‘फेसबुक’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरील सॅन्डबर्ग यांनी लिहिलेल्या ‘लीन इन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक पाध्ये यांनी केला आहे. सरस्वती पब्लििशग कंपनीने हे पुस्तक मराठी पुस्तकांच्या दालनात आणल्यामुळे स्त्रीवादी तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकांमध्ये एक मोलाची भर पडली आहे. तसे पाहता स्त्रियांनी गुलामगिरीचे जोखड फेकून देऊन मोकळा श्वास घ्यायला सुरुवात करूनही बरीच वर्षे झाली आहेत. स्त्री-पुरुष समानतेची भाषा आता समाजाच्या एका कोपऱ्यात तरी हळू आवाजात का होईना, बोलायला सुरुवात झाली आहे. घर-संसाराचा गाडा एकटय़ाने हाकण्यापेक्षा दोघांनी हाकला तर जगण्याची गुणवत्ता भौतिक पातळीवर तरी वाढते, हा अनुभव जगभरातला समस्त मध्यमवर्ग घेत आहेच. स्त्रियांसाठी वज्र्य असलेली क्षेत्रे आता फारशी उरलेली नाहीत. त्यामुळे वरकरणी पाहता स्त्रीवादाचा विजय होऊन समानतेच्या पातळीवर येण्याचा स्त्रियांचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असे वाटत असतानाच शेरील सॅन्डबर्ग यांचे हे पुस्तक स्त्री व पुरुष दोघांनाही कठोर वास्तवाच्या जमिनीवर आणते.

अमेरिकेसारख्या विकसित देशातसुद्धा अजूनही स्त्रिया परंपरेच्या जोखडातून बाहेर पडलेल्या नाहीत, हे लेखिका अनेक पाहण्यांच्या निष्कर्षांवरून सप्रमाण उलगडून दाखवते. अर्थार्जनासाठी घरातून बाहेर पडणे आणि स्वतच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पावले उचलणे यांतील फरक लेखिका अधोरेखित करते. परिणामी उच्च व्यवस्थापनाच्या पातळीवर कर्तृत्ववान स्त्रियांचे प्रमाण अजूनही नगण्यच आहे. स्वतची दुय्यम भूमिका कोणतेही कारण नसताना स्त्रिया त्यांच्या न कळत्या वयात मान्य करतात. आणि त्याच भूमिकेस कायम पकडून ठेवत कोणती महत्त्वाकांक्षा मनात निर्माणच होऊ न देता कायम दुय्यम स्थानावर राहण्यात त्या समाधान मानतात. उच्च पदांसाठीच्या स्पर्धेतून माघार घेत आपण एक चांगली स्त्री आहोत, असे स्वतला बजावत राहतात. घराबाहेर पडणाऱ्या स्त्रिया- मग त्या कोणत्याही देशातल्या असोत- आपण घरासाठी कमी वेळ देतो, या अपराधीपणाच्या भावनेने पछाडलेल्या असतात. उच्च पदावर जाण्याऐवजी आपल्या मुलांनी आपल्याला चांगली आई म्हणणे त्यांना अधिक गरजेचे वाटते. चांगल्या आईचे निकष पूर्वापार चालत आलेले असतात. पण काळानुसार त्यात बदल करण्याची गरज असते, हे या बुद्धिमान स्त्रियाही विसरतात. याचा परिणाम जगाच्या सुधारणेचा विचार करणाऱ्या लोकसंख्येतील निम्मी संख्या आधीच बाद होते. आज जगभरात ज्या सुधारणा दिसत आहेत, त्या स्त्रियांच्या या निम्म्या लोकसंख्येच्या मतांशिवायच!

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

‘लीन इन’ याचा अर्थ आपल्या अंतरंगात डोकावून पाहा. लेखिकेने समस्त वाचकवर्गाला केलेले आवाहन अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक आहे. स्वतच्या व्यक्तिगत आयुष्याचा आढावा घेत शेरील सॅन्डबर्ग यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे थेटपणे बुद्धीला, भावनेला आणि मनाला जाऊन भिडते. त्या लिहितात, ‘मला आयुष्यभर असे सांगण्यात आले आहे, की कामाच्या जागी नेहमीच असमानता असते. आणि एकाच वेळी आपला व्यवसाय व संसार सांभाळणे अत्यंत कठीण असते.’ शेरील सॅन्डबर्ग यांनी या आव्हानास यशस्वीरीत्या तोंड दिले. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे- सर्वच स्त्रियांमध्ये ही क्षमता असू शकते, त्यामुळे स्त्रियांनी आपल्या मनात डोकवावे, आपले सुप्त गुण हेरावेत आणि त्यानुसार आपली महत्त्वाकांक्षा फुलवावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.

