खासदार रेणुका चौधरींच्या जोरदार हास्यानंतर संसदेत जो काही असभ्यपणा उसळून बाहेर आला, तो बघता स्त्रियांसाठी परिस्थिती आजही फारशी काही बदललेली नाही, असंच वाटतं. अन्यथा संसदेत बहुतेक खासदार बिनधास्त हसत, घोषणा देत असताना, हसणारी एक स्त्री खासदार अशी सगळ्यांच्या टिंगलीचं लक्ष्य झाली नसती.

– रेणुका चौधरी यांच्या संसदेमध्ये हसण्याने उठलेल्या गदारोळाच्या निमित्ताने हा अनुवादित लेख.

आमच्या पिढीतल्या मुलींना दोन गोष्टी करू नयेत म्हणून सारखं बजावलं जायचं – लांब, पुरुषी ढांगा टाकत चालणं आणि मोठय़ाने हसणं. चांगल्या घरातल्या मुलींना फक्त वडील, भाऊ, काका वगैरे मंडळींनी चेष्टा केली की फक्त खुदुखुदु हसण्याची किंवा त्यांनी केलेल्या विनोदांवर (म्हणजे त्यांना ते विनोद वाटायचे) खुदखुदण्याची परवानगी होती. पण एखाद्या धीट मुलीने कर्कश आवाजात हा विनोद फुसका आहे, असं म्हटलं तर तिला देवच वाचवेल, अशी परिस्थिती होती. ते अत्यंत गंभीरपणे काही तरी मूर्ख उपदेश करत असताना मुलगी जोरात हसली तर मग विचारायलाच नको.

हे खूप पूर्वीचं झालं. पण खासदार

रेणुका चौधरींच्या जोरदार हास्यानंतर संसदेत जो काही असभ्यपणा उसळून बाहेर आला, तो बघता स्त्रियांसाठी परिस्थिती काही फारशी बदललेली नाही, असंच वाटतं. जर परिस्थिती बदलली असती, तर संसदेत बहुतेक खासदार बिनधास्त हसत, घोषणा देत असताना, हसणारी एक स्त्री खासदार अशी सगळ्यांच्या टिंगलीचं लक्ष्य झाली नसती.

तसं बघितलं तर सगळ्या वयोगटांच्या स्त्रिया आणि हसणं या दोहोंमध्ये एक निरुपद्रवी मैत्री आहे. बायका काही काम घेऊन बसल्या किंवा दिवसभराच्या कष्टानंतर थोडा वेळ आरामात बसल्या की, त्यांना दररोज सहन कराव्या लागणाऱ्या मानहानीच्या कहाण्या मोठय़ा आनंदाने सांगू लागतात : चाचपडत, कुजबुजत, नावं घेत आणि थट्टा करत, सगळं सार्वजनिक ठिकाणी. मात्र, या बायकांच्या मेळाव्यातलं सामूहिक हास्य म्हणजे ब्लॅक कॉमेडी असते- हॅम्लेटच्या गॅलोज ह्य़ुमरसारखी. आणि हास्य हे तर सर्वोत्तम औषध. मग एखादी सहानुभूतीने ओतप्रोत भरलेली बाई फिदीफिदी हसत आणखी एक दु:खाने भरलेली कहाणी सांगते. सगळ्यांच्या डोळ्यांत दिसू लागते दु:खाची चमक. वय वाढायला लागतं तसं स्त्रिया सर्रास चालणाऱ्या लिंगभेदाकडे आणि त्यातून येणाऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करायला शिकतात- या गोष्टींना आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारतात. त्याचप्रमाणे त्या आणखी एक गोष्ट शिकतात- त्यांचे हे अनुभव केवळ बायकांपुरते मर्यादित ठेवायला. त्यांचा शहाणपणा सांगतो, चाचपडण्याला, लकाकण्याला, छेडछाडीला अवास्तव महत्त्व देऊन दु:खी का व्हायचं? नियम तयार करणारी आणि लागू करणारी पुरुषांची जमात मदत करणार नाहीच. आयुष्य स्त्रियांना शिकवतं की, अशा गोष्टी प्रियकर, भाऊ, नवरा, वडील यांना सांगितल्या तर सहानुभूती किंवा आत्मपरीक्षण वगैरे काही होणार नाही, ते सरळ निघून जातील तिथून किंवा त्याहून वाईट म्हणजे ‘तुझी हिंमत कशी झाली’ असा कटाक्ष टाकतील. बहुतेक पुरुष कायदे लागू करण्याबद्दल (हा..हा..) किंवा सुडाबद्दल (ऑनर किलिंगच्या जवळ जाणाऱ्या प्रतिशब्दाच्या पन्नासेक छटा या शब्दांत आहेत, म्हणून आणखी हा.. हा..) बोलू लागतील.

