13 July 2020

News Flash

मराठवाडी बोली सिंथेसाइझ्ड वुईथ इंग्लिश डेडली कॉकटेल

बब्रुवान रुद्रवान कंठावार यांचे ‘आमादमी विदाऊट पार्टी’ हे पुस्तक जनशक्ती वाचक चळवळतर्फे प्रकाशित होत आहे.

बब्रुवान रुद्रवान कंठावार यांचे ‘आमादमी विदाऊट पार्टी’ हे पुस्तक जनशक्ती वाचक चळवळतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील सुप्रसिद्ध कादंबरीकार अरुण साधू यांच्या प्रस्तावनेचा संपादित अंश..
बब्रुवान रुद्रवान कंठावारांचे हे चौथे पुस्तक. त्यांचा खास आठवतो तो ‘बटरड्र रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’ हा धमाल संग्रह. त्यातच त्यांच्या इंग्रजी-प्रचुर खास भाषेची ओळख झाली. प्रथम वाटले, की हे सारे लिखाण एखाद्या वृत्तपत्रात नियमित स्तंभ म्हणून प्रसिद्ध झाले असावे. पण नंतर कळले, केवळ वृत्तपत्रच नव्हे तर वेगवेगळी नियतकालिके, मासिके यांच्या विशेष अंकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले हे लेख आहेत. या अनियमित लेखांमधूनही त्यांच्या भाषेच्या खास स्टाईलीची सुसंगती त्यांनी कटाक्षाने राखलेली लक्षात येते. तशीच त्यांच्या निवेदनाची विशेष शैलीदेखील. आणखी एक वैशिष्टय़ नमूद केले पाहिजे. ‘बटरड्र रसेल..’ (२००७) पासून आतापर्यंत आपल्या खास भाषेची स्टाईल तासत तासत बब्रुवानांनी ती अधिकच खुमासदार केलेली दिसते. इतकी, की वाचता वाचता तिच्या वेगळ्या सौंदर्याचा व मादक माधुर्याचा तसेच तिच्या नैसर्गिक लयीचादेखील वाचकाला आनंद देणारा प्रत्यय यावा. अस्सल ग्रामीण मराठवाडी बोली सिंथेसाईझ्ड वुईथ इंग्लिश.. डेडली कॉकटेल. त्यातच जबरी विनोदाच्या किंवा अबसर्डिटीच्या आधारे केलेली स्कॅथिंग कॉमेन्ट्स् वा ऑब्झर्वेशन्स!
त्यासाठी प्रस्तुत संग्रहातील पहिलाच लेख ‘जातीचं मॅथेमॅटिक्स’ यातील पहिलाच पॅरा वाचला तरी बब्रुवानांच्या तेज लेखनाचे सॅम्पल टेस्ट केल्यासारखी किक बसेल. खरं तर हा पॅरेग्राफ इथे कोट करण्याचा मोह होतो; बब्रुवानांच्या लेखनाच्या बऱ्याच पिक्युलियारिटीज् या एका पॅरेग्राफमधून सहज प्रकट होतात.
लेखकाची साधारण सहा पात्रे पर्मनंट असतात. लेखक म्हणजे स्वत: बब्रुवान आणि त्याचा दोस्त. दोस्त त्याला बबऱ्या असेच कायम संबोधित असतो आणि बबऱ्या दोस्ताला फक्त दोस्त. बबऱ्याचा मुलगा गब्रू आणि दोस्ताचा बारक्या. वय असणार बाराच्या आसपास. पण पोट्टे बापांपेक्षा सुपर बेरकी. दोघेही या बापांची पुरेपूर मापे घेतलेली. त्यांच्या चेहऱ्यावरील ऑल-नोईंग तिरके इंपिश हसू वाचकांना जणू टायपात दिसते. बायकांना वहिनी व्यतिरिक्त नावे नाहीत. त्या सहसा सैंपाकघरात खुडबुड करीत असतात; पण बाहेर चहा घेऊन आल्या, की त्यांच्याही चेहऱ्यावर प्रॅक्टिस करून आणलेली स्केप्टिसिझमची स्मितयुक्त शेड सहज दिसावी. मात्र त्याचबरोबर या कधी नवऱ्यांच्या दांडय़ा उडवतील असाही आविर्भाव असतो. मुले कधी एखादा सुसाट प्रश्न टाकून बापद्वयांच्या विकेटी घेतील याचीही खात्री नसते. स्टोरी सुरू होते सहसा बबऱ्याच्या किंवा दोस्ताच्या घरी. बबऱ्या कोठल्या तरी सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय किंवा थिल्लर प्रश्नावर गहन विचारात बुडालेला असतो. तशात दोस्त येतो अन् त्यांचे मसालेदार कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होते. फुलझडय़ा, भुसनळे, लवंगी लडी, अ‍ॅटम धमाके फुटू लागतात. कुठे लंबा पॉझ पडला की जद्र्याच्या पुडय़ा असतातच किंवा आतून बायकोने कॉमेंटसह आणलेला चहा. सरता सरता बबऱ्या कंसामधे पाच-सात ओळींमध्ये एक जबरी खासगी कॉमेंट टाकतो. अर्थातच ती फक्त वाचकांसाठी असते. असा साधारणपणे बब्रुवानांच्या लेखांचा फॉर्म असतो.
