11 December 2017

News Flash

पटली पाहिजे अंतरीची खूण!

मध्यंतरी ‘म्हातारा बाप’ नावाची एक गोष्ट वाचनात आली.

संपदा वागळे | Updated: June 17, 2017 4:53 AM

आपल्या सख्ख्या आई-वडिलांना घराबाहेर काढण्याच्या अनेक घटना घडत असताना दूरच्या नात्यातल्या किंवा नातं नसलेल्यांना वडील मानून त्यांची अखंड सेवा करणारे अनेक जण याच समाजात आहेत, हेच नात्याचे विलक्षण बंध! उद्याच्या जागतिक पितृदिनानिमित्त अशाच काहींना वडिलांप्रमाणे सांभाळणाऱ्या मुलांच्या या कथा. सगळ्यांसाठीच मायेचा संदेश देणाऱ्या!

मध्यंतरी ‘म्हातारा बाप’ नावाची एक गोष्ट वाचनात आली. तरुण मुलगा आणि वडिलांमध्ये संवाद चालला होता.. ‘‘बाळा, ते काळं दिसतंय ते काय आहे?’’‘‘बाबा तो कावळा आहे?’’ थोडंसं अंधूक दिसणाऱ्या वडिलांना त्या काळ्या रंगाच्या गोष्टीबद्दल बरंच कुतूहल वाटत होतं. थोडा वेळ गेल्यावर वडिलांनी पुन्हा विचारलं, ‘‘बाळा ते काळ्या रंगाचं काही तरी हलतंय, ते काय आहे?’’ ‘‘बाबा तो कावळा आहे, सांगितलं ना एकदा..’’ पुन्हा थोडय़ा वेळाने वडिलांनी तोच प्रश्न विचारल्यावर..‘‘बाबा तुम्हाला किती वेळा तेच तेच सांगायचं.. एकच प्रश्न किती वेळा विचारताय..’’ असं म्हणत मुलगा चिडून घरातल्या खोलीत निघून जातो. वडील थरथरत्या पावलांनी उठतात, आपल्या खोलीत जातात. कोपऱ्यातील डायरीवरची धूळ हातानेच पुसत ती उघडतात, पिवळ्या रंगाची ती जीर्ण पानं. त्यावर लिहिलेलं ते वाचतात.. आज मला दिनूनं कुतूहलानं विचारलं, ‘बाबा ते काळं काय आहे?’ ‘बाळा, तो कावळा आहे..’ मी त्याला सांगितलं. त्याने पुन्हा तोच प्रश्न मला विचारला. मी त्याला पुन्हा सांगितलं, ‘बाळा, तो कावळा आहे..’ दिनू प्रश्न विचारत होता याचा मला खूप आनंद वाटत होता. आज त्याने एकूण ३३ वेळा मला तोच प्रश्न विचारला, ‘बाबा ते काय आहे..’ आणि मीही प्रत्येक वेळी त्याला अगदी आनंदाने सांगितलं की, ‘‘राजा तो कावळा आहे..’’

गोष्ट वाचताना तुमच्याही घशात आवंढा आला ना? खरं तर लहानपणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलांकडून आई-वडिलांचे हातपाय थकल्यावर वाटय़ाला येणारी उपेक्षा ही गोष्ट आज नवी नाही. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील संदेशात मायेचा पूर आणि घरातील वडिलधारी कोसो दूर.. हे वास्तवही हल्ली फारसं बोचेनासं झालंय. सगळ्या चराचरातूनच आपुलकीचा ओलावा आटू लागल्यावर नात्यातील गोडवाही कसा उरावा? हे सर्व जरी खरं असलं तरी ओसाड भूमीचा थर भेदून रुजून येणाऱ्या कोवळ्या पात्याप्रमाणे, रक्ताच्या नात्यापलीकडील काही ऋणानुबंध माणुसकीवरील विश्वास जागता ठेवताना दिसतात. यातील बापलेक/ लेकी या नात्यामधील काही विलक्षण बंधांचा हा वेध उद्याच्या पितृदिनाच्या निमित्ताने.

