14 December 2017

News Flash

शिक्षणाचा  ‘तमाशा’

प्रभावतीबाई जिथे राहतात त्याच इंदिरानगर झोपडपट्टी भागात संगीता साठे यांचा बंगला आहे.

सुहास सरदेशमुख | Updated: August 5, 2017 2:50 AM

तमाशा ज्या गावात लागतो, त्या पूर्वीची एक मोठी कसरत व्यवस्थापकांना करावी लागते.

शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला, हा आपला राजकीय आणि सामाजिक संकल्प. मात्र आजही अनेक समाज या शिक्षणाच्या परिघापासूनही फार दूर आहेत, त्यामुळे त्याच्या बळावर स्वत:च्या पायावर उभं राहाणं, आत्मसन्मानानं जगणं हेही विचारांच्या पलीकडचं. तमाशा व्यवसायातील मुलांसाठी हा प्रश्न गहन होत चाललेला आहेच.. कधी वडिलांचं नाव वेगळं म्हणून शिक्षण थांबलेलं तर कधी थोडं शिक्षण घेतलं, पण पुढे काय हे न उमगून वा दुसरा पर्याय नाही म्हणून पुन्हा तमाशातच काम सुरू  केलेलं.. इथल्या प्रत्येक बाईच्या मुलांसमोर ठरावीकच भवितव्य आहे.. शिक्षणाशिवायचं, आजही!

दुसरा नवरा कधी निघून गेला त्यांना माहीत नाही. किंबहुना त्यांना ते आठवायचंही नाही.. ‘प्रभावती शिवाजी पवार असंच माझं नाव लिहा.’ प्रभावतीबाई जराशा ठसक्यातच म्हणाल्या. ‘पहिल्या दोन मुलांच्या नावापुढे पहिल्या नवऱ्याचे पवार हेआडनाव. मग रेणुकाचा जन्म झाला, पण तिचा जन्मदाता दुसरा होता.’ त्या सांगत होत्या.. रेणुका छोटय़ा चणीची. आईला बिलगून उभी राहिलेली. कपाळावर मोठ्ठं कुंकू. अंगात गाऊन. गळ्यात कसलासा तावीज. बावरलेलीच..  इयत्ता नववी उत्तीर्ण झाली तेव्हा तिच्या वर्गातील पटावर तिचं नाव होतं- रेणुका बाळू सोनवणे. चाळिशीपार प्रभावतीबाई शेवगावमधील इंदिरानगर वस्तीत काही दिवसच राहतात. उर्वरित सात महिने तमाशाच्या फडात चेहऱ्याला रंग लावून नृत्य करणे, हे त्यांच्या चरितार्थाचे साधन!

त्यांची आई हौसाबाईदेखील हेच काम करायच्या. त्या आता थकल्या आहेत. एवढय़ा की त्यांना उठायला-बसायला आधार द्यावा लागतो. रेणुका त्यांची नात. दहावीत तिला प्रवेश मिळाला. त्यापूर्वी केव्हा तरी रेणुकाचं आधारकार्ड तयार झालं. प्रभावतीबाईंचा दुसरा नवरा याच काळात कधीतरी निघून गेला असावा. रागाच्या भरात प्रभावतीबाईंनी रेणुकाच्या नावासमोरील तिच्या वडिलांचं नाव काढलं आणि पहिल्या पतीचं नाव टाकलं. त्यामुळे रेणुकाचं आधारकार्डवरचं नाव आणि पटावरचं नाव वेगवेगळं झालं. ‘ते नाव एकच असायला हवे. दुरुस्त करून द्या,’ मुख्याध्यापकांनी सांगितलं आणि रेणुकाच्या शिक्षणाचा पेच निर्माण झाला.. ती आता घरीच असते.. तिला पुढचं शिक्षण घ्यायला मिळेल का, या शंकेपुढे सध्या तरी प्रश्नचिन्हच आहे. राज्यातील जवळजवळ सर्वच तमाशा कलाकारांसमोर, त्यांच्या मुलांसमोर शिक्षणाचा प्रश्न वेगवेगळ्या कारणांमुळे आ वासून उभा आहे.

