ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सणासुदींच्या दिवसांत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबई शहराला झोडपून काढलं. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्यांसाठीच्या मदतकार्यात अनेक कुटुंबांनी, व्यक्तींनी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत माणुसकीचं हृद्य दर्शन घडवलं. अनेकांनी खाण्यापिण्याची सोय केली, आसरा दिला. अतिवृष्टीने उभ्या राहिलेल्या संकटाने मुंबईकरांना २६ जुलैच्या प्रलयकारी पावसाची प्रकर्षांने आठवण करून दिली. त्याच २६ जुलैचा एक प्रसंग कधीही न विसरता येण्याजोगा.

२६ जुलैला सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी दोनच्या सुमाराला पावसाचा जोर अचानक वाढायला लागला. ऑफिसचं काम संपल्यावर घरी जाण्याच्या मार्गावर एक-दोन महत्त्वाची कामं होती. पावसाचा अंदाज घेतला. वाढलेला जोर विचारात घेतला आणि लवकर म्हणजे दुपारी दोन वाजताच ऑफिस सोडण्याचा विचार पक्का केला. वाटेतली कामं आटोपली. अर्ध्या वाटेवर पावसाचा जोर खूप वाढल्याचं लक्षात आलं. रस्त्यावर पाणीही भराभर साचू लागल्याचं दिसत होतं. चारच्या सुमाराला जेमतेम घरी पोचलो आणि पावसाच्या धारा धबधब्यासारख्या कोसळायला लागल्याचं जाणवलं. घराच्या बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं. त्यानंतर पुढच्या एखाद-दोन तासांतच आमच्या बिल्डिंगच्या आवारातच गुढघाभर पाणी जमा झालं. रात्री आठ वाजेपर्यंत बाहेरचं पाणी कमरेपर्यंत वाढलं. काही वेळात वीजही गायब झाली. चहूबाजूला जमा होऊन वाढणारं पाणी, मुसळधार कोसळणारा पाऊन, सोसाटय़ाचा वारा अन् वीज नसल्यानं झालेला भीतीदायक काळोख यानं या अस्मानी नैसर्गिक आपत्तीच्या गांभीर्यात वाढ झाली.

रात्री दहाच्या सुमाराला बॅटरीच्या प्रकाशात परिस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आमच्या बिल्डिंगला पावसामुळे साचलेल्या कमरेभर पाण्याने संपूर्णणे वेढलं होतं. बॅटरीच्या थोडय़ाशा प्रकाशात कंपाऊंड वॉलवर आमच्याच एरियातली पाच-सहा भटकी कुत्री जिवाच्या आकांताने बसलेली दिसली. पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्यापासून बचाव व्हावा यासाठी तीच एक जागा सुरक्षित होती. जीव वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग त्यांच्यासाठी योग्य होता.

आपल्याच घरात सुरक्षितपणे झोपताना मनात कंपाऊंड वॉलवर बसलेल्या कुत्र्यांचा विचार आला. जिथे माणसांनाच जीव मुठीत धरायला लागला होता, तिथे या मुक्या प्राण्यांबद्दल विचार येणंही अशक्य होतं. दुसऱ्या दिवशीही पाऊस थांबण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं. पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यासारखा वाटला; पण साचलेलं पाणी तसूभरही कमी झालेलं नव्हतं. आहे त्यात थोडीफार वाढच झाली होती. पुन्हा कंपाऊंड वॉलवरच्या कुत्र्यांची आठवण आली. पहाटेच्या फटफटलेल्या उजेडात सर्व कुत्री त्याच अवस्थेत कुडकुडत बसलेली दिसली. यांना खायला मिळालं नसेल, उपाशी असतील. जमलं तर काही खायला द्यायला हवं. भूतदयेपोटी तरी एवढं करायलाच हवं. या विचारानं थोडं उजाडल्यावर खाली जाण्याचा निर्णय घेतला. छत्री घेऊन खाली उतरलो. कंबरभर पाण्यातून वाट काढत कंपाऊंड वॉलपाशी पोहोचलो. हातातला बिस्किटांचा पुडा कुत्र्यांपुढे धरला. भटक्या कुत्र्यांच्या आक्रमकतेबद्दल वाचलेले काही प्रसंग आठवले. कुत्र्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेणं आवश्यक होतं. कोणी तरी आपल्या मदतीला आला आहे याचा त्यांना अंदाज आला असावा, कारण तशा पूर्ण भिजलेल्या कुडकुडणाऱ्या अन् भुकेल्या अवस्थेतही त्यांनी शेपटी हलवली अन् हीच त्यांच्या खुशीची खूण माझ्या पुढच्या क्रियेला ग्रीन सिग्नल देऊन गेली. कुत्र्यांच्या आणखी जवळ गेलो. त्यांच्या मुखात बिस्किटं जाणं गरजेचं होतं. नाही तर बिस्किटं कुत्र्यांच्या तोंडी न लागता खाली पाण्यात पडण्याची शक्यताच जास्त होती. म्हणून थोडा धीर करून प्रत्येकाला दोन-चार बिस्किटं चक्क भरवली. एरवी त्यांच्यात आढळणारी आक्रमकता बाजूला सारून त्यांनीही ती ‘समजूतदारपणे’ खाल्ली. खाऊन झाल्यावर काही वेगळे आवाज काढले. कदाचित मला न समजणाऱ्या भाषेत खाणं मिळाल्याची कृतज्ञतेची पावती त्यांनी दिली असावी. त्या क्षणाला त्यांच्या नजरेत दिसलेल्या भावना शब्दबद्ध करण्यापलीकडच्या होत्या असं मला वाटलं.

