31 October 2020

News Flash

ती कणखर आहे म्हणुनी..

साऱ्या प्रवासात १६ वर्षांच्या भूपालीला ६० वर्षांच्या व्यक्तीएवढे अनुभव आले.

भूपालीच्या आयुष्यात आलेल्या एका घटनेनं तिचं आयुष्य पूर्णत: बदलून टाकलं. पण या निराशेनं खचून न जाता तिनं आपलं आयुष्य मार्गी लावलं. बहिणीच्या नावाने प्रतिष्ठान सुरू केलंच, सृजनला दत्तक घेतलं आणि स्वत:ला एक उद्योजक म्हणून मान्यताही मिळवून दिली. त्या भूपाली निसळची गोष्ट जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..

भूपाली ही अहमदनगरमधील सुधाकर व विजया या सरळ, साध्या दाम्पत्याची द्वितीय कन्या. दीपाली तिची मोठी बहीण. दोघींनाही घरातून मुलगी यापेक्षा व्यक्ती म्हणूनच वाढवलं गेलं. अत्यंत सकस, समृद्ध वातावरण मिळालं. साहजिकच दोन्ही मुलींचं व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने बहरलं.

भूपाली आणि दीपालीचं नातं तर जन्मजन्मांतरीचं असावं असं घट्ट! दोघींमध्ये घट्ट मत्री तेवढंच प्रेम, ममत्व आणि सामंजस्य! लहानपणी भूपाली जेवढी अवखळ, खटय़ाळ आणि वांड तेवढीच दीपाली शांत, समंजस आणि परिपक्व! दीपाच्या प्रेमळ निगराणीत भूपाली सहजपणे घडत होती. ३ जून १९९४ रोजी ताईचं लग्न झालं. ताई खूश, सारं घर खूश, अठराव्या वर्षी दीपा अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला असतानाच लग्न झालं. जेमतेम दीड वर्ष गेलं असेल आणि तो काळ दिवस उगवला. १६ नोव्हेंबर, १९९५ बातमी मिळाली की दीपाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. दीपाचे बाबा तडकाफडकी पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचले. काही तासांपूर्वीच दीपा त्यांना भेटली होती. तिच्या तक्रारी ऐकून घेऊन तू लगेच माझ्याबरोबर चल, असं बाबांनी म्हटल्यावर, ‘‘माझी परीक्षा संपल्यावर सगळं आवरून मी येते मग घटस्फोटाचे बघू.’’ असं म्हणणारी दीपा गोळ्या कशी घेईल? बाबांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना हात जोडून अश्रुभरल्या डोळ्यांनीच विनंती केली. डॉ. चांदेकरांनीही बाबांच्या पाठीवर हात ठेवून शब्द दिला, ‘‘जे सत्य असेल तेच..’’

त्या एका घटनेने अवघ्या १६ वर्षांच्या भूपालीचं जगच बदलून गेलं. ताईने भूपालीला छोटय़ा छोटय़ा तक्रारी सांगितल्या होत्या. पण ताई असं काही टोक गाठेल असं वाटलं नव्हतं. मग सुरू झाली खऱ्या-खोटय़ाची लढाई. थोडी थोडकी नाही तब्बल ७ र्वष! खालच्या कोर्टात निकाल लागेपर्यंत! आणि नंतरही.. पण १६ वर्षांच्या भूपालीने हे आव्हान स्वीकारलं. वडिलांनी तिला भक्कम साथ दिली. कोर्टकचेऱ्या करताना शारीरिक, मानसिक, आíथकदृष्टय़ा कुटुंब पूर्णत: कोलमडलं. तरीही ताईला न्याय मिळवून देणं हेच भूपालीचंजीवितकार्य बनलं. पुरावे गोळा करण्याची अवघड जबाबदारी भूपाली आणि तिच्या बाबांनी स्वीकारली. दीपाच्या मृत्यूला प्रत्यक्ष हजर असलेला साक्षीदार (आय विटनेस) नव्हता. त्यामुळे मोठे आव्हान होते.

