विसाव्या शतकाच्या मध्यावर ‘सिमॉन द बुव्हॉ’ यांच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाने संपूर्ण जगभरातील स्त्रीला खडबडवून जागे केले. त्यातील ‘स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडवली जाते’ या सिद्धांताने स्त्रीला अंतर्मुख व्हायला लावले. स्वत:ला तपासायला लावले. व्हर्जिनिया वुल्फ, क्लाश झेटकीन, मिसेस ऱ्हीस डेव्हिड्स, कॅथरीन ब्लॅकस्टोन यांसारख्या पाश्चात्त्य देशातील लेखिका – कार्यकर्त्यां स्त्रियांनी स्त्रीचळवळीला ‘स्त्रीत्वा’च्या पलीकडे जाऊन स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी दिली. तिच्याकडे ‘माणूस’ म्हणून पाहावे ही ती दृष्टी होय. १९७५चे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि तेव्हापासून सुरू झालेल्या ८ मार्च या जागतिक महिला दिनाने पुढील प्रत्येक वर्षांगणिक स्त्रीला जागृत करण्याचे काम केले. तिच्यावर ‘स्त्री’ म्हणून होणाऱ्या अन्याय-अत्याचाराकडे प्रतिकारात्मक भावनेने बघण्याचे आणि प्रसंगी कृती करण्याचे बळ दिले. या वर्षीच्या सुरुवातीलाच ‘मी टू’ या चळवळीने जोर धरला आहे. तो या प्रतिकाराच्या भावनेतूनच.

भारत मुख्यत: खेडय़ात वसलेला आहे. उरलेला शहरी भाग- त्यात झोपडपट्टय़ांत राहणारा वर्ग जास्त आहे. दोन्हीकडे कष्टकरी स्त्रिया घराचा आर्थिक भार उचलतात. कुणा शेठकडे कामाला जाताना किंवा ठेकेदाराकडून काम मिळवताना आणि ते टिकवताना जर त्यांना शारीरिक शोषणाला बळी पडावे लागत असेल तर त्याविरुद्ध त्या कसा आणि कुठे आवाज उठवणार?

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
provisions regarding citizenship in part II of indian constitution
संविधानभान : नागरिकत्वाची इयत्ता
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

गरीब-मजूर स्त्रिया आपल्यासाठी खुलेआम उपलब्ध व्हायला पाहिजेत, अशी मानसिकता उघड करणारं एक मी प्रत्यक्ष पाहिलेलं उदाहरण इथे देऊ  इच्छिते. १९९० मधील ही घटना आहे. मी जेव्हा विठ्ठलवाडीला (कल्याणच्या पुढचं स्टेशन) एका चाळीत माझ्या नवऱ्याबरोबर राहत होते. आमच्या बाजूच्या खोलीमध्ये एक दाम्पत्य भाडय़ाने राहत होतं. यातील स्त्री तिच्या नवऱ्यापेक्षा खूप कमी वयाची होती. म्हणजे पत्नी तरुण होती आणि पती वयस्कर होता. ते दोघे गावाहून मुंबईच्या दिशेने कामासाठी आलेले होते. दोघेही दिवसभर बिगारी काम करायचे आणि सायंकाळी घरी यायचे. विठ्ठलवाडी तेव्हा नुकतीच विकसित होत होती. गाववाल्यांचं वर्चस्व अजूनही कायम होतं. काही गाववाल्या उच्चवर्णीय तरुणांनी (गुंडांनी) त्या दाम्पत्याला जाता-येता पाहून ठेवलेलं होतं. एक दिवस दोन तरुण तिथे आले. हे दोघेही पती-पत्नी बाहेर ओटय़ावर बसलेले होते. त्यांच्याजवळ येऊन एका गुंडाने त्या पतीला बुटांच्या लाथांनी मारायलाच सुरुवात केली. मारता-मारता तो बोलत होता, ‘‘तू या बाईच्या लायक नाहीस. हिला माझ्याबरोबर पाठवून दे. नाहीतर मी उद्या हिला पळवून घेऊन जाईन.’’ बिचारा पती घाबरून गेला. पत्नी तर खूपच घाबरली. त्या रात्री मी त्या दोघांनाही माझ्या घरी झोपायला ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये जायची तयारी केली, पण सकाळ होताच ते दोघेही तिथून निघून गेले. त्यांचा पोलिसांवरही विश्वास नव्हता. ते पुन्हा गावी गेले की अजून कुठे गेले? मला समजू शकले नाही.