प्रभावतीबाई जिथे राहतात त्याच इंदिरानगर झोपडपट्टी भागात संगीता साठे यांचा बंगला आहे. दारासमोर दार अशी वस्तीमधील इतर घरांची रचना. त्यात हा बंगला उठून दिसणारा. आलिशान शब्दाला झळाळी देणारा. छताच्या नव्या रचनेतील दिवे खोबणीमधून झगमगणारे. एका कोच, टी.व्ही, ध्वनिक्षेपकाची चांगली व्यवस्था. म्हणजे मोबाइलचा आवाज ब्लुटूथने जोडता येईल असा. संगीताबाईच्या आईचा तमाशा होता. बाई हे केवळ करमणुकीचं साधन मानणाऱ्या पुरुषी वृत्तीसमोर नाचणारी त्यांची ही तिसरी पिढी. किती वर्षांपासून त्या हे काम करतात, हे त्यांना नीटसं सांगता येत नाही. त्यांना तीन अपत्य. दोघी मुलींपैकी एकीने पुन्हा चेहऱ्यावर रंग लावला आणि तिचं भवितव्य ठरून गेलं.. घरामधूनच जाणाऱ्या जिन्यांच्या पायऱ्यावर दुसरी मुलगी बसली होती. संगीताबाई सांगत होत्या, ‘तिला आता ‘मालक’ मिळाला आहे.’ तमाशामध्ये दोन प्रकार- एक ढोलकी फडाचा आणि दुसरा संगीत बारीचा. ढोलकी-तमाशाच्या फडात समोर जनसमुदाय असतो आणि संगीत बारीमध्ये काही निवडक लोक असतात. हा प्रकार तसा उच्चभ्रू पुरुषी वृत्तीच्या करमणुकीचा. संगीताबाईची धाकटी मुलगी संगीत बारीमधली. ‘तिला मालक मिळाला,’ या शब्दात त्यांच्या बंगल्याचं रहस्य उलगडत होतं..

जिन्यांच्या पायऱ्यावर बसून मोबाइलशी खेळणारी ती तरुणी बोलली काहीच नाही, मात्र कर्त्यांचा भाव तिच्या वागण्यात दिसत होता.. याच घरात संजय बोरुडे भेटले. संगीताबाईचे भाऊ. बुटका, काळासावळा. हा पठ्ठय़ा तमाशामध्ये सोंगाडय़ा. हरहुन्नरी हे विशेषण सोंगाडय़ाला का लावतात हे संजय बोरुडेंना भेटल्यावर कळतं. रंगमंचावर धमाल करणारा हा गडी वैयक्तिक आयुष्यातही असाच. तीन लग्न केली त्याने. पण एकही टिकलं नाही. सगळ्या जणी निघून गेल्या. त्या कशा निघून गेल्या, याचं रसभरीत वर्णन ते करतात. पण सांगता-सांगता एक दुखरी बाजूही तेवढय़ाच सहजतेने मांडतात. पहिल्या पत्नीपासून त्यांना मुलगा झालेला. सागर त्याचं नाव. त्याच्या नावासमोर दुसऱ्या व्यक्तीचं नाव वडील म्हणून लागेल म्हणून संजयने सागरला स्वत:च्या घरी आणले. तो वस्तीत आला. वस्तीत जशी बाकीची मुलं वाढतात तसा वाढला. संजय बोरुडेंचे तेव्हा तमाशाच्या फडाबरोबर ‘करार’ झालेले..

असे करार आणि फड या शब्दांची रचना उसाशी जोडली गेलेली. साखर कारखान्यांचे ऊसतोड कामगारांशी जसे करार होतात तसेच करार तमाशा कलावंतांचेही होतात. तेथे जसा मुकादम असतो तसे येथेही. कलाकारांना उचल रक्कम दिली जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशीपासून तमाशा कलावंत बाहेर पडतो. तत्पूर्वी करार होतो. बाकायदा नोटरी करून घेतली जाते त्याची. मी अमुक अमुक पुढील सात महिन्यांसाठी एवढय़ा रुपयांवर नाच करेन किंवा सोंगाडय़ाची भूमिका वठवेन, असा मजकूर त्यात असतो. संजयचे असे करार झाले होते. तो सात महिने बाहेर राहणार होता, असं प्रत्येक वर्षी. अशा वातावरणातच सागर वाढला कसाबसा. दहा वर्षांचा होईपर्यंत त्याने शाळेचे तोंडही पाहिलं नव्हतं. पण त्याच वेळी त्यांना बीड जिल्ह्य़ातील सुरेश राजहंस या तरुणाने कलावंतांच्या मुलांना शिकवण्यासाठी शाळा सुरु केल्याचे कळले आणि सागरला तेथे ठेवण्याचा निर्णय झाला. २००८ पासून कलावंतांच्या मुलांसाठी सुरु झालेल्या या शाळेत सध्या ४३ मुले आहेत. सागर तिथेच दहावीपर्यंत शिकला. पण पुढे त्याने काय करायला हवे, याबाबतीत संजय बोरुडेही अनभिज्ञ आहेत. भविष्य काही वेगळं असू शकेल याची कल्पनाच केलेली नसल्याने किंबहुना हे माहीतच नसल्याने त्यांनी आता त्याला या वसतिगृहातून काढून आणले आहे. त्याला तमाशातलच काम शिकवतो, असं ते सांगतात. मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या सुरेश राजहंस यांच्या समोर मात्र त्यामुळे यक्षप्रश्न निर्माण झाला, कारण इतकं शिकूनही पुन्हा तमाशातच आयुष्य काढायचं का? संजय बोरुडेला सागरच्या शिक्षणाचं महत्त्व पटेल का, या प्रश्नाची उत्तरं सध्यातरी कोणाकडेच नाहीत. एका विचित्र आर्थिक दुष्टचक्रातून हा सारा समाज जात आहे. त्याचे कोणाला सोयर ना सुतक. कारण सोयरंपण होतच नाही. त्यामुळे सुतक कोणी पाळणार?

