महर्षी व्यासाचं ‘महाभारत’ हा असा ग्रंथ आहे की त्याच्या प्रत्येक वाचनात, त्याचे नवनवे अर्थ उलगडू लागतात. त्यातील पात्रं, त्यांचे स्वभाव, वागणं, बोलणं, त्यांच्या वृत्ती – प्रवृत्ती – कृती, त्यांचं प्राक्तन, त्यातील घटितं यांचा वर्तमान संदर्भातही, मानवी पातळीवर नव्यानं विचार करता येतो. ‘महाभारता’तील पात्रांच्या मृत्यूच्या तऱ्हाही किती भिन्न आहेत. केवळ मरणच नव्हे, तर पात्रांच्या अमरत्वातही विविधता आहे. आचार्य द्रोणपुत्र अश्वत्थामा तर चिरंजीव. पण तो शापित. महर्षि व्यास, परशुराम, हनुमान, कृपाचार्य, बळीराजा, बिभीषण यांच्याप्रमाणेच अश्वत्थामाही चिरंजीव. पण कौरव-पांडवांच्या महायुद्धाच्या अखेरीस अश्वत्थाम्याकडून होणारं पशुतुल्य वर्तन त्याला ‘शापित’ करतं आणि हा शाप त्याला मिळतो तोही श्रीकृष्णाकडून.

खरं तर अश्वत्थामा हा प्रत्यक्ष रुद्राचा – शंकराचा – अंश. जन्मत:च त्याच्या माथी रुद्राशी संबंधित, प्रकाशमान होणारा नीलमणी. महायुद्धाअखेरीस त्यानं विवेकशून्यतेनं योजलेल्या अस्त्रामुळे, पशुवृत्तीनं केलेल्या हत्याकांडामुळे तो नीलमणी श्रीकृष्ण अर्जुनाकरवी काढून घेतो. त्या ठिकाणी उरते ती प्रचंड वेदनादायक, रक्त- पू यांनी युक्त एक भळभळणारी जखम. त्यातून येणाऱ्या दरुगधीमुळे माणसंही त्याच्यापासून लांब पळतात. त्याला एकाकी जीवन जगावं लागतं. हा शाप त्याला भोगायचा आहे, तो तीन हजार र्वष. त्या व्रणाचा दाह शमविण्यासाठी तेलाची भीक मागत त्याला वणवण करावी लागते.

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

अशा शापित अश्वत्थाम्याकडे साहित्यिकांनी दुर्लक्ष केलं. कर्ण, कुंती, भीष्म, दुर्योधन, गांधारी यांना न्याय द्यायचा प्रयत्न साहित्यिकांनी केला; त्यांचं उदात्तीकरणही केलं. त्यांच्या वागण्या-बोलण्याचा संबंध नियतीशी, प्राक्तनाशी जोडून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. अश्वत्थामा मात्र या पात्रांच्या तुलनेत उपेक्षितच राहिला.

ही कसर ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या अशोक समेळ लिखित महाकादंबरीने भरून काढली आहे. अश्वत्थाम्याविषयी फारच थोडय़ा गोष्टी ज्ञात आहेत. त्यावर महाकादंबरीच काय, लघुकादंबरी लिहिण्याइतकंही साहित्य संदर्भग्रंथांतून मिळत नाही. असं असतानाही, महाभारतातील संदर्भस्थळं, जिथे जिथे अश्वत्थाम्याचा संबंध आला ती स्थानं, त्याचं वास्तव्य असलेला ‘अस्तंबा’ पर्वत, तिथल्या आदिवासींशी बोलून, ज्यांना अश्वत्थाम्याचं दर्शन झालं, अनुभूती आली, त्या लोकांच्या अनुभवाचं संकलन करून अशोक समेळ यांनी अश्वत्थाम्याची एक प्रतिमा तयार केली आहे.

अश्वत्थामाच्या चिरंजीवत्वामुळे समेळ यांना महाभारताच्या द्वापारयुगापासून ते आजच्या कलियुगापर्यंतचा कालपट मांडायचा होता. आजच्या काळाशीही त्याचा संबंध ताडून पाहायचा होता. अशोक समेळ हे वृत्तीनं नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक. त्यामुळे या अनुभवाच्या जोरावर त्यांना अश्वत्थाम्याच्या जीवनातील नाटय़ हुडकणं फारसं कठीण गेलं नसावं. त्यातलं नाटय़ गवसताच त्यांनी या महाकादंबरीचा अभूतपूर्व घाट स्वीकारला.

समेळ यांनी महाकादंबरीचा प्रारंभ अश्वत्थाम्याच्या विस्मृतीनं केलाय. टप्प्याटप्प्यानं त्याची महाभारताशी, त्यातील पात्रांशी स्मृती चाळवत नेत त्याला वर्तमानातून महाभारतकाळात नेलं आहे. आणि त्याचं ‘स्व’त्व त्याला मिळवून दिलंय. महाभारताचं महायुद्ध होऊन पाच हजारांहून अधिक वर्षांचा काळ पुढं सरकलाय. या काळात अश्वत्थाम्याची स्मृती गेल्यानं, त्याला आठवतं ते टप्प्याटप्प्यानं. म्हणून या महाकादंबरीच्या प्रकरणांना समेळ यांनी ‘स्मृतिपटल’ असं समर्पक शीर्षक दिलंय.