मीनल व संजीव खरे हे दाम्पत्य डोंबिवलीत राहातं. पद्माकर चिंतामण फडतरे (बन्याकाका) हे ८५ वर्षांचे गृहस्थ गेल्या ३ वर्षांपासून खऱ्यांच्या डय़ुप्लेक्स बंगल्यात त्यांच्यासोबतीने राहताहेत. नातं सांगायचं तर ते संजीव यांच्या आईच्या मावशीचे दीर. त्यांना डोंबिवलीला आपल्या घरात सामावून घेण्याचं श्रेय संजीव यांच्या आई-वडिलांचं म्हणजेच आशाताई व माधव खरे यांचं.

बन्याकाकांनी लग्न केलं नसल्यामुळे आधी ते पुण्याला आपल्या भाऊ-भावजयपाशी म्हणजे आशाताईंच्या मावशीजवळ राहात. खरे कुटुंबाचा या मावशीशी चांगला घरोबा होता. त्यामुळे आशाताई व माधवरावांना या बन्याकाकांबद्दल ममत्व होतं. माधवरावांनी त्यांना आपल्याबरोबर (स्वखर्चाने) बंगळूरु, उटी, बेळगाव.. अशा ठिकाणी फिरवूनही आणलं होतं. बेताची कमाई असणाऱ्या या अविवाहित दिरावर आशाताईंच्या मावशीचा भारी जीव. ते जाणून माधवरावांनी पत्नीच्या या मावशीला शब्द दिला की मी त्यांना शेवटपर्यंत सांभाळीन आणि त्या वचनाला जागत त्यांनी मावशीच्या पश्चात बन्याकाकांना आपल्या घरी आणलं.

ही गोष्ट २०१४ च्या जूनमधली. या वेळी परिस्थिती बदलली होती. आशाताईंची सोबत उरली नव्हती. संजीवचं लग्न होऊन नवी सून घरात आली होती. मात्र तिनेही म्हणजे मीनलने सासऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि खऱ्यांच्या घरात बन्याकाकांचा सहर्ष प्रवेश झाला. जाण्याआधी आशाताईंनी एक पुण्यकर्म मात्र केलं होतं. ते म्हणजे बन्याकाकांचं उर्वरित आयुष्य समाधानानं जावं, त्यांचा कोणावर भार पडू नये, यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहापुरते पैसे व्याजातून मिळावे एवढय़ा रकमेची ठेव त्यांनी बँकेत बन्याकाकांच्या नावे ठेवली. त्यामुळे आता माधवरावही नसले तरी त्यांचं रुटीन बदललेलं नाही.

आई-वडिलांनी घेतलेला हा वसा आज मीनल व संजीव जबाबदारीने पुढे नेत आहेत. कॅरमची नॅशनल चॅम्पियन असलेल्या मीनलचा (पूर्वाश्रमीची मीनल लेले) कल्याणला इकोफ्रेंडली गणपती बनवण्याचा कारखाना आहे आणि संजीवची ठाण्यात खासगी नोकरी. त्यामुळे बन्याकाकांची काळजी घ्यायला एक मावशीही त्यांच्या सोबतीला असतात. मात्र वृद्ध माणसाला सांभाळायचं तर केवळ पैशांची माया पुरेशी नसते. त्यासाठी जिव्हाळा आणि मनाचा मोठेपणाही लागतो. संजीव व मीनल या कसोटीलाही उतरले. मध्यंतरी घरातल्या घरात पडल्याने बन्याकाका महिनाभर रुग्णालयामध्ये होते आणि नंतर एक महिना घरी बेडवर. त्या वेळी संजीवने २ महिने रजा घेऊन त्यांची मनापासून सेवा केली. अगदी डायपर बदलण्यापासून सगळं स्वत: केलं. तो नेमका गणपतीचा हंगाम असल्याने मीनल खूप बिझी होती. अशा वेळी संजीवच्या बहिणीने (सुखदा दातार) रोज दुपारी बदलापूरहून येत भावाचा भार हलका केला. या आत्मीयतेमुळे बन्याकाका आज एकदम फिट आहेत.