एका महत्त्वाच्या मुद्दय़ावर सॅन्डबर्ग पुन:पुन्हा लिहीत राहतात. तो मुद्दा म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये खरीखुरी समानता आणायची असेल तर अधिकारपदांवर जास्तीत जास्त स्त्रिया येणे आवश्यक आहे, तरच खरी समानता अवतरेल. अधिकारपदावर सातत्याने काम करणाऱ्या शेरील सॅन्डबर्ग गृहिणी व दोन मुलांच्या माता आहेत. कामानिमित्त जगभर फिरणाऱ्या, अत्यंत महत्त्वाचे निर्णय सहजगत्या घेणाऱ्या आणि अधिकारपदाच्या स्पर्धेत सतत राहण्यासाठी वेळ आणि गुणवत्ता पणाला लावणाऱ्या सॅन्डबर्ग जेव्हा आई म्हणून त्यांचे अनुभव लिहितात, ते वाचताना ही कर्तृत्ववान स्त्री आपली मत्रीण असल्यासारखी वाटते.

हे पुस्तक तयार करण्यासाठी लेखिकेने खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची मदत मिळवली आहे. आपल्या स्त्रीवादी विचारसरणीवर अकारण ताशेरे ओढले जाऊ नयेत यासाठी प्रत्येक मुद्दा माहितीच्या आधारेच त्यांनी मांडला आहे. लेखिकेने या पुस्तकाची विभागणी अकरा प्रकरणांमध्ये केली आहे. नेतृत्वगुणाला महत्त्वाकांक्षेची साथ नसेल तर उच्चपद प्राप्त करणे हे एक मृगजळच वाटू शकते. शेरील सॅन्डबर्ग यांनी हा ताळमेळ व्यवस्थित घातला. त्यांच्यातील अंगभूत नेतृत्वगुणांना महत्त्वाकांक्षेचे पंख लावले आणि त्या फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. त्यांच्या या जडणघडणीचे श्रेय त्यांनी प्रथम स्त्री-पुरुष समानतेचा अनुभव देणाऱ्या आई-वडिलांना आणि नंतर पती डेव्ह यांना दिले आहे. स्त्रीची महत्त्वाकांक्षा आणि संसारातील पती-पत्नीची खरीखुरी भागीदारी यांचे समीकरण त्यांनी अनुभवले. मुलांना वाढवणे हे काम आपलेच आहे हे स्त्रियांच्या मनावर ठसवले गेले नाही तरच त्या मुलांच्या संगोपनात पतीची भागीदारी मिळवू शकतील असे त्यांना वाटते.

हे पुस्तक वाचताना प्रश्नांची वादळे मनात घोंगावू लागतात. जगभरातल्या स्त्रीवादाशी आपले िबदुवत नाते जाणवत राहते. स्वततील नेतृत्वगुणांची आहुती देणाऱ्या लक्षावधी स्त्रिया डोळ्यांसमोर येतात. त्यांची आहुती अनावश्यक होती, हे शेरील सॅन्डबर्ग यांनी दाखवून दिले आहे. येणाऱ्या पिढय़ांमधील स्त्री-पुरुषांनी ही परंपरा नक्की थांबवली पाहिजे, हे पुस्तक वाचून झाल्यावर स्पष्टपणे मनावर उमटते. पुस्तकातील मूळ इंग्रजी वाक्यरचनांना अनुवादक पाध्ये यांनी कुठेही धक्का लावलेला नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. स्त्रीवादी चळवळीतले हे जोमदार पुस्तक पुरुष वाचकांच्याही पसंतीस उतरावे, ही अपेक्षा.

‘लीन इन’- शेरील सॅन्डबर्ग,

अनुवाद- अशोक पाध्ये,

सरस्वती पब्लिशिंग कंपनी,

पृष्ठे- २१२, मूल्य- २०० रुपये.

मेधा राजहंस medharajhans@gmail.com