जीर्णपुरुष अश्वत्थामा याला आत्मभान येण्यापूर्वी आणि त्याची स्मृती जागृत होण्यापूर्वी वाटाडय़ा आणि यात्रेकरूंच्या प्रश्नोत्तरातून, तो प्रदेश, महाभारतातील घटना – प्रसंग – व्यक्ती यांच्याविषयी सतत माहिती मिळत राहते. या संवादामधून वाचकांसाठी अश्वत्थाम्याविषयी पाश्र्वभूमी तयार होत जाते. स्वत:ला जाणून घेण्याची उत्सुकता अश्वत्थाम्याची जशी वाढत जाते, तसतशी वाचकांचीही अश्वत्थामाविषयीची जिज्ञासा बळावते. महाकादंबरीच्या घाटाचं हे वैशिष्टय़च मानायला हवं.

व्यासांनी अश्वत्थाम्याला प्रतिस्मृतींचा वर दिल्याने अश्वत्थामा तो सारा कालपट ‘पुन्हा’ पाहू शकला. या महाकादंबरीची ही मांडणी अशी ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीनं होते. त्याबद्दल समेळ म्हणतात, ‘पाच हजार वर्षांपूर्वी संजयनं समरांगणाकडं डोळे लावले. पाच हजार वर्षांनंतर अश्वत्थाम्यानं मैदानाकडे डोळे लावले.’ ते, तसंच वर्णन अश्वत्थाम्याच्या चक्षूनं अशोक समेळ यांनी वाचकांसमोर ठेवलंय. पण हे कथन करतानाच अश्वत्थामाच्या चिरायू वेदनेसह त्यांनी वर्तमानकाळही सापेक्षतेनं यात बेमालूमपणे गुंफला आहे.

मराठी आणि गुजराती नाटकं मिळून पन्नासहून अधिक नाटकांच्या लेखनाचा अनुभव असणाऱ्या अशोक समेळ यांनी या महाकादंबरीतील व्यक्तिमत्त्वांची रेखाटनंही सुरेख केली आहेत. समेळ यांचं या व्यक्तिरेखांविषयीचं स्पष्टीकरण आगळं आहे. त्यांची लेखनशैली, वर्णनशैली चित्रदर्शी आहे. प्रसंग वर्णन करताना तो वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहील, याची दक्षता घेऊन चित्रमयशैलीत तो वर्णिला आहे. कौरव-पांडवांच्या महायुद्धाच्या वर्णनात तर, कॅमेऱ्यानं ३६० अंशात फिरून दृश्यं टिपावीत, तशी वर्णनं येतात. त्यामुळे वाचकालाही आपण प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर आहोत, असा भास होतो. ही समेळ यांच्या लेखनाचीच ताकद म्हणायला हवी.

या महाकादंबरीत ठिकठिकाणी ‘पताकास्थानं’ येतात. त्यातून भविष्यात घडणाऱ्या घटनांचं सूचन केलं जातं. द्रोणाचार्यांशी चर्चा करत असताना अश्वत्थामा म्हणतो, ‘जेव्हा अधर्मयुद्ध सुरू होईल तेव्हा माणूस हा माणूस राहणार नाही. त्याचा पशू होईल आणि तो हिंस्र पशू किती निरपराध माणसांचे बळी घेईल, हे सांगता येणार नाही.’ आणि नेमकं हेच पशुत्व अश्वत्थाम्यात प्रबळ होऊन तो अधर्मानं महायुद्धाचा अंत घडवून आणतो. ‘कुठलंही आततायी कृत्य करू नकोस. अन्यथा तुला कधीही उत्तम गती लाभणार नाही,’ असं श्रीकृष्णानं अश्वत्थाम्याला सावध केलेलं असतानाही अश्वत्थामा पशुतुल्य कृत्य करतोच आणि त्याला त्या कृत्यानं ‘शापित’ अमरत्व ‘भोगावं’ लागतं. पृ. ६२५ वर येणारा ‘घुबडाचा प्रसंग’ हा तर अश्वत्थाम्याच्या पशुत्वाच्या कर्माचा प्रतीकात्मक प्रसंग आहे. हे असे छोटे छोटे प्रसंगही या महाकादंबरीच्या वाङ्मयीन सौष्ठवात भरच घालतात.

चित्रदर्शी वर्णनशैली आणि संवादाच्या स्वाभाविकतेबरोबरच राजनीतीचे दंडकही आपसूकच येत जातात. त्याचे संदर्भ हे वर्तमानकालीन घटना, राजकारणालाही लागू होतात. उदा. ‘ज्या राज्यात अनाचार, अत्याचार माजतो, ते राष्ट्र कितीही बलाढय़ असो, ते प्रजेच्या रागाच्या आवर्तनात पालापाचोळ्याप्रमाणे उद्ध्वस्त होतं.’ किंवा ‘आश्रितांनी राजासमोर कधीच बोलायचं नसतं’, ‘राजा कधीच कुणाचा मित्र नसतो.’