८५ व्या वर्षीही डोळ्यांना चष्मा नाही की कानांना यंत्र नाही. सकाळी दोन-चार वर्तमानपत्रं वाचतात, संध्याकाळी फिरून येतात, दिवसभर रेडिओ चालू असतो. म्हणाले, ‘‘१६ व्या वर्षांपासून ८० पूर्ण होईपर्यंत दरवर्षी विठ्ठलाला भेटायला पंढरीला गेलो.. कधी पायी तर कधी बसने. त्यानेच हे पंढरपूर दाखवलं..’’

आज आपण पाहतो की जिथे आई-वडिलांचं अस्तित्वदेखील खुपतं तिथे कुटुंबाबाहेरील कुणाला पितृत्त्वाच्या भावनेनं सामावून घ्यायचं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी केवळ ऐसपैस घर असून चालत नाही तर जागा मनात असावी लागते. ती असेल तर छोटय़ाशा घरकुलाचंही गोकुळ होतं. ठाण्यातील रानडे कुटुंबीयांनी हेच तर दाखवून दिलं.

निर्मलाताई व प्रभाकर रानडे, त्यांची दोन मुलं विष्णू व संजय. दोघांच्या पत्नी, नातू अथर्व यांच्याबरोबर केशव बर्वे (बर्वेमामा) हे निर्मलाताईंच्या बहिणीचे यजमान, वन बेडरूमच्या लहानशा जागेत अनेक र्वष आनंदाने राहत होते. काळाच्या ओघात रानडय़ांच्या आधीच्या पिढीने जगाचा निरोप घेतला. पुढे एक खोलीही वाढली. मात्र पुढच्या पिढीनेही बर्वेमामांचा हात शेवटपर्यंत सोडला नाही. बर्वेमामा रानडय़ांच्या घरी १६ वर्षे राहिले आणि ३ वर्षांपूर्वी वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी भरल्या घरात सुखासमाधानाने डोळे मिटले. बर्वेमामांच्या पत्नी आणि निर्मलाताई या सख्ख्या बहिणी. त्यांची घरंही (ठाण्यात) लागून होती. त्यामुळे रानडय़ांच्या घराला बर्वेमामा कधी परके नव्हतेच. त्यांना मूल-बाळ नसल्याने विष्णू व संजय यांच्यावर त्यांचं पुत्रवत प्रेम. पुढे या प्रेमात सुना आणि नातूही वाटेकरी झाले. पत्नीच्या निधनानंतर या कुटुंबाच्या आधारे शेजारी ते एकटेच राहात होते. मात्र राहती इमारत धोकादायक झाल्यावर दोन्ही कुटुंबांनी ती जागा सोडली. तेव्हापासून म्हणजे १९९८ पासून बर्वेमामा या परिवारात साखरेसारखे विरघळले.

त्यांच्या या विरघळण्याचे अनेक किस्से रानडे मंडळी चवीने सांगतात. निवेदिता या घरची मोठी सून, विष्णूंची पत्नी. ठाण्यात गेल्या २० वर्षांपासून त्या कथ्थकचे क्लास घेत आहेत. म्हणाल्या, ‘माझ्या क्लासचा कुठलाही कार्यक्रम असो किंवा विद्यार्थिनींचे सुटलेले घुंगरू बांधायचे असोत वा घरातली पूजा. प्रत्येक कामात मामा सदैव पुढे असत. चित्रा ही निवेदिता यांची धाकटी जाऊ. या जावाजावांचंही अगदी मेतकूट आहे. म्हणाली, ‘‘स्वयंपाकघर हा मामांच्या जिव्हाळ्याचा विषय. छंदही याच विषयाशी निगडित.. वाणसामानाची यादी काढून ते आणणं, मंडईत जाऊन भाज्यांची खरेदी इत्यादी. दूध विरजवून चक्का बांधून घरगुती श्रीखंड कसं बनवायचं हे त्यांनीच आम्हा दोघींना शिकवलं.’ संजय आणि विष्णूपाशी मामांनी लहानपणी टांग्यात बसवून फिरवल्याच्या आठवणी आहेत, तर तारुण्याच्या उंबरठय़ावरील अथर्व त्यांना क्रिकेटची मॅच बघताना मिस करतोय. जाण्याआधी २-३ वर्षे त्यांना क्षयरोग झाला होता. या माणसांच्या प्रेमाने यातून ते बरेही झाले. पण नंतर मधुमेहाने घात केला. गँगरीनने पाय कापावा लागल्यावर ते फारसे जगले नाहीत.

