कवी पी. विठ्ठल यांचा ‘शून्य एक मी’ हा कवितासंग्रह गूढ शीर्षक आणि तितकेच गूढ मुखपृष्ठ यांमुळे लक्षवेधी ठरतो. जागतिकीकरणाने समाजात, माणसांत, घरात, नोकरी-व्यापारात, नातेसंबंधांत, मूल्यव्यवस्थेत आणि एकूणच भोवतीच्या पर्यावरणात अपूर्व असे बदल होत गेले. हळूहळू भिनत जाणाऱ्या विषाने – सायलेंट किलर व्हावे आणि एक दिवस नकळतपणे शरीर काळेनिळे पडून गतप्राण व्हावे, अन् मरणाचे कारणच समजू नये, अशी एकूण समाजव्यवस्था दिसते आहे. कवी याच भूलभुलयाचा भाग आहे. आक्रमक बाजारपेठांनी समाज माध्यमांना विकत घेऊन अंगावर धावून येणाऱ्या दिलखेचक जाहिरातींनी माणसाला मगरमिठी घातली आहे. त्यावर उतारा म्हणजे, बाजारू आध्यात्माचे गोड चाटन! कवी लिहितो –

‘मॉडर्न आध्यात्माचे जंगली पीक धुपत चाललेय

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

घरादारांना, खिडक्यांना, संडास-बाथरूमला

टी.व्ही., फ्रिज आणि ए.सी. कुलरला येतोय –

मेड इन चायनाचा तकलादू वास

आउटडेटेड झालेल्या देशी चुली

प्रश्नपत्रिकेतल्या रिकाम्या जागेसारख्या गतप्राण

टिश्यू पेपरने तोंड पुसणारे बघत नाहीयेत

मातीच्या मुळांना’

कवीला हे सारे डाचते आहे. पण तो निरुपाय आहे. या व्यवस्थेचाच तोही भाग आहे. एकीकडे आजवर जपलेली मूल्ये, झालेले संस्कार आहेत नि दुसरीकडे झगमगाटी भौतिकवादातून फोफावलेले अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य व भोगलालसाही आहे. या कात्रीत सापडलेल्या माणसाची ही भेदक अभिव्यक्ती आहे. आधुनिकीकरणाने लादलेल्या गतिमान आयुष्याला चिकटून आलेले सक्तीचे फॅशनेबल राहणीमान, रॅट-रेसमधले ताणतणाव, बेगडी शिष्टाचार आणि जगण्यातली विसंगती हे सारेच संवेदनशील कवीला अस्वस्थ करते. प्रगतीच्या या पोकळ फुगवटय़ात माणसाला सतत अपडेट होण्याखेरीज पर्याय नाही. म्हणूनच कवी म्हणतो –

‘खिडकीत पसरलेल्या आडव्या उभ्या वेलीसारखे

हे अगम्य जगणे आणि कुंडीत कोंबलेल्या

कृत्रिम रोपटय़ासारखे आपले डुप्लिकेट पाय

भीती वाटतेय पायांना पालवी फुटेल की काय?

ह्य नग्न देहावर वेदनेचे झुंबर लटकेल की काय?

भीती वाटतेय याची की आपण हळूहळू मॉडर्न बनत

आहोत की काय? मेंदूवर धूळ साचत जाईल हळूहळू

आणि प्रश्नांचा टाइमबाँब फुटेल की काय?

आणि भीती याचीही वाटते-

कोणत्याही क्षणी आपल्या आवाजाचे एन्काउंटर होईल की काय?’

कवीची भाषा थेट आहे. ती आजच्या पिढीच्या आकलनाशी ‘कनेक्ट’ होणारी आहे. उपहास आणि उपरोध यांनी ठासून भरलेली ही भाष्यकविता आहे. आजच्या काळाचे ती जणू दस्तऐवजीकरण करत आहे. एकीकडे चंगळवादाचे, लैंगिक स्वातंत्र्याचे फुगे उडत आहेत, त्याच वेळी दुसरीकडे श्रद्धा-भक्तीची अफू पाजून नतिकतेच्या दंतकथा ऐकवल्या जात आहेत. कवी म्हणतो –

‘भगवद्गीतेतला श्लोकच संशयास्पद वाटावा अशी

कोणती खजुराहो कोरली जातेय आपल्या मस्तकात

की आपण बनत चाललोय अधिक बाळबोध

सांस्कृतिक अभिसरणाच्या बख्खळ गोष्टी करणारे

शेवटी अध्यात्माकडून का करून घेतात ब्रेनवॉशिंग?

कोणती व्यवस्था आपल्याला अंकित करत असते अखेरीस?’

