|| अरुणा अन्तरकर

बुजुर्ग अभिनेत्री सुलोचनादीदी यांचा ३० जुलै रोजी ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने..

Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

मराठी कवितेतली आई आधी जन्मली की सुलोचनादीदी? सनावळ्या ढुंढण्याची किंवा बुद्धिकर्कश होण्याची गरज नाही. सुलोचनादीदींच्या बाजूनं उत्तर देणं चांगलं आहे. पटणारं आहे. नाही तर ‘वात्सल्यसिंधू’, ‘प्रेमस्वरूप’ हे शब्द कुठून आले असते? सुलोचनादीदींमुळे या शब्दांचा अर्थ समजण्याकरता शब्दकोश पाहण्याची गरजच पडली नाही. त्यांना ‘सुलोचना’ नावाचा चेहरा मिळाला. ‘फिल्मफेअर’नं फार पूर्वी- जेव्हा फिल्मी नियतकालिकं नट-नटींच्या बेडरूममध्ये न डोकावता त्यांच्यातला माणूस पाहायचा प्रयत्न करायची- त्या काळात मीनाकुमारीचं ‘नेशन्स स्वीट हार्ट’ असं (सार्थ) वर्णन केलं होतं. त्या चालीवर सुलोचनादीदींना ‘नेशन्स गोल्डन हार्ट’ म्हणायला हवं. ‘मदर इंडिया’ हा किताब नर्गिसच्या नावावर जमा आहे आणि निर्विवादपणे तो तिचाच असेल. पण पडद्यावरची ‘बेस्ट’ आई कोण, यावर ‘पोल’ घेतला तर दीदी बिनविरोध ‘मदर इंडिया’ ठरतील. त्यामागे आई म्हणून केलेल्या भूमिकांचं संख्याबाहुल्य असेल, तशीच विश्वासार्हताही असेल. ‘एकटी’ आणि ‘मोलकरीण’ या चित्रपटांमधून त्या आधी महाराष्ट्राच्या आई झाल्या आणि नंतर यथावकाश ‘मदर इंडिया’ झाल्या.

हिंदी चित्रपटातल्या चरित्र अभिनयाची महिला आघाडी मराठी अभिनेत्रींनीच संपन्न केली आहे. दुर्गा खोटे आणि ललिता पवार यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा रीमापर्यंत चालू राहिली. सुलोचना हे या मालिकेतलं नुसतं उल्लेखनीय नाव राहिलं नाही, तर हिंदी रजतपटावरच्या ‘टॉप टेन मदर्स’मध्ये ते समाविष्ट झालं.

सांगून विश्वास बसणार नाही, पण अगदी थोडय़ाच दूरच्या भूतकाळामध्ये नायिकांनाच नाही, तर चरित्र अभिनेत्रींनासुद्धा वाव असायचा. ‘मुगले आझम’, ‘दादी मां’ आणि ‘बिदाई’मधल्या दुर्गा खोटे अन् ‘अनाडी’, ‘श्री ४२०’, ‘घराना’ आणि ‘प्रोफेसर’ या चित्रपटांमधल्या ललिता पवार व ‘दीवार’मधली निरुपा रॉय या चरित्रनायिका होत्या. लाडावलेल्या मुलांना आलू के पराठे आणि गाजर का हलवा खिलवणं एवढंच त्यांचं काम नव्हतं. हिंदी चित्रपटाचा नायक परमेश्वराच्या ‘स्टेटस’ला पोचला तरी त्याचंही पान ‘मां’शिवाय हलत नव्हतं. सुलोचनादीदी दुर्गाबाई, ललिताबाई आणि निरुपा रॉय यांच्याइतक्या सुदैवी नव्हत्या. पहिल्या दोघी ‘टिपिकल’ प्रेमळ आईइतक्याच खाष्ट सासवा किंवा सुस्वभावी, पण कुटुंबावर वचक ठेवणाऱ्या करडय़ा, कर्त्यां स्त्रियाही वाटायच्या. त्यामुळे त्यांना वैविध्यपूर्ण, दमदार भूमिका मिळाल्या. मानवी स्वभावाचे कंगोरे आणि राखाडी छटा दाखवणाऱ्या भूमिका दीदींना हिंदीत कमीच मिळाल्या. ‘वहिनीच्या बांगडय़ा’, ‘एकटी’ आणि ‘मोलकरीण’ यांसारखे त्यांच्याभोवती फिरणारे चित्रपट त्यांना हिंदीत मिळाले नाहीत. ‘सुजाता’मधून हिंदीत चरित्र अभिनयाचा डाव सुरू करण्याआधी दीदींनी नायिका म्हणून ३०-४० तरी चित्रपट केले असतील. त्यात मोतीलालसारख्या श्रेष्ठ नटाबरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही होता. पण सामाजिक चित्रपटांपेक्षा पौराणिक चित्रपट जास्त मिळू लागले तेव्हा दीदींनी हिंदीकडे पाठ फिरवून मराठीवर लक्ष केंद्रित केलं. याचा त्यांना उत्तम लाभ मिळाला. ‘मोलकरीण’सारखे सर्वस्वी त्यांना महत्त्व देणारे (आणि त्या काळात सुपर हिट् ठरलेले) चित्रपट त्यांना मिळाले. हिंदीत पौराणिक चित्रपटांना आणि त्यातल्या कलाकारांना तितकासा मान नव्हता. गमतीदार योगायोग म्हणजे चरित्र अभिनयात जिच्याशी त्यांची स्पर्धा होती, त्या निरुपा रॉयनं याच कारणाकरता पौराणिक चित्रपटांमधलं नायिकापद नाकारून लहान वयातसुद्धा आईच्या भूमिका करण्याचा निर्णय घेतला. तिचाही निर्णय योग्य ठरला. ‘अमिताभची आई’ अशी तिची नवी ओळख निर्माण झाली.

