02 April 2020

News Flash

संघ परिवार : एक मायाजाल

लोकमान्य टिळकांना मानणाऱ्या डॉ. के. ब. हेडगेवार या काँग्रेसी नेत्याने नागपूर-विदर्भात १९१६ ते १९२६ या काळात अनेकानेक ‘स्वयंसेवक संघां’चे प्रयोग केले

(संग्रहित छायाचित्र)

दिलीप देवधर

अटलबिहारी १३ दिवसांसाठी भारताचे पंतप्रधान झाले त्याच दिवशी भाजपचे काँग्रेसीकरण सुरू  झाले. काँग्रेसीकरण म्हणजे भारतात अखिल भारतीय सत्ता मिळवणे व ती टिकवण्यासाठी साधनशुचिता खुंटीला टांगून ठेवणे. संघ स्वयंसेवक प्रारंभी वादग्रस्त आयारामांना ‘वाली’ म्हणतो, तर संघ अधिकारी ‘वाल्मीकी’ संस्कार करण्याची भाषा वापरतात.. रा. स्व. संघाच्या विश्लेषकांनी केलेली मीमांसा..

हिंदुस्थानचे ‘स्वॉट (Swot) असेसमेंट’ करणाऱ्या देशी-विदेशी विचारवंतांना लक्षात आली भारतीयांची कमजोरी, असंघटितता, वाचाळपणा आणि आधुनिक राष्ट्रीयतेचा अभाव. ख्रि्रश्चन आणि इस्लामने प्रथम आपल्या समाजाला संघटित केले आणि नंतर साम्राज्यवादी शक्ती निर्माण करून विघटितांवर राज्य केले. युरोपने धर्मनिष्ठ (रिलीजस) नेत्यांना पराभूत करून औद्योगिक महासाम्राज्य निर्माण केले. भारत हे विश्वाचे लघुरूप असल्यामुळे प्रथम इस्लामी शक्तींचा गुलाम झाला आणि त्यानंतर औद्योगिक ताकदींचे भक्ष्य बनला.

भारतीयांमध्ये राष्ट्रीयता रुजवण्यासाठी आणि त्यांना संघटित करण्यासाठी अहिंसावादी देशी-विदेशी विचारवंतांनी पुण्यात ‘भारतीय राष्ट्रीय महासभा’ स्थापन करण्याचा संकल्प सोडला. परंतु प्लेगच्या साथीमुळे स्थानबदल करून मुंबईला ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’चा १८८५ साली जन्म झाला. पुढे लोकमान्य टिळकांना दादाभाई नौरोजी यांनी काँग्रेसमध्ये ओढले. अर्थातच त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे प्रबलीकरण झाले. काँग्रेसला प्रतिस्पर्धी निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी मुस्लीम लीगला मैदानात उतरवले. मुस्लीम लीगला तोंड देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी १९१५ साली हरिद्वारला ‘हिंदूसभे’ला जन्म दिला. ब्रिटिशांनी १९३७ साली ‘हिंदूमहासभे’ला मुस्लीम लीगच्या बरोबर आणून इंडियन नॅशनल काँग्रेसला चहुबाजूंनी घेरले.

लोकमान्य टिळकांना मानणाऱ्या डॉ. के. ब. हेडगेवार या काँग्रेसी नेत्याने नागपूर-विदर्भात १९१६ ते १९२६ या काळात अनेकानेक ‘स्वयंसेवक संघां’चे प्रयोग केले. १९२० च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात लो. टिळक काँग्रेसाध्यक्ष होणार होते. यानिमित्ताने गणवेशधारी १२०० स्वयंसेवक डॉ. हेडगेवार यांनी उभे केले. पण टिळकांचे १९२० साली निधन झाले आणि महात्मा गांधी यांच्या पर्वास प्रारंभ झाला. डॉ. हेडगेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ म. गांधींना स्वीकारले. म. गांधींनी वध्र्याला सेवाग्राम आश्रम उभारला. १९२५ ला निर्माण झालेल्या स्वयंसेवक संघटनेचे नाव १९२६ च्या विजयादशमीला ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ठेवण्यात आले. वध्र्याला १९३६ साली राष्ट्रसेविका समितीचा प्रारंभ झाला. १९२० च्या काँग्रेस अधिवेशनातील स्वयंसेवकांचा गणवेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४२ पर्यंत जपला होता. ब्रिटिश सरकारने बंदी आणल्यामुळे १९४२ साली तो बदलावा लागला.

