तशीच धडपडत ती कशीतरी फोनजवळ पोहोचली आणि शेजाऱ्यांना, मला फोन केला. शेजाऱ्यांनी येऊन दार उघडलं होतं. तोपर्यंत मी जवळपासच्या तीन-चार ‘एकी’च्या मैत्रिणींना फोन करून तिच्या घरी जाण्याविषयी सांगितलं. डॉक्टरांना बोलावलं. घरी येऊन एक्स-रे काढणाऱ्या माणसाला बोलावलं. कोणी औषधं आणून दिली. कोणी कॉफी केली. रात्री तिच्यासोबत राहण्याकरिता एकजण तयार झाली. त्या दोघींचा नाश्ता, जेवण याची सोय करण्याची जबाबदारी दोघींनी घेतली. नंदाला तिच्या सोबत राहाणारी बाई मिळेपर्यंत आठवडाभर डॉक्टर, औषधं या गोष्टीसुद्धा व्यवस्थित सांभाळल्या गेल्या. थोडय़ा दिवसांनी काठीचा आधार घेऊन चालण्याची परवानगी डॉक्टरांनी दिल्यावर सुवर्णाने तिला काठीसुद्धा आणून दिली. फोन करून तिच्या संपर्कात राहणं, तिला कंटाळा येऊ नये म्हणून एक-दोन दिवसांनी तिच्याकडे जाऊन गप्पा मारणं आदी कामं केवळ ‘एकी’मुळे शक्य झाली. या आणि प्रसंगातूनच ‘एकी’तील मैत्रिणींचं मनोबळ वाढतंय. प्रेमाची, आपुलकीचं नातं अधिक घट्ट होतय.
वाढत्या तंत्रज्ञानामुळे व शहरीकरणामुळे, मुलींना मिळत असलेल्या विविध संधींमुळे जसं त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरतं तसंच झाड उंच वाढलं तर एकांडं होतं जातं असं मुलींच्या बाबतीत होईल का अशी चिंता वाटू लागते. परिस्थितीमुळे, विचारांमुळे, कधी स्वप्नपूर्तीच्या ध्यासामुळे तर कधी जबाबदाऱ्यांमुळे सख्या-सोबत्यांचे हात सुटून जातात. नवीन मैत्रिणी जोडणं, त्यांना टिकवणं, आपलं न्यून झाकणं, मुखवटा घालून वावरणं याचा कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी असे ग्रुप आपल्याला नक्की ‘सपोर्ट’ करु शकतात. मला तुम्ही व मी तुम्हाला जशा आहोत तशा स्वीकारू या, जरा मोकळं ढाकळं, खरंखुरं वागू या अशी भावना ‘एकी’मध्ये आहे.
आज समाजात अशा किती तरी एकेकटय़ा स्त्रिया राहात आहेत. त्या आपला असा वेगवेगळा ग्रुप तयार करून आपलं एकटेपण घालवू शकतात. नाही तर आम्हाला सामीलही होऊ शकतात, एकटेपण वाईटच पण आपण एकाकी नाही ही भावना ‘एकी’ मुळे जाऊ शकते. एवढा विश्वास नक्कीच आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

मुंबईतल्या या ग्रुपची ही ‘एकी’ पाहून पुण्यामधील वीणा गोखले यांनाही पुण्यात हा ग्रुप सुरू करायची कल्पना सुचली. त्यांना ‘देणे समाजाचे’ या उपक्रमामार्फत सलग दोन वर्षे २०११ व २०१२ मध्ये पुण्यातील एकटय़ा राहाणाऱ्या स्त्रियांपर्यंत पोचता आलं. तरुणपणी नाही, पण आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर मात्र कुणीतरी आपल्यासारखं असलं/ भेटलं तर स्त्रीला मानसिक बळ मिळतं. काही अनुभवांमुळे काय नको याचं नेमकं भान आलेलं असतं. त्यातूनच पुण्यात काहीजणी एकत्र आल्या आणि पुण्यात ‘एकी’ ग्रुप तयार झालाय. शिक्षण, वय, सामाजिक स्थान बाजूला ठेवून, आखलेल्या उपक्रमात सहभागी होणं सुरू झालंय. प्रत्येकीच्या वाढदिवसाला तिचं केलेलं कौतुक, दिवाळीत स्वत: खपून केलेला घरपोच फराळ, डॉक्टरकडे किंवा वकिलाकडे जाताना मिळालेला धीर मोलाचा वाटू लागलाय. एरवी रोजची एकटीची लढाई एकटीनेच लढावी लागत असली तरी मीच नाही एकटी आहेत आजूबाजूला माझ्यासारख्याच अनेकजणी! ही भावना आपलं एकटेपण केविलवाणं होऊ न देता हिंमतच देतं!
संपर्क- खुशी- ७५०६१९२३३९.
गीता- ९८२०३९६४६५.
prabha.gramo@gmail.com