23 November 2017

News Flash

अर्थ जगण्याचा!

अनेक माणसं अशी असतात जी बुद्धीने चांगली आहेत.

अंजली पेंडसे | Updated: September 9, 2017 5:19 AM

अनेक माणसं अशी असतात जी बुद्धीने चांगली आहेत. शिक्षण व्यवस्थित घेतलं आहे. पण परिस्थितीमुळे त्यांना हवं ते करत नाहीत. खरं पाहिलं तर दरवेळी परिस्थितीला दोष द्यायचा नसतो. आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला की जी काही प्रतिकूल परिस्थिती असेल ती हळूहळू नक्की बदलता येते. त्यासाठी आपली इच्छा तीव्र पाहिजे.

दुपारची अडीचची वेळ. भूक लागली म्हणून मैत्रिणीबरोबर एका हॉटेलमध्ये शिरले. मैत्रिणीची मुलगी परदेशी शिकायला चालली होती. म्हणून तिच्यासाठी आम्ही खरेदी करत होतो. मग जेवणाची वेळ टळून गेल्याचं लक्षात आलं. तेव्हा काहीतरी खाऊया म्हणून हे हॉटेल. आम्ही ज्या टेबलवर बसलो होते त्यासमोरच बरीच टेबलं एकापुढे एक लावून त्यावर साधारण पंधरा-सोळा बायका बसल्या होत्या. छान नटलेल्या, गप्पा मारत हसणाऱ्या आणि थोडय़ा एकमेकींची चेष्टा करणाऱ्या गप्पा रंगल्या होत्या.

आपण हॉटेलमध्ये सार्वजनिक ठिकाणी आहोत, आजूबाजूला इतरही लोक आहेत यांचे त्यांना भान नव्हते. साडय़ा, दागिने, खरेदी आणि गॉसिप यावरच सगळे बोलणे होते. मध्येच त्यांच्यापैकी एकीने पैसे गोळा करायला सुरुवात केली. एक  एक करत सर्वानी पैसे दिले. मग एकीने एका छोटय़ा प्लॅस्टिकच्या पिशवीत खूप छोटय़ा छोटय़ा चिठ्ठय़ा होत्या त्या एका प्लेटमध्ये ओतल्या आणि जिने पैसे गोळा केले होते तिने त्यातून एक चिठ्ठी काढली. वाचली. जिचे नाव आले होते ती हर्षांने किंचाळली. बाकीच्या बायका तिच्या आनंदात सहभागी झाल्या. मग टाटा, बाय बाय, सी यू वगैरेच कलकलाट करत त्या सगळ्या उठल्या आणि बाहेर जाऊ लागल्या. त्यातला एकीचा चेहरा ओळखीचा वाटला. पण पटकन लक्षात येईना. मला पाहताच ती हसून थांबली. म्हणाली, ‘‘मॅडम ओळखलं का मला? मी काही वर्षांपूर्वी तुमच्याकडे येत होते. सरोज-औरंगाबदला राहात होते.’’ आता मला एकदम सरोज आणि तिची सारी केसच आठवली. पण मी पाहिलेल्या त्या सरोजचा आणि या समोरच्या सरोजचा चेहरा सारखा असला तरी बाकी बाह्य़रूपात फारच फरक झाला होता. मी म्हटलं, ‘‘ओळखलं मी कशी आहेस आता? तुमची भिशी वाटतं?’’ सरोज म्हणाली,’’ हो ना. या सगळ्या माझ्या पतीच्या मित्रांच्या बायका आहेत. माझ्याही मैत्रिणी झाल्या. तशा माझ्या चार-पाच भिशा आहेत. त्यामुळे सारखंच काही ना काही चालू राहतं.

मी विचारलं, ‘‘मग सरोज तुझ्या नोकरीचं काय झालं? आणि तुझ्या कवितांचं पुस्तक आलं का ग?’’ सरोज हसू लागली. म्हणाली, ‘‘नोकरी सोडून दिली. माझ्या आई-बाबांना फार वाईट वाटलं. बाबा म्हणाले, एवढं शिकून तू इतकं छान करिअर केलंयस ते असं वाऱ्यावर का सोडतेस? पण मॅडम, लग्नानंतर माझं सासर इतकं श्रीमंत आहे की त्यांना मी नोकरी केलेली चालत नव्हती. मग सोडून दिली. आमच्या घरी साहित्य, वाचन असल्या गोष्टींमध्ये कुणाला इंटरेस्ट नाही. मी कविता करते याचीच सगळ्यांनी चेष्टा केली. मग कवितांची वही कुठे गेली अडगळीत कुणास माहीत. सारख्या पाटर्य़ा असतात. आमच्या घरी नाहीतर आम्ही दुसऱ्यांच्या घरी जातो. उरलेल्या दिवसात या भिशा. मी मस्त मजेत आहे.’’ मी म्हटलं, ‘‘छान वाटलं ऐकून. खरंच मजेत आहेस ना? कर कधीतरी फोन.’’ माझं व्हिजिटिंग कार्ड घेऊन सरोज गेली.