थोडक्यात, शोषित समाजाच्या स्त्रियांविषयी असा विचार केला जातो. मजबुरी, दहशत, आत्मविश्वासाचा अभाव, गरिबी या साऱ्या कारणांमुळे ही स्त्री चूप राहते आणि यातूनही जर कोणती घटना बाहेर आलीच तर माध्यमंही अशा घटनेला जास्त महत्त्व देत नाही, जितकं उच्चवर्णीय, श्रीमंत स्त्रीवरील अत्याचाराच्या घटनेला देते. यामुळेच तळागाळातील स्त्रीवरील अन्याय-अत्याचाराला शहरी वर्ग गांभीर्याने घेत नाही. या स्त्रीला आवाज देण्याचं काम सर्व थरातील समाज देईल तेव्हा त्याही नक्कीच आपल्यावरील अन्यायाची वाच्यता करायला पुढे येतील.

प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांच्या ‘माणसं’ पुस्तकात विडीकामगार स्त्रियांचे ठेकेदारांकडून कसे शोषण होते याचे विदारक चित्रण आलेले आहे. संपूर्ण भारतातील कामगार स्त्रियांच्या शोषणाचे हे प्रातिनिधिक चित्रण आहे. नाका कामगार स्त्रियांचे, उसतोडणी मजूर स्त्रियांचे, सफाई कामगार स्त्रियांचे होणारे शोषण हे सर्व त्या स्त्रियांच्या असहाय परिस्थितीचा, मुकादम किंवा ठेकेदार यांनी घेतलेला फायदा असतो. कामावरून कमी होण्याच्या आणि त्यामुळे कुटुंबाच्या होऊ घातलेल्या उपासमारीच्या भीतीने, या स्त्रिया आलेल्या परिस्थितीला शरण जातात. जर त्यातील कुणी एखादीने याविरुद्ध तक्रार करायचा प्रयत्न केला तर तिलाच खोटे ठरवले जाते. तीच चारित्र्यवान नाही असा आरोप केला जातो, तिची अवहेलना केली जाते. चरित्र्यहननाच्या भीतीने अनेक स्त्रिया पुढे येतच नाहीत. कारण यात मग एखादी लग्न न झालेली लहान वयाची मुलगी असेल तर तिचे पुढे लग्न होणे, तिला समाजाने स्वीकारणे यासारख्या गोष्टीत प्रचंड अडथळे निर्माण होतात. म्हणजे ज्या पुरुषाने तिचे लैंगिक शोषण केलेले असते तो साळसूदपणे समाजात वावरतो आणि जी पीडित असते तिला मात्र समाज बहिष्कृत करतो.

पोलिसात तक्रार केल्यावरसुद्धा पोलीससुद्धा अनेकदा अतिशय अपमानकारकपणे स्त्रीलाच धारेवर धरतात. चौकशीच्या नावाने नको-नको ते प्रश्न विचारतात, जेणेकरून तिची मान शरमेने खाली जावी. यात प्रसारमाध्यमेही कमी नसतात. थोडक्यात, या सर्व गोष्टींना घाबरून लैंगिक शोषणाला बळी पडलेली स्त्री आणि तिचे कुटुंबीय या गोष्टीची बाहेर वाच्यता करणे टाळतात. आपल्या घराची अब्रू ते अशा प्रकारे चार भिंतींत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या नीलम माणगावे यांच्या ‘निर्भया लढते आहे’ या कथासंग्रहातून, या परिस्थितीवर चांगलाच प्रकाश टाकलेला आहे.

