01 March 2021

News Flash

मी हिंदू आहे!

हिंदू धर्मातील पाच सहजभाव आम्हाला हे निसर्गवैभव पाहताना विनासायास मिळाले आहेत.

अतुल पेठे

माझ्या आई-वडिलांनी, आजीने, नातेवाईकांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आणि शिक्षकांनी मला सहभावाने राहायला शिकवले आहे. त्यांनी मला ‘सहिष्णुता’ हा शब्द नसून ती ‘वर्तणूक’ आहे याचे धडे दिले आहेत. मला खात्री आहे, की हाच माझ्या बहुसंख्य हिंदूंचा अनुभव असणार. मग गेल्या काही वर्षांमध्ये आजूबाजूला डाचणारा आणि मनाला व्यथित करणारा फरक का पडतो आहे? गेली काही वर्षे आजूबाजूच्या होत चाललेल्या प्रखर आणि विखारी वातावरणामुळे मी बहुसंख्यांतील एक असूनही भयभीत झालेलो आहे..

मी हिंदू आहे. जन्माने आणि वृत्तीनेही! पण गेली काही वर्षे आजूबाजूच्या होत चाललेल्या प्रखर आणि विखारी वातावरणामुळे मी बहुसंख्यांतील एक असूनही भयभीत झालेलो आहे. कुठलाही टीव्ही चॅनल लावला की हिंदू धर्माचे संरक्षक म्हणवून घेणारे लोक कडवेपणाने बोलत असतात. त्यांचा उच्चरव असतो. त्यांची भाषा कमालीची हिंस्र असते. बोलताना चेहरा उग्र असतो. त्यांचे ओचकारून बोचकारून बोलणे मला ऐकवत नाही. त्यांचे उग्र दिसणे मला पाहवत नाही. मला माहीत असलेल्या माझ्या प्रिय हिंदू धर्माविषयी ते बोलत आहेत असे मला वाटत नाही. हे लोक हिंदू धर्माच्या नावाने वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियावर थमान घालत असतात. त्यांना पाहून पाहून आणि ऐकून ऐकून समस्त हिंदू धर्माचे ते जणू प्रतिनिधी किंवा प्रवक्ते आहेत असे आम जनतेला वाटू लागले आहे. या बोलणाऱ्या लोकांनाही तेच हिंदू धर्माचे पालक- संरक्षक- परीक्षक आहेत असे ठामपणे वाटू लागले आहे. त्यांची मांडणी ही आक्रमक आणि आघाती आहे. नम्रपणे सांगतो : ती मला माझी बिलकूल वाटत नाही. उलट, त्यांच्या या अशा मांडणीमुळे माझ्यातला हिंदू माणूस व्यथित

आणि व्याकूळ होऊ लागला आहे. त्यांना अपेक्षित असलेला हिंदू मी कधीच होऊ शकत नाही, म्हणून मला ते एकटे पाडतील की काय अशी सतत शंका मला येत आहे. मी असे बोललो अथवा लिहिले तर ते मला धर्मविरोधी ठरवतील; आणि कदाचित ठेचून मारण्याची शिक्षा देतील की काय असे भयस्वप्न पडत राहते. मग माझ्या मनात अनेक प्रश्न उमटतात. मी चिंतनात पडतो. असे प्रश्न पडणे आणि चिंतनात पडणे हे खरं तर मला हिंदू धर्मानेच दिलेले शिक्षण आहे. ज्या अर्थी माझ्या मनाला प्रश्न पडतात आणि ज्या अर्थी मी चिंतनात पडतो त्या अर्थी मी हिंदू धर्माचा पाईक आहे असेही मला लक्षात येते.

माझ्या आई-वडिलांनी, आजीने, नातेवाईकांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आणि शिक्षकांनी मला सहभावाने राहायला शिकवले आहे. त्यांनी मला ‘सहिष्णुता’ हा शब्द नसून ती ‘वर्तणूक’ आहे याचे धडे दिले आहेत. कोणावरही हात उगारू नये, कोणालाही शिवी देऊ नये, उच्च-नीच भेद पाळू नये, कोणाला कमी लेखू नये, स्वतला अहंकार असू नये, कशाचाही गर्व करू नये आणि कोणाचे वाईट चिंतू नये असे संस्कार त्यांनी माझ्यावर केले आहेत.

