मी मानसोपचार घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बुद्धिमान मित्रांनी ‘काय गरज आहे तुला? आपण विचार करून आपले प्रश्न सोडवायचे असतात!’ असा सल्ला दिला होता. आपल्याकडे मनाच्या आजाराविषयी खूप औदासीन्य आहे. बहुतेकांना तो आजार आहे, हेच लक्षात येत नाही. बहुतेक लोकांना त्याचा ‘टाबू’ आहे. हे सामान्य माणसांपुरतंच सीमित नाहीए, तर कौन्सेलिंग करणारे आणि मानसोपचार देणारेही अनेक जण या क्षेत्राविषयी पुरेसे साक्षर नाहीत, हे चित्र मात्र भीतीदायक आहे.

होळीच्या दिवशी विजय तेंडुलकर सोनालीकडे आले होते. आम्ही सगळे जण रंगात न्हाऊन निघालो होतो, पण त्यांना रंग लावायला कचरत होतो. ते म्हणाले, ‘‘अरे, लावा ना मला रंग! मला लहानपणापासून विदूषकासारखा तोंडाला रंग लावायचा होता आणि भान हरपून नाचायचं होतं. पण आम्हाला काही ते जमलं नाही. ’’आम्ही लाजत उगाच त्यांच्या कपाळावर आणि गालावर हलक्याने रंग लावला. पण आत्ता मी एका कार्यशाळेसाठी संपूर्ण विदूषकाचा वेश धारण केला तेव्हा त्यांची खूप आठवण आली.

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…

निमित्त होते एप्रिल फुल दिवस साजरा करण्याचं. आम्ही मित्रांनी ‘पोतडी एन्टरटेन्मेंट’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. सध्या झी युवा या चॅनेलवर आमची ‘बन-मस्का’ नावाची मालिका सुरू आहे; जी आता संपत आली आहे. त्यासाठी सेंड ऑफ पार्टी देण्याऐवजी आपण काही कार्यशाळा घेऊयात असं मनात आलं. मला बऱ्याच दिवसांपासून मनाच्या रचनेचं नव्याने आलेलं भान इतरांबरोबर शेअर करायचं होतं. मी गेली काही वषेर्ं मानसोपचार घेत आहे. त्यामुळे मला बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या आहेत. आणि सेटवर मुलांशी गप्पा मारताना असं वाटलं, त्यांनाही या कळल्या तर त्यांच्या समस्या ते समर्थपणे हाताळू शकतील. मनाचा विषय गुंतागुंतीचा आणि नाजूक असला तरी आम्ही वर्कशॉपमध्ये मजा केली. मी स्वत: विदूषकाच्या वेशात होतोच; पण इतर सगळ्यांनीच मेकअप् करून चेहऱ्याला विदूषकाचे रंग फासले होते. सगळेच चेहरे रंगवून, रंगीबिरंगी कपडे घालून आल्याने वातावरणात लहान मुलांसारखा उत्साह आणि कुतूहल होतं. त्यामुळे सगळ्यांचे मन नवीन अनुभव घ्यायला, त्यातून शिकायला उत्सुक होतं. ‘बन-मस्का’ची टीम तर उपस्थित होतीच; पण झी युवाचा चॅनेल हेड बवेश जानवलकरही आपल्या बायकोसोबत आला होता. दोघांनीही मुलांबरोबर चेहरे रंगवून घेतले. बाकी सगळ्यांना कळलं नाही तरी टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्यांना कळेल, की एका प्रॉडक्शन हाऊसने असा कार्यक्रम ठेवायचा आणि त्याला चॅनेल हेडने यायचं म्हणजे किती विलक्षण गोष्ट आहे! पण १ एप्रिलला हा अनोखा प्रयोग सुंदररीत्या पार पडला. चाळीस विदूषकांनी मनासारख्या गंभीर गोष्टीचा हसतमुखाने, मन लावून शोध घेतला!

मी मानसोपचार घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बुद्धिमान मित्रांनी ‘‘काय गरज आहे तुला? आपण विचार करून आपले प्रश्न सोडवायचे असतात!’’ असा सल्ला दिला होता. आपल्याकडे मनाच्या आजाराविषयी खूप औदासीन्य आहे. बहुतेकांना तो आजार आहे हेच लक्षात येत नाही. बहुतेक लोकांना त्याचा ‘टाबू’ आहे. त्यामुळे आजारी व्यक्तीला मानसोपचारासाठी नेलेच जात नाही. ही परिस्थिती सुशिक्षित वर्गाची आहे. त्याहून खालच्या स्तरात तर मनाचा आजार म्हणजे त्या व्यक्तीला वेडाच ठरवलं जातं. अंगात आलेल्या भुताला उतरवण्यासाठी जालीम उपाय करून थकल्यावर मानसोपचाराची गरज असलेल्या या तथाकथित वेडय़ांना असह्य़ झालेल्या घरच्यांनी तीर्थक्षेत्री टाकून दिलेले आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं.