तळागाळातील स्त्रीच्या लैंगिक शोषणाचा गरिबीबरोबरच दुसरा एक पदर आहे, तो म्हणजे जात. ‘मनुस्मृती’ने स्त्रीच्या लैंगिक शोषणासाठी जातीनुसार वेगवेगळे शिक्षेचे नियम दिलेले होते. जसे शूद्र-अतिशूद्र मानल्या जाणाऱ्या स्त्रीचे जर उच्च मानल्या गेलेल्या जातीतल्या पुरुषाकडून लैंगिक शोषण झाले तर त्याला शिक्षा म्हणून, काही मोहरा घेऊन सोडून देण्याची मुभा आहे. पण जर कनिष्ठ जातीय पुरुषाकडून उच्च जातीय स्त्रीकडे नजर वरती करून बघण्याचा जरी गुन्हा घडला तरी त्याला गवताच्या गंजीत जिवंत जाळण्यासारख्या शिक्षेची तरतूद होती. आज मनुस्मृती शिल्लक नाही. अनेकांना मनुस्मृती माहीत नाही. पण मनुस्मृतीने निर्माण केलेली मानिसकता अजूनही अनेकांच्या मनीमानसी रुजलेली आहे. गाव-खेडय़ात तर जातव्यवस्था आजही पक्की ठाण मांडून आहे. म्हणूनच २००६ मध्ये साऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी भंडारा जिल्ह्य़ातील खरलांजीची घटना घडली. तिथे गरिबी हा मुद्दा नव्हता तर जात हा मुद्दा होता. ठळकपणे समोर आलेली आणि गाजलेली ही घटना म्हणून साऱ्यांना माहीत पडली. पण अशा किती तरी घटना भारताच्या कानाकोपऱ्यात राजरोसपणे घडतात. वर्तमानपत्रात काही घटना वाचनात येतात. येता-जाता छेडछाड करणे या गोष्टी तर सर्रास असतात. कोण त्याची दाद घेते? सत्ता, संपत्ती, राजकीय ताकद आणि जातवर्चस्व यातून या घटना सर्रास घडतात; आणि अशा घटनांत पीडित स्त्रीचा वाली कुणीही नसतो. किंबहुना तिच्या जात-समूहाकडूनही ती अव्हेरली जाण्याच्या घटनाच जास्त असतात. म्हणून मग गावात जर कुणाकडून काही त्रास होत असेल, तर स्त्री निमूटपणे सारे सोसण्याचा मार्ग पत्करते. जीव गमावण्यासारख्या किंवा बहिष्कृत जिणे जगण्यासारख्या भयानक परिणामांपासून वाचण्यासाठी, तिच्यामते हा ‘छोटा छोटा’ त्रास सहन करणे पसंत करते. माझ्याकडे समुपदेशनाला येणाऱ्या अनेक स्त्रिया अशाप्रकारच्या अत्याचाराला सामोऱ्या गेलेल्या असतात.

सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांचे मुकादमाकडून किंवा ठेकेदाराकडून शोषण या मुद्दय़ाबरोबरच दुसराही एक कळीचा मुद्दा या क्षेत्रातील काही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताना लक्षात आला. रमेश हरळकर नावाचे एक कार्यकर्ते ज्यांनी ‘कामगार परिवर्तन संघ – मुंबई’ या संस्थेची स्थापना केलीय आणि १९७२ पासून ते सफाई कामगारांसाठी काम करतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, नगरपालिकेच्या सफाई खात्यात काम करणाऱ्या व्यक्तीला मुंबईत नगरपालिकेचे एक छोटसे घर मिळते. हे घर हातचे जाऊ नये म्हणून त्याच्या मुलाला नाइलाजाने हाती झाडू घ्यावा लागतो, मग तो कितीही शिकलेला असू दे. ज्यांना मुलगा नाही त्यांच्या अविवाहित किंवा घटस्फोटित, या अटीत बसणाऱ्या मुलींना कामावर घ्यायचा नियम आहे. जर तरुण व्यक्ती मरण पावली तर त्याची पत्नी अनुकंपा तत्त्वावर सफाई कामगार म्हणून रुजू होऊ शकते. या नोकऱ्या मिळवताना  पैशांपासून वाटेल ती किंमत काहींना मोजावी लागते मधल्या दलालांपाशी. म्हणजे प्रत्यक्ष काम करतानाचे शोषण वेगळे आणि काम मिळावे म्हणून होणारे शोषण वेगळे. हरळीकरांचे असे निरीक्षण आहे की, संविधानाने दिलेले कायदे आजही या स्त्रियांना माहीत नाहीत.

तळागळातील स्त्रियांचे हे सारे चित्र बघितल्यानतंर प्रश्न पडतो की, भारताच्या संविधानाने केलेले कायदे जर या स्त्रियांना माहीत नसतील तर, ‘मी टू’ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेली चळवळ त्यांच्यापर्यंत कशी पोचणार? दुसरीकडे धार्मिक भोळेपणातून बाबा – महाराजांच्या जाळ्यात अडकून शोषणाला बळी पडणाऱ्या स्त्रियांची संख्याही काही कमी नाही. आसाराम बापू, बाबा रहीम आणि असे किती सारे बाबांचे आश्रम म्हणजे धार्मिकतेच्या आड स्त्रियांचे लैंगिक शोषण करणारे अड्डे बनलेले आहेत. हे अड्डे कसे उद्ध्वस्त करणार? भारतातील स्त्रीवादी चळवळीपुढे हे मोठे प्रश्न आहेत. खेडय़ापाडय़ातील किंवा झोपडपट्टीत राहाणारी रोजंदारीवर काम करणारी आमची अशिक्षित स्त्री एकीकडे खमकी म्हणूनही नजरेस पडते. घरच्यांवर कुणी अन्याय-अत्याचार केला तर ती वाघिणीसारखी पिसाळून उठते; पण लैंगिक शोषणासारख्या मुद्दय़ावर मात्र पोटापाण्याच्या प्रश्नामुळे किंवा इज्जतीच्या प्रश्नामुळे चूप राहणे पसंत करते.