म. गांधी, मोतीलाल नेहरू आणि डॉ. के. ब. हेडगेवार या तिघांचे ‘कोडे’ सोडवले तर नवइतिहास समोर येईल. डॉ. हेडगेवार आणि रा. स्व. संघ निवडणुकीतील सहभागास कधीच इच्छुक नव्हते.  मोतीलाल नेहरूंना मात्र निवडणुकीतून सत्ताप्राप्ती अपेक्षित होती. शेवटी म. गांधींनी जवाहरलाल नेहरूंना  पंतप्रधानपदी विराजमान केले. इंग्लंड, अमेरिका आणि रशिया या त्रयीला पं. जवाहरलाल नेहरू हवे होते आणि म. गांधी हे द्रष्टा पुरुष होते.

३० जानेवारी १९४८ रोजी सकाळी म. गांधींनी काँग्रेस संघटना विसर्जित करून लोक सेवक संघाचा संकल्प सोडला. २ फेब्रुवारी १९४८ ला वर्धा जिल्ह्य़ातील सेवाग्रामला लोक सेवक संघाचा विधीवत प्रारंभ होणार होता. परंतु ३० जानेवारी १९४८ रोजीच सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी या महात्म्याची हत्या झाली. नेहरूंनी गांधीजींच्या आर्थिक विचारांची, तर हिंदूमहासभेच्या नथुरामने महात्म्याच्या शरीराची हत्या केली. पुढे म. गांधीजींचे ‘लास्ट विल अँड टेस्टामेंट’ काँग्रेसी सत्तावाद्यांनी आणि सर्वोदयवाद्यांनी पायदळी चिरडले.

महात्म्याचा हत्यारा हा हिंदूमहासभेचा नेता होता. हिंदूमहासभा नेहरू सरकारात सहभागी होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने हिंदूमहासभेबरोबर सत्ताशय्यासोबत करून रा. स्व. संघावर ४ फेब्रुवारी १९४८ रोजी बंदी आणली. त्यानंतर स्वतंत्र भारतात नेहरूवादी- साम्यवादी- समाजसाम्राज्यवाद्यांनी सेक्युलर हिंदूंना ‘कम्युनॅलिझम’ची लेबले चिकटवीत, कम्युनल मुस्लीम नेत्यांना ‘सेक्युलॅरिझम’ची प्रशस्तीपत्रे दिली. मल्टिकम्युनल नेहरूवादी नेत्यांची सत्ता बळकट करून घराणेशाही रुजवली गेली.

हिंदुत्व..राष्ट्रीयत्व

स्वा. सावरकर यांचा ‘हिंदुत्व’ नावाचा ग्रंथ नागपुरातून १९२३ साली प्रकाशित झाला. या ग्रंथात ‘हिंदू’ संकल्पना ‘रिलीजस’ शैलीने मांडली गेली. डॉ. हेडगेवारांची ‘हिंदू’ कल्पना सभ्यतेची होती. त्यामुळे स्वातंत्र्यवीरांची ‘हिंदू’ संकल्पना डॉक्टरांनी मनोमनी नाकारली. प्रारंभीची हिंदूसभा काँग्रेसची होती, तर १९३७ नंतरची ‘हिंदूमहासभा’ स्वा. सावरकरांची होती. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांनी रा. स्व. संघ आणि सावरकरांची ‘हिंदूमहासभा’ यांना सदैव एकमेकांपासून दूर ठेवले.

हिंदू समाजात राष्ट्रीयत्वाचे संस्कार करण्यासाठी, वाचाळ वेदांतींना ‘स्वयंसेवक’- म्हणजे कार्यकारी करण्यासाठी आणि यासाठी व्यवस्थापनशास्त्र व कला यांचा वापर करण्यासाठी त्यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली. मला ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ हे नाव कधीच मान्य नाही, असे एका लेखात १९३७ साली डॉ. हेडगेवार यांनी लिहून ठेवले आहे.

स्वामी विद्यारण्य आणि रामदासस्वामी हे डॉ. हेडगेवारांचे ‘रोल मॉडेल’ होते. स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजीमहाराज हे गोळवलकर गुरुजींची प्रेरणास्थाने होती. भारताचे पंतप्रधान होण्याची बाळासाहेब देवरसांची प्रबळ इच्छा, आशा-आकांक्षा होती.