या सगळ्यांविषयी मला मोकळेपणाने बोलायचे होते आणि त्यासाठी मला माझ्या मित्रांनी चांगली साथ दिली आणि मी माझ्या अनुभवांची पोतडी उघडू शकलो. गेल्या वर्षी मला डिप्रेशनने गाठलं होतं. जवळपास दीड वषर्ं मी या अवस्थेत होतो. त्या अवस्थेची असह्य़ता मी भोगली होती. अनेक सहृदय मित्र, चंद्रशेखर फणसळकरसारखा डॉक्टर- मित्र, माझ्या थेरपिस्ट आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट यांच्या मदतीने मी आता त्यातून बाहेर पडतो आहे. या परिस्थितीतून जाताना मला जाणवलं की बहुतेक लोकांना मनाच्या दुखण्याचं काय करावं, हेच कळत नाही. शरीराचं दुखणं झालं की फुलं, सदिच्छा भेटी, प्रेमाचे मेसेजेस देणारे मित्र मनाचं दुखणं किंवा आजार झाला की मात्र फार चटकन् गोंधळून जातात. आधी ‘कम ऑन.. बक अप्’, ‘ही फेज आहे.. जाईल ती..’ असं म्हणूनही मी बरा होत नाही म्हटल्यावर त्यांचा पेशन्स जायला लागतो. मग ते विविध मार्ग सुचवायला लागतात- ‘तू व्यायाम कर’, ‘मन कशात तरी गुंतव’, ‘निगेटिव्ह विचार करू नकोस’, ‘कम ऑन- बी स्ट्रॉंग’ असं सांगायला लागतात. काहीजण अध्यात्माचा मार्ग सांगतात- ‘‘हे पूर्वजन्माचं संचित आहे. ध्यानधारणा कर. माझ्या गुरूंकडे ये. त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे. ते तुला या दुखण्यातून मुक्त करतील.’’ एक-दोन मित्रांच्या तर डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी या आजाराची जबाबदारी स्वत:वर घेतली. ‘‘एवढं प्रेम करतो तुझ्यावर आम्ही.. पण तुला काही त्याचा फायदाच  होत नाही! काय उपयोग मग आमच्या मैत्रीचा?’’ काहीजण म्हणाले, ‘‘तू आधी तुझा मानसोपचार थांबव! रिझल्ट येत नसेल तर  किती वर्षं करणार तो उपचार? तू उगाच तुझ्या त्या बाईवर अवलंबून राहू नकोस. तुला तिच्या आधाराचं व्यसन लागलं आहे. उद्या ती नसली तर कसे फेस करणार तू तुझे प्रॉब्लेम?’’ काहीजण अ‍ॅग्रेसिव्ह होतात- ‘‘अरे, तू किती भाग्यवान आहेस. हाती-पायी धड आहेस. जगात किती दु:खी माणसं आहेत. अनेक जणांना डोळे नाहीत, हात-पाय नाहीत, तरी ते आनंदाने जगतायत. परवा तर एका पाय नसलेल्या मुलीने एव्हरेस्ट सर केला. त्यांच्याकडून शिक काहीतरी.’’ किंवा- ‘‘ काय वाईट चाललं आहे तुझं? अमृतासारखी चांगली समजूतदार बायको आहे. काम आहे. मुंबईसारख्या ठिकाणी स्वत:चं घर आहे. दोन वेळचं खायला-प्यायला मिळतंय! बाकी काही नाही, तुला सुख बोचतंय! हे सगळे तुझ्या मनाचे चोचले आहेत.’’ ही बोलणी खायला लागली तरी मला त्याचं वाईट वाटलं नाही. कारण हे सगळे माझे जीवाभावाचे मित्र माझ्या काळजीपोटीच हे सांगत होते. पण मनाबद्दल त्यांचं भान आणि ज्ञान पुरेसं नव्हतं. ते याबाबतीत साक्षर नव्हते. बऱ्याचजणांना सायकिअ‍ॅट्रिस्ट आणि सायको-थेरपिस्ट यांच्यातला फरकही अजूनही माहीत नाहीये. आणि नुसते हे मित्रच नव्हे, तर कौन्सेलिंग करणारे आणि मानसोपचार देणारेही अनेक जण या क्षेत्राविषयी पुरेसे साक्षर नाही आहेत, हे चित्र भीतीदायक आहे. हृदयाची किंवा कुठलीही शरीराची शस्त्रक्रिया करणारा सर्जन त्याच्या क्षेत्रात  साक्षर असतो आणि त्याला त्याचे प्रॅक्टिकल ज्ञानही असते. पण मी पाहिलं आहे की, काही मनाचे डॉक्टर- म्हणजे मानसोपचारतज्ज्ञ  किंवा थेरपिस्ट, कौन्सेलर्स यांना पुरेसं प्रॅक्टिकल ट्रेनिंग नाहीये. काहीजणांना तर मनाची पुरेशी माहितीही नाहीये. मनाच्या नवीन अभ्यासाची त्यांना काही कल्पनाही नाहीये. हे सगळं भीतीदायक आहे. कारण पेशंट किंवा क्लायंट जेव्हा त्यांच्याकडे जातो, तेव्हा तो मनाच्या अत्यंत नाजूक स्थितीत असतो. कौन्सेलर जे बोलेल त्यामुळे त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम होऊ  शकतो. माझ्या काही मित्रांना कौन्सेलरनी हानीकारक सल्ले दिलेले आहेत. हे होण्याचं एकमेव कारण म्हणजे मनाच्या क्षेत्राविषयी असलेला साक्षरतेचा आणि त्याच्या ट्रेनिंगचा अभाव!

