प्रकाश बाळ

‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक कै. अनंतराव भालेराव यांची जन्मशताब्दी १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील बिनीचे शिलेदार, पुढे मराठवाडय़ातील सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या चळवळीतील एक सेनानी अशी अनंतरावांची विविध रूपे आहेत. त्यांच्या आयुष्यात कसोटीचे अनेक क्षण आले. त्या प्रत्येक वेळी ते तितक्याच धैर्याने व विचारपूर्वक त्यांना सामोरे गेले. मराठवाडय़ासारख्या मागास भागात पत्रकारिता करूनही ते सर्वदूर पोहोचले. अशा या चौफेर व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेणारा लेख..

Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

‘‘कावड’ खाली ठेवली आणि तुम्हाला पत्र लिहायला बसलो. एखाद्या सुंदर काव्यशास्त्रविनोदाच्या मैफलीत रंगून जावं, असा अनुभव ‘कावड’ वाचताना आला. वृत्तपत्र- लेखनाला ‘घाईतलं साहित्य’ म्हटलं जातं. हे लेखन करताना मुहूर्त गाठण्याची घाई असते, हे खरं; पण एखाद्या सुसंस्कृत, सहृदय, व्यासंगी आणि सत्कार्यप्रवण अशा गुणांनी समृद्ध असलेल्या व्यक्तिमत्त्वाचं तुमच्या लेखनातून घडलेलं दर्शन मनाला केवढा आनंद देऊन गेलं, ते शब्दांतून प्रकट करता येणार नाही. अचानक धनलाभ व्हावा, तसा हा ग्रंथलाभ झाल्याच्या आनंदात मी आहे.’

हे पत्र लिहिलं आहे- मराठी साहित्यातील भाषाप्रभू असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी प्रख्यात सव्यसाची पत्रकार व आता अस्तंगत झालेल्या ‘मराठवाडा’ या दैनिकाचे संपादक दिवंगत अनंत भालेराव यांना! ‘कावड’ या त्यांच्या लेखसंग्रहावरचा पुलंचा हा अभिप्राय म्हणजे अनंत भालेरावअण्णा यांच्या पत्रकारितेचं मर्म व्यक्त करणारा आहे.

अण्णांच्या जन्मशताब्दी वर्षांला येत्या १४ नोव्हेंबरला सुरुवात होत आहे, तर पुलंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आहे. अशा वेळी पुलंचं हे पत्र अनंतरावांचे चिरंजीव निशिकांत यांनी ‘शेअर’ केलं आहे.

आजच्या पिढीला भालेरावांची ओळख कशी करून द्यायची? एक मूल्याधिष्ठित आयुष्य जगणारा पत्रकार म्हणून? की हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या चळवळीत तरुण वयात उडी घेणारा आणि नंतर चळवळीत विविध संस्कारांमुळं जनवादी दृष्टिकोनाची जडणघडण होऊन एक व्रत म्हणून पत्रकारितेत आलेला पत्रकार या नात्यानं अण्णांची ओळख करून द्यायची? की अण्णा हे अफाट जनसंपर्क असलेले लोकशाही समाजवादी चळवळीशी बांधिलकी मानणारे व्यासंगी, भाषाप्रभू, सव्यसाची पत्रकार होते असं म्हणायचं?

खरं तर भालेरावांची ही विविध रूपं होती आणि त्यांचा समुच्चय अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रतीत होत असे.

भालेराव चळवळीतून पत्रकारितेत आले तो देशाच्या जडणघडणीचाही कालावधी होता. अनेक आव्हानं देशापुढं होती. सार्वजनिक आयुष्यातील मूल्याधिष्ठित वागणुकीचा वारसा तोपर्यंत ओसरलेला नव्हता. आव्हानांना सामोरे जाताना व्यक्तिगत राग-लोभ, हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलानं पुढं जाण्याची वृत्ती समाजातून लोप पावायची सुरुवात अजून व्हायची होती. आपलं व्यक्तिगत आयुष्य जगताना, व्यवसाय व नोकरी करताना समाजाची बांधिलकी मानण्याच्या भावनेला ओहोटी लागलेली नव्हती.