हिंदूमहासभा ‘संघटना आणि घटना’ समूळ नाकारून ‘भारतीय जनसंघा’ची स्थापना स्वतंत्र भारतात संघनेत्यांनी केली. जनसंघाच्या प्रारंभीच्या अ. भा. अधिवेशनात दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हिंदुराष्ट्रा’चा ठराव मांडला. जनसंघाने ‘हिंदुराष्ट्र’ संकल्पना रा. स्व. संघाकडे पूर्णपणे सोपवून नव्या पक्षाने (सेक्युलर पार्टी) घटनेच्या बांधीलकीचे राजकारण करावे, असा सल्ला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी उपाध्याय यांना दिला. भारतीय मजदूर संघाची श्रमनीती आणि जनसंघाचा एकात्म मानववाद याची पार्श्वभूमी गुरुजींच्या भूमिकेतून स्पष्ट होईल. ‘हिंदू इतिहासात राज्ये ‘सेक्युलर’ होती. अपवाद सम्राट अशोकाचा!’ असा सणसणीत टोला दिल्लीतून प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून गोळवलकरांनी नेहरूवाद्यांना हाणला होता. गोळवलकर गुरुजी निर्मित संघ परिवारातील प्रत्येक संघटना ‘राष्ट्रीय’ किंवा ‘भारतीय’ नावाची आहे. वैश्विक संघटनेचे नाव ‘विश्व हिंदू परिषद’ आहे, हे इथे लक्षात घ्यावे.

पंतप्रधान इंदिरा गांधींना कार्ल मार्क्‍सप्रमाणे स्वामी विवेकानंद विश्वभर न्यायचे आहेत, त्यासाठी भारतीयत्वाची संकल्पना विवेकानंदांच्या मुखी सादर करण्याची परवानगी द्या, असे पत्र विवेकानंद केंद्राचे प्रमुख एकनाथजी रानडे यांनी गोळवलकर गुरुजींना पाठवले होते. इंदिराजींच्या मातोश्री कमला नेहरू या स्वामी अखंडानंद आणि रामकृष्ण परिवाराशी संबंधित होत्या. या पार्श्वभूमीवर १९७२ साली ठाण्यात दहा दिवसांच्या झालेल्या चिंतन बैठकीत गुरुजी उद्गारले, ‘हिंदू इथॉस म्हणजे भावविश्व भारतीय चिंतनाचा आत्मा आहे. हिंदुत्व, हिंदुत्ववाद आणि हिंदू इथॉस- वैदिक अध्यात्म यामध्ये गोळवलकर गुरुजी भेद करीत असत. स्वा. सावरकरांचे ओझे गुरुजींनी संघाच्या पाठीवर कधीच वाहिले नाही.

जनता पार्टी अध्यक्ष आणि सरसंघचालक यांच्या बैठकीत चंद्रशेखर यांनी विनंती केली होती की, ‘हिंदुत्व’ शब्दाचे चलन संघाने आता थांबवावे. यामुळे जनता पार्टीचे विघटन टळेल. बाळासाहेब देवरस यांनी त्यास होकार दिला. ही बैठक नागपूर विमानतळावरील व्हीआयपी रूममध्ये झाली होती. त्यानंतरच्या रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाह प्रा. राजेंद्रसिंह यांनी तशा सूचनाही जाहीरपणे केल्या होत्या.

१९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने एकात्म मानववाद त्यागून ‘गांधीयन समाजवाद’ स्वीकारला. यावर नागपूरच्या तरुण भारतने सडकून टीका केली होती. यावेळी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी भाजपचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतली.

सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह आणि सरकार्यवाह  शेषाद्री यांनी संघाच्या संघशिक्षा वर्गामध्ये एकात्म मानववादावरील बौद्धिके थांबवली. विभूतीपूजा आणि इझम् संघात नको अशी त्यांची भूमिका होती.

वास्तविक बघता संघवाल्यांची वैचारिक बांधीलकी राष्ट्रीयत्वाशी आहे, तर स्वा. सावरकरांच्या हिंदूमहासभावाद्यांची हिंदुत्वाशी/ हिंदुत्ववादाशी आहे. हिंदुत्वाचे भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्यामुळे तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरील मा. गो. वैद्य यांच्या प्रभावामुळे संघविश्वात सध्या ‘हिंदुत्ववादा’चे चलन वाढले आहे. संघ परिवारातील सावरकरभक्त संघनेत्यांच्या अस्पष्टवादाचा पुरेपूर फायदा उठवत असतात, हे इथे नमूद करावेसे वाटते. जन्मठेपेच्या आधीचे स्वा. सावरकर ‘सेक्युलर’ होते, नंतर ते ‘कम्युनल’ झाले, हे विसरून चालणार नाही. भाजप अध्यक्ष अमित शहांच्या दिवाणखान्यात वि. दा. सावरकरांचा फोटो आहे, तो ‘हिंदूमहासभा’ अध्यक्षांचा नसून ‘स्वातंत्र्यवीरां’चा असावा!