आशा गोरे याही अशाच एक. घरातून लहानपणीच कधी तरी बाहेर पडल्या. आशाबाईची आई भिल्ल  समाजातील. त्यांनी एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले. पण आशाबाईच्या मावस बहिणी तमाशामध्ये नाचायच्या. आशाबाई घर सोडून आल्या तेव्हा त्यांना या नाचण्याच्या जगाने भुरळ घातली. त्यांनी संजय गोरे यांच्याशी लग्न  केले. एक मुलगी झाली, पूनम. पूनम शिकली नाही. मोठी होत गेली. जराशी कळती झाली आणि आईने तिला आपल्याबरोबर नाचायला घेतले. आता आई आणि मुलगी एकाच मंचावर कला सादर करतात. ‘‘आता तशी कला काही राहिली नाही. हिंदी गाण्यावर नाचायला लावतात लोक.’’ आशाबाई खंत व्यक्त करतात. ‘पूनमला का शाळेत नाही पाठवलं? शिकली असती तर पूनमही दहावीत असती.’ पण चुणचुणीत पूनम स्वत:च सांगते, ‘मी शिकत बसले तर आईला कोण सांभाळेल?’

‘तिला शिकवावं, लग्न करून द्यावं असं नाही का वाटत?’ असं विचारल्यावर आशा म्हणाल्या, ‘वाटून काय उपयोग? कोण करेल आमच्या मुलींशी लग्न? आमच्या मुलींना समाज स्वीकारत नाही. ‘आई काय करते’ या एका प्रश्नातच सगळा संवाद संपून जातो. मग दुसरा काहीच पर्याय नसतो. तमाशात काम करणाराच एखादा गाठायचा. तेही नावासमोर नवऱ्याचं नाव लावायचं समाजाचा रिवाज आहे म्हणून.’’

इथल्या तमाशा कलावंतांचा एक स्वतंत्र समाज तयार झाला आहे. त्यांचे ‘बेटी’चे व्यवहार अन्य समाजात होतच नाहीत. ‘ठेवलेली’ अशीच ओळख तारुण्य असेपर्यंत मिळते. मुख्य समाजधारेत येण्याचा एकमेव मार्ग नात्यांच्या रूढ चौकटीबाहेरचा. मग मुलींवर संस्कारही तसेच होतात आपोआप. आईकडे बघून मुलगी शिकते. नजरेच्या आधारे ‘पुरुषा’चं मनोरंजन करण्याचा नाद जडून जातो. कधी रंगमंचावर तर कधी हळूच एखाद्याच्या आयुष्यात डोकावताना. शेवगावच्या इंदिरानगरमधील झोपडपट्टीतील काही घरांमध्ये वयात आलेली मुलगी गाऊन घालूनच का असते याचं उत्तर आशाबाईंच्या ‘वाटून काय उपयोग’ या तीन शब्दांमध्ये दडलेलं..

या व्यवसायात बरीच वर्षे घालविणाऱ्या  शिवाजीराव दळवींनाच विचारलं, ‘किती मिळतात पैसे या तमाशातील महिला कलावंतांना?’  ते मुकादमाचे काम करतात. कलाकार एकत्रित ठेवण्याचं काम त्यांचं. कोणत्या गावात तमाशा कलावंत आहेत. त्यातील कोणाची मुलगी मंचावर येऊ शकते, याचा अंदाज त्यांना असतो. कोणकोणत्या आई-लेकीचे करार होऊ शकतात, याची चाचपणी ते करत असतात आणि त्याप्रमाणे व्यवहारही. त्यांची स्वत:ची मुलगीही तमाशा कलावंत म्हणून नाचते.

