खजुराहोला पोचण्याआधीच तिथे पडत असलेल्या अवेळी पावसाचे वर्तमान कळले होते. खरे तर फेब्रुवारी महिना. या सुमारास मध्य प्रदेशात कुठेही पाऊस पडण्याचे कारण नाही. पण तरीही पावसाचे काय? आले देवाजीच्या मना! खजुराहोचा डान्स फेस्टिव्हल पाहण्याचे अनेक वर्षांपासून मनात होते. आणि आता वेळात वेळ काढून येथवर पोचले तर हा अवेळीचा पाऊस! छे:! वैतागच की! पण तरीही कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आशा होती की तास- दोन तास कोसळून तो थांबेल. खजुराहोच्या देवळाच्या पाश्र्वभूमीवर पदन्यास उमटतील. खजुराहो फेस्टिव्हल पाहण्याची कित्येक दिवसांची इच्छा पूर्ण होईल.

खरे सांगायचे तर खजुराहो गावातून जर देवळे वगळली तर ते तसे सामान्य असेच गाव आहे. म्हणजे खजुराहोला देवळासमोर प्रत्यक्ष पोहचेपर्यंत आपण कुठल्या अलौकिक सौंदर्याला सामोरे जाणार आहोत याची पुसटशी कल्पनादेखील येत नाही. गावापाशी येऊन पोचावे तर प्राचीन देवळांनी अलंकारित असे ते गाव विशाल भूमीवर एकाकीच उभे असल्याचे जाणवते. दहाव्या-बाराव्या शतकातल्या पंचवीसेक देवळांच्या समूहांनी आज खजुराहोला असे काही वलय प्राप्त करून दिले आहे, की जगातल्या महत्त्वाच्या वास्तूंपैकी ते एक होऊन गेलेले आहे. या देवळांच्या पाश्र्वभूमीवर खजुराहोचा डान्स फेस्टिव्हल दरवर्षी नियमितपणे पार पडत असतो. ऐकून होते की, कलेच्या क्षेत्रातले अनेक अतिरथी-महारथी यादरम्यान खजुराहोला भेट देऊन जातात. असेही असेल की, नृत्यापेक्षाही देवळांच्या पाश्र्वभूमीवर केला जाणारा महोत्सव पाहणे अधिक रोमँटिक वाटत असावे. काय असेल ते असो, पण खजुराहोमध्ये डान्स फेस्टिव्हलदरम्यान धो-धो कोसळणाऱ्या पावसात जाऊन पोचणे नक्कीच अपेक्षाभंग करणारे होते.
खजुराहोची कथादेखील रोचक आहे. कुणीएक हेमवती नावाची अतिसुंदर स्त्री होती. ती हेमराज नावाच्या काशीच्या राजपुरोहिताची कन्या. काही कथा ती बालविधवा असल्याचे सांगतात, तर काही ती अविवाहिता असल्याचे सांगतात. हेमवती तरुण होती. आणि अशी काही रसरसून उमललेली, की दहा अप्सरांचे सौंदर्यही तिच्यापुढे फिके पडावे. सूर्यदेव आणि चंद्रदेव तर तिच्या गावावरून रोजच मार्गक्रमण करत. एका रात्री एकांत स्थळी तलावात हेमवती नहात असताना चंद्रदेवाला तिची इतकी लालसा निर्माण होते, की मानवी शरीर धारण करून तो तिच्यापुढे अवतरतो आणि तिचा उपभोग घेतो. मर्यादा ओलांडून चंद्राने आपला उपभोग घेऊन आपले शील भ्रष्ट केल्याबद्दल हेमवती रागावून चंद्राला शाप देऊ जाते तेव्हा तिला एक सुंदर आणि शूर मुलगा होऊन तो पुढे शक्तिशाली राजा होण्याचे आश्वासन चंद्र तिला देतो. चंद्रापासून तिला दिवस जातात. बालविधवा असल्यामुळे ती तिचा गाव सोडून खजुराहोच्या निर्जन जंगलात येते. तिथेच ती प्रसवते. खजुराहो हे नाव इथे खूप खजुरांची झाडे असल्यामुळे पडले असेही मानले जाते. तर या खजुरांच्या झाडांच्या, जंगली प्राण्यांच्या सान्निध्यात हेमवती चंद्रवर्मन नावाच्या एका सुंदरशा मुलाला जन्म देते. असे म्हणतात की, सोळा वर्षांचा होईतोच चंद्रवर्मन इतका शूर झाला होता, की तो नुसत्या हातांनीही वाघ-सिंहांशी मुकाबला करून त्यांना मारू शकत असे. आपल्या वडिलांच्या-चंद्राच्या आशीर्वादाने त्याने कलिंजरचे राज्य स्थापन केले. तरी बालविधवा असूनही माता झालेल्या त्याच्या आईचे पाप उरलेच! तिच्या पापक्षालनासाठी तिच्याच इच्छेनुसार चंद्रवर्मनने खजुराहोमध्ये देवळे आणि भोवती बगिचे, तलाव बांधले. बांधलेल्या देवळांवर सारा संसार कोरताना माणसाच्या मनातल्या लालसेचे उघडेनागडे रूप, त्यातला पोकळपणा, निर्थकताही चित्रित करून सजीव करावी असाही हेमवतीचा हेतू असू शकतो.