या भन्नाट संवादाचे विषय कोणते असतात? राजकारण, साहित्य, समाजकारण, संस्कृतीकारण, टीव्ही, कॉम्प्युटरच्या पडद्यात दडलेले भासमय जग.. त्या त्या वेळच्या निमित्ताने काहीही. संवादाची पातळी वरवरची भासली तरी कधी प्रोफाउंडिटीची उच्च पातळी गाठते. ठायी-ठायी सवंग वाटणाऱ्या मुक्ताफळांमधून शाश्वत सत्ये बोलली जातात. कधी चक्क अ‍ॅबसर्डिटीची विलक्षण झिंग! अ‍ॅबसर्डिटी कधी संवादातून कडेलोट झाल्यासारखी, कधी बबऱ्याच्या समाधियुक्त म्युझिंग्जमधून. दोस्त एका स्थानिक नेत्याच्या गोटातला. त्यामुळे गप्पांमध्ये राजकारण सर्व तऱ्हेचे- म्हणजे ग्लोबलपासून तो लोकलपर्यंत. झालंच तर गावचं पॉलिटिक्स, कंपूमधलं, मित्रांमधलं, जाती-पातींचं, घरातलं डोमेस्टिक पॉलिटिक्स, नातेवाईकांचं, नवरा-बायकोचं, बाप-मुलाचं पॉलिटिक्स.. त्याशिवाय इकॉनॉमिक्स, लॉजिक, फिलॉसॉफी, फिलॉलॉजी, अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी, सोशॅलॉजी, सोशल सायकॉलॉजी इत्यादी इत्यादी विषय तर यांच्या रोजच्या मीठ-मिरचीचे; पण पीएच.डी. स्टुडन्टने नोट्स काढाव्यात असे घनगंभीरपणे चर्चिलेले. अर्थात लाइट भाषेत. आणि जेव्हा गप्पांचा विषय असतो कॉम्प्युटरचा, डिजिटल उचापतींचा, तेव्हा बब्रुवानांच्या प्रतिभेला पंख फुटतात. पाच लेख तर आभासी जग आणि फेसबुक वगैरे विषयांतून जे मनुष्यजातीचे जीवन तसेच अनुभवविश्व बदलते आहे, त्यातून उसळणाऱ्या नव्या फिलॉसॉफिकल आव्हानांशी भिडणारे आहेत. हंसीमजाकमध्ये या गहन विषयांवर गप्पा मारणाऱ्या या दोन मित्रांची प्रतिभाशक्ती थक्क करणारी आहे. अर्थातच ही कॉम्प्लिमेंट लेखकाची प्रतिभा जाण व त्याची कल्पनाशक्ती यांस आहे. तशी सगळ्या पुस्तकावरच या जगाची छाया आहे.
पॉलिटिक्सवर तर दोघाही मित्रांची मास्टरी आहे. कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिक्सचा सब्जेक्ट निघाला की यांची रसवंती झुळुझुळु वाहू लागते. दोस्ताच्या लोकल श्रेष्ठीचं तिकीट वांद्यात पडल्यावर दोस्तबी अन्नेनेसरीली बंडखोरीला हुभा राहतो. अशा क्रिटिकल क्षणी बबऱ्या त्याच्या घरी जातो. त्यानंतर दोघांच्या डायलॉगचा जो फुफाटा उडतो, त्या निमित्ताने कॉमन मॅनच्या डेफिनेशनवर दोघांची जी इंटेलेक्च्युअल व फिलॉसॉफिकल हाणामारी होते, त्यात बबऱ्या एक स्वत:च्या पब्लिक फजितीची जी सिम्बॉलिक स्टोरी सांगतो, ते सर्व ‘आमादमी विदाऊट पार्टी’ या लेखात वाचावे.