अशा काळात भालेराव पत्रकारितेत- तेही मराठवाडय़ासारख्या मागास भागात- स्वत:चं एक स्थान निर्माण करू लागले होते. ‘मराठवाडा’ हे साप्ताहिक होतं. नंतर ते द्विसाप्ताहिक झालं आणि पुढं दैनिक. या प्रदीर्घ वाटचालीत अण्णा सहभागी झाले होते आणि काळाच्या ओघात ‘‘मराठवाडा’ म्हणजे भालेराव’ असं समीकरणच तयार झालं!

या वाटचालीत एक संपादक म्हणून अनेक कसोटीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. त्यापैकी एक होता अब्रुनुकसानीच्या खटल्याचा. त्याचं असं झालं की, ‘मराठवाडा’ हे द्विसाप्ताहिक असताना १९६७ साली पन्नालाल सुराणा यांचा एक लेख अण्णांनी छापला होता. त्यात एका साखर कारखान्यात प्रत्येक शेतकऱ्याकडून पोत्यामागं दोन रुपये कापून घेतले जातात, असा आरोप होता आणि त्याचा रोख होता- त्या काळात महाराष्ट्र सरकारात पुरवठा मंत्री असलेल्या होमी तल्यारखान यांच्यावर. साहजिकच गदारोळ झाला. राजकारण रंगलं. तेव्हा तल्यारखान यांनी ‘मराठवाडा’, संपादक म्हणून अनंत भालेराव आणि लेखक या नात्यानं पन्नालाल सुराणा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. हे प्रकरण गाजू लागलं. खटल्याच्या सुनावणीच्या बातम्या प्रसिद्ध होऊ  नयेत म्हणून तल्यारखान यांनी तो ‘इन कॅमेरा’ चालवावा अशी मागणी उच्च न्यायालयात केली. ती न्यायालयानं मान्य केली. त्याच्याविरोधात भालेराव सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथेही ही मागणी न्यायालयानं स्वीकारली आणि अखेर हा खटला ‘इन कॅमेरा’ चालून अण्णा व पन्नालाल सुराणा यांना दोषी ठरवण्यात येऊन त्यांना तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा फर्मावण्यात आली. ‘आम्ही केलेल्या आरोपाचा न्यायालयात सिद्ध होईल असा पुरावा सादर करू शकलो नाही. त्यामुळं ही शिक्षा भोगायची आमची तयारी आहे,’ अशी अण्णा व सुराणा यांची भूमिका होती. त्यामुळं तीन महिन्यांसाठी नाशिक तुरुंगात या दोघांची रवानगी झाली.

पुढं होमी तल्यारखान यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. एक प्रकारे ‘मराठवाडा’ जे म्हणत होता ते न्यायालयात सिद्ध होऊ  शकलं नाही, तरी राजकारणाच्या आखाडय़ात त्याची सरशी झाली.

एका दशकाच्या आतच पुन्हा एकदा कसोटीचा क्षण येऊन अण्णांना नाशिकच्या तुरुंगात जावं लागलं, ते आणीबाणीच्या काळात. १९७५ साली. आणीबाणीच्या काळात अण्णांनी आपली लेखणी ज्या तडफेनं चालवली, तिचा परिणाम त्यांच्या स्थानबद्धतेत झाला. महाराष्ट्रातील जी काही मोजकी दैनिकं व नियतकालिकं सेन्सॉरशिपचा बडगा उगारला जाऊनही आणीबाणीच्या विरोधात उभी राहिली, त्यात ‘मराठवाडा’चं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. अण्णांना अटक झाली तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बंडखोरीचा झेंडा फडकवत ठेवला, हे विशेष.