बर्वेमामांच्या आठवणी ऐकताच एक प्रश्न राहून राहून माझ्या ओठावर येत होता.. या लहान जागेत आधीच तुम्ही एवढी माणसं, शिवाय दोन्ही सुनांच्या माहेरची माणसे येत जात असणारच.. मग अडचण नाही का यायची. पण हे शब्द उच्चारायचं धैर्य मला काही झालं नाही..

बन्याकाका किंवा बर्बेमामा यांचं लांबचं का होईना पण नातं तरी होतं, पण चित्रा रानडे यांनी सांगितलेला एक ऋणानुबंध तर कल्पनेच्याही पलीकडला. चिपळूणपुढील आरवली गावाजवळील बुरंबाड हे त्यांचं माहेर. तिथे घडलेली ही घटना. २० वर्षांपूर्वीची. दिवे लागणीच्या वेळी एक साधू त्यांच्या घरी आले. एका रात्रीपुरता निवारा हवा होता त्यांना. मुरलीधर आणि सुधीर सहस्रबुद्धे या काका-पुतण्यांनी त्यांना आदराने घरात घेतलं. हा अनोळखी साधू पुढची ५-६ वर्षे त्या घरी राहिला. श्रीकांत दिरांगकलगीकर हे त्यांचं नाव. सहस्रबुद्धे यांच्या घरासाठी भाऊकाका. मुखाने हरी नाम आणि हाताने चटया विणून त्या विकणं हा त्यांचा दिनक्रम. आपल्या खर्चापोटी दरमहा ५०० ते १००० रुपये दर एक तारखेला ते देवासमोर ठेवत. एके दिवशी जसे आले तसे निघूनही गेले. पुढे बार्शी या गावी त्यांनी प्रायोपशनाने देह ठेवला, असं या मंडळींच्या कानावर आलं. काहीही अतापता नसलेल्या या व्यक्तीला उंबरठय़ाच्या आत घ्यायलाही जिथं आपलं मन कचरतं तिथं एखाद्या अनोळखी व्यक्तीला पितृसमान मानून घरात सामावून घेतलेलं, तेही पाच -सहा वर्षे, हे ऐकताना मला ..तरीही माझं जीवन सुखाचं होतं. या कवितेची आठवण झाली.

..पाहुणेरावळ्यांचा घरात राबता असायचा, सख्खी चुलत मावस असा भेद नसायचा!

दारी आलेल्या याचकाचा सन्मान व्हायचा,

घराचा दरवाजा सदैव उघडा असायचा!..

तरीही माझं जीवन सुखाचं होतं.

गुरू-शिष्याच्या नात्यालाही पितृप्रेमाची हळवी किनार आहे. सांदिपनी मुनी-कृष्ण, द्रोणाचार्य व अर्जुन, दादोजी कोंडदेव आणि बालशिवाजी या जोडय़ांचा भक्तीपूर्ण इतिहास या प्रेमाची ग्वाही देतो. आजच्या काळात गुरुगृही राहून त्यांची सेवा करून ज्ञानार्जन करणं दुर्मीळ झालं असलं तरी आपल्या संस्कृतीत गुरुसेवेची संधी हे आजही भाग्य समजलं जातं. या भाग्याकडे पितृसेवेच्या भावनेतून बघणाऱ्या पूनम, प्रज्ञा व पल्लवी या तिशी-पस्तीशीतील तीन तरुणींची ही कहाणी.

