01 March 2021

News Flash

लोकरंगी नाटय़कर्मी

लहानपणी कोकणात त्यांनी दशावतारी ‘खेळ’ पाहिले होतेच

दक्षिण कोकणातील ‘दशावतार’ या लोकनाटय़ाचे अभ्यासक व संशोधक डॉ. तुलसी बेहेरे यांनी अलीकडेच आयुष्याच्या रंगभूमीवरून अकल्पितपणे ‘एक्झिट’ घेतली. ज्या वयात व्यासंगी संशोधकाने अधिकारवाणीने आपले विचार मांडायचे असतात अशा वयात त्यांची झालेली ही ‘एक्झिट’ मनाला तीव्र वेदना देणारी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सावंतवाडीजवळच्या जैतीर यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळस या गावी तुलसी बेहेरे यांचा जन्म झाला. पुढे मुंबईत आल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ते नोकरीला लागले. मात्र, मूळचा नाटय़कलेचा उमाळा त्यांना स्वस्थ बसू देईना. अनेक हौशी नाटय़संस्थांना ते मार्गदर्शन आणि दिग्दर्शनाच्या कामी साहाय्य करू लागले. राज्य नाटय़स्पर्धाचे परीक्षक म्हणूनही ते काम करू लागले. दरम्यान, ज्येष्ठ नाटय़-दिग्दर्शिका  विजया मेहता यांच्या ‘हयवदन’ या नाटकात तुलसी बेहेरे यांनी त्यांना साहाय्य केले. लोकरंगभूमीची रंगतत्त्वे उपयोजून सादर झालेले हे नाटक यशस्वी झाल्याने बेहेरे यांचा आत्मविश्वास दुणावला. परंतु पुढे ते लोककलेच्या अभ्यासाकडे वळले. त्यातही ‘दशावतार’ हा लोककलाप्रकार त्यांनी आपल्या संशोधनासाठी निवडला. प्रा. रमेश कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘कोकणच्या दशावतारी नाटकांची संहिता व प्रयोग आणि कर्नाटकातील यक्षगान यांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर परिश्रमपूर्वक संशोधन करून २००५ साली मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

लहानपणी कोकणात त्यांनी दशावतारी ‘खेळ’ पाहिले होतेच; पण मुंबईत येणाऱ्या दशावतार मंडळींची ‘आख्याने’ही ते आवर्जून बघत. आय. एन. टी. या संस्थेत अशोकजी परांजपे यांच्या सहवासात आल्यावर त्यांनी ‘दशवातारी राजा’ हे प्रायोगिक नाटक लिहिले. आणि स्वत:च ते दिग्दर्शित करून सादरही केले. अनेक दशावतारी कलावंत आणि दशावतारी नाटय़मंडळे यांना ते हरतऱ्हेची मदत करत. स्वत:च्या ओळखीवर त्यांना ‘प्रयोग’ ठरवून देत आणि स्वत:ही त्यांच्यासोबत जात. नोकरी सांभाळत लोकनाटय़कर्मी बनलेला हा तरुण एकेकाळी कविताही करीत असे. त्यातून त्यांचा ‘झेलम’ हा काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. पुढे ते वृत्तपत्रीय लेखन आणि मुंबई आकाशवाणीसाठी मुलाखती घेऊ लागले. मालवणी भूमी आणि मालवणी माणूस यांच्यावर नितांत प्रेम करणारा हा कलासक्त माणूस मनात आले की एस. टी. पकडायचा नि थेट तुळस (आपले गाव) गाठायचा. लोककलेच्या सादरीकरणात परंपरा जोपासत असताना ते ‘प्रायोगिकता’ही जपत. शिरुरला आमच्या चां. ता. बोरा महाविद्यालयात झालेल्या ‘लोककला दशावतार’ या विषयावरील चर्चासत्रात अभ्यासपूर्ण बीजभाषण दिल्यावर लगेचच ते त्यावरील सादरीकरणात हास्याची कारंजी फोडत गूढ बोलणारे ‘संकासुर’ झाले नि विद्यार्थी प्रेक्षकांत ‘काळे कपडे’ घालून मुलामुलींची चक्क मालवणीत फिरकी घेऊन आले. नाटकातील नटाने प्रेक्षकांशी कशी जवळीक साधावी याचे जणू त्यांनी प्रात्यक्षिकच करून दाखविले नि क्षणात विद्यार्थी नाटय़प्रयोगाशी समरस झाले.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते मानद प्राध्यापक म्हणून शिकवीत असत. कोकणात विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करून त्यांना ते तिथल्या लोककलांचे दर्शन घडवीत. लोककलांवर तासन् तास बोलणारे डॉ. बेहेरे सातत्याने या विषयावर लेखन करत असत. ‘दशावतार’ या लोककलाप्रकारास त्यांनी नागर प्रेक्षकांमध्ये आदराचे स्थान मिळवून दिले. लोककलेच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुण अभ्यासकांची ते कदर करीत. त्यांचा उचित गौरव करीत. माझ्या ‘सोंग’, ‘लळित’, ‘दशावतार’ या ग्रंथांचा ते अनेकदा प्रसंगपरत्वे नामोल्लेख करीत. यक्षगान आणि दशावतार यांच्या अनुबंधावर आमचे मतभेद होते. पण त्यातील सांस्कृतिक आणि व्यावहारिक बाजू पटल्यावर मात्र त्यांनी ‘दशावतारी लोककलेला आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून देण्यासाठी तुमचा विचार मान्य करायला हवा!’ अशी सहमती त्यांनी व्यक्त केली होती. मूलगामी संशोधनपर प्रबंध लिहूनही ते स्वत:ला अभ्यासक म्हणवत, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