साधनशूचितेचे एकचालकानुवर्तित्व

१९२५ ते १९७३ या काळात रा. स्व. संघात साधनशुचितेचे एकचालकानुवर्तित्व होते. १९७३ साली सरसंघचालक होताच बाळासाहेब देवरस यांनी सांगितले.. (१) मला ‘परम पूजनीय’ म्हणायचे नाही. (२) रेशीमबाग परिसरात भविष्यात सरसंघचालकांच्या समाध्या बांधायच्या नाहीत. (३) एकचालकानुवर्तित्व समाप्त करून प्रत्येक स्तरावर चमूनेतृत्व प्रगत करायचे. (४) भगवा ध्वज गुरुस्थानी आहे हे लक्षात घेऊन ‘गुरुपरंपरा’ निर्माण करायची नाही. (५) रा. स्व. संघ आणि संघ परिवार संपूर्ण समाजमय करायचा. (६) संघ स्वयंसेवक आणि शाखा समाजपरिवर्तनाचे बिंदू व्हावेत. आमच्या सद्गुणांचा वापर समाजासाठी झाला पाहिजे. (७) समरसता एस. सी. आणि एस. टी.पर्यंत पोहोचली पाहिजे. (८) विजयी व्हा. पराभवाच्या समर्थनार्थ साधनशुचितेची ढाल वापरू नका. (९) समर्थ, समृद्ध राष्ट्रसंकल्प विसरू नका. (१०) विषमता नष्ट होईपर्यंत आरक्षणाचे रक्षण करा. (११) हिंदूहिताच्या बाबींचे स्वागत करा. हिंदू विशेषणाच्या भानगडीत पडू नका.

प्रारंभीच्या १५ वर्षांत डॉ. हेडगेवारांनी ७०० शाखा आणि एक लाख गणवेशधारी स्वयंसेवक घडवले. ३३ वर्षांत गोळवलकर गुरुजींनी शाखांची संख्या ७००० आणि १० लाख साधक-स्वयंसेवक संस्कारित केले. या काळात संघ परिवाराच्या साधक-कार्यकर्त्यांची संख्या ५० लाख होती. नंतरच्या २२ वर्षांत- १९९४ पर्यंत बाळासाहेब देवरसांनी शाखांची संख्या ५५,००० आणि स्वयंसेवकांची संख्या ७५ लाख इतकी साध्य केली. संघ परिवार कार्यकर्त्यांची फौज ९० लाखांची होती. लक्षात ठेवा, एकटय़ा भारतीय मजदूर संघाच्या सदस्यांची संख्या ९२ लाख होती. २०१८ साली आज मोहन भागवत-मोदींच्या सत्ताकाळात भाजपची सदस्यसंख्या १२ कोटींची आहे. संघ परिवारात सव्वा कोटीहून अधिक कार्यकर्ते इ. स. २०२५ पर्यंत २५ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत आहेत. या लक्ष्यप्राप्तीसाठी सत्तासाधन वापरण्याची स्पष्टता संघनेत्यांनी आणि नियंत्रकांनी साध्य केली आहे.

नैतिकतेचे अवजार

भारतीय स्वातंत्र्यलढय़ात इंग्रजांच्या विरोधात लढताना अहिंसेचे अवजार वापरणारे नेते वर्ग व वर्णसंघर्ष समूळ नाकारत असत. त्याग, दान, कष्ट इत्यादी परवलीचे शब्द होते. म. गांधी उद्योजकांवर ट्रस्टीशिपचे संस्कार करण्यात धन्यता मानत. १९४० साली डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर बिर्लाजींचे दिवाणजी गोळवलकर गुरुजींना भेटायला आले होते. त्यांनी बिर्लाजींचा निरोप गुरुजींना सांगितला- ‘डॉ. हेडगेवारांशी ठरल्याप्रमाणे संघ शिबीरस्थळ बिर्लाजी रा. स्व. संघास अर्पण करू इच्छितात. तपशील निश्चित करा.’ गुरुजींनी तात्काळ उत्तर दिले- ‘गुरुदक्षिणा उत्सवाच्या समयी भगव्या ध्वजासमोर बिर्लाजींनी स्वत: येऊन हे अर्पणकार्य करावे.’ ‘आपला निरोप बिर्लाजींना देतो,’ असे म्हणत दिवाणजींनी संघाला रामराम केला. संघ परिवाराचे जनक गोळवलकर  गुरुजी आर्थिक साधनशुचिता कठोरपणे पाळत.

गुरुजीपर्व १९७३ साली संपले आणि संघाची लोकयात्रा प्रारंभ झाली. गुरुजींचे भक्त हे गुरुजींची ‘मिरर इमेज’ आहेत. गुरुजी स्वत:साठी कडक आणि इतरांसाठी लवचीक होते. पण भक्तमंडळी स्वत:साठी लवचीक व इतरांसाठी कडक आहेत. पदाच्या शक्तीने संघकार्य चालते आणि पदमुक्तीने संघनियंत्रण टिकवले जाते. संघसृष्टीतील समस्त स्रोत (रिसोर्सेस) व्यक्तीच्या मालकीचे नसतात, तर संस्थेतली मालमत्ता म्हणून उभे केले जातात. ‘मालकी-संस्थांची यादी’ लक्षावधीची आहे, हे लक्षात ठेवावे. संघ-मालकी टोकाची विकेंद्रित आहे. त्यामुळे भरपूर सुरक्षित आहे आणि व्यक्तिनिरपेक्ष आहे. अविवाहित प्रचारक संघ परिवाराचे नियंत्रक असून गृहस्थी अधिकारी ‘मॅनेजर्स’ आहेत. स्वयंसेवक संघाचा ‘स्टाफ’ आहे.