शक्यतोवर समेळ यांनी अनलंकृतशैलीचे, सहज स्वाभाविक संवाद योजले आहेत. पण काही वेळेस उपमा-उत्प्रेक्षांच्या साहाय्यानं ते आपलं म्हणणं मांडतात. उदा. ‘आभाळ निरभ्र होतं.. विधवेच्या पांढऱ्या कपाळासारखं’, ‘भडकलेल्या अग्नीनं वाळलेल्या गवतास भस्मसात करून प्रदीप्त व्हावं, तसा भीम कौरवसैन्यात प्रदीप्त होऊन फिरू लागला.’ किंवा ‘पापात्मा दुर्योधनाशी मृदू बोलणं म्हणजे गाढवाला गोंजारणं आणि गाईला कठोर वागणूक देण्यासारखं आहे.’.. हे सारे दृष्टांत प्रत्ययकारी आहेत.

कधी कधी त्यांच्या लेखनात सुभाषितात्मक संवाद येतात. उदा. ‘मत्सर, द्वेष, सूड या भावनांनी पेटलेल्या माणसाच्या हातून अनंत प्रमाद घडतात.’, ‘मानवाचा पश्चात्ताप, त्याची ती गेलेली वेळ, तो काळ परत आणून देत नाही’, ‘अधर्मनिष्ठ माणसाला शहाणपणाचे बोल समजत नाहीत, तेव्हा त्याचा शेवट जवळ आला हे निश्चित समजावं.’ कदाचित, यामागे समेळ यांच्या संस्कृतग्रंथांच्या अभ्यासाचाही परिणाम असेल.

कृष्ण काळझोपेतून जागा झाल्यानंतर अश्वत्थाम्याला भेटतो आणि त्यांच्या संवादाच्या अखेरीस म्हणतो, ‘नुसतं मरण म्हणजे मुक्ती नव्हे अश्वत्थामा, स्वत:ला स्वत:च्या सामर्थ्यांची आत्मप्रचिती येऊन जगाच्या कल्याणार्थ भटकणं, ही पण मुक्तीच आहे.’ खरं तर हा मुक्तीचा मार्ग साऱ्या मानवजातीसाठी आहे. ‘स्व’कडून ‘समष्टी’कडे आणि ‘समष्टी’कडून ‘विश्वा’कडे नेणारा हा मार्ग आहे.

महाभारतातील सूडाचा हा सारा प्रवास समेळ यांनी अश्वत्थाम्याच्या नजरेतून रसिकांसमोर ठेवलाय. त्यामुळं त्याला एक वेगळं परिमाण लाभलंय. अश्वत्थामाचं, अखेरीस उन्नयन करण्यात आलं असलं तरीही त्याच्यातील ‘माणूस’पणाचं होणारं दर्शन, त्याला ‘स्व’ सापडणं, जगण्याचा उद्देश लाभणं, हे अत्यंत मोलाचं आहे.

या महाकादंबरीतून समेळ एक विधान करतात, ते या साऱ्या कथानकाचं फलित आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अश्वत्थाम्याच्या तोंडून ते म्हणतात, ‘जगातल्या कुठल्याही मानवाच्या आयुष्यात कधीच कुठलाच दुर्योधन येऊ नये, नाही तर त्याची अवस्था या अश्वत्थाम्यासारखी होईल.’ प्रत्येक साहित्यिक आपल्या साहित्यकृ तीतून एखादं विधान करत असतो. समेळ यांचं या महाकादंबरीतील हे विधान, कादंबरी वाचून संपल्यावरही वाचकाची पाठ सोडत नाही. त्याचबरोबर, ‘युद्धाचे परिणाम पुढे किती निरपराध माणसांना भोगावे लागणार आहेत, याची युद्ध लादणाऱ्यांना कल्पना नसते,’ हे वैश्विक सत्यही वाचकाच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करतं.

सुमारे दीड तप या ‘अश्वत्थामा’नं अशोक समेळ यांना झपाटलं होतं. त्यांची ही पहिलीच कादंबरी- महाकादंबरी. त्या कादंबरीचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रं गणेश भावसार यांनी अप्रतिम रेखाटली आहेत. डिम्पल पब्लिकेशनने या पुस्तकाच्या निर्मितीत कुठेही कसर सोडलेली नाही.  प्रा. अशोक बागवे यांची मर्मग्राही प्रस्तावना या महाकादंबरीची थोरवी अधोरेखित करते. अशोक समेळ यांची ‘मी अश्वत्थामा चिंरजीव’ ही महाकादंबरी केवळ वाचनीयच नव्हे, तर संग्राह्यही आहे.

मी अश्वत्थामा चिरंजीव’ – अशोक समेळ,

डिंपल पब्लिकेशन,

पृष्ठे – ६८८, मुळ किंमत – ९०० रुपये

(सवलतीत ६०० रुपये)

अरुण  घाडीगावकर – arunghadigaonkar636@gmail.com