हेमवती आणि चंद्राभोवतीच फिरणारी दुसरी कथा अशी की, वडिलांचा शब्द खाली पडू नये म्हणून एका आज्ञाधारक मुलीने आपला बळी दिला. मणिराम हा कलिंजर राज्याचा राजपुरोहित. एकदा चुकीचे गणित मांडून अमावास्येच्या दिवशी त्याने राजाला पौर्णिमा असल्याचे सांगितले. हेमवतीच्या लक्षात वडिलांची चूक आली आणि त्यांच्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून तिने चंद्राला अमावास्येच्या दिवशी पूर्णरूपात येण्याचे साकडे घातले. चंद्राने ते मान्य केले; पण तिच्या सौंदर्याचा बळी घेऊनच! जेव्हा मणिरामला हे कळले तेव्हा त्याला इतका पश्चाताप झाला, की दु:खातिरेकाने त्याने स्वत:लाच शापित केले आणि तो दगडाची मूर्ती झाला. चंद्राच्या समागमापासून हेमवतीला चंद्रेतय नावाचा मुलगा झाला आणि त्याच्यापासूनच चंदेला राजघराणे सुरू झाले. चंदेला लोक मणिरामाची मनियादेव म्हणून पूजा करत असत. आपल्या आईच्या शीलशुद्धीसाठी चंद्रवर्मन किंवा चंद्रेतय नावाच्या मुलाने आठव्या शतकाच्या अंती महोबानगरीची स्थापना करून महोबाला एक मोठा यज्ञ केला आणि पंच्याऐंशी देवळांची निर्मिती केली. चंद्रापासून झालेली वंशावळ म्हणून इथले हे चंदेला घराणे!
आधुनिक जगाला खजुराहोपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय इंग्रज कॅप्टन टी. एस. बट्रला जाते. असाच फेब्रुवारी महिना. १८३८ चे वर्ष. एका तरुण ब्रिटिश ऑफिसरचे मध्य प्रदेशात पोस्टिंग झाले होते. कामाप्रीत्यर्थ फिरत असताना त्याची पालखी उचलणाऱ्या भोयांनी त्याला खजुराहोच्या देवळांबद्दल सांगितले. आपल्या ठरीव कार्यक्रमात बदल करून रात्रभर पालखीचा प्रवास करून बट्र कुतूहलापोटी खजुराहोला जाऊन पोचला. सकाळी देवळांभोवती चक्कर मारता मारता त्याच्या लक्षात आले की हे प्रकरण काही वेगळेच आहे. बट्रने संपूर्ण दिवस खजुराहोची पाहणी करण्यात घालवला. वर्षभरानंतर त्याच्या त्या प्रवासाचा रिपोर्ट बंगाल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.
बट्रला १८३८ मध्ये नव्याने सापडलेले खजुराहो प्रतीकांनी आणि कलाकुसर, वेलबुट्टय़ांनी भरलेले व देव, गंधर्व, माणूस या तिन्ही जगातल्या मूर्तीनी भरून गेलेले होते. जंगलाच्या मधोमध अशी अनोखे सौंदर्य असलेली निर्जन देवळे अचानक सापडल्यानंतर बट्रची काय मानसिक स्थिती झाली असेल याची कल्पना करत या देवळांच्या परिसरात उभे राहावे, तर हा कलाप्रदेश एखाद्या महाकाव्यासारखा आपल्याला वेढून टाकतो. विश्वाचे अफाट दर्शनच ते!
खजुराहोची देवळे निर्माण करणारे हजारो शिल्पकार कोण होते? माहीत नाही!
कुणी आखणी केली? कुणी रचना मांडली? कुणी विषयांची निवड केली? प्रतीकांची दुनिया कुणी सांगितली? माहीत नाही!
इथली शिल्पकला जगभरातल्या लोकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत असली तरी या देवळांच्या उभारणीमागचा नक्की हेतू काय, याचा अंदाज प्रत्येकाने आपला आपला बांधावा. देवळे पाहणाऱ्याच्या दृष्टीची ताकद जणू निर्माण करणारे कुणीतरी आजमावत असावे असे वाटते.