अण्णांच्या पत्रकारितेच्या जीवनातील सर्वात मोठा पेचप्रसंग आला, तो मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा. शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पु. लो. द. सरकारनं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करायचा निर्णय घेतला आणि मराठवाडय़ात जनक्षोभ उसळला. प्रादेशिक अस्मिता विरुद्ध वैचारिक अस्मिता असा संघर्ष उभा राहिला. अण्णा हे दोन्ही अस्मितांचे पाईक. साहजिकच ते कोणाच्या बाजूचे, हा प्रश्न निर्माण झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सहभागामुळं अण्णांच्या मनावर प्रादेशिक अस्मितेचा खोल ठसा उमटला होता. दुसरीकडं लोकशाही समाजवादी चळवळीतील सहभागामुळं दलितांच्या दु:खाची व सर्वागीण उपेक्षेची जाणीवही तीव्र होती. मात्र, प्रखर संघर्षांनंतर मराठवाडय़ाच्या मुक्तीचे स्वप्न साकार झाल्यामुळं ही अस्मिता वरचढ ठरली आणि अण्णांनी नामांतराला विरोध करण्याची भूमिका घेतली. त्यामुळं टीकेचं मोहोळ उठलं. उभं वैचारिक आयुष्य दलितांच्या समस्यांवर व त्यांच्या सोडवणुकीसाठी वेचणाऱ्या अण्णांना ‘दलितविरोधी’ ठरवलं गेलं. त्यांच्यासाठी ही सर्वात दु:खदायक गोष्ट होती. लोकशाही समाजवादी चळवळीतील त्यांचे अनेक घनिष्ठ सहकारी त्यांच्यापासून दुरावले. अण्णांनी हे वार धीरोदात्तपणे झेलले. मात्र, आपली भूमिका त्यांनी सोडली नाही. त्याचप्रमाणं नामांतराच्या निमित्तानं दलितांवरील अत्याचारांचा त्यांनी तेवढय़ाच तीव्रतेने निषेध केला आणि त्याच्याविरोधात पोटतिडिकीनं लिहिलंही.

पुढं ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा नामांतराचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असं नामकरण करण्याच्या तोडग्याची चर्चा सुरू झाली. हा तोडगा अण्णांना मान्य होता. परंतु तो सर्वसंमतीनं मान्य झाला तेव्हा नामकरण पाहण्यास अनंतराव हयात नव्हते. मात्र, नामांतराचा निर्णय घेतानाच उद्भवणाऱ्या परिस्थितीची पुरेशी दखल राजकारण्यांनी घेतली असती आणि असा तोडगा आधीच काढला असता तर?

असे कसोटीचे क्षण येत असतानाच ‘मराठवाडा’चा व्यावसायिक डोलारा सांभाळण्याचे आव्हान दिवसेंदिवस बिकट होऊ  लागले होते. वृत्तपत्राच्या जगतात आमूलाग्र बदल होऊ  लागण्याचा तो काळ होता. छपाईच्या तंत्रज्ञानात विलक्षण वेगानं बदल होत होते. संगणकाचं युग अवतरण्याच्या बेतात होतं. वाचकांच्या अपेक्षा आणि आकांक्षाही पालटत होत्या. त्यातच व्यावसायिक स्पर्धाही वाढत होती. पत्रकारिता हे ‘मिशन’ म्हणून बघण्याचा काळ ओसरण्याची सुरुवात होत होती. अशा वेळी ‘मराठवाडा’चं आर्थिक गणित जुळवणं अनंतरावांना मेटाकुटीचं ठरू लागलं होतं. हे आर्थिक गणित जुळवत ‘मराठवाडा’चा व्यावसायिक डोलारा सांभाळण्याचे अण्णांचे प्रयत्न अथक सुरू होते; पण त्यांना म्हणावं तसं यश येत नव्हतं. आणि काळाची पडणारी बदलती पावलं बघता तसं ते येणंही कठीण होतं. अण्णांच्या आयुष्याचं शेवटचं पर्व हे असं आर्थिक व व्यावसायिक कसोटीचं होतं.

अण्णांच्या निधनाला आता २७ वर्षे झाली. अण्णांनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मराठवाडा’ चालविण्याचा प्रयत्न कसोशीनं केला; पण बिघडत गेलेलं आर्थिक गणित सोडवणं त्यांनाही शक्य झालं नाही. आणि तसं ते सोडवणंही कठीणच होतं. कारण दरम्यानच्या काळात वृत्तपत्रांची ‘प्रसारमाध्यमं’ बनून त्यांची ‘मीडिया’च्या दिशेनं जोरदार वाटचाल सुरू झाली होती. वृत्तवाहिन्या अवतरल्या होत्या. साखळी वृत्तपत्रांच्या प्रादेशिक आवृत्त्या निघण्यास आधीच सुरुवात झाली होती. अधिकाधिक पानं आणि विविध पुरवण्या यांनी वाचकांना आकर्षून घेण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू होती. जागतिकीकरणाच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या युगात घरात बसून जगात काय घडत आहे, ते बघण्याची सोय होत होती. त्यामुळं वाचकांच्या/ प्रेक्षकांच्या मनोभूमिका पालटत होत्या. ‘समाजमाध्यमं’ प्रसारमाध्यमांच्या क्षितिजावर दिसू लागण्याचा तो काळ होता. मोबाइल टेलिफोनची क्रांती घडून येण्याची शक्यता बोलून दाखविली जात होती.