ठाणेस्थित, साईभक्त आप्पा महाराज हे या तिघींचे गुरू. आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून या तिघी पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या गुरूंची सर्व प्रकारची काळजी घेतात. लहानपणापासून साईबाबा हे पूनमचं दैवत. २००९ च्या गुरुपौर्णिमेला आप्पांच्या साईदरबारात आली. वर्षभरातच आप्पांनी तिला साधना दिली आणि तिची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली. ती म्हणते, ‘आप्पांच्या आणि माझ्या संवादाला शब्दांची गरज नसते. केवळ संकेत पुरेसे असतात.’ पूनम कमावते पण एकाच नोकरीत बांधिल नाही. त्यामुळे आप्पांनी हाक मारताच ती धावत येते. त्यांना डॉक्टरांकडे नेणे, औषध वेळेवर घेताहेतना याची माहिती ठेवणं, साई दरबारात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी त्यांचा हिशोब या हिच्या जबाबदाऱ्या. आप्पांच्या सोबतीला ठेवलेल्या नेपाळी मुलाला पूजा करण्यापासून स्वयंपाक बनवण्यापर्यंत हिनेच प्रशिक्षित केलंय. तसंच तिथे गुढीपाढवा, नवरात्र, दिवाळीत एकत्र फराळ.. असे उत्सवही तिने सुरू केले.

शांत, समंजस अशी प्रज्ञा सर्वप्रथम दरबारात आली ती इतरांप्रमाणे भौतिक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी. परंतु, पुढे अध्यात्माची गोडी लागल्यावर तिच्या विचारात बदल झाला. ही मुलगी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत साहाय्यक व्यवस्थापक पदावर आहे. तिचं कार्यालय आहे पवईला. ती राहते कळव्याला आणि अप्पा रहातात ठाण्यात. ही त्रिस्थळी यात्रा ती जवळजवळ रोज करते. आप्पांकडे येताना त्यांना काय आवडतं ते घरून बनवून आणायला ती विसरत नाही. गुरुपौर्णिमेला तसंच इतर उत्सवांना फुलं, हार आणून सर्व तयारी करणं हे तिचं आवडतं काम. या तिघींपैकी पल्लवीचं लग्न झालंय. उत्तम नोकरी, प्रेम करणारा जोडीदार, गोड मुलगी.. असं सर्व काही तिला मिळालंय. ती म्हणते,  आप्पांच्या सान्निध्यात माझ्या विचारात बदल झाला. त्यांचा निरिच्छपणा, कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याची वृत्ती, दुसऱ्याच्या छोटय़ाशा सुखानेही आतून आनंदित होणारा स्वभाव, सकारात्मकता.. या गोष्टी मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करत गेले, त्यामुळे माझी भौतिक प्रगती होत गेली. आपल्या गुरूंसाठी तिचा खिसा नेहमी वाहत असतो. त्यांना कुठे जायचं असेल तर विमानाची तिकिटं काढण्यापासून, उकाडा सुरू झाल्यावर दरबारात ए.सी. बसवण्यापर्यंत काहीही करण्यात तिला धन्यता वाटते. तिच्या मते हे मणभर घेऊन कणभर देण्यासारखं आहे. आप्पा महाराजांना विचारलं असता त्यांनी आपल्या या लेकींची वैशिष्टय़े एका वाक्यात सांगितली. म्हणाले, ‘पूनम म्हणजे शांतीरूप, पार्वती. शांत, विचारी प्रज्ञा ही माझी सरस्वती आणि पल्लवी हे तर लक्ष्मीचं दुसरं रूप. या त्रिदेवींची साथ असल्यावर आणखी काय हवं..?’