स्वत: लेखकाला बदलत्या राजकारणाचे व राजकीय-सामाजिक मूल्यांच्या आजच्या गोंधळाचे सखोल भान आहे. म्हणूनच तो सारे सहजपणे लिहून जातो. पहिल्याच लेखात दोघा मित्रांची जातीच्या मॅथेमॅटिक्सवर गंभीर चर्चा सुरू असताना त्यात तोंड खुपसून दोस्ताचं बेरकी पोरगं बारक्या एक सवाल टाकून दोघांची (आणि वाचकांचीही) दांडी उडवतो, ‘‘बब्रुअंकल, सांप्रतला कोणती जात सेफ हाये?’’ बराच घनगंभीर खल करून दोघांचं कॉन्सेंशस तयार झाल्यावर दोस्त पोराला बोलावून टेचात सांगतो, ‘‘बारक्या, सांप्रतला ‘मानूस’ ही जात लै सेफ हाये.’’ मानूस या शब्दाचा व्यापक गहनार्थ जाणून वाचक तरी थक्क होतो; पण लेखक थोर. त्याचं चाइल्ड सायकॉलॉजी आणि आधुनिक पोरांच्या जाणकारीचं अंडरस्टॅण्डिंग अधिक सखोल. बारक्या हे उत्तर झटकून टाकत म्हणतो, ‘‘असली टोपण जात टाकू नका माझ्याम्होरं. म्या काई पब्लिक न्हाई, तुमचा पोरगा हाये. प्रॅक्टिकलमंदी बोला. पैलीपास्नं सारेच ‘मानूस’ जातीचं सांगतेत. पन तशी यकबी जात आपल्यामंदी न्हाई. संस्कार म्हनून पैली-दुसरीच्या पोरांसाठी हे अ‍ॅन्सर चांगलं हाये, पन आमच्यासाठी न्हाई.’’
बब्रुवानांच्या लेखनाचे मोल केवळ विनोदी स्तंभलेखक म्हणून करणे योग्य होईल का, असा प्रश्न पडतोच. विनोदी स्तंभ लेखनासाठी समकालीन अशी राजकारणातील किंवा समाजकारणातील विनोदी सिच्युएशन निवडावी तरी लागते किंवा तिला तसे मुद्दाम वळण द्यावे लागते. आता खास विनोदी स्तंभ लिहायचा म्हणून बब्रुवान बैठक मारत असतील असे वाटत नाही. त्यांच्या लिखाणात स्पेसिफिक अशी आज-कालची न्यूज-ओरिएंटेड घटना किंवा सिच्युएशन नसतेच. त्यांनी निर्माण केलेली आमादमी पात्रे आपापले सामान्य जीवन जगत असतात. त्यांच्या जगण्याचे, समस्यांचे, संभाषणांचे, भाष्यांचे ते फक्त चित्रीकरण करतात. त्यात ते जी त्यांची भाषा वापरतात व संभाषणातून जे नेहमीचे विषय चर्चिले जातात, त्यातून आपोआप सौम्य विनोद-निर्मिती होत असावी. लेखकाच्या नकळत! सुरुवातीला ‘धम्माल’, ‘अफलातून’, ‘जबरा’, ‘तुफान’, ‘डेडली’ वगैरे विशेषणे काही ठिकाणी वापरली आहेत. ती बब्रुवानांना अपेक्षित नसावीत. त्या त्या वेळी दाद देण्यासाठी ती वापरावीशी वाटतातच; पण खदाखदा हसविणारा अंगविक्षेपी असा त्यांचा विनोद नव्हे की कोटीबाजही नव्हे. त्यांना शब्दांवर कोटय़ा करण्याची हौसही दिसत नाही. विनोदी लेखक सहसा एरवी दैनंदिन आयुष्यातही पावलोपावली कोटय़ा करण्यासाठी प्रसिद्ध असतात. परिचय नसल्याने बब्रुवानांचे आपल्याला माहीत नाही. खरे मनापासून सांगायचे तर त्यांचा विनोद मन उत्फुल्ल करतो असेही नाही. वाचून थोडे मनातल्या मनात हसायला होते खरे. चेहऱ्यावर स्मितही उमटते; पण बव्हंशी विषादयुक्त स्मित उमटते. वाचक अस्वस्थ होतो. एखादा विचित्र सामाजिक, सांस्कृतिक पेच, त्यातून निर्माण होणाऱ्या सिच्युएशन्स व त्यांचा औपहासिक अथवा औपरोधिक अन्वयार्थ याची चर्चा दोन मित्रांमध्ये होते. त्यामध्येच हा अदृश्य विनोद लपलेला असतो.