सगळं छान असूनही मला मात्र ही सरोज जुन्या सरोजच्या तुलनेत निस्तेज आणि बेगडी वाटत होती. सरोज खूप हुशार, मेहनती आणि व्यवहारी आहे. तिच्या कामाचा झपाटा मी पाहिला आहे. शिक्षणात चांगले यश मिळवल्यावर तिला नोकरीही उत्तम मिळाली होती. मेहनतीने आणि हुशारीमुळे सरोज कमी वेळात वरच्या हुद्दय़ावर पोचली होती. तिला फक्त मोठा पगारच नव्हता तर ती जे काम करत होती त्यामुळे त्या कंपनीचा मोठा फायदा होत होता.

आम्ही भेटल्यानंतर काही दिवसांनी सरोजचा फोन आला. म्हणाली, ‘‘मला तुम्हाला भेटायचंय!’’ आम्ही भेटल्यावर मला कळलं की तिचे सासरे त्या कंपनीचे एक संचालक होते. त्यांना त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी सरोज पसंत पडली. म्हणून हे लग्न झालं. सरोज म्हणाली, ‘‘मॅडम, मला या सततच्या पाटर्य़ा आणि भिशांचा उबग आलाय. आधी त्याची मजा वाटली. आता इट्स कमिंग ऑन माय नव्‍‌र्ह्ज! काय करू कळत नाही.’’ मी सरोजला मग काही गोष्टी सांगितल्या. सुचवल्या. तिनेही त्या अमलात आणल्या आणि आता तिची स्वत:ची एक मार्केटिंगची फर्म आहे. रेग्युलर व्यायामाने सरोजने स्वत:ची फिगर व्यवस्थित केली आहे आणि स्वत:च्या बुद्धीचा आणि शिक्षणाचा उपयोग करून स्वत:ची नवी ओळख सासरी आणि जगात निर्माण केली आहे.

सरोजसारखी खूप माणसं आहेत. जी बुद्धीने चांगली आहेत. शिक्षण व्यवस्थित घेतलं आहे. पण परिस्थितीमुळे त्यांना हवं ते करत नाहीत. खरं पाहिलं तर दरवेळी परिस्थितीला दोष द्यायचा नसतो. आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला की जी काही प्रतिकूल परिस्थिती असेल ती हळूहळू नक्की बदलता येते. त्यासाठी आपली इच्छा तीव्र पाहिजे. आपल्या मनात उत्कटतेने काही चांगले, योग्य, उपयुक्त आणि प्रगतीकडे नेणारे करावेसे वाटले पाहिजे. आपल्या मनात आपल्या सर्व क्षमता वापरून काही रचनात्मक, उपयुक्त, प्रगतिशील, विकासाकडे नेणारे काम करण्याची एक जबरदस्त ऊर्मी असायला हवी. मग ही ऊर्मी एक प्रेरणा निर्माण करते. या प्रेरणेच्या रेटय़ाने आपण काय करता येईल त्याचा शोध घ्यायला लागतो. शोध घेताना काही गोष्टी सुचतात, काही माहिती कळते, काही कामे करता येतील असे वाटू लागते. मग सगळ्या शक्यता विचारात घेऊन त्यातली एखादी साध्य करता येईल अशी गोष्ट, साध्य होऊ शकणारे काम, कृती निवडता येते. मग त्या गोष्टीचा, कामाचा प्रत्यक्ष कृतीने पाठपुरावा करून खरोखरच ते साध्यही होते.

या साऱ्याचा आपल्या जगण्याला अर्थ आणण्यासाठी, आपले जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी फार उपयोग होतो. यामुळे आपल्या क्षमता आणखी सुदृढ होतात. वाढतात. नव्या क्षमता विकसित होतात. आपली आपल्याला एक सक्षम, सुदृढ, सशक्त आणि प्रगतिशील व्यक्ती म्हणून ओळख होते. स्वत:प्रति आदर वाटू लागतो. स्वत:बद्दल यथार्थ प्रेमही वाटते. यातून आत्मविश्वास, स्वत:चा स्वत:वर असणारा भरवसा वाढतो. जगण्याची उमेद आणि उत्साह वाढतो. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या सान्निध्यात येणाऱ्यांवरही होतो. आपले प्रेम, आपली अर्थपूर्ण जगण्याची उत्कटता आणि आपली सकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ येणाऱ्या लोकांवर सकारात्मक परिणाम करते. परस्पर नातेसंबंध सुधारतात. जगण्यातली ही मजा तकलादू नसते. दिखाऊ नसते. अस्सल असते.

चला तर पाहू या. आढावा घेऊ या. आपण जे विहित काम करतो आहोत त्याला आपण मनापासून शंभर टक्के प्रयत्न देतो आहोत का? आणि आपण जे करतो आहोत त्याहून अधिक चांगले / वेगळे / निराळे काही आपल्याला करणे जमेल का? मनाच्या अशा विचारांमुळे नैराश्य, दु:ख, वैताग वगैरे आपल्या वाऱ्यालाही उभे राहणार नाही!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in

First Published on September 9, 2017 1:23 am

Web Title: kathakathan by anjali pendse part 4