बाळासाहेब देवरसांनंतर (प्रो. राजेंद्रसिंह यांच्याऐवजी) सरसंघचालक होऊ  न शकलेले मोरोपंत पिंगळे यांच्याशी माझा झालेला संवाद इथे सादर करतो- १९७२ च्या ठाण्याच्या चिंतन बैठकीत गुरुजींनी भारतीय ‘रिलिजन वर्ल्ड’ बद्दल टोकाचे नैराश्य व्यक्त करून फक्त संघाला ‘संस्कृतीचे शुद्ध बीज’ म्हटले होते. विश्व हिंदू परिषदेचे जनक गुरुजी आहेत. विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांना गुरुजींचा सल्ला काय होता?

पिंगळे : वस्तुनिष्ठ विश्लेषणात गुरुजी कुशाग्र होते. भारतीय रिलिजन वर्ल्डची त्यांना खडान्खडा माहिती होती. गुरुजींची सक्त ताकीद होती- रिलिजन वर्ल्डच्या आत शिरू नका. प्रमुखांना साष्टांग नमस्कार करून हिंदू धर्मसुधारणेसाठी त्यांची फक्त संमती मिळवा. लहानसहान विश्वात आकंठ बुडालेले संप्रदाय-मठ-आखाडे यांचा उपयोग राष्ट्रकार्यात व्हावा. (त्यांच्या नादी न लागता!)

भारतीय मजदूर संघ संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांना गोळवलकर गुरुजी खासगीत ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ आरएसएस’ म्हणत. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे एक संस्थापक दत्तोपंत ठेंगडीही होते. गुरुजींनी ठेंगडींना जनसंघातून बाहेर काढून संघविश्वात स्वतंत्रपणे प्रगत केले. भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये ठेंगडीनिर्मित सदस्यांची दहशत मुळातून अभ्यासली पाहिजे. संघनेते ‘पॉलिसी ऑफ पॅरडॉक्स’ला व्यूहात्मकरीतीने हाताळतात. संघ परिवार ‘बंडल ऑफ युनिफॉर्मिटी’ आहे. भारतीय समाजाची विविधता निसर्गवादी आहे. भाजपला संघाने दशदिशांनी घेरून मोकळे सोडले आहे. संघ-भाजपचे नाते भावनाशून्यतेचे आहे. रा. स्व. संघाला काहीही चालते व आसक्ती कशाचीच नाही, हे मुळातून समजून घ्यावे.

अटलबिहारी १३ दिवसांसाठी भारताचे पंतप्रधान झाले त्याच दिवशी भाजपचे काँग्रेसीकरण सुरू झाले. १९८५ साली काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात तत्कालीन काँग्रेसाध्यक्ष राजीव गांधी काँग्रेसला ‘सत्तादलालांचा पक्ष’ म्हणाले होते. ३० जानेवारी १९४८ ला म. गांधींना समजलेले सत्य डिसेंबर १९८५ ला पंतप्रधान राजीव गांधींनासुद्धा समजले. काँग्रेसीकरण म्हणजे भारतात अखिल भारतीय सत्ता मिळवणे व ती टिकवण्यासाठी साधनशुचिता खुंटीला टांगून ठेवणे. राजकारणात विरोधकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी नैतिकतेचे हत्यार वापरतात. हे हत्यार दुधारी असल्यामुळे भस्मासुराचा खेळ चालतो. हा खेळ लोकतंत्राचा आत्मा आहे.

संघ परिवाराला हिंदू समाजाचे सूक्ष्मरूप समजणे याक्षणी वस्तुनिष्ठ ठरेल. अखिल भारतीय होण्यासाठी भाजप प्रत्येक मार्ग अवलंबित आहे. नको त्याला बाजूला सारण्यासाठी नैतिकता कामाची बाब ठरते. पदमुक्त करताना ‘भ्रष्टाचार’ मोलाचा ठरतो याबद्दल सर्वाचेच एकमत आहे. संघ स्वयंसेवक प्रारंभी वादग्रस्त आयारामांना ‘वाली’ म्हणतो, तर संघ अधिकारी ‘वाल्मीकी’ संस्कार करण्याची भाषा वापरतात. संघ नियंत्रक ‘नर का नारायण’ तत्त्वज्ञान मांडतात.

