आज्जी, तुला म्हैतीये? या प्रश्नाने सुरू होणाऱ्या नातवाच्या ब्रह्मज्ञानाने आजीला कधी कधी दमायला व्हायचं.. जगातलं सगळय़ात मोठं-सगळ्यात उंच- सगळय़ात जुनं-सगळ्यात वेगवान विचारू नका, इंटरनेट-विकिपीडिया- गुगलवरची सगळी माहिती त्याच्या चिमुकल्या तोंडावर सदैव तयार असे. आपण जन्माला घातलेल्या या ‘प्रॉडक्ट्स’च्या या अगाध हुशारीने त्याचे आई-बापच जिथे कायमचे दचकलेले होते, तिथे आजीचं काय होणार? कुतूहल-कौतुक-भरून येणं-दचकणं-गांगरणं-हताश होणं यातली समयोचित प्रतिक्रिया देऊनच तिला पुढे सरकावं लागे. मात्र तरीही..  रोजच्या व्यवहारातल्या असंख्य गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात, ‘म्हैती’ करून घेण्याजोग्या आहेत, हे या मुलांना कोणी कधी सांगितलंच नसेल तर ती बिचारी तरी काय करणार? हा प्रश्न आजीला पडलाच.

‘‘आज्जी, तुला म्हैतीये?’’ पुढे जाता जाता मागे वळून शाळकरी नातवाने उत्साहाने विचारलं तेव्हा त्याला आणि त्याच्या मित्राला घेऊन आपण हा रस्ता कसा पार करू शकू या चिंतेत आजी होती. रोज या मुलांना पोहण्याच्या तलावावर पोचवणारा गडी आला नसल्याने त्यांना ‘हाकण्याची’ वेळ आज आजीवर आली होती. सध्या शहरातला हा रस्ता पार करणं हे भवसागर पार करण्याहून बिकट होतं. चौफेर अंदाधुंद वाहनांचा मारा आणि इकडे पोरांकडून कोडी-कूटप्रश्न-असामान्य ज्ञान आणि असंबद्ध माहितीचे तुकडे वगैरेंचा मारा.

‘‘आज्जी, तुला म्हैतीये? एक असा इंग्लिश वर्ड आहे, की ज्याचं फर्स्ट लेटर आणि उच्चार एकच आहे. सांग पटकन.’’

‘‘चूप.’’

‘‘ह्य़ाऽऽऽ ‘क्यू’ नाही का? क्यू यू ई यू ई म्हणजे पण क्यू आणि पहिलं लेटर क्यू म्हणजे पण क्यू.’’

‘‘सिग्नल सुटला की पलीकडच्या सगळय़ा क्यू लावलेल्या गाडय़ा बंदुकीच्या गोळय़ांसारख्या सूं.. सूं.. करत अंगावर येतील ते आधी बघ रे सोन्या.’’

‘‘बंदूक ओल्ड झाली आजी. तुला पेलेट गन म्हैतीये? पेलेट.. गन.. पॉश..’’ नातू खुलून म्हणाला. त्याच्या मित्राने लगेच पुस्ती जोडली,

‘‘मला म्हैतीये.. पेलेट गनने असा नेम धरायचा.. मग खूप उंचावर उडून गोळय़ांचा स्फोट होतो.. मग असे सर्व बाजूंनी सटासटा र्छे उडतात..’’

‘‘ए, असे नाही काही.. असे..’’ नातवाने भर रस्त्यात छऱ्र्यासारखं उडून दाखवायला घेतलं. ही पेलेट गन आपल्याला कशी पेलेल हे आजीला कळेनासं झालं.

जुन्या हिंदी सिनेमातल्या आजीसारखी ही आजी खंगलेली, दमा जडलेली मुळीच नव्हती. नाही म्हणायला अलीकडे या नातवाच्या ब्रह्मज्ञानाने तिला कधीकधी दमायला व्हायचं.. तो कुठून काय माहिती मिळवायचा याचा पत्ता लागत नसे. पण माहितीच्या बाबतीत करट सदैव अप टु डेट! जगातलं सगळय़ात मोठं-सगळय़ात उंच- सगळय़ात जुनं-सगळय़ात वेगवान विचारू नका, मोटारी-विमानं-क्षेपणास्त्र म्हणू नका, इंटरनेट-विकिपीडिया- गुगल- व्हॉट्स अपच्या वाटेला जाऊ नका, मॉन्युमेंट्स-वंडर्स पुसू नका, सगळी माहिती त्याच्या चिमुकल्या तोंडावर सदैव तयार असे. सॅमसंग-मायक्रोमॅक्स-लेनोओ वगैरे कंपन्या तर त्याच्याशी चर्चा करूनच आपली नवी प्रॉडक्ट्स बाजारात आणताहेत असं वाटे. आपण जन्माला घातलेल्या प्रॉडक्ट्सच्या या अगाध हुशारीने त्याचे आई-बापच जिथे कायमचे दचकलेले होते, तिथे आजीचं काय होणार? कुतूहल-कौतुक-भरून येणं-दचकणं-गांगरणं-हताश होणं यातली समयोचित प्रतिक्रिया देऊनच तिला पुढे सरकावं लागे. त्याच सरावाने आजीने विषय बदलला.