आमच्या घरात रेडिओ होता. त्यावर गाणी वाजत. त्याचा आवाजही आमच्या घरापुरताच राहील याची काळजी माझे आई-वडील घ्यायला सांगत. सायकल चालवत असताना घंटा ही गरजेपुरतीच वाजवायची असते असे मला बजावले गेले होते. तेव्हा दुसऱ्यांना त्रास होईल असा आवाज करणे हे गैरकृत्य आहे, हेच माझ्या कानावर बिंबवले गेले आहे. सायंकाळी देवासमोर लावलेला दिवा घरामध्ये सात्विक शांतता आणत असे. दुसऱ्यांचे डोळे प्रखर उजेडाने टोचून दिपवणे योग्य नव्हे असेही माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला शिकवलेले होते. एक तीळ सात जणांत वाटून खावा हे मूल्य मनात नव्हे, तर बुद्धीत ठसवले होते.

आमच्या देवघरात अनेक देव होते. त्यांची पूजा करणे यात एक निरागस भाविकता होती. त्यातून ‘धर्म म्हणजे स्निग्धता’ असे मनात ठसले होते. कडक व्रतवैकल्ये करणे किंवा ‘फॅशन’ म्हणून सणवार करणे त्यात नव्हते. आमचे देवही कोपिष्ट वगैरे नव्हते. ते आजूबाजूच्या माणसांइतकेच साधे होते. आमचा श्रीराम हा सतत धनुष्यबाण ताणलेला नसे. आमचा राम हा चंद्र मागणारा, बालहट्ट करणारा असे. तर कधी भावासाठी राज्याचा त्याग करणारा, तसेच प्रजाहितदक्ष असे. असेच कृष्णाबाबतही वाटत असे. माझे वडील हे त्या अर्थाने शहरी असूनही ते विठ्ठलमार्गी होते. घरात भजन चाले. ते अभंग म्हणत. हे सगळं अतिशय सहज घडे. यात ‘हिंदू धर्माची ध्वजा’ वगैरे काही नव्हतं. यावरून माझ्या हे लक्षात येतं की, मी हिंदू असण्याकरता गर्वाने काही दाखवण्याची गरज नाही.

अशीच एक लहानपणची गोष्ट. रंगपंचमीला पिचकारी म्हणून बाजारात नवीन ट्रेंड आला होता. पिस्तुलाची पिचकारी! मी आणि माझ्या मित्राने पिस्तुले विकत घेतली. माझ्या आईने ते पाहताच तिने ते पिस्तूल मला परत करायला लावले. ‘पिस्तूल आणण्यात गैर काय?’ असे मी तिला विचारले तर तिने मला ‘त्यातून रंग उडवायचा आहे; गोळी नव्हे!’ असे सांगितले. माझे लहान डोळे त्यावेळेस मोठे झालेले मला आजही आठवतात. आश्चर्य म्हणजे माझ्या मित्राच्या घरीही असेच घडले. आम्ही दोघांनी ती पिचकारी पिस्तुले दुकानदाराला परत देऊन टाकली. ही पिस्तुले हातात न धरल्यामुळे मी कुठेही बुळचट, घाबरट अथवा हिंदू धर्माला लांच्छनास्पद झालो नाही. उलट, पिस्तूल असण्यापेक्षा नसण्यातच जास्त हिंदूपणा आहे हे आपोआपच लक्षात आले.

आम्ही लहानपणीच महाराष्ट्रातील सर्व गडकोट, किल्ले पालथे घातलेले आहेत. तिथला सुसाट वारा प्यायलो आहे. राकट कडय़ांनी आणि झाडाझुडपांनी आमची मने तजेलदार झालेली आहेत. आम्ही अनेकदा आमच्याच अडाणी बांधवांनी इथे-तिथे लिहून ठेवलेली नावे पुसून स्वच्छ केली आहेत. फिरायला जाताना घरातील कोरडे कपडे आणि भाज्या गावातील लोकांना वाटल्या आहेत. पण हे करताना कुठेही आपण धर्मरक्षणार्थ किंवा ‘हिंदू धर्माची पुनस्र्थापना’ वगैरे करण्यासाठी इथे आलेले आहोत हा आव नव्हता. तिथे कोणाला तरी शत्रू ठरवून ठार करण्याचे बेत आखले नव्हते. जाता-येता झेंडे खोवून आपण धर्मराष्ट्रभक्त आहोत हा अहंभाव नव्हता. अभ्यास, आदर, अवलोकन, आनंद आणि आत्मविश्वास हे हिंदू धर्मातील पाच सहजभाव आम्हाला हे निसर्गवैभव पाहताना विनासायास मिळाले आहेत.