‘ चित्रपट अभिनेत्री रंगमंचावर नाचली तर चांगली आणि तमाशा कलावंतांच्या मुली नाचल्या तर वाईट’ हा दृष्टिकोन मोठा गमतीचा आहे. पण या कलावंतांना पैसे कमीच मिळतात. कधी करार एक लाख रुपयांमध्ये होतो तर कधी दीड लाख रुपयांमध्ये, वर्षभरासाठी!  उचल दिली जाते, साठ-सत्तर हजार रुपये. दररोजच्या खर्चाला स्वतंत्र रक्कम असते. त्याला ‘शिधा’ म्हणतात. हा शिधा चहापाण्यासाठी. मूळ रकमेतून तो वजा केला जातो. सात-आठ महिने काम केले की ही रक्कम कधी फिटते तर कधी अंगावर बसते. मग पुन्हा नाचायचे पैसे फिटेपर्यंत! अक्षय्य तृतीयेला करार होतात. तसं दिवसभराची मजुरी कोणी मोजत नाही. पण २०० ते २५० रुपयांपर्यंत पैसे मिळत असावेत. खरे तर आता रोहयोची मजुरीसुद्धा मिळते, ‘मग हे काम का?’ या प्रश्नाच्या उत्तरात ‘ती नियमीत मिळतेच असे नाही.   शिवाय ऑरगन वाजविणारा आणि ढोलकीपटूला तुलनेने अधिक पैसे मिळतात.’ असे उत्तर मिळाले.  पण मुलगी झाली तर तिने नाचायचे आणि मुलगा झाला तर त्यांनी खेळ चालू राहावा, यासाठी बांबू लावण्यापासून ते इतर कोणतेही काम करावे, असा आग्रह असतो. त्यामुळे मुले फिरत राहतात. त्यांना कोणी शाळेत जा, असं म्हणत नाही. शिक्षण कशासाठी, याची जाणीवच इथे नाही. रोजचं जगणं जगायचं एवढंच माहीत.

समाजरचनेत तमाशा व्यवसायातील कलावंतांना विवाह संस्थेत स्थान दिले जात नाही. त्यामुळे पैसा कमविण्यासाठी ते मुख्य प्रवाहात येतात. शक्य तेवढी पुंजी स्वत:जवळ बांधून घेतात. बदल्यात त्यांच्या जवळ असलेलं सारं देतात. पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न कोणी प्रकर्षांने हाती घेतलेले दिसत नाहीत. खरंतर हा समाजही राज्यभर विखुरला आहे. जामखेड, नगर, बीड जिल्ह्य़ांतील आष्टी-पाटोदा, सोलापूर जिल्ह्य़ांतील मोहोळ, करमाळा या तालुक्यांमध्ये तमाशा कलावंतांच्या अनेक वस्त्या आहेत. तमाशा हा व्यवसाय आपल्या समाजाची पारंपरिकता आहे, असे मानणारा कोल्हाटी समाज अजूनही या क्षेत्रात असला तरी आता अनेक समाज त्यात आहेत. पण या व्यवसायातील मुलींना मुख्य प्रवाहात विशेषत: विवाह संस्थेत स्थान दिलं जात नाही. परिणामी पायात घुंगरू बांधणे अपरिहार्य ठरते. ज्यांना त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात, तेच लावणी महोत्सव घेत असल्याने हा समाज कुंठित जीवन जगत आहे.

एकदा तमाशात पाऊल ठेवलं की, जगण्याचं गणित बदलतं, वेळेचं चक्रही उलटं फिरतं. संध्याकाळी ४ ते रात्री १२ हे दररोजचं जागरण. कधी व्यसन लागतं कळतच नाही. प्रभावती पवार सांगत होत्या, ‘मला तंबाखूचं व्यसन आहे. अनेकांना त्याच्याही पुढची व्यसनं आहेत. दारू ही नित्याचीच बाब असते. आणि याचे कुणालाच काही वावगे वाटत नाही, जगण्याचा भाग झालाय तो जणू.’

