आपल्या बागेत, बंगल्याच्या आवारात, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. वर्षांतून दोनदा होणारी झाडांची पानगळती बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरतात. हा पालापाचोळा विविध पद्धतीने वापरता येतो.
पालपाचोळा कुंडय़ा, वाफे यांत भरण पोषण म्हणून आहे तसा वापरता येतो. तसेच हा पालापाचोळा एखाद्या तागाच्या गोणीत, लोखंडाच्या जाळीत भरून ठेवावा. त्यावर पाणी देत जावे, ऊन-वारा-पाऊस यांमुळे चांगले कंपोिस्टग स्वरूपातले खत तयार होते. हा सुकलेला पालापाचोळा अर्धवट कुजला तरी तो खत म्हणून वापरण्यास योग्य असतो.
ड्रमचा वापर
एखाद्या ड्रमला तळाशी भोक पाडून त्या ड्रममध्ये पालापाचोळा व रोज पाच लिटर पाणी टाकत गेल्यास पाच महिन्यांत कंपोस्ट झालेले खत मिळते. शिवाय ड्रममधून निचरा झालेले पाणीसुद्धा झाडांना ह्य़ुमिक अ‍ॅसिडच्या रूपात वापरता येते.
सीमेंटचा हौद
अपार्टमेंट, वाडी व घराच्या आवारात पालापाचोळ्यापासून खत बनवण्यासाठी हौद साकारता येतो. यात सुरुवातीला एक इंच जाडीचा सीमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर एकेरी अथवा दुहेरी विटांचा जाळीदार हौद तयार करावा अथवा सीमेंटच्या मदतीने बांधून घ्यावा. याची उंची तीन फुटांपेक्षा अधिक नसावी. सीमेंट न वापरताही फक्त विटा सांधे पद्धतीने रचूनही हौद तयार करता येतो. विटा रचून केलेला हौद नेहमी चांगला म्हणजे खत काढताना विटा चारही बाजूने काढून घेता येतात. संपूर्ण खत फावडय़ाने वर खाली चाळून ते संपूर्ण बाजूलाही करता येते. यात गांडुळेही सोडता येतात. तसेच उंदीर, घुशीचा त्रास नसेल तर हिरवा ओला कचरा व खरकटे अन्नही जिरवता येते. अधूनमधून त्यावर शेणपाणी शिंपडल्यास उत्तम.
संदीप चव्हाण – sandeepkchavan79@gmail.com