अपार शक्यतांचे भांडार देवळांवर चित्रित केले गेले आहे. जशी काही कलेची एक लाट काळाच्या पट्टय़ावर उसळली आणि जाता जाता ती आपले अस्तित्व सोडून गेली. इतक्या निर्ममपणे, की आपापल्या कलाकृतींवर आपला हक्क सांगणाऱ्या प्रत्येक कलाकाराने त्यापासून काहीएक बोध घ्यावा.. स्वत:चा शोध घ्यावा.
झोपेतून उठून आळस देणारी, आरशात डोकावून पाहणारी, उघडय़ा पडलेल्या मांडीवर चढलेल्या विंचवाकडे भयचकित नजरेने पाहणारी, भांगेत कुंकू भरणारी, हातात पक्षी धरलेली मुक्तवक्षा, हातावर मेहंदी काढणारी, पायांत घुंगरू बांधणारी, लाजणारी, कामासक्त, आपल्या वस्त्रांचेही भान नाही अशी.. स्त्रीची विविध रूपे, विविध भाव, प्रणयाची नाना रूपे.. सात रंग आकाशात उधळावेत तसे जणू ‘स्त्री’ या विषयाला मुक्तहस्ते त्या लोकांनी साकार केले आहे.
पण हे सारे नंतरचे..
सांगत काही वेगळेच होते..
खजुराहोला पोचले तर नुसता धुवांधार पाऊस. नृत्याविष्कारही देवळाच्या पाश्र्वभूमीवर होणार नसल्याचे वर्तमान समजले. मन खट्टू झाले. आळसावून रूमवर पडून होते. कारण बाहेर जाऊन देवळे बघण्यातही अर्थ नव्हता. अशात रूममधला फोन वाजला. रिसेप्शनच्या बाईने गोड आवाजात फोनवर सांगितले की, कुणीएक तुम्हाला भेटायला आला आहे. आधीच फेब्रुवारी महिना. पावसामुळे हवेत अधिकच गारवा. शिरशिरी. अंगाभोवती शाल लपेटून बाहेर काऊंटरपाशी गेले तर खजुराहोचा आजचा नृत्य कार्यक्रम कुठे दुसरीकडे आयोजित केला असल्याचे समजले. हा कुणीएक बिचारा आमच्यासाठी तिकिटे घेऊन आला होता. वस्तुत: देवळांच्या पाश्र्वभूमीवर नृत्याचा कार्यक्रम नसेल तर कुठेतरी बंदिस्त जागेत जाऊन पाहण्यात मला जराही रस नव्हता. पण हा कुणी एक जण ताटकळत राहिला होता आमच्यासाठी- म्हणताना सरळ तोडून टाकणेही शक्य नव्हते. शिवाय तो सांगत होता की, इतकी अफाट गर्दी असूनही अगदी पहिल्या रांगेतली चार तिकिटे त्याने आमच्यासाठी राखून ठेवली होती. ‘हो-नाही’ करता करता निघालो.
कार्यक्रम स्थळापाशी पोचलो तर सगळीच ें‘ी २ँ्रऋ३ ं११ंल्लॠीेील्ल३. प्रशस्त जागा. कुठे खुच्र्या टाकल्या जात आहेत, तर कुठे लाइट्स लावले जात आहेत. कलावंतांचा उच्च स्तर. प्रेक्षकही असेच उच्चस्तरीय. एक वेगळीच ँ्रॠँ स्र्१ऋ्र’ी िदंगल तिथे उसळलेली. काहीसे बावचळून त्या माहोलात सामील होत खुर्चीवर टेकले तर माझ्या डाव्या बाजूच्या खुर्चीवर दस्तुरखुद्द रतन थिय्याम. एरवी मी त्यांच्या नाटकांची प्रेक्षक असते, तर आज त्यांच्यासोबत मीदेखील नृत्याचा आस्वाद घेणार होते. रतन थिय्यामांच्या नाटकांचे वाणच निराळे. वाटले, एकच कार्यक्रम आम्ही दोघे बघणार; पण त्याचा आस्वाद घेण्याची आमची ताकद वेगवेगळी असेल. आपल्या सामान्य नजरेला जे आणि जेवढे रंग दिसतात, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पक्षी पाहू शकतात.. तसेच काहीसे. माझ्या उजवीकडे बसलेली उंच स्त्री- तशी वयस्करच आणि तिच्या मांडीवरला तिचा नातू. या बाईची मुलगी आणि जावई तिथे नृत्य सादर करणार होते. ते म्हणे कॅनडातून खास इथवर आले होते. तर त्यात हा पाऊस.. वगैरे वगैरे. ती उंच, रुबाबदार स्त्री आपल्या मुलगी-जावयाच्या कौतुकात बुडून गेलेली.