‘दशावतारी राजा’ या आगळ्या प्रायोगिक नाटकाचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले. मालवणी मुलखातील संपूर्ण गावच या विधिनाटय़ात भाग घेते असे त्यांनी त्यात दाखवले आहे. गावातील जत्रेत (दहीकाल्यात) दशावतार नाटक आणि दशावतारी मंडळींना सन्मानाची वागणूक असते. एका गावात जत्रेच्या ठिकाणी  ‘दशावतार’ प्रयोग होणार असतो. पूर्वरंगात ‘भक्ती’ डोळ्यासमोर ठेवून विविध धार्मिक विधी, नृत्य, पदे, संवाद यांनी पारंपरिक ‘आख्यान’ सुरू होते. त्यात एकादशी माहात्म्याचे तुलसी आख्यान सादर करताना दशावतारी कलावंतांचे प्रत्यक्ष जीवन आणि नाटकातील आख्यान समांतर ठेवून त्यांनी एक वेगळाच परिणाम साध्य केला होता. ‘दशावतारा’तला राजा  हा प्रत्यक्ष वास्तवात काय काय भोगत असतो याचे दर्शन त्यांनी त्यात घडवले होते. यातील मालवणी संवाद आणि शिव्या हा तिथल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग असल्याने ते तसेच ठेवले होते. हा सामुदायिक नाटय़विधी असल्याने त्याचे रंगमंचावरील दर्शन हे नाटय़संहितेपुरते मर्यादित न ठेवता सकाळी देवळासमोर ढोल वाजवण्यापासून ते दहीहंडी फोडून दशावतार आख्यान संपेपर्यंत जे जे विधी होतात ते दाखवत त्यांनी हे कथानक फुलवत नेले होते. या नाटकात लोककलाकाराचे वास्तवदर्शी आयुष्य सादर करून त्यांनी प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले होते. ‘‘दशावतारी राजा’मुळे शहरी प्रेक्षकांनाही ग्रामीण भागातील वातावरण आणि लोकजीवन परके न वाटता आपले वाटू लागले आणि खऱ्या अर्थाने तो प्रेक्षक नाटकाच्या जवळ गेला,’ अशी प्रतिक्रिया देऊन डॉ. अशोकजी परांजपे यांनी तुलसी बेहेरेंना शाबासकी दिली.

‘दशावतारी राजा’च्या यशानंतर ते मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक म्हणून पुढे येतील असे वाटत असताना ते मात्र लोककलांच्या अभ्यासाचा गांभीर्याने विचार करीत होते. नोकरी सांभाळत, लोकनाटय़कर्मीपण जोपासत ते चक्क विद्यापीठीय संशोधनाकडे वळले आणि ‘दशावतार लोककला आणि कर्नाटकातील यक्षगान’ यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागले.