‘‘सहा वाजेपर्यंतच स्वीमिंग असतं ना रे? मग लग्गेच टँकच्या बाहेर यायचं. मला घरकामं आहेत. टू मोअर मिनिट्स, पाच मिन्टं वगैरे करायचं नाही. आऊट अ‍ॅट सिक्स पॉइंट झीरो झीरो.’’

‘‘आज्जी तुला म्हैतीये? अँड्रॉईडच्या सिक्स पॉइंट झीरो ऑपरेटिंग सिस्टीमला नाव काय दिलंय? मार्शमेलो. आधी अँड्रॉईड हीच गुगलची ऑपरेटिंग सिस्टिम आहे बरं का.’’

‘‘असू दे रे.. जे आपलं नाही, ते कोणाचं का असेना.’’

‘‘ए, तुला अँड्रॉईड म्हैत नाही? अँड्रॉईड.. लॉलीपॉप.. किट कॅट.. जिंजर ब्रेड.. कायपण म्हैत नै तुला?’’

नातवानं ढीगभर ज्ञान आजीसमोर झटकलं. तोवर बुंगाट गेलेल्या एका मोटारसायकलने बरीच धूळही उडवली होती. ती ज्ञानासकट नाकातोंडात गेल्याने आजीला मोठ्ठी शिंक आली. लगेच नातवाच्या दोस्ताने आणखी एका ज्ञानाची पिंकटाकली.

‘‘ब्लेस यू आजी. शिंकल्यावर ब्लेस यू का म्हणतात म्हैतीये?’’

‘‘सोप्पंय. शिंकताना, लिसन आजी, माणसाचं हार्ट वन थाऊजंड्थ सेकंद स्टॉप करतं. वन डिव्हायडेड बाय थावजंड सेकंद. ते कायमचं थांबू नये ना म्हणून अशा शुभेच्छा द्यायच्या असतात.’’

नातवाने परस्पर मित्राला उत्तर देऊन टाकलं. अन् खळाखळा उकळणारं ज्ञान त्याला स्वस्थ कुठून बसू देणार?

‘‘ए, तू नाही रे सांगायचं. तुझ्या आजीला सांगू दे.’’

‘‘जाऊ दे रे. एवढय़ात सगळं कसं येणार बिचारीला.. थोडी थोडी मोठी झाली की थोडं थोडं लागेल तिला कळायला.’’ नातवाने अपार समजुतीनं म्हटलं. त्यावर त्याला कुशीत ओढून घ्यावं असं आजीला वाटलं. पण तोच आपल्याला कुशीबिशीत घेऊन जाईल हे जाणवून, थोडं रागानं, थोडं लाडानं ती त्याला म्हणाली, ‘‘कळली तुमची अक्कल. आता पोहायला चला आइनस्टाइन.’’

‘‘ई, मला आइनस्टाइन काय म्हणतेस? त्याला तर शाळेतनं काढून टाकलेलं. डायरेक्ट काढलेलंच. का असेल सांग? कारण तो वयाची पहिली ४ र्वष बोलू शकत नव्हता आणि ७ र्वष चालू शकत नव्हता.’’

‘‘म्हणूनच वाचली असेल त्याची आजी रे. पावलापावलाला अडाणी ठरवली जाण्यापासून..’’ आजी त्रासून म्हणाली. मुलांपर्यंत ते पोचलं नाही. कारण तेवढय़ात हॅरी पॉटर त्यांच्या सोबतीला आला होता आणि ब्रूमस्टिकवर बसून हॉग्वर्ट्सचा परिसर बघणं जास्त एक्सायटिंग की ‘बकबिक’च्या पाठीवरून जाणं जास्त थरारक यावर त्यांचा ऊहापोह सुरू होता. खाली मूठभर रस्ताही धड, सरळ, नितळ नव्हता आणि यांचं साभिनय सादरीकरण चाललेलं.

‘‘हा रस्ता आहे ना रे? किती दंगा करता.. त्यापेक्षा घरीच तुम्हाला खेळायला दिलं असतं तर बरं झालं असतं.’’

‘‘नो चॅन्स आजी. पोकेमॉन गो हा गेम अजून ऑफिशियली लाँच कुठे केलाय आपल्या कंट्रीने?’’