‘ऐंट्रोपी’ म्हणजे ‘अव्यवस्थेचे मोजमाप’ (डिसऑर्डर मेझरमेंट)! म. गांधींचे ‘लास्ट विल अँड टेस्टामेंट’ राहुल गांधी अमलात आणत आहे. अखिल भारतीय संस्थेचे रूप साध्य झाल्यानंतरच संघाच्या विघटनास प्रारंभ होईल. त्याची जबाबदारी भाजप कशी पार पाडेल, हा भविष्यातील अभ्यासाचा विषय ठरेल.

संघ परिवाराची राजनीती

संघ-भाजप संबंधांचे आकलन होण्यासाठी रा. स्व. संघाची राजनीती समजणे अत्यावश्यक आहे. संघच काय, संघ परिवारातील एकही संस्था भाजपची नाही. ‘जनसंघ’ नावाची गाजराची पुंगी नीट वाजली नाही तर खाऊन टाकू, अशी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींची भूमिका होती. ‘जनसंघ ते जनता पार्टी ते भाजप’ ही प्रक्रिया कायम लक्षात ठेवावी.

इंडियन नॅशनल काँग्रेसचे नेते डॉ. हेडगेवार मिठाच्या सत्याग्रहात (विदर्भातील जंगल सत्याग्रहात) सुमारे वर्षभर तुरुंगात होते. त्यासमयी डॉ. ल. वा. परांजपे रा. स्व. संघाचे सरसंघचालक होते. १९२५ ते १९४० या काळात संघ खुलेपणाने काँग्रेसशी संबंधित होता. नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीस जाण्यापूर्वी दोनदा डॉ. हेडगेवार यांना भेटायला आले होते. १९४२ च्या चळवळीत काही काँग्रेस नेते संघवाल्यांच्या घरी लपले होते.

१९४६ ते १९५० दरम्यान सरदार पटेल, बाळासाहेब देवरस, वसंतराव ओक आदी नेते नवा राजकीय पक्ष काढणार होते. कारण म. गांधी काँग्रेसचे विसर्जन करणार होते. ३० जानेवारी १९४८ ला सकाळी काँग्रेस पक्ष म. गांधींनी विसर्जितसुद्धा केला होता. १९४२, १९४६, १९५१, १९५३ आणि १९६० साली बाळासाहेब देवरसांना गुरुजींच्या संमतीने राजकीय पक्षात जायचे होते. गुरुजींनी त्यांना सपशेल परवानगी नाकारली. १९५३ ते १९६० या काळात बाळासाहेब देवरस हे पदमुक्त, निष्क्रिय व नाराज स्वयंसेवक होते.

सरसंघचालक होताच १९७३ साली बाळासाहेब देवरसांनी जयप्रकाश नारायण यांच्या पाठीशी संघ परिवार उभा केला. १९८९ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान राजीव गांधींचे दूत, सरसंघचालक देवरस आणि सरकार्यवाह राजेंद्रसिंह यांच्या गुप्त बैठका नागपूर आणि दिल्लीत झाल्या होत्या. जम्मू-काश्मीर, केरळ आणि पूर्व भारताच्या सीमाभागामध्ये संघ आणि इंदिरा गांधी गुप्तपणे एकत्र आले होते.

१९९६ साली वाजपेयी १३ दिवसांसाठी पंतप्रधान झाले, ते देवरसांमुळे. १९९८ ते २००४ या काळात वाजपेयी पंतप्रधान होते, ते सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंहांमुळे. सोनिया गांधी पंतप्रधान होऊ  शकल्या नाहीत, यामागे ठाकूर लॉबी, प्रा. राजेंद्रसिंह आणि मुलायमसिंह यादव हे होते, हे विसरता कामा नये. ‘इगो क्लॅश’मुळे तसेच सरसंघचालक सुदर्शनजींमुळे २००४ साली वाजपेयी सरकार हरले. १९९८ ते २००० या काळात सुदर्शनजी सरसंघचालकपदी बसू शकले नाहीत, ते वाजपेयी व सरकार्यवाह शेषाद्रीजींमुळे. २००४ साली वाजपेयी सरकार पडल्यानंतर सरकार्यवाह मोहन भागवत यांची खासगी प्रतिक्रिया मार्मिक आहे : ‘वाजपेयी सरकार पुन्हा सत्तेत आले असते तर संघाचा ‘सवरेदय’ झाला असता.’