शवविच्छेदनाचा निकाल होता, ‘डोक्याला मार लागल्यामुळे मेंदूला इजा होऊन मृत्यू’ हा मार बाहेरून लागला हे सिद्ध करण्याची खरी गरज होती. यासाठी भूपाली, न्याय वैद्यक शाखेच्या (मेडिको लिगल) सल्लागाराला भेटली. त्यांच्या मते मेंदूला अशा इजा होण्याचं मुख्य कारण हे बाहेरून मार लागल्यामुळेच! भूपालीने मेंदूचाही सखोल अभ्यास केला. डोक्याला मार लागल्यामुळेच दीपाची बोटं काळीनिळी पडली होती. तिच्या पतीने मात्र झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत, असं भासविण्यासाठी गोळ्यांचे कागद तिच्या मृतदेहाजवळ टाकून गोळ्या कमोडमध्ये टाकून दिल्या असाव्यात. कारण पंचनाम्यात दिसलं की कमोडच्या पाण्याच्या परीक्षणात त्या गोळ्या सापडल्या, तिच्या पोटात गोळ्या सापडल्या नाहीत. शिवाय तिच्या पतीचा बॉक्सिंगचा एक ग्लोव्हज् (हातमोजा) सापडला होता. त्यानं तिला ठोसा मारला असावा. दीपालीची वृत्ती ही आत्महत्या करण्याची नव्हती. हे तिची पत्रं; वडिलांची साक्ष जी दीड दिवस चालली, भूपालीची साक्ष अर्धा दिवस चालली यावरून सिद्ध झालं. डॉ. चांदेकरांनीही वैद्यकीय भाषेत शवविच्छेदनातलं वास्तव सांगितलं. या सर्व मुद्दय़ांच्या आधारे ११ डिसेंबर, २००२ रोजी खटल्याचा निकाल लागला. निकालपत्र जवळ जवळ २०० पानी होतं. संपूर्ण दिवसभर त्याचं वाचन चालू होतं. या खटल्यासाठी अ‍ॅड. सदानंद देशमुख हे सरकारी वकील होते. न्यायाधीश गायकवाड यांनी दीपालीच्या पतीला जन्मठेप सुनावली. या सर्व क्लेशकारक प्रवासात दिलासा मिळाला..

या साऱ्या प्रवासात १६ वर्षांच्या भूपालीला ६० वर्षांच्या व्यक्तीएवढे अनुभव आले. खूप हवं ते आणि बरंच नको ते ज्ञान मिळालं. असंख्य माणसं, त्यांच्या जगण्याच्या नाना तऱ्हा समजल्या. अनेकांनी हवी ती मदत निरपेक्षपणे केली, तर काहींनी मदत न करता भलतीसलती अपेक्षाच फक्त केली. भूपालीनं विडा उचलला होता. ताईला न्याय मिळवून देण्याचा. खालच्या कोर्टात न्याय मिळाला तरी गप्प बसून चालणार नव्हतं. हायकोर्टात केस चालू होईपर्यंत, आरोपीचा जामीन नामंजूर करण्यासाठी पुन्हा मंत्रालयापर्यंत खेटय़ा आणि भेटीगाठी चालू झाल्या. जामीन नामंजूर झाला, तरी आरोपी पॅरोलवर बाहेरच होता. त्याच काळात भूपालीच्या अंगावर गाडी घालून तिला जिवे मारण्याचा प्रयत्नही झाला. तक्रारीनंतर ताईच्या नवऱ्याला परत अटक झाली.

पण त्या प्रचंड शारीरिक, मानसिक त्रासामुळे भूपालीच्या बाबांच्या, सुधाकर यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. संकटांची मालिका संपत नव्हती. त्यात दु:खाचं आभाळ कोसळलं. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी भूपालीवर आली. अशातच एक दिवस बातमी समजली, आरोपीची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली..

