21 January 2018

News Flash

एम. एम. कलबुर्गी यांचे निवडक लेख

‘माझ्यासाठी सत्य जिवंत असेतोवर मी मरणार नाही.

लोकसत्ता टीम | Updated: October 1, 2017 2:44 AM

‘माझ्यासाठी सत्य जिवंत असेतोवर मी मरणार नाही. मी जन्मलोय ते मरून जाण्यासाठी नव्हे, तर सूर्य-चंद्राबरोबर जगण्यासाठी!’ असे म्हणणारे कर्नाटकातील अभ्यासक-लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या होऊन आता दोन वर्षे उलटली. त्यांच्या हत्येचा तपास सुरू आहेच, आणि नुकतीच, ५ सप्टेंबर रोजी कर्नाटकातीलच ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आली. या दोघांच्याही आधी महाराष्ट्रातील विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकर आणि साम्यवादी नेते व अभ्यासक गोविंद पानसरे यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. या चौघांतील समान धागा म्हणजे विविध विचारधारांशी, मतांशी बांधिलकी मानणारे हे महानुभाव अभ्यासातून तयार झालेले आपले विचार निर्भीडपणे मांडत होते. यातील दाभोलकर व पानसरे यांच्या लेखन-विचारांशी मराठी वाचक परिचित असले, तरी कलबुर्गी व लंकेश यांच्या लेखनाशी मात्र मराठी वाचकांचा क्वचितच संबंध आला असेल. अशा वेळी कलबुर्गी ज्याबद्दल ओळखले जातात, त्या त्यांच्या निवडक संशोधनपर लेखनाचा मराठी अनुवाद उपलब्ध होणे मराठी वाचकांसाठी महत्त्वपूर्ण ठरते. ‘धीमंत ‘सत्य’शोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी’ या पुस्तकाद्वारे कलबुर्गी यांचे निवडक लेख आता मराठीत उपलब्ध झाले आहेत.

कर्नाटकच्या महाराष्ट्र बसव परिषदेने प्रकाशित केलेले हे पुस्तक दोन भागांत विभागले गेले आहे. पहिल्या भागात कलबुर्गी यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणाऱ्या सात लेखांचा समावेश आहे. त्यातून एक व्यक्ती म्हणून, अभ्यासक-संशोधक म्हणून कलबुर्गी यांची समग्रपणे ओळख करून दिली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले कलबुर्गी हे प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून अध्यापन व संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत झाले. पुढे ते हंपी कन्नड विद्यापीठाचे कुलगुरूही झाले. या सुमारे पाच दशकांच्या काळात त्यांनी विपुल संशोधनपर लेखन केले. त्यांच्या या संशोधनपर लेखनाचे ‘मार्ग’ या शीर्षकाखाली सात खंड प्रकाशित झाले. शिलालेख, हळेगन्नड काव्य आणि वचन साहित्य व बसव सिद्धान्त हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात या विषयांवरील कलबुर्गी यांच्या १५ संशोधनपर लेखांचा समावेश केला आहे. या लेखांतून बसवेश्वर, लिंगायत धर्म, वचन साहित्य यांची मूलभूत स्वरूपाची माहिती वाचकांस होते. एकूणच कलबुर्गी यांच्या लेखनाची ओळख करून देणारे हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

धीमंत सत्यशोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी

संपादक- राजू ब. जुबरे, महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान, भालकी,

पृष्ठे- १४४, मूल्य- १०० रुपये. 

First Published on October 1, 2017 2:44 am

Web Title: articles in marathi on m m kalburgi book
  1. No Comments.