३० जून २००४ रोजी कोलकाता येथे टीव्ही कॅमेऱ्यासमोर सरकार्यवाह मोहन भागवत म्हणाले होते- ‘आमच्यात आज डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस नाहीत, तरीही संघ वाढतोच आहे. १९५२ पासून काम करणाऱ्या वाजपेयी-अडवाणी यांनी आता पदमुक्त व्हावे. भाजप वाढेल.’ त्याआधीच संघाच्या कोअर ग्रुपने युवा नेता प्रमोद महाजन यांना भाजप प्रमुख करण्याचे ठरवले होते. प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर संघाचा नवा मोहरा होता- नरेंद्र मोदी. मोदींना डिसेंबर २०१२ नंतरच गुजरातच्या बाहेर पूर्ण तयारीनिशी यायचे होते. २००९ पासून रा. स्व. संघात भागवत-जोशी ही महाराष्ट्रीय जोडी, तर २०१३ पासून भाजपात मोदी-शहा ही गुजराती जोडी नियंत्रकपदी विराजमान आहे.

भागवत-मोदी अद्वैत

संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या सहकाऱ्यांचा मुलगा मधुकरराव भागवत प्रथम गुजरात संघप्रचारक झाला आणि नंतर गृहस्थी. डॉ. मधुकरराव भागवत यांच्या मुलाचे नाव मोहन, तर मानसपुत्राचे नाव नरेंद्र. मोहनचा जन्म ११ सप्टेंबर १९५० चा, तर नरेंद्रचा जन्म १७ सप्टेंबर १९५० चा. दोघांनाही सत्तायोग असल्यामुळे मोठा मुलगा झाला संघाचा सरसंघचालक, तर धाकटा झाला भारताचा पंतप्रधान! संघ परिवाराचे सातत्याने स्क्वॉट असेसमेंट करीत मोहन-नरेंद्र जोडी आज ६८ व्या वर्षांत पोहोचली आहे.

‘आरएसएसला चिरडून टाकीन’ अशी घोषणा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नोव्हेंबर १९४७ ला केली होती. भारत काही दिवसांपूर्वीच स्वतंत्र झाला होता. त्यानंतर ३० जानेवारी १९४८ ला म. गांधींची हत्या होऊ  दिली गेली आणि ४ फेब्रुवारी १९४८ ला नेहरू सरकारने संघावर बंदी घातली. १२ जुलै १९४९ पर्यंत बंदी उठवली नाही तर संघाचे परिवर्तन राजकीय पक्षात करू, असा निर्वाणीचा इशार बाळासाहेब देवरसांनी दिल्यामुळे नेहरू सरकारने बंदी उठवली. या घटनेचे योग्य विश्लेषण मोहन-नरेंद्र जोडीने केले.

‘हिंदू टेररिझम’चा बागुलबुवा उभा करत राहुल गांधींना पंतप्रधान करायची तयारी सोनिया गांधींनी केली होती. संघाच्या चुका पुन्हा होऊ  द्यायच्या नाहीत, असा निर्धार संघ परिवाराने करून मोहन-नरेंद्राचे सत्ताअद्वैत साकारले. वाजपेयी-सुदर्शन सत्ताकाळातील चुकांची मालिका कधीच करणार नाही, अशा आणाभाका भागवत-मोदी यांनी जानेवारी २०१३ ला घेतल्या. डॉ. हेडगेवारांपासून प्रेरणा घेत भागवतांनी, तर गोळवलकर गुरुजींपासून स्फूर्ती घेत मोदींनी १९७३ ते २०१८ या काळात बाळासाहेब देवरसांच्या मार्गावर स्वविकास घडवला.

वाजपेयींच्या सत्ताकाळात कार्यक्षम, भविष्यवेधी, हिंदू संस्कृतीचा अभिमानी व माहिती तंत्रज्ञानी मुख्यमंत्र्यांची गरज जिकडे तिकडे जाणवत होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपातील श्रेष्ठ प्रचारकाला संघाच्या कोअर ग्रुपने गुजरातचे मुख्यमंत्री केले. गोध्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांचे कारसेवक जिवंत जाळले गेले. या घटनेची पूर्वसूचना मुख्यमंत्री मोदी सरकारला न मिळण्याची घोडचूक प्रारंभीच सत्ताकाळात घडली. सोनिया-राहुलने ‘मौत का सौदागर’ ही उपाधी गोध्रा दंगलखोरांसाठी न वापरता मुख्यमंत्री मोदींसाठी वापरली. मोदींनी या संधीचे सोने करत गुजरात दंगलमुक्त केले. राजीव-सोनिया-राहुलच्या ‘मल्टिकम्युनॅलिझम’ला सत्ताप्राप्तीसाठी वापरण्याचे कौशल्य नरेंद्र मोदींनी आता साध्य केले आहे.