आश्चर्य, संताप, दु:ख, क्लेश, चीड, वैफल्य, पराधीनता..साऱ्या भावनांवर नियंत्रण मिळवून भूतकाळ मागे ठेवून भूपालीनं स्वत:च्या जीवनाची कारकीर्द सुरू केली. हा सारा काळ तिच्या साठी भावनिक आंदोलनाचा होता. लहान वयातच पोक्तपणाचं जगणं तिनं स्वीकारलं होतं खरं परंतु प्रत्येक दिवस आव्हान देणारा होता. तिला उठून उभं रहाणं भागच होतं..
वडील गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची कामं सुरू केली. भूपालीकडे सिव्हील वा कन्स्ट्रक्शन क्षेत्राची ना पदवी ना अनुभव. त्यात कामगारांची संख्या सातशेहून अधिक. हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या दृष्टीने तो निर्णय फार महत्त्वाचा होता. त्याच कामगारांकडून वडिलांची चालू कामं पूर्ण करून घेतली. अचानक अंगावर घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्यास २ वर्षांचा काळ जावा लागला. दरम्यान इतरत्र त्यांना कामं शोधण्यास सांगितलं. तशी ती सर्वाना मिळाली. मग सन्मानानं वडिलांचा व्यवसाय पूर्ण बंद केला. आजही ते सर्व लोक भूपालीशी जोडलेले आहेत.

दीपासंबंधी न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना ‘दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठान’ची स्थापना निसळ कुटुंब आणि त्यांच्या सहवेदना मित्रमंडळांनी केली होती. त्या माध्यमातून भूपालीने अनेकांचे विस्कटलेले संसार मार्गी लावले. प्रतिष्ठानमार्फत १६ नोव्हेंबर या दीपाच्या स्मृतीदिनानिमित्त काव्य स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा घेतल्या. त्याला भारतभरातून प्रतिसाद मिळाला. समदु:खी लोक जोडले गेले. काहींना त्यांच्या दु:खातून मार्ग सापडला. दु:खाला सकारात्मक वाट मिळाली. वडील गेल्यानंतरही भूपालीने ३ वष्रे प्रतिष्ठानचे काम केले. आज स्पर्धा बंद केल्या, तरी वाचनालय आणि अभ्यासिका चालूच आहे. एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. त्यातून एक मुलगा कलेक्टर झाला आहे, एक मुलगी आणि दोन मुले पीएसआय झाली आहेत. आपल्या दु:खातून आणि कायद्याची लढाई लढताना भूपाली खूप शिकली. ती वाचकांनाही उपयोगी म्हणून ती सांगते.
दुर्घटना-छळ, खून, संशयास्पद गोष्टी घडल्यानंतर ताबडतोब तक्रार नोंदवणे (एफआयआर) आवश्यक असते. उशीर झाला तर पुढे गुंतागुंत वाढत जाते.

खटला दाखल करण्यापूर्वी स्टेटमेंट बनवलं जातं, त्यानंतर ३-४-५ कितीही वर्षांनी खटला सुरू होतो. खटला सुरू झाल्यावर स्टेटमेंट बाहेरचे काहीही बोलता येत नाही-एक शब्दही नाही. म्हणून स्टेटमेंटची झेरॉक्स काढून ठेवावी. कारण एवढे दिवस स्टेटमेंटमधील नोंदी शब्दन् शब्द लक्षात राहात नाहीत.
सरकारी वकिलांकडे अनेक खटले असतात, त्यांना पुरावे गोळा करण्यास मदत केली तर ते सोयीस्कर होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, न्याय मिळविण्यासाठी कितीही कालावधी जाऊ शकतो. तो देऊन न्याय मिळविण्याची प्रबळ इच्छा आणि चिकाटी असेल तरच यात पडावं.