या तिघींप्रमाणे गुरूंवर पितृवत प्रेम करणारे, त्यांची सेवा करण्यात धन्यता मानणारे अन्य भक्तही सापडतील परंतु यापलीकडे जाऊन ‘तरीही माझं जीवन सुखी होतं’ म्हणणारी आदर्श मानस पिता-पुत्रांच्या जोडय़ातील एक जोडी म्हणजे दिवंगत कृष्ण वामन मोडक आणि डॉ. अशोक कामत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ५४ विद्यार्थ्यांनी आपली पीएच.डी. पूर्ण केलीय. ज्यांची संतवाङ्मयावरची शंभर पुस्तकं प्रसिद्ध झालीयत आणि जे आज ७६ व्या वर्षीही बारा बारा तास काम करताहेत असे डॉ. अशोक कामत आणि त्यांचे पितृतुल्य गुरू  मोडक सर यांचं नातं कोणालाही थक्क करील असंच.

डॉ. कामत शाळेत असतानाच हे बंध जुळले. मोडक सर हे त्यांचे हिंदीचे शिक्षक. त्यांना मूलबाळ नव्हतं. मात्र त्यांनी अनेक विद्यार्थ्यांवर मुलांसारखं प्रेम केलं.. आई-वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेला अशोक मात्र त्यांच्याकडे ओढला गेला. डॉ. कामत सांगतात, ‘‘ माझ्या जीवनातील सर्व सुख-दु:खात सर आणि त्यांच्या पत्नी सुशीलाबाई दोघांचाही सहभाग होता. माझं शिक्षण, लग्न, मुलांचा जन्म, घर या सगळ्या टप्प्यांवर ती दोघं आई-वडिलांप्रमाणे आमच्या पाठीशी उभी होती. एवढंच नव्हे तर माझा व्यासंग माझं ग्रंथलेखन, विद्यापीठातील माझं संत नामदेव अध्यासन कार्य हे सर्व त्यांच्या पाठिंब्याशिवाय आकाराला येऊ शकलं नसतं.’’

कालांतराने मोडक सर व सुशीलाबाई दोघंही जेव्हा थकली तेव्हा डॉ. कामत पती-पत्नीने त्यांची २० वर्षे सेवा केली. ९४ वर्षांचं सुखी समाधानी आयुष्य जगून २०१२ मध्ये सरांनी देह ठेवला. सुशीलाबाई ५ वर्षे आधी गेल्या. त्यांच्या इच्छेप्रमाणे डॉ. कामतांनी त्यांचं नेत्रदान, देहदान केलं. त्यांचं आयुष्य बघताना कबिराचा दोहा आठवतो. त्यात थोडा बदल करून म्हणावंसं वाटतं..

गुरू तो ऐसा चाहिए, शिष्य को सब कुछ दे,

शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु का कछु न ले

मोडक सरांनी आपल्या इच्छेनुसार त्यांचा डेक्कन जिमखान्यावरील (पुणे) बंगला व इतर किडूकमिडूक सर्व त्यांचा लाडका विद्यार्थी व मानसपुत्र डॉ. अशोक कामत यांच्या नावे केलं. तर डॉ. कामत यांनी स्वत:च्या इच्छापत्रात लिहून ठेवलेले शब्द असे.. ‘मोडक सरांची वास्तू ही लोकसेवेसाठी आहे. एका सत्त्वशील दाम्पत्याची ही पुण्याई, त्यांची स्मृती म्हणून जपून ठेवायची आहे.’ फक्त इच्छा लिहून डॉ. कामत थांबले नाहीत तर ती आज त्यांनी पूर्णत्वाला नेलीय. मोडक सरांच्या वास्तूत ‘सुशीला कृष्ण मोडक स्मृती गुरुकुल प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आलीय (जानेवारी २००२) इथे १५००० पुस्तकांची भरलेली ७५ कपाटं आहेत. या ठिकाणी एका वेळी दहा ते पंधरा अभ्यासक इथे जपून ठेवलेल्या संदर्भसाधनांचा उपयोग करून निवांत वातावरणात काम करू शकतात. प्रतिष्ठानतर्फे संतवाङ्मयावरील १०० पुस्तकं व १०० ग्रंथ प्रकाशित झाले आहेत व ते अल्प किमतीत उपलब्ध आहेत. दरवर्षी आदर्श शिक्षक, आदर्श माता अशी १२ पारितोषिके (एकत्र २ लाख रुपयांची) प्रतिष्ठानतर्फे दिली जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम मोडक सरांच्या हयातीतच सुरू झालं. हे गुरुकुल अनुभवत ते मोठय़ा आनंदाने शेवटची ६ वर्षे जगले. त्यांची ती कृतार्थता अनेकांनी पाहिली.