तमाशा ज्या गावात लागतो, त्या पूर्वीची एक मोठी कसरत व्यवस्थापकांना करावी लागते. पूर्वी प्रत्येक तहसीलला करमणुकीचा कर म्हणून परवाना घ्यावा लागत असे.  गृहमंत्री असताना आर. आर. पाटील यांनी त्यात बदल केले आणि वर्षांला एकदाच दोन हजार रुपयांचे शुल्क भरून घेतले जाते. पण त्या परवान्याची प्रत पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्यांच्या परवानगीसाठी म्हणून ‘हिशेब’ सुरू होतात.. शिवाजीराव दळवी अशी सगळी कामं करतात. ते सांगत होते, ‘‘ज्या गावात जातो तिथल्या गावगुंडांना आधी भेटावंच लागतं. त्यांना विनंती करायची, सहकार्य करा. मग तो मोफत पास मागतो. एखाद्याला पाच दिले की दुसरा दहा मागतो. दादापुता करून त्यांना सांभाळून घ्यायचं. असं केलं नाही तर ज्या ठिकाणी महिला कपडे बदलतात तिथं ही मंडळी गोंधळ घालतात. नको त्या मागण्या करतात. तसं तमाशाच्या तिकिटाचे दरही जास्त नाहीत. ६० रुपये प्रति व्यक्ती. पण सगळ्यांना तमाशा फुकट बघावासा वाटतो. सांगली-सातारा या जिल्ह्यंत मात्र चांगला अनुभव आहे. तिथं कोणी तरी एकच माणूस सुपारी देतो. कोणी त्रासही देत नाही. मात्र ग्रामीण भागात जत्रांच्या ठिकाणी कमालीचा त्रास होतो. नाहीच काही जमलं तर समोरच्या रांगेतला माणूस रंगमंचावर नृत्य करणारीवर एखादा खडा तरी मारतोच,’’ दळवी सांगत होते. हे सगळं कायम चालतच आलेलं..

मात्र, कालपरत्वे बदलाचे काही प्रयत्न केले गेले. आर्थिक परिस्थिथी बदलावी, मुलांच्या शिक्षणासाठी थोडे बहुत प्रयत्न केले गेले.  या समाजात शिक्षण पोहोचावं म्हणून करमाळा तालुक्यातील नेरला इथं एक शाळा सुरू केली होती. हे गाव कोल्हाटय़ाचं. किशोर शांताबाई काळे हे नाव आठवतं का, त्या दिवंगत डॉ. काळे यांचं हे गाव. आता त्यांच्या आई शांताबाई याच गावात राहतात. काही दिवसांपूर्वी या गावात इंग्रजी शाळा सुरू करण्यात आली होती. पुढे शांताबाई काळेंवर जातपंचायत बसली. या कामात अनेक अडचणी आल्या आणि काम थांबलं. या गावात चांगलं काम उभं राहावं, असं वाटणाऱ्या एका कार्यकर्तीला आता जातपंचायतीने बाहेरच्या व्यक्तीशी, समाजाविषयी माहिती देण्यास मज्जाव केलाय.

आज या करमाळा तालुक्यातील गावात काही हवेल्या आणि काही वाडेही पडके पडले आहेत. एक भयाण वास्तव इथं दिसतं ते म्हणजे ज्यांच्या घरात तरुण मुली आहेत, त्यांचं घर भरभराटीला आलेलं दिसतय  आणि ज्याचा वाडा मोडकळीला आलेला आहे तिथलंही तारुण्य संपल्याची ती भगभगीत निशाणी ठरते आहे.

या क्षेत्रात शिक्षणाचं काम उभं करू पाहणारे प्रयोग आतापर्यंत अल्पजीवी ठरले आहेत. मात्र सुरेश राजहंस, बीड जिल्ह्यतीलच दीपक नागरगोजे ही मंडळी नेटाने काम उभं करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा समाज मोठा आहे. किमान ४० हजारांहून अधिक मुलं आजही शिक्षणापासून वंचित असावीत असा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर, नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव या भागात एक प्राथमिक सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा मोजक्या दहा-बारा गावांत दीडशे मुली सहा ते चौदा वयोगटातील होत्या. मुलांची संख्याही तेवढीच. एका तमाशात तसे १३० ते १५० जण असतात. तंबू उभे करण्यापासून ते आचाऱ्यापर्यंत. कोणी चारचाकीचे चालक, कोणी कपडे सांभाळणारा तर कोणी तंबू टाकण्यास मदत करणारा. यांची मुलं शिकतात कोठे, याचा अधिकृत आकडा काढावा, असं कधी सरकारी यंत्रणेलाही वाटलं नाही. राज्यात परवाना घेऊ न तमाशा करणारे ४५० फड आहेत. त्यांचा सारा कारभार पुणे जिल्ह्यतील नारायणगाववरून चालतो. यात छोटय़ा फडांची मोजणी नाहीच. येथील प्रश्नांची गुंतागुंत केवळ संख्येवरही ठरविता येत नाही.