निर्भयपणा, धाडस, धडाडी, कामातील चिकाटी, प्रखर बुद्धिमत्ता, बहिणीबद्दल अत्यंतिक प्रेम, तिला न्याय मिळवून देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळेच भूपालीचा हा असामान्य प्रवास घडला तो इतरांना मार्गदर्शन करणारा मलाचा दगड आहे. इतरांना मार्गदर्शन करण्याची तिची इच्छाही तेवढीच. इतर देशांत आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागते. आपल्या देशात मात्र अनेकदा आरोपी निर्दोष मानला जातो. फिर्यादीच्या वकिलाला त्यावरील आरोप सिद्ध करावे लागतात. जे मोठे आव्हान असते. या सर्व घडामोडीत भूपालीची उमेदीची १० वष्रे सरली. अभियांत्रिकीचं शिक्षण त्यातच केलं. पण ते कुठं तरी मनाच्या तळाशी विरून गेलं.
आता स्वत:च्या आयुष्यात काहीतरी करायचं एवढं मात्र जे काही करायचं ते स्वबळावर हे पक्कं होतं. कुणाच्या ओळखीचाच काय स्वत:च्या वडिलांच्या नावाचाही फायदा घ्यायचा नाही. हेही निश्चित होतं. त्यामुळं कष्टाला पर्याय नाही हे स्वीकारलं, अनुभवासाठी, अधिक ज्ञानासाठी काही दिवस क्वेस्ट (बंगळुरू) या कंपनीत नोकरी केली. छोटय़ा छोटय़ा जॉब पासून रडापर्यंत असंख्य उत्पादनांची माहिती मिळवली. त्यांचं ड्राइंग पाहायला मिळालं. अनेक ओळखी झाल्या. व्यावहारिक ज्ञान मिळालं. संवादकौशल्य शिकायला मिळालं. आत्मविश्वास आला.
उद्योग वसाहतीत (एमआयडीसी) एक लेथ मशीनचं काम चालवायला घेतलं. पण छोटीशी मूर्ती आणि मुलगी त्यामुळं कोणी काम द्यायला तयार होईना. मयूर नावाच्या कंपनीने तिला धातू बांगडी २ रुपये आणि बुश ५० पसे या दराने किरकोळ काम दिलं. सुरुवातीपासून दर्जा आणि वेळ कठोरपणे पाळले. कामगारांच्या कामासह, टेंपो भरण्यापासून टेंपो चालवण्यापर्यंत सर्व काम एकटीनं केली. हळूहळू कामं मिळत गेली. कामानं वेग घेतला. बाजारपेठेत सातत्यानं चढ-उतार असले तरी सातत्यानं कामं मिळत राहिली. कामं देणाऱ्यांचा विश्वास व स्वत:चा आत्मविश्वास दोन्हीही वाढत आज स्वत:ची जागा, ४ लेथ मशीन, दोन सीएनसी मशीन, दोन ड्रिल मशीन आणि १० कामगार एवढं सर्व व्यवस्थापन डी.एस.एन. इंटिग्रेट या नावानं भूपालीनं कंपनी सुरू केली आहे. १० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महत्प्रयासाने भूपालीने खडतर कष्ट करून बस्तान बसवलं.

एवढं सारं झाल्यावर तरी लग्न करून वैयक्तिक सुखात एखादीनं निवांत, सामान्य जीवनमान सुरू केलं असतं. पण ती सामान्य नाहीच. सगळे करतात म्हणून लग्न करायचं हे तिला मान्य नाही. भूपाली स्पष्ट सांगते, ‘‘माझी स्वतंत्र, मनस्वी वृत्ती लग्नाच्या बंधनात राहू शकणार नाही. शिवाय कोणतंही नातं कायद्याने किंवा विधीने मला स्वीकारता येणार नाही. पण मूल वाढवण्याचा आनंद मात्र मला मनापासून घ्यायचा होता. ताईचंही तसंच मत होतं. मी मुलगी दत्तक घ्यावी आणि तिचं नाव सृजन ठेवावं. असं ताईशी माझं बोलणं झालं होतं. त्यानुसार भूपालीनं मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव सृजन ठेवलं. अत्यंत डोळसपणे तिला वाढवण्याचा भूपालीचा सृजनशील प्रवास सुरू झाला. यातही भूपालीनं स्वत:ची वेगळी वाट शोधली. सृजनला आईच्या साथीने वाढवताना भूपाली कारखानाही समर्थपणे सांभाळते आहे. मिहद्रा, क्रॉम्पटन, प्रीमियर..यासारख्या मोठय़ा कंपन्यांना तिच्या कंपनीतून जॉब पुरवले जातात. काही जॉब त्या कंपन्यांकडून इटली, लंडनलाही जातात.