एखाद्या बाईला हसवण्याचं कसब म्हणजे तिला आपल्याला हवं ते देण्यास फशी पाडण्याची युक्ती या विश्वासात लहानाचे मोठे झालेले पुरुष जोरात हसणाऱ्या बाईला नकारात्म दृष्टीने पहाणारे असतील तर त्यात नवल ते काय? त्यात ते वक्तृत्वकौशल्यं दाखवत असताना जोरात हसणारी आणि (आणखी भयंकर म्हणजे) त्यांच्या विरोधातील राजकीय पक्षातली स्त्री म्हणजे झालंच. स्त्रियांचं हास्य चिडून दाबण्याचा संबंध वर्चस्वाशी आहे हे खूप कमी पुरुष मान्य करतील. त्यामुळे आपण हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडू : नाही तरी सध्या कोणत्याही युक्तिवादाची सुरुवात लिच्छवी राजवट आणि मुघलांपासून सुरू करण्याची फॅशनच आहे. त्यामुळे आपण वाचकांना सांगू की, नागरीकरणाच्या विविध टप्प्यांवर पुरुषांना आणि त्यांच्या चुकांना हसणाऱ्या सुविख्यात स्त्रियांची मोठी मालिका आहे. मर्त्य आणि दैवी दोन्ही जगांत. पॅन आणि एको यांच्या पोटी जन्मलेली ग्रीक पुराणांतील हास्यदेवता इयांबे ही साहजिकच अत्यंत संयमी व दयाळू अशा कृषिदेवतेची- दिमितरची अर्थात पृथ्वीमातेची अत्यंत जवळची मैत्रीण होती.

द्रौपदीची गोष्ट तर माहीत आहेच. पांडवांच्या भव्य प्रासादाचं वैभव बघून अवाक् झालेला दुर्योधन पाय घसरून पाण्यात पडला, तेव्हा द्रौपदी त्याला हसली आणि तिचं हे हसणं पुढे युद्धाला कारणीभूत ठरलं. अर्थात, ज्येष्ठ लेखिका इरावती कर्वे यांच्या मते मात्र दुर्योधनाने ही गोष्ट रचली होती, आपल्या अंध पित्याने संतप्त होऊन हातातली युद्धाची कळ दाबावी म्हणून. असो, युद्धही झालंच आणि व्हायची ती हानीही झालीच.

नाथपंथाच्या अनुयायांमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते. सिंहली बेटावरच्या मंदाकिनी या एका वादग्रस्त राजकन्येची ही गोष्ट आहे. मंदाकिनीने एका देवाला समुद्रावरून उडताना बघितलं आणि त्याच्या उडणाऱ्या कपडय़ांतून त्याच्या शरीराचे काही उल्लेख न करण्याजोगे भाग दिसल्याने या राजकन्येला हसू आवरलं नाही. तिच्या या अवमानकारक हसण्याचा आवाज ऐकून हा देव खाली उतरला आणि त्याने शाप देऊन राजकन्येला त्रियाराज या पुरुषांचं अस्तित्वच नसलेल्या केवळ स्त्रियांच्या राज्यात पाठवलं. पुढे या गोष्टीतून आपल्याला कळतं की, गोरखपंथाचे संस्थापक गोरखनाथ यांचे गुरू मत्स्येंद्रनाथ या दंतकथेतल्या राज्यात गेले आणि आपली सगळी साधना, योग वगैरे विसरून सुंदर स्त्रियांच्या सहवासात आनंदाने राहू लागले. अखेर त्यांना त्यांच्या अत्यंत हट्टी चेल्याने- गोरखनाथांनी- पुन्हा आश्रमात नेलं. त्यासाठी गोरखनाथ स्त्री वेशात (हसू नका) तिथे गेले होते.

चला, आता जरा फास्ट फॉरवर्ड करून पुन्हा रेणुका चौधरींच्या हसण्याकडे येऊ. त्यांच्या हसण्याने नेतृत्वाला संताप आलाच. या हसण्याची परिणती युद्ध किंवा शापात झाली नसली, तरी त्यांना व्यक्तिगत पातळीवर टोमणे सहन करावे लागलेच. २०१८ मध्ये देश पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकांच्या जवळ येऊन पोहोचला असताना, अ-राजकीय असं काहीच असू शकत नाही. आणि त्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान बोलत असताना रेणुका चौधरी हसल्या, म्हणजे त्यातली अशोभनीयता अमरच झाली. तेव्हापासून हे प्रकरण संसद आणि प्रसारमाध्यमे दोहोंमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या, बहुस्तरीय वादाचा विषय झालं आहे.

पण दरम्यान, या वादात अनेक तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ पुरुषांनाही (हो, सोशल मीडियावर नजर टाकली तर असे पुरुष आहेत आणि खूप मोठय़ा संख्येने आहेत याची खात्री पटेल) समाविष्ट करून घेण्याची संधी आहे.

आता आपण सगळे मिळून ‘साऊंड ऑफ म्युझिक’ चित्रपटात विचारलेला अलंकारिक प्रश्न विचारू- कशी सोडवाल तुम्ही, या लोकशाहीमध्ये चारचौघात हसणाऱ्या स्त्रियांची समस्या?

(मृणाल पांडे या ज्येष्ठ पत्रकार असून प्रसारभारतीच्या माजी अध्यक्ष आहेत.)

भाषांतर – सायली परांजपे

chaturang@expressindia.com