खरं तर अशा मुलांनी शिकावं म्हणून देशात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते. बिहार एज्युकेशन प्रकल्प, प्राथमिक शिक्षणासाठीचा ‘पीप’ नावाचा प्रकल्प. राज्यात पर्यायी शिक्षणाचा प्रयोग करणाऱ्यांमध्ये जी. पी. नाईक व चित्रा नाईक यांचं नाव आदराने घेतलं जातं. सर्व शिक्षा अभियानापूर्वी चालणाऱ्या डीपीईपी नावाच्या प्रकल्पात अशा वंचित मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी तरतूद होती. त्यामध्ये वस्तीशाळांचा प्रयोग झाला, पण तो फसला. कारण या क्षेत्रात काम करण्यासाठी समर्पित वृत्तीचे कार्यकर्ते लागतात. नुसत्या योजना करून भागत नाही. अलीकडे तर वंचित मुलांच्या शिक्षणासाठी सरकार पातळीवर फारसे काही होताना दिसत नाही किंवा त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत. अशा वंचितांच्या योजनांना कमी पैसे दिले तरी चालतात, असा समजही शिक्षण विभागात असावा. त्यामुळे दहावी-बारावीच्या एखाद्या गावातील तरुणाला दोन किंवा तीन हजार रुपये द्यायचे आणि शिक्षणाची सोय केली, असं भासवायचं, अशाही योजना अधूनमधून आणल्या जातात. पण त्यातून फारसं काहीही निष्पन्न होत नाही.

येथील मुलींच्या वाटय़ाला तमाशात नाचणं आणि मुलांच्या वाटय़ाला तमाशासाठी काम करणं हेच बहुतांशी दिसतं. आजही अनेक वस्त्यांमध्ये पूनम, रेणुका, सागरसारखे अनेक जण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ढकलले जात आहेत. त्यांनी शिक्षण व्यवस्थेत टिकून राहावं, त्या शिक्षणाच्या आधारावर त्यांचं वेगळं भविष्य घडावं यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनाही बळ द्यायला हवं. समाजानेच ते आता करायला हवं..

तमाशा कलावंतांच्या मुलांनी शिकायला हवं, यासाठी सुरेश राजहंससारखा तरुण झटत असतो. त्याचे अनुभव थक्क करायला लावणारे आहेतच, पण अधिकतर दु:खद आहेत. त्याच्या वसतिगृहात एक मुलगी लहानपणापासून शिकली. मोठी झाली आणि तिच्या बाबाने सुरेशबरोबर वाद घालायला सुरुवात केली. पोलिसांपर्यंत नेत वडिलांचा-जन्मदात्याचा हक्क सांगितला आणि मुलीला घरी नेलं. ती मुलगी आता शाळा सोडून तमाशात नाचते आहे. ही मुलगी इतकी वर्षे व्यवस्थित शिक्षण घेत होती; परंतु तिच्या वाटय़ाला शेवटी तमाशाच आला. जेव्हा तिला असं जबरदस्तीने जावं लागलं तेव्हा सुरेश आणि त्याची पत्नी मयूरी दोघांचे डोळे पाणावले होते. ही परिस्थिती कधी बदलणार याबद्दल दोघंही साशंक आहेत. तरीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेतच. एक साडेचार वर्षांचा मुलगा त्याच्या आईने राजहंस यांच्याकडे आणून सोडला. त्यानंतर ती बाई फिरकलीच नाही. तो सहा वर्षांचा झाला. त्याला शाळेत घालायची वेळ आली. जिने या मुलाला  या वसतिगृहात सोडलं होतं तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला गेला. पण ती पुन्हा परत येण्याची शक्यता संपलेलीच होती. शेवटी या मुलाच्या नावासमोर वडील म्हणून सुरेश राजहंसने स्वत:चं नाव लावलं. आता हा मुलगा शिकतो आहे. तो शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर भरभक्कमपणे उभा रहायला हवा यासाठी जोमाने प्रयत्न व्हायला हवेत.

सुहास सरदेशमुख suhas.sardeshmukh@expressindia.com

First Published on August 5, 2017 2:00 am

Web Title: tamasha artists children fight for education right
टॅग Tamasha Artists