‘गुड गव्हर्नन्सचा पुरस्कार’ राजीव गांधींच्या संस्थेने नरेंद्र मोदींना बहाल करणे हा संघ प्रचारकांच्या टोपीतील मानाचा तुरा आहे. ‘समर्थ, समृद्ध गुजरात’कडून ‘समर्थ, समृद्ध भारताकडे’ असे नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीचे वर्णन करता येईल. मोदी निराळे (‘डिफरंट’) काहीच करीत नाहीत. प्रत्येक गोष्ट निराळ्या पद्धतीने- म्हणजे ‘डिफरंटली’ करतात. मुख्यमंत्रीपदी विकसित झालेले नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताना ‘सार्क’मय झाले व नंतर ‘विश्व’मय झाले. थ्री आय-इन्फर्मेशन, इनोव्हेशन आणि इंडिव्हिज्युलिझम ही नरेंद्र मोदीची वैशिष्टय़े आहेत.

वाजपेयींचे सरकार ‘लोकमान्य’ होते. नरेंद्र मोदींनी सरकारला ‘ओबीसी’ मुद्रा प्रदान केली. दोन निवडणुकांच्या मध्ये विकासाचे राजकारण हे मोदी तंत्र आहे. मोदी-भागवत जोडी अल्विन टॉफलरच्या थर्ड वेव्ह प्रोग्रामचे (माहिती तंत्रज्ञान सभ्यतेच्या कार्यक्रमाचे) विश्वकर्मा आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील मोदी सरकारचे प्रत्येक पाऊल २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे नशीबवान पंतप्रधान आहेत, कारण त्यांना सोनिया-राहुलसारखे विरोधक मिळाले. २०२५ साली संघ शताब्दी कार्यक्रमाच्या भव्यतेसाठी २०१९-२०२४ या काळात भाजप सरकार सत्तेवर असणे लाभप्रद ठरणार आहे. २०२५ पर्यंत संघ परिवाराला भारतमय व्हायचे आहे.

इंडियन नॅशनल काँग्रेसच्या लढय़ामुळे इंग्रज जातील, पण देश पुन्हा असंघटित होईल. केवळ एक टक्का इंग्रज भारतावर राज्य करीत आहेत. लोकसंख्येच्या एक टक्का गणवेशधारी स्वयंसेवक घडवले तर स्वतंत्र भारतात लोकशाहीचे स्वराज्य व सुराज्य सहज शक्य होईल, या व्यूहात्मक योजनेने १९२५ पासून रा. स्व. संघ कार्यरत आहे. फीडबॅक आणि फीड फॉरवर्ड मेकॅनिझमच्या ओपन सिस्टीमने संघ परिवाराचे नेटवर्क प्रगत होत आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचा व्यवस्थापकीय आविष्कार म्हणजे संघसृष्टी! संघाचे सत्य परिवाराच्या बहुमुखाने प्रकट होत असते. हिंदू समाजात शिस्तबद्ध आणि संघटित ‘कॉर्पोरेट लाइफ’ म्हणजे समष्टीचे जीवन आम्हाला घडवायचे आहे, असे संघाच्या घटनेची प्रस्तावना सांगते. उपयुक्ततावाद संघाने पचवला असल्यामुळे टवटवीत व्यक्तींचे निर्माल्य करण्यात, त्यांना कुजवण्यात संघनेत्यांचा हातखंडा आहे. ‘माया’ म्हणजे भ्रम नव्हे, तर बदल व जाळं म्हणजे नेटवर्क. भारतीय सभ्यता एक मायाजाल आहे. त्यामुळे कालानुरूप ती रूप बदलते. १९२५ पासून संघ रोज बदलतो आहे. नाव, प्रार्थना, गणवेश, आज्ञा, प्रतिज्ञा, नेते, कार्यक्रम संघ परिवाराने अनेकदा बदलले आहेत. १९४० पर्यंत संघ प्रार्थनेत ‘आर्यभूमी’ शब्द होता. आता ‘हिंदूराष्ट्र’ आहे. २०२५ साली संघाच्या प्रार्थनेत ‘विश्वमाता की जय’ हा शब्दप्रयोग येऊ  शकतो. आजचा संघ परिवार पुरुषप्रधान आहे. परंतु उद्या तो महिलाप्रधान व्हायची खात्री वाटते. आजचे नियंत्रक, नेते ब्राह्मण-क्षत्रिय आहेत. उद्याचे वैश्य-शूद्र असतील. संघ अस्पृश्यता मानत नसल्यामुळे वाल्यांचे स्वागत करण्यास कचरत नाही. नेहरू घराण्याची सूनही मुलासकट आज संघ परिवारात सुखाने वावरते आहे. असे आहे आणि राहील संघ परिवाराचे स्वरूप!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2018 12:14 am

Web Title: article about sangh parivar
Next Stories
1 प्रत्यक्ष आणि भासातला अदृश्य आशय
2 जीएंच्या कथासृष्टीचा धांडोळा
3 अनाम क्रांतिकारकाची कहाणी
Just Now!
X