‘‘बॅन नाही केला हे नशीब समज. आतापर्यंत ट्वेण्टी टू कंट्रीजनी बॅन पण केलेला तो’’ मित्राने लगेच माहिती पुरवली. त्या खात्यावर कुठे काही कमी राहायला नको होतं पठ्ठय़ांना. त्या बावीस देशांच्या शहाणपणाला दाद देत आजीने आपलं म्हणणं पुढे रेटलं.

‘‘आता पोहायला आलाच आहात तर नीट सगळे स्ट्रोक्स मारा, उगाच एकमेकांवर पाणी उडवणं, आतमध्ये अदृश्य होणं, मोठय़ांदा दंगा, आरडाओरडा नको.’’

‘‘हवेतून जाणाऱ्या आवाजापेक्षा पाण्यातून जाणारा आवाज तिप्पट वेगाने जातो ना आजी.. म्हणून बाहेरच्या तुम्हाला तसं वाटत असणार.’’ नातवाने आजीचा आवाज सवयीने बंद केला. तोवर तरणतलावाचं फाटक दिसायला लागलंच होतं. ते नुसतं दिसल्यानेही आजीचा जीव भांडय़ात पडला. पुढचा तासभर मुलं एक वेळ नाकातोंडात पाणी घेतील, पण आपल्या नाकातोंडापासून नरडय़ापर्यंत कशातही.. कुठूनही.. जरासंही.. ज्ञान कोंबणार नाहीत या कल्पनेनं तिला गारगार वाटलं. अमेरिकेचा प्रसिद्ध जलतरणपटू मायकेल फेल्प्स हा ‘गोल्डफिश’ या टोपणनावाने ओळखला जातो ही अत्यंत महत्त्वाची माहिती तिला देऊनच नातवाने पाणी जवळ केलं, तर त्याच्या मित्राने ‘कोरडं करताना स्वत: ओला होतो तो कोण?’ हे कोडं वेळात वेळ काढून घातलं. त्याचं ‘टॉवेल’ हे उत्तर देऊन आजी (तलावाच्या) काठावर पास झाली. कारण हे कोडं दर तीन-चार दिवसांनी तिला घातलं जायचं. सोयीनुसार ती टॉवेल, तर कधी अज्ञान पांघरायची. आल्यासारखं पोरांचं पोहणं झालं तोवर आजी शांत बसून होती. वाटेत भाजी घेत घेत आणि क्षणोक्षणी सज्ञान होत रस्ता कसा कापायचा याचा विचार करत होती. अक्षरश: कालपरवापर्यंत आपण ज्यांना बोंडल्याने औषधं पाजली ती आपली नातवंडं आपल्यालाच बघता बघता डावाने-ओगराळय़ाने-कढईने-घंगाळय़ाने-ज्ञानामृत पाजू लागली आहेत हे ‘सृष्टीचे कौतुक’ नव्याने अजमावू लागली.

पोहल्यानंतर मुलं शरीराने दमली असली तरी त्यांच्या मते जे ज्ञान होतं ते देण्या-घेण्यात कणानेही मागे सरली नव्हती. २०२० मध्ये होणाऱ्या ३२व्या ऑलिम्पिकबद्दल त्यांना बरंच काही सांगायचं होतं. पोहताना वापरण्याचा चष्मा खरेदी करायचा तो स्नॅपडीलवरून करावा की अ‍ॅमेझॉनवरून याचा खल सुरू होता. रस्त्यात दिसलेली जियो डिजिटल लाइफची जाहिरात पाहून तर त्यांचे जीवच थाऱ्यावर राहिले नव्हते. शेवटी तेच तर त्यांनी ‘लाइफ’ मानलेलं होतं. खुद्द त्यांना आपलं लाइफ मानणारे त्यांचे आई-बाप त्यांना सतत नवनव्या गोष्टी देत होते, सांगत होते, दाखवत होते, त्यासाठी लागतील तेवढय़ा दीडक्या मोजत होते, आपली मुलं जगात कोणत्याही अर्थाने मागे पडू नयेत म्हणून छाती फुटेस्तोवर पुढे पळत होते आणि आजी सगळय़ाची फक्त प्रेक्षक होती. तलावासारखीच आयुष्याच्याही काठाकाठावरून फिरणारी आणि कोणी चुकूनमाकून ऐकणारा भेटलाच तर दुरून इशारा देणारी.. गरीब बिचारी श्रीमंत आजी!