म्हणजे एक तर कौन्सेलर कमी; आणि त्यात त्यांचे पुरेसे शिक्षण नाही. शिवाय या प्रकारच्या आजारी व्यक्तींची संख्या किती आहे हे पाहिलं तर या चित्रातली दाहकता लक्षात येईल. NIMHANS संस्थेने ७ फेब्रुवारी २०१७ रोजी-  म्हणजे जागतिक मन:स्वास्थ्य दिनी प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, भारतात किमान सात कोटी लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. आणि त्यांच्या उपचारासाठी डॉक्टर आहेत फक्त ४०००! त्यातले बहुतेक डॉक्टर शहरी आणि निम-शहरी भागांत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मानसिक रुग्ण या उपचारांपासून वंचितच आहेत.

ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागरण होण्याची गरज आहे की- मानसिक आजार हा खरा असतो आणि त्यावर योग्य ते उपचार केले तर रोगी बरा होऊ  शकतो! पण त्यासाठी आपल्याला या आजाराकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे.

माझी कार्यशाळा हा त्याचाच एक प्रयत्न होता. मी त्यामध्ये नव्याने शिकलेल्या ‘Internal Family Systems’ ही Richard Schwartz  ( रिचर्ड श्वार्ट्झ) यांच्या मॉडेलची माहिती दिली. ती वापरल्याने माझ्यात आता चांगलीच सुधारणा व्हायला लागली आहे. मी आता ओक ट्री, इलिओनि येथील रिचर्ड श्वार्ट्झ यांच्या संस्थेला भारतात त्यांचे ट्रेनिंग देण्याची विनंती केली आहे. http://www.selfleadership.org ही त्यांची साइट आहे. त्यावर या मॉडेलची माहिती आणि उपयुक्तता कळू शकेल.

आज हे काम करणे ही काळाची गरज आहे. यासाठी या क्षेत्रातील पूर्णवेळ मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. आपला समाज आणि कौन्सेलर्स साक्षर झाले पाहिजेत. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचे मानसिक आरोग्य चांगले होईल आणि मग साऱ्या समाजाचे होण्याच्या दिशेने आपण महत्त्वाचे पाऊल टाकू. ज्यांना हे काम करण्यात रस आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अशा सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचे काम मी करू शकेन.

जाता जाता पुन्हा तेंडुलकर! मी आधी मानसोपचार घ्यायला तयार नव्हतो, कारण मला माझ्यात काही प्रॉब्लेम आहे असं वाटतच नव्हतं! किंवा असं म्हणूयात की, माझ्यात प्रॉब्लेम आहे याचं मला भानच नव्हतं. I did not know that I did not know!  पण माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात तेंडुलकर होते! त्यांनी मला मानसोपचार घ्यायला तयार केलं. त्यांची मुलगी प्रिया तेंडुलकर गेली तेव्हा त्यांनी  स्वत: मानसोपचार घेतला होता. त्यांच्या मनात त्याविषयी काही टाबू नव्हता! किंबहुना, त्यांनी सतत बदलणाऱ्या काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. नवीन गोष्टी सतत कुतूहलाने पाहत राहिले. सतत शोधत राहिले. त्यामुळे त्यांना तोंडाला रंग लावून भान हरपून नाचता आलं नसलं तरी इतर अनेकांच्या आयुष्यात त्यांच्या नुसत्या असण्याने त्यांनी अगणित रंग भरले! त्यांना सलाम!

संदेश कुलकर्णी ifssandesh@gmail.com