माझ्या आई-वडिलांनी धार्मिक असूनही कर्मकांडांचा बडिवार न करता स्वधर्म पाळता येतो याचे उदाहरण आम्हाला घालून दिले आहे. मृत्यूनंतरच्या कुठल्याही विधींना नकार देऊन त्यांनी देहदानासाठी फॉर्म भरलेला होता.

आमच्या घरात जानव्याचा वगैरे त्याग करायला मुभा होती. त्याचबरोबर ‘आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म’ असा भडिमार नव्हता. कुठलेही विधी आणि कर्मकांड करायची सक्तीही नव्हती. आमच्याच घरात काय, पण आजूबाजूच्या घरांतही असेच कमी-अधिक मोकळे वातावरण होते. धर्म ही आनंदाची गोष्ट असून ‘बुभुक्कार’ असलेले राणा भीमदेवी नाटक नाही, हे मनावर रुजवलेले होते. भातुकलीच्या खेळात असते तशी मजा धर्म पाळण्यात होती. त्या निरागस खेळाचा जीवघेणा ‘पोकेमॉन’ आणि ‘ब्लू व्हेल’ झाला नव्हता!

अशीच मन उन्नत करणारी गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांकडे गाडगेमहाराज यायचे आणि र. धों. कर्वेही यायचे. हे समजताच या दोघांशी वैचारिक नाळ जुळली. पुढे त्यांचे आणि त्या विवेकी परंपरेतील बहुश: लेखन वाचले. त्यातून हिंदू धर्म म्हणजे मूर्तिपूजा, पोथ्यापुराणे आणि दंतकथा इतकेच सीमित असता कामा नये याचे भान आले. शनिवारपेठेत मी अनेक स्वघोषित ‘राष्ट्रीय’ कीर्तने ऐकली. पण मला कीर्तन आवडू लागले ते ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जाच्या गाडगेबाबांचे!

अशी अनेक उदाहरणे देता येतील. मला खात्री आहे, की हाच माझ्या बहुसंख्य हिंदूंचा अनुभव असणार. मग गेल्या काही वर्षांमध्ये आजूबाजूला डाचणारा आणि मनाला व्यथित करणारा फरक का पडतो आहे? हा अहंगंड आहे की न्यूनगंड? हा माझा हिंदू धर्म खलास करायचा तर डाव नव्हे ना? जे झाड अनेक विचारांनी डवरलेले आहे, ज्याच्या फांद्यांवर अनेक घरटी विसावली आहेत, ज्याची मुळे खोलवर आणि सर्वत्र पसरली आहेत, जे झाड सर्वात पुरातन आहे, असे हे स्वत:चे झाड हिंस्र कुऱ्हाडीने स्वत:च कोण तोडते आहे? या विस्तीर्ण झाडाच्या फांद्या आणि डहाळ्या तोडून ते खांबासारखे सरळसोट करण्याचे कृत्य कोण करत आहे? या सृजनशील जमिनीमध्ये साधारण ८०% अशी बळकट झाडे असताना या झाडांचे मालक आपलीच झाडे ‘बोन्साय’ का करीत आहेत? हे प्रश्न गेला काही काळ मी हिंदू असल्यामुळेच माझ्या मनात रोज येत आहेत.

हात जोडून विनंती करतो, की असे प्रश्न इतर धर्मातल्या लोकांना का विचारत नाही, असे कृपा करून मला विचारू नका. माझे घर वाहत्या पाण्यासारखे प्रवाही आहे. त्यात बंदिस्त नसलेल्या अनेक खोल्या आहेत. त्याची निगा राखणे आणि काळजी घेणे हेच माझे प्रथम परमकर्तव्य आहे. आपली अशी सुखाची घरे पाहून इतर धर्मातील लोक अशीच घरे बांधतील अशी मला खात्री आहे.

या काळात ‘हिंसेने दु:खी होतो तो हिंदू’ हा विचार मानणारेही अनेक हिंदू आहेत याची नोंद व्हावी म्हणून हा लेख मी लिहिला आहे. आता हा लेख वाचूनही कोणाचे मन दुखावले असेल तर उदार अंत:करणाने क्षमा करा.

atulpethe50@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 2:20 am

Web Title: i am a hindu
Next Stories
1 माझी ‘दंत’कथा
2 जळगाव व्याघ्र प्रकल्प एक प्रश्नचिन्ह!
3 गजल विधेची उपेक्षा का?
Just Now!
X