संगणक-डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात, माणसाच्या भावविश्वात, विचार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करीत आणले आहेत. आपली भाषादेखील त्यामुळे वेगाने बदलू लागली आहे. बदलती जागतिक परिस्थिती, मार्केटचा जगड्व्याळ व्याप, सगळ्या जगाला गिळंकृत करणारा मार्केटचा पसारा, त्यातून बदलणारी जागतिक समीकरणे, जीवनमूल्यांची दाणादाण, नीतीअनीती संकल्पनांची तोडफोड आणि माणसाची विस्कटलेली मन:शांती.. या सगळ्या खळबळींची छाया बबऱ्या आणि दोस्ताच्या मन:स्थितीवर, त्यांच्या संसारावर, त्या छोटय़ा शहरातील नजीकच्या परिसरावर पडली आहे. त्याचे पडसाद या मित्रांच्या डायलॉग्जमध्ये, दोन कुटुंबाच्या संबंधामध्ये, शहरातील समाजाशी होणाऱ्या इंटरअ‍ॅक्शनमध्ये उमटताना दिसतात (तुलना करायची नाही; परंतु जगातील बरेचसे पुरातन तात्त्विक वाङ्मय गुरू-शिष्यांच्या अथवा दोन व्यासंगी तत्त्वज्ञांच्या डायलॉग्जमधून येते. जसे की- औपनिषदिक किंवा सॉक्रेटिस-प्लेटो यांचा डायलॉग.). या साऱ्या खळबळी व्यक्त करण्यासाठी बब्रुवानांनी हा फॉर्म निवडला असावा.
खरोखर २४ तास टीव्ही, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी गोष्टींनी मनुष्यजीवनात केवढी उलथापालथ केली आहे. या सगळ्यांशी जुळवून घेताना धाप लागते. बबऱ्या आणि त्याचा दोस्त आपल्या कुटुंबीयांसह या वावटळीत सापडले आहेत. त्यांची धावपळ आपण या संवाद-सत्रांमध्ये, एकमेकांना सांगितलेल्या किश्श्यांमधे वाचून आपल्याला थोडी मौज वाटते खरी; पण मन अंतर्मुख होते, विषण्णही होते. किंबहुना मौजेपेक्षा विषण्णता आणि कारुण्य यांचे प्रमाण अधिकच. गंमत, टवाळी आहे खरी; पण त्या आड हे कारुण्य. बाईकवर फुलांचे हार व फुलांनी गच्च भरलेली टोपली घेऊन जाणारा माणूस खड्डय़ात पडतो व फुलांखाली गाडल्यासारखा होतो. लोक त्याला हसतात. शहरात घडलेला हा किस्सा बबऱ्या गंभीरपणे, उदास चेहऱ्याने दोस्ताला सांगतो. दोस्त मनकवडा. तो ओळखतो, हा खड्डय़ात पडलेला माणूस म्हणजे बबऱ्याच! हसणारे बघे म्हणजे आपण वाचक तर नव्हे? वाचकांनीच ठरवावे. वर सुचविल्यानुसार बब्रुवानांच्या लिखाणाला सामाजिक व राजकीय परिमाण आहे. उपरोध व विनोद तर आहेच; पण त्यापेक्षा विषण्णता, कारुण्य व दु:ख यांची मात्रा किंचित जास्त आहे. म्हणूनच ते हलवून सोडते. प्रत्येक लेखाच्या शेवटची कंसातील भाष्ये अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. म्हणूनच त्यांचे लिखाण विनोदाचे आवरण फोडून वरची उंची गाठते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2016 1:16 am

Web Title: aam aadmi without party book by arun sadhu
टॅग Arun Sadhu
Next Stories
1 अचंब्याच्या गोष्टी
2 तो राजहंस एक!
3 चित्रकलेतील पांडित्य
Just Now!
X