आपलं स्वप्न सत्यात उतरलेलं पाहून मोडक सरांनी ज्या शब्दात आपल्या मानसपुत्राची पाठ थोपटली ते असे होते, ‘देवाने मला रक्ताच्या नात्याचं मूल दिलं नाही, पण एक असा वारस दिला की जे मी करू शकलो नसतो ते त्याने करून दाखवलं..’

भैयाजी काणे व जयवंत कोंडविलकर या मानस पिता-पुत्राच्या खडतर, संघर्षमय व धाडसी जीवनप्रवासाची कहाणी ऐकताना आपण दिङ्मूढ होतो. शंकर दिनकर ऊर्फ भैयाजी काणे म्हणजे धर्माच्या भिंती ओलांडून ईशान्य भारतातील अपरिचित माणसांना मैत्रीच्या व प्रेमाच्या आधारावर आपलेसे करणारे एक कर्मयोगी. त्यांची आणि कोकणातील राजापूर तालुक्यातील जुवाठी नावाच्या खेडय़ातील जयवंत कोंडविलकर या मुलाशी भेट झाली ती शिक्षक व विद्यार्थी या नात्याने. १९७० ची ही गोष्ट. ११-१२ वर्षांच्या या चुणचुणीत मुलाला भैयाजींनी हेरलं आणि आपल्याबरोबर थेट मणिपूरला नेलं. जयवंतला तिथे भैयाजींचा सहवास फक्त दोन-अडीच वर्षे लाभला. त्या सत्संगाने तो आमूलाग्र बदलला. त्याच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटली. भैयाजी सांगत.. आपला जन्म आईच्या उदरात होतो व अंत धरतीमातेमध्ये. म्हणून जन्मदात्रीची व भारतमातेची सेवा करायची..’ जयवंतला घेऊन तिथल्या डोंगरदऱ्या पायी तुडवताना ते मोठमोठय़ाने भगवद्गीतेतील श्लोक, विष्णुसहस्रनाम.. इत्यादी म्हणत. बरोबर चालणाऱ्या छोटय़ा जयवंतना सांगत.. वातावरणात पसरलेल्या या पवित्र ध्वनिलहरी कधी नाश पावत नाहीत. इथली भूमी या मंत्राने सुपीक होईल..’ या ध्येयवेडय़ा सत्पुरुषाच्या सहवासात जयवंतचं आयुष्य उजळून निघालं. भैयाजींनी त्याला माता व पिता दोघांचंही प्रेम दिलं. या शिदोरीच्या पाठबळावर आज जयवंत आपल्या गुरुपित्याचं हाती घेतलेलं काम पुढे नेत त्यांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. भैयाजींच्या या सुपुत्राने ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गुरूंच्या पश्चात मणिपूरच्या ३ दिशांना अत्यंत दुर्गम भागात तीन शाळा सुरू केल्यात. या शाळांतून सध्या ३०० विद्यार्थी शिकत आहेत. देशभक्त नागरिकांच्या पिढय़ा निर्माण करण्याचे कार्य या शाळांतून होत आहे. अनेक जीवघेण्या प्रसंगांना तोंड देत, प्रसंगी प्राणाची बाजी लावत, आपल्या गुरू-पित्याचा ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या या सुपुत्राची खडतर तपश्चर्या अखंडपणे सुरू आहे.

सख्खी नाती दुरावत असताना, मानलेले पिता-पुत्र/पुत्री यांच्या नात्यातून जुळून आलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी पाहताना ‘श्यामची आई’ चित्रपटातील या अजरामर गाण्याची आठवण होते..

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण।

जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण।

रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम

पटली पाहिजे अंतरीची खूण।।

 

संपदा वागळे

waglesampada@gmail.com

 

First Published on June 17, 2017 4:53 am

Web Title: marathi articles on international fathers day