या प्रबंधाची एकूण अकरा प्रकरणे असून त्यात दोन्ही लोककलांच्या संहिता, कलावंतांच्या मुलाखती, दोन्ही प्रांतांतील जीवनरहाटी, विधीनाटक लिहिताना कोकणातील ‘बारापाच देवस्की आणि त्यातील दशावतार’ लोककलेचे स्थान आणि कर्नाटकातील ‘देवता’ या प्रकारावर त्यांनी लिहिले. ‘दशावतार’ हा यक्षगान परंपरेतून उगम पावलेला आहे, असे काही अभ्यासक मानतात. या मतात काही तथ्य आहे का, हे शोधून काढण्याच्या ऊर्मीतून त्यांनी या कलांच्या मौखिक संहिता ‘लिखित’ केल्या. त्यासाठी अनेक वेळा त्यांनी कर्नाटकातील उडुपी आणि दक्षिण कोकणात संशोधनासाठी दौरे केले. ही दोन्ही विधीनाटय़े असली तरी त्यांना स्वत:ची अशी ‘स्वतंत्र’ परंपरा आहे, तसेच त्या- त्या जीवनसंस्कृतीत जन्मलेले, घडलेले, वाढलेले आणि संस्कारित झालेले हे नाटय़प्रकार आहेत, हे त्यांनी संशोधनाअंती सिद्ध केले.

‘दशावतार’ आणि ‘यक्षगान’ वादनपद्धती पूर्णत: भिन्न आहेत. रंगभूषा आणि वेशभूषा दोन्हीही ठिकाणी भरजरी असली तरी त्यांत शिरस्त्राणे, अंगरखे, पितांबर परिधान करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. दशावतार प्रयोग ‘मौखिक’ पद्धतीचा, तर यक्षगानात ‘संहिता’ असते, हे डॉ. बेहेरे यांनी दाखवून दिले. हा अभ्यास करताना ही विधीनाटय़े जेथे सादर होतात तेथील लोक एक धर्माचार म्हणूनच लोकाविष्कार स्वरूपातील या नाटकांचे जागरण करत असतात. आणि एक सांस्कृतिक बाब म्हणूनही ही कला ते सादर करतात. दोन्ही नाटय़प्रकारांतील पात्रे ही समोरच्या जनसमुदायास सत्शीलतेचे आणि सद्वर्तनाचे धडे देतात. आपापसातील कलहभावना (सध्या तर ती खूपच वाढते आहे.) नष्ट करण्याचा संदेश देतात. प्रेमभाव वाढविण्याचा गुरुमंत्र देतात. त्यामुळे माणसाचे जीवन सुखी व समाधानी बनवण्याचे सामर्थ्य या दोन्ही कलााविष्कारांत आहे. हे नाटय़प्रकार तेथील जीवनसंस्कृतीशी एकरूप झालेले, तिथल्या लोकांना संस्कारित करणारे आणि कलाविष्काराचे विशिष्ट रूप स्पष्ट करणारे असल्याने ते आजही टिकून आहेत आणि पुढेही ते टिकतील. याचे कारण त्या- त्या प्रदेशातील लोक या नाटकांकडे ‘धर्मनाटय़’ म्हणून पाहतात.. अशी सरळ, साधी, पण अर्थगर्भ मांडणी डॉ. तुलसी बेहेरे यांनी या संशोधनात केली आहे.

डॉ. तुलसी बेहेरे, मी आणि सतीश लळित यांनी उडुपीच्या धर्तीवर दक्षिण कोकणात दशावतारी अ‍ॅकेडमी स्थापन करून स्थानिक हौशी तरुणांना दशावताराचे धडे देण्याचा संकल्प सोडला होता. स्थानिक दशावतरी नाटय़मंडळे आणि पर्यायाने लोककलाकार आर्थिकदृष्टय़ा अधिक सक्षम कसे होतील याविषयी त्यात मार्गदर्शन करणार होतो. या प्रकल्पाची सुरुवातही झाली होती.. आणि अचानक तुलसी बेहेरे हा ‘दशावतारी राजा’ संकासुरासारखा लोकरंगात मिसळून गेला. दक्षिण कोकणातील, तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातील दशावतारप्रेमी रसिक तुलसी बेहेरे यांची सदैव आठवण काढतील यात शंकाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 2:49 am

Web Title: articles in marathi on folk art scholor dr tulsi behere
Next Stories
1 बदलती हवा आणि कुडमुडे संशोधक
2 लख्ख दर्दी आरसा!
3 अद्भुतरम्य प्राणीविश्व!
Just Now!
X