दिवसभराच्या रिपरिपीनंतर रात्रीपर्यंत तरी पाण्याचा निचरा पूर्ण झालेला नव्हता. अजून निम्म्यापेक्षा जास्त पाणी शिल्लक होतं. कंपाऊंड वॉलवरचं श्वानांचं टोळकं ठाण मांडून असाहाय्यपणे त्याच अवस्थेत बसून होतं. पुन्हा त्यांच्या अन्नपाण्याचा विचार मला स्वस्थ बसू देईना. पाणी तर दिवसरात्र आकाशातून बरसत होतं, पण पोटाच्या खळगीचं काय? विचारानं अस्वस्थता वाढली. रात्री त्यांच्यासाठी पुन्हा बिस्किटांचं खाद्य घेऊन गेलो. गेल्या खेपेप्रमाणे तेच सोपस्कार पार पाडले. श्वान टोळक्याकडूनही तसंच सहकार्य मिळालं. समाधानी मनाने घरी परतलो. दुसरा दिवस उजाडेपर्यंत पाऊस पूर्णपणे विसावला. आमच्या भागातलं सर्व पाणीदेखील ओसरत गेलं. त्यानंतरच्या एखाद-दोन आठवडय़ांच्या अवधीत विस्कळीत झालेलं मुंबईचं जनजीवनही हळूहळू पूर्वपदावर येत गेलं.

जवळपास आठ-दहा दिवसांच्या अवधीनंतर माझं ऑफिसला जाणंही पुन्हा सुरू झालं; पण २६ जुलैच्या निसर्गाच्या तडाख्यात माझी ओळख झालेल्या या श्वान टोळक्याचा एक अद्भुत अनुभव मला रोज येऊ  लागला. नोकरीवरून पहिल्याच दिवशी घरी परतत असताना आमच्या गल्लीच्या तोंडापर्यंत आल्यावर तेच श्वानांचं टोळकं समोर दिसलं अन् माझी चाहूल लागताच एकदम जवळ आलं आणि जोरात शेपटय़ा हलवून उडय़ा मारायला लागलं. सुरुवातीला थोडं धाकधूक वाटलं, पण टोळक्याच्या एकंदर आविर्भावातला लडिवाळपणा लक्षात आला आणि निर्धास्त होऊन मी घराकडे चालायला लागलो. माझ्याबरोबर ते टोळकंही निघालं. घरापर्यंत माझी सोबत करून सर्व श्वानं परत गेली.

त्यानंतर मात्र जवळपास दररोज ही श्वानं तिथे येऊन माझी नाक्यावर येऊन वाट पाहू लागली. मला यायला उशीर झाला तर गल्लीच्या तोंडावर हे टोळकं घुटमळताना दिसू लागलं. एकदा का गल्लीच्या नाक्यावर माझी त्यांची भेट झाली की पुढे हे टोळकं माझ्याबरोबर घरापर्यंत येऊ  लागलं, माझी सोबत केल्यासारखं अन् घर जवळ आल्यावर आपसूक माझ्यापासून दूर होऊ  लागलं. कदाचित माझ्यासाठीची त्यांची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा त्यांचा हा मार्ग असावा. त्यांच्या या साथसंगतीचा एवढाच अर्थ मी काढू शकलो.

प्र. . जोशी

pajoshi51@hotmail.com