अशा या काळात ‘मराठवाडा’ हे ‘वृत्तपत्र’ म्हणून चालवून स्पर्धेत टिकून राहण्याकरिता जो भांडवल संचय, व्यवस्थापन संरचना व कौशल्य यांची गरज होती, ती ‘विश्वस्त निधी’च्या टीमकडं नव्हती. त्यामुळं २००० साली ‘मराठवाडा’ बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणं अपरिहार्य ठरलं.

सुरुवातीला उद्धृत केलेल्या पुलंच्या पत्रात अण्णांच्या पत्रकारितेचं मर्म त्यांनी उलगडून दाखवलं आहे. ‘पत्रकारितेचं ज्ञानपीठ’ असं अनंतरावांबद्दल म्हटलं गेलं. अशी पत्रकारिता आज टिकून आहे काय किंवा करता येऊ  शकते काय?

एक तर भालेराव लिहीत होते, ते त्यांच्या हाती असलेल्या प्रथम साप्ताहिकात, मग द्विसाप्ताहिकात आणि मग दैनिकात! त्यामुळं त्यांना आपली ‘मतं’ मांडायचं स्वातंत्र्य होतं. आणि त्यापायी ज्याला तोंड द्यावं लागेल, त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची त्यांची तयारी होती. हे अब्रुनुकसानीचा खटला, आणीबाणी आणि विद्यापीठ नामांतराची चळवळ या कसोटीच्या क्षणांनी दाखवून दिलं होतं. आज बदललेल्या काळात एखाद्या ध्येयनिष्ठ पत्रकाराला वृत्तपत्रं वा वृत्तवाहिनी यांत इतकं ‘स्वातंत्र्य’ मिळणं, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. व्यवस्थापनाचं नियंत्रण आणि जाहिरातदारांचं दडपण व त्याच्या जोडीला अलीकडच्या काळात येऊ  लागलेली प्रशासकीय व राजकीय दडपणं यामुळं प्रसारमाध्यमांतील मुख्य प्रवाहातील ‘स्वातंत्र्या’चा चांगलाच संकोच झालेला आहे. अर्थात एक नवा मार्गही उपलब्ध झाला आहे, तो म्हणजे ‘समाजमाध्यमां’चा आणि माहितीच्या महाजालातील- इंटरनेट- विविध प्रकारची संकेतस्थळं व ब्लॉग्ज् यांचा. तेथे अजून तरी या ‘स्वातंत्र्या’चा संकोच झालेला नाही.

मग अशा प्रकारे उपलब्ध असलेल्या या संधीचा वापर अनंतराव भालेराव यांना अभिप्रेत असलेल्या आणि त्यांनी व्यावसायिक आयुष्यात निष्ठेनं जपलेल्या, मूल्याधिष्ठित, व्यासंगी आणि जनहिताचा दृष्टिकोन बाळगून केलेल्या पत्रकारितेसाठी केला जाऊ  शकतो काय?

..निश्चितच केला जाऊ  शकतो.

आजही समाजाच्या विविध थरांतून आलेल्या तरुण-तरुणी ही संधी साधण्याच्या प्रयत्नांत असल्याचं दिसतं. त्यांची अभिव्यक्ती कदाचित तोकडी पडत असेल, अनुभवांचं गाठोडं त्यांच्याकडं नसेल, व्यासंगात ते अपुरे पडताना दिसत असतील; पण त्यांचे प्रयत्न कळकळीचे व प्रामाणिक आहेत, हे नि:संशय. गरज आहे, ती त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याचीएॅ

मात्र, ‘समाजमाध्यमां’वरील अशा लिखाणाची ‘पहूँच’ मर्यादित आहे, ती भारतासारख्या खंडप्राय देशात ‘डिजिटल’ क्रांती अजून पूर्णत्वास न गेल्यामुळं. जेव्हा हे घडेल तेव्हा भालेराव यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता एका नव्या स्वरूपात समाजमाध्यमांत अवतरेल, असा विश्वास बाळगण्याजोगी स्थिती आज आहे. अशा तरुण-तरुणींच्या दृष्टीनं अनंतरावांची पत्रकारिता हा दीपस्तंभ ठरेल.

prakaaaa@gmail.com