पूर्वी इतरांकडून पुरवले जाणारे हेच जॉब ५ वष्रे सातत्याने नाकारले जात होते. पण डीएसएनमार्फत तेच जॉब आता सलग ३ वष्रे इटलीला जातात. ते आजतागायत एकदाही नाकारले गेले नाहीत. याचा भूपालीला स्वाभाविकपणे सार्थ अभिमान वाटतो. भूपालीच्या कामासाठी तिला आजपर्यंत-भारतीय स्त्री शक्तीचा पुरस्कार मिळालेला आहे.

विद्यार्थी दशेत असतानाच ज्याला नॅशनल इनोव्हेटीव्ह अवॉर्ड मिळाला त्या प्रोजेक्टच नाव होतं , २ स्ट्रोक पेट्रोल इंजिन टू २ स्ट्रोक एलपीजी इंजिन विथ सेपरेट ऑइल फिडींग सिस्टिम. याशिवाय भारतीय विश्वकोषात महाराष्ट्रातील ३०० स्त्रियांमध्ये तिची २०० व्या स्थानावर नोंद आहे., फिरोदिया विद्यालय स्मरणिकेतील १४० वर्षांतील नामवंत विद्यार्थ्यांमध्ये तिच्यावर दीड पान माहिती आहे.
आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाने भूपालीने स्वत:च्या आयुष्याला आकार दिला आणि इतरांच्याही आयुष्याला दिला. महिला दिनानिमित्त तिच्या कर्तृत्वाला सलाम.
भावनांचा रोलर कोस्टर
सर्व जाणिवांचा खेळ आहे. एका घटनेनं कोलमडून जावं, तर उलट उभंच केलंय अदृश्य शक्तीनिशी. चालत राहिलेय कोण्या एका सावलीचं बोट धरून. कोण असेल ती? कोणती ताकद?
चाकोरीबाहेरचे निर्णय सातत्याने घेताना.. निर्णयांवर ठाम राहणं आणि स्वत:ला सिद्ध करणं, आंतरिक ऊर्जा देणारं आहे. माणूस जन्माला येण्याचे कोणते ऋतू असतील? मी माझ्या वाटय़ाला आलेल्या ऋतूंसाठी मात्र खूप समाधानी आहे.
ताईची केस, बाबांचं जाणं, बाबांची काम मानाने पूर्ण करण्याचा ध्यास, प्रतिष्ठान, घराची आर्थिक जबाबदारी, माझा व्यवसायातच उतरण्याचा निर्णय.. माझ्या पिल्लूचं, सृजनच घरी येणं.. भावनिक नि मानसिक आंदोलनांचा दीर्घ प्रवास.रोलर कोस्टरसारखा. या प्रवासात ‘माझी आई’ माझ्या सोबत, माझ्या मागे नेहमीच ठाम उभी राहिली आहे. खरं तर हा प्रवास एकटय़ाचा नाहीच. या वाटचालीत अनेक माणसं भेटली, जोडली गेली.. ज्यांनी मला मदत केली, मला सांभाळलं, जाणून घेतलं, माझ्यावर माया केली. कित्येकांशी तर आता संपर्कही नाही. या लेखाच्या निमित्ताने सर्वाची पुन्हा एकदा प्रकर्षांने आठवण होते आहे. त्यांचे आभार.
– भूपाली निसळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:08 am

Web Title: life story of bhoopali nisal
टॅग Womens Day
Next Stories
1 जेंडर बजेट उपचारापुरते….
2 स्त्रीकेंद्री अर्थसंकल्प अजूनही कागदावरच?
3 अपंग नव्हे अभंग
Just Now!
X