व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांच्या मुंग्या कवीच्या अंगावर चढून येत आहेत. आपल्या अवयवांना पॉलिश करत, ब्युटी पार्लरमध्ये वय चोळून घेण्याची निकड का वाटतेय माणसाला? अतोनात गर्दीनेच का गुदमरतोय ऑक्सिजनचा जीव? ग्लोबल वॉर्मिग थेट माणसाच्या मेंदूत उतरतेय, ते कसे? सारे जण वितभर कपडय़ाच्या घनगर्द सावलीत का गुंडाळताहेत आपले डोके? संस्कारांचा सिलॅबस का उरत नाही कुठल्याच मेंदूत? फेसबुकवरल्या निर्जीव चेहऱ्याशी का होतेय दोस्ती? ब्रेकिंग न्यूज का करत आहेत आपल्या निर्बुद्ध जगण्याचा पाठलाग? बिनचेहऱ्याची गर्दी का मागते आपल्याला माणूस असल्याचे सर्टिफिकेट? अशा अनेक प्रश्नांनी कवीला जखडले आहे. हे सारे अस्वस्थपण व्यक्त करावे तर भाषाही कचकडी बाहुलीसारखी झाली आहे. ‘माणसाच्या भाषेचे आदिम दु:ख’ या कवितेत कवी म्हणतो –

‘डेकोरेशनपुरतीच राहिलीये भाषा आणि-

व्याकरणाच्या फांदीला सजवताहेत बोलींचे कोलाज

कॉलसेंटर, मॉल आणि फाइव्हस्टार हॉटेलमध्ये

दिमाखात उभ्या आहेत वारली पेंटिंग्ज

भिंतीच्या पापुद्रय़ाला हसतोय मोनालिसाचा निव्र्याज चेहरा..’

पी. विठ्ठल आपल्या मनातली तगमग विठ्ठलाशीही ‘शेअर’ करतात. हा कवी माणसाला, संस्कृतीला प्रश्न विचारतो. पण आपणही त्याच काळाचे प्रतिनिधी व त्याच व्यवस्थेचे भाग आहोत, ही ‘बेबस’ जाणीव कवी मिश्किलपणे मांडतो -‘पायाची माती जाऊन गुळगुळीत टाइल्सवर पावलं घसरू लागली की समजावं, आपण मध्यमवर्गीय झालो आहोत.’ त्या जगण्याला लगडूनच आलेत विविध मनोकायिक विकार नि त्यावरचे उपायही! भावना, नाती व मूल्यांना दुय्यम ठरवत करिअर, पसा, ऐहिक सुखलोलुपता मिळवण्यात इतिकर्तव्यता मानण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही. ग्लोबल होण्याच्या दुष्टचक्रात माणूस अडकला आहे.

कवीच्या प्रतिमा खूप वेगळ्या आहेत. जे म्हणायचंय त्यात स्पष्टता आहे. अलंकारिकता, सांकेतिकता कवितेत फारशी नाही. शब्द जरी सुस्पष्ट असले तरी त्यातून ध्वनित होणारी अर्थवलये आसपासचे अनेक प्रदेश कवेत घेतात. कवीच्या काही प्रतिमा पाहा – ‘ऋतू अपडेट करण्याच्या खटपटीत गुंतलेत थोर वैज्ञानिक’, ‘जेसीबीच्या नाकातून पाझरतोय बिल्डरचा मेंदू’, ‘लाइट गेल्यावर लिफ्टला जनरेटरचा बॅकअप मिळावा, तसे टवटवीत होतेय शरीर’, ‘माझ्या विचारांचे प्रिंटआउट्स कसे घेता येत नाहीत कुणाला?’, ‘पांढऱ्याशुभ्र कपडय़ांवरचे मतलबी डिजिटल झुरळ हसतेय सर्वाना’, ‘सुखदु:खाच्या अँब्युलन्स आपापल्या परीने धावत राहतात’ अशा प्रतिमांनी पी. विठ्ठल यांची कविता भरलेली आहे. या प्रतिमांमध्ये अपरिहार्यपणे येणारे इंग्रजी शब्द ही आजच्या काळाची ओळख आहे. भौतिक सुखाच्या सोपानावरच्या या निसरडय़ा पायऱ्या आहेत.

ही कविता खूप बोलते, स्पष्ट बोलते, खिल्ली उडवते, कोपरखळ्या मारते, आत्मवंचना करते, स्वत:च्या नतिक स्खलनाची कबुली देते. तसेच वाचकांसाठी बऱ्याच गाळलेल्या जागाही सोडते. या संग्रहात मोजक्याच ‘हळव्या’ म्हणाव्यात अशा कविता आहेत. बहुतांश मुक्तछंद आणि थोडय़ा सयमक-मुक्तछंद प्रकारच्या या कविता सहज बोलल्यासारख्या, विधानात्मक आहेत. काही रचना खूपच गद्य आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अतिशयोक्ती इत्यादी अलंकार आहेत. कवीसारखेच बोलायचे झाले तर –  एकूणच व्यवस्थेच्या बुलडोझरखाली चिणलेल्या सर्जनशीलतेचा या कवितेत पुनर्जन्म आहे. साधे-सरळ, आधुनिक-रांगडे असे आवाजी उद्घोषही आहेत. पुस्तकात एक मनोगत स्फुट-गद्यात मांडले आहे. आधुनिक माणसाला आपले प्रतिबिंब पाहायचे असेल, तर हा संग्रह वाचायलाच हवा.

 ‘शून्य एक मी’- पी. विठ्ठल,

कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,

पृष्ठे – १२७, मूल्य – १५० रुपये.

आश्लेषा महाजन ashlesha27mahajan@gmail.com