एकामागोमाग एक नृत्यं सादर होऊ लागली. चढत्या श्रेणीने कार्यक्रम रंगत गेला. देवळाच्या पाश्र्वभूमीवर नृत्य सादर होत नाहीत म्हणून खट्टू झालेली मीदेखील हरखून गेले होते. पाच-सातशे माणसांचा तो समूह बंदिस्त जागेमुळे अधिकच एकरूपला होता.. एकजीव झाला होता. शेजारच्या बाईच्या मुलगी-जावयाचाही नाच अगदी नेटका झाला. पण आपल्या आई-बापाच्या परफॉर्मन्सशी सूतराम संबंध नसलेला त्यांचा मुलगा समोरच्या सतरंजीवर अगदी गाढ झोपून गेलेला. त्याला बिचाऱ्याला कल्पनाही नसेल, की केवढा मोठा आदरसत्कार त्याच्या आई-वडिलांचा होत आहे. कार्यक्रम शेवटाला आला आणि आमचा यजमान आम्हाला जेवण्यासाठी चला म्हणून उठून लवकर बाहेर पडण्याचा आग्रह करू लागला. त्याच्या आग्रहाला भीक न घालता आम्ही खुर्चीत दटून होतो.
कुणीएक जयंती आनंद नावाची नर्तकी अवतरली. केवळ सर्वागसुंदर असेच वर्णन व्हावे अशी. शेलाटी अंगलट, गोरा गुलाबी वर्ण आणि अति मोहक चेहरा. डोळे इतके बोलके, की जणू तिला बोलण्याची कधी गरजच भासत नसावी. कृष्णलीलांचा अध्याय सुरू झाला. कधी ती कृष्णाला रागे भरत होती. कधी बांधून ठेवत होती. कधी कृष्ण करंगळीवर गोवर्धन उचलून धरत होता त्याचे कौतुक करत होती. सारे काही हावभावांतून व्यक्त होत होते. करता करता ती ताक घुसळून लोणी काढू लागली. कृष्णाने लोण्याचा गोळा पळवला म्हणून सगळ्यांची तक्रार येते. कावलेली यशोदा कृष्णाला बांधून ठेवते. म्हणते, कसे खरे सांगत नाहीस तेच बघते! उघड, उघड, तोंड उघड. जयंती आनंद आता जयंती आनंद राहिलीच नव्हती. ती होती कृष्णाची, परमरूपाची यशोदा आई. कृष्ण तोंड उघडतो आणि.. स्टेजवर निळा प्रकाश पसरला. बासरीचे सूर उमटले. आणि विश्वरूपदर्शनाचे अवघे आश्चर्य तिच्या चेहऱ्यावर उमटले. आनंदातिरेकाचा एक सामुदायिक हुंकार सभागृहात उमटला. जणू तिला होत असलेले विश्वरूपदर्शन प्रत्येकालाच होत होते. आपापल्या स्मृतीच्या, कल्पनेच्या ताकदीवर आमच्यातल्या प्रत्येकाने जयंती आनंदच्या नजरेतून कृष्णमुखातले विश्वरूपदर्शन घेतले होते. सभागृह भारून टाकणारा अलौकिक प्रकाश आणि बासरीचे संमोहित करणारे सूर.. कलेच्या माध्यमातून केवळ स्वत:च नाही, तर साऱ्यांना त्या रूपाशी असे एकजीव करणे.. केवढी मोठी ताकद तिच्या नृत्याची! वस्तुत: स्टेजवर ती एकटीच. समोर कृष्ण म्हणून कुणीही नाही. तरीही केवळ कृष्णाचाच आभास नव्हे, तर कृष्णाच्या मुखात यशोदेला दिसलेल्या अवघ्या विश्वाचा आभास तिने निर्माण केला. आभाळात उमटणारी विजेची लखलखती रेष जशी आपल्याला खिळवून जाते, तसे काहीतरी. क्षणभर अवाक् झालेले अवघे सभागृह भानावर आले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. जशी एका व्यक्तीची वैयक्तिक स्मृती असते तशीच समूहाची म्हणून एक स्मृती असते. शब्दही न उच्चारता तिने समूहाच्या त्या स्मृतीला जागवले आणि खजुराहोचा तो नृत्याविष्कार अगदी लीलया सात आभाळांपार पोहोचवला.
समोरच्या सतरंजीवर झोपलेला बाळकृष्ण- त्या उंच बाईचा नातू अगदी शांत-निवांत झोपला होता.. त्याही सगळ्या पार! निर्मम, निरामय परमात्म्याप्रमाणे!
ranidurve@gmail.com

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या