पोहून घरी जाताना भूक लागलीच तर वाटेत कुठे बर्गर घ्यायचा, कोणत्या दुकानात तो एकावर एक फ्री मिळतो किंवा कोणत्या दिवशी सवलतीत मिळतो वगैरे सर्व गोष्टी मुलांना तोंडपाठ होत्या. पण आज त्याअगोदर आजीला थोडेफार बटाटे, टोमॅटो वगैरे विकत घ्यायचे होते. घरी स्वयंपाक करण्याची तिची जुनी खोड अजून गेलेली नव्हती. योगायोगाने थोडय़ाच अंतरावर एका फिरत्या भाजीविक्याची भाजीची गाडी समोर आली. तिच्यात बटाटे, टोमॅटो, इतरही काही भाज्या होत्या. आजीने तिच्या परीने खूप निरखून- पारखून बटाटे निवडले, टोमॅटो वेगळे काढले. हे तिचं काम सुरू असताना-पोटॅटो+ टोमॅटो यांचा संकर करून ‘पोमॅटो’ हे नवं पीक जगाच्या पाठीवर कोणता तरी देश कशी ती पिकवतोय याची मुलांनी शास्त्रशुद्ध उजळणी केलीच. ती करण्याऐवजी मुलांनी या भाज्या पिशवीत घ्याव्यात आणि त्यांचं ओझं घरापर्यंत वाहावं ही गोष्ट आजीच्या दृष्टीने जास्त जरुरी होती. पाकिटातले पैसे काढून फेरीवाल्याला ते देईपर्यंत तिनं मुलांवर तेवढं काम सोपवलं. पोरांनी इमानाने पिशवीत आधी टोमॅटो ठेवले आणि नंतर वरून गोटय़ा सटासट गलीत टाकाव्यात तसे बटाटे त्यावर टाकायला सुरुवात केली.

‘‘अरे, अरे.. हे काय करताय?’’ आजीला बघवेनासं झालं.

‘‘तूच म्हटलेली ना.. पिशवी भरा म्हणून..’’

‘‘अरे, पण मग खाली टोमॅटो आणि वर बटाटे का?’’

‘‘का? काय झालं?’’

‘‘फुटतील ना ते..’’

‘‘बटाटे?’’

‘‘टोमॅटो रे, ते बटाटय़ाच्या वजनाने फुटणार नाहीत का?’’

‘‘हो? ते फुटतील?’’

‘‘नुसते फुटणार नाहीत दिवटय़ांनो.. तुम्ही जसे पिशवीत भरताय त्यावरून घरी जाईपर्यंत सॉस किंवा सूप होईल त्यांचं आणि जाताना पिशवीतून गळून रस्त्यावर त्याचा सडा पडेल तो वेगळाच. ते काय ते पोमॅटो वगैरे पिकवायचे म्हणत होतात ना, ते शेतात पिकवत असणार. पिशवीत नाही. शिरतंय का डोक्यात?’’ बोलताना आजीचा एकदम आवाजच चढला. पोरं क्षणभर कावरीबावरी झाली. टोमॅटो नाजूक असतील, बटाटय़ांच्या भाराने फुटतील हे त्यांना कोणत्याच धडय़ात, साइटवर, विकिपीडियावर, अ‍ॅपवर, बुकमध्ये, क्विझमध्ये कोणीच कधीच दाखवलं नव्हतं, सांगितलं नव्हतं. अगदी आजीनंही नाही आणि एकदम एवढं रागवायचं म्हणजे काय? ती चपापून जागीच उभी राहिली. तेव्हा क्षणभरात आजीचा पारा उतरला. रागाऐवजी तिला त्यांची दया यायला लागली. आपल्या परिघातल्या, परिसरातल्या, रोजच्या व्यवहारातल्या, रोजच्या जगण्यातल्या असंख्य गोष्टी बघण्यासारख्या, समजून घेण्यासारख्या असतात, ‘म्हैती’ करून घेण्याजोग्या आहेत, हे त्यांना कोणी कधी सांगितलंच नसेल तर ती बिचारी तरी काय करणार? क्षणभर तिला वाटलं, नातवाला पोटाशी घेऊन म्हणावं,

‘‘सोन्या, तुला म्हैतीये, छोटय़ामोठय़ा स्क्रीनच्या, पडद्याच्या पलीकडे पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात. खूपदा रोजच्या जगण्यात त्यांचीच जास्त गरज असते. तुमच्या ऊरफोड पळापळीत त्याकडे दुर्लक्ष तर होत नाहीये?’’

आजीनं मनात वाक्यं जुळवली आणि गिळूनही टाकली. ही किंवा असली वाक्यं मुलांबरोबरच त्यांचे पालक, शिक्षक, संस्था वगैरे अनेकांना ऐकवायला हवी होती. तेवढी तिची पोच कुठून असायला? ती आणि मुलं आपापली ओझी घेऊन चालायला लागली. तेवढय़ात रस्त्यावरचा एलईडी दिवा लागला. लगेच नातू सवयीने म्हणाला, ‘‘आजी, तुला म्हैतीये? एलईडी म्हणजे काय? सांग.. अगंऽ, लाइट इमिटिंग डायोड नाही का?’’

मंगला गोडबोले mangalagodbole@gmail.com