‘मी टू’च्या चळवळीत आज जगभर धिटाईने पुढे होऊन आपल्यावरील अन्यायाविषयी बोलू लागलेल्या ही स्त्री बोलू लागेल तेव्हा तिला सर्व अर्थाने संरक्षण देण्याचे आणि त्यासाठी सामाजिक, राजकीय पातळीवर दबाव आणण्याचे काम अग्रक्रमाने करणे, हा अजेंडा भारतातील स्त्रीवादी चळवळीपुढे येणे ही आजची गरज आहे, असे जेव्हा होईल तेव्हा सर्वच थरांतील स्त्रिया ‘मी टू’ चळवळीचा घटक बनतील.

खरे तर जगातील सर्वप्रथम स्त्रीवादी तत्त्वज्ञान भारतातच निर्माण झालेले आहे. ‘थेरीगाथा’ या पालिभाषेतील ग्रंथातून स्त्रीने आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या ‘मार’ या प्रवृत्तीशी संवाद करताना ‘सोमा’ नावाची थेरी म्हणते की, ‘स्त्रियांनी जर मनात आणले तर पुरुषालासुद्धा अशक्य असे सर्वोच्च ज्ञान ती प्राप्त करू शकते. तिथे पोचताना ‘इत्थिभाव’ म्हणजे ‘स्त्रीभाव’ तिचे काय करू शकणार आहे? इ. स.पूर्व सहावे शतक ते इ. स.पूर्व तिसरे शतक या तीनशे वर्षांच्या कालखंडातील स्त्रियांचे अनुभवकथन करणाऱ्या या ग्रंथातून सोमाथेरीसारख्याच, ‘स्त्रीत्वा’च्या पलीकडे जाऊन स्वत:च्या आंतरिक सामर्थ्यांवर विश्वास ठेवणाऱ्या अशा अजून किती तरी स्त्रिया आढळतात. वेदकाळाच्या प्रारंभी ‘गार्गी’ या भारतीय स्त्रीनेदेखील याज्ञवल्क्य यांना प्रतिप्रश्न विचारून स्वत:ची विद्वत्ता सिद्ध केली होती. विद्वत्तेला किंवा कर्तृत्वाला स्त्री आणि पुरुष हा भेद आडकाठी ठरू शकत नाही हेच तिने त्या काळात सिद्ध केलेले होते. तर अशा प्रकारे गार्गी-मैत्रेयी-सुलभा – बुद्धकाळातील थेरी हा सामर्थ्यशील भारतीय स्त्रियांचा वारसा आहे.

हाच वारसा भारतीय संविधानाने मान्य करून स्त्रीच्या कर्तृत्वाला ‘माणूस’पणाच्या पातळीवर कायद्याने मान्यता दिलेली आहे. मात्र इथे वर्षांनुवर्षे रुजलेली, जात-पुरुषसत्ताक, धर्मसंस्कृती, सर्वच पातळ्यांवर समानता आणू पाहणारी ‘संविधान संस्कृती’ रुजू देत नाही. म्हणूनच स्त्रीला सर्वस्व बळ देणारी अशी समाजाची निरोगी दृष्टी बनविणे हे स्त्री आणि पुरुष मिळून आपणा सर्वाचेच काम आहे. ८ मार्चचा महिला दिन, स्त्रियांनी ‘स्त्रीत्वा’च्या जाणिवेतून आणि पुरुषांनी ‘पुरुषत्वा’च्या जाणिवेतून मुक्ती मिळवून, दोघांनीही ‘माणूस’पणाच्या पातळीवर येत निरोगी समाजव्यवस्था निर्माण करू या, असा संकल्प करण्याचा दिवस आहे असे मला वाटते.

– प्रा. आशालता कांबळे

k.ashalata@yahoo.co.in