अमिताभ आणि अ‍ॅक्शनपट यांच्या उदयापासून हिंदी चित्रपटातल्या आईच्या महत्त्वाला ओहोटी लागली. तिचं अस्तित्व कायम होतं; पण नायिकेप्रमाणेच नायकावर प्रेम करण्यापलीकडे तिला काम उरलं नाही. यामुळेच असेल, चरित्र अभिनयातल्या पूर्वसुरींसारख्या दमदार, कंगोरेदार, वेगळ्या भूमिका हिंदी चित्रपटांत दीदींच्या वाटय़ाला आल्या नसाव्यात. त्यांचं सोज्वळ रूप (खरं म्हणजे लावण्यच म्हणायला हवं.), त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला गोडवा आणि ऋजुता हे चाकोरीबाहेरच्या भूमिका न मिळण्याचं दुसरं कारण असावं. ‘पायदळी पडलेली फुले’ या चित्रपटातल्या त्यांच्या वेगळ्या भूमिकेचा आज म्हणूनच उल्लेख होत नसावा. त्या चित्रपटात त्या (चक्क) महिला पोलीस इन्स्पेक्टर होत्या. चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या प्रियकराच्या हातात बेडय़ा ठोकण्याचं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा ही स्त्री दाखवते. पण चेहऱ्यावर चांदणं विलसणाऱ्या स्त्रीच्या हातात पोलिसी काठी किंवा बेडी बघणं त्या काळातल्या प्रेक्षकाला मानवलं नसावं. आजच्या प्रेक्षकाला कलाकारांना ‘रोमँटिक’ आणि ‘अँटी’ या दोन्ही रूपांमध्ये स्वीकारण्याची सवय लावण्यात आली आहे. ती त्या काळात नव्हती. त्याची झळ कलाकाराला सहन करावी लागते, हे खरं. पण दुसऱ्या बाजूनं विचार केला तर असा अस्वीकार हा कलाकाराला ‘कॉम्प्लिमेन्ट’सुद्धा असतो.

‘माझं घर, माझी माणसं’ या चित्रपटातल्या दीदींच्या सुंदर भूमिकेचा उल्लेख कमीच होतो. अरविंद गोखले यांच्या ‘अविधवा’ या सुंदर कथेवर आधारलेल्या या चित्रपटाची नायिका लग्नाआधीच विधवा होते. अपघातामध्ये तिचा जोडीदार मृत्युमुखी पडतो. तरीही त्याच्या आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी ती त्या घराशी सुनेचं नातं कायम ठेवते.

या चित्रपटातला दीदींचा ‘लूक’ वेगळा होता. भूमिकेचा तोंडवळा स्वत:पेक्षा इतरांच्या सुखाला महत्त्व देणाऱ्या सुस्वभावी स्त्रीचा होता. पण त्याग, आर्य स्त्री, भारतीय संस्कृती यांच्या दडपणाखाली ही स्त्री दबलेली, गुदमरलेली नव्हती. तिचा पोशाख (अर्थात साडीच!) साधा आणि मर्यादशील होता. पण त्या काळातल्या कोणत्याही तरुणीसारखा होता. ही स्त्री साधी भाषा बोलत होती, हसत होती. पारंपरिक नऊवारी, ग्रामीण रूपातल्या नायिकेपेक्षा ही नायिका वेगळी व आधुनिक वाटत होती. आणि जवळचीसुद्धा! तिचं जगावेगळं विधवापण तिच्या सौभाग्यापेक्षा मोठं होतं.

राजा परांजपे यांच्या सुंदर सामाजिक चित्रपटांमध्ये सुलोचना दिसत नाही, ही रूखरूख राजा ठाकूर यांच्या या सुरेख चित्रपटानं दूर केली. अर्थात कलाकारांचं डॉक्टरसारखं नसतं. एकच एक काम करणाऱ्या डॉक्टरला ‘स्पेशालिस्ट’ म्हटलं जातं. पण एकाच प्रकारच्या भूमिका करणारा कलाकार मात्र साचेबद्ध किंवा एकसुरी ठरवला जातो. त्या प्रकारच्या भूमिका करण्यातलं त्याचं ‘स्पेशलायझेशन’ लक्षात घेतलं जात नाही. अशा वेळी अस्सल कलाकार नाउमेद न होता दुसरा समंजस मार्ग पकडतो. आपल्याला जी भूमिका मिळते ती आवडून घेतो आणि जीव ओतून काम करतो.

सुलोचनादीदींनी एक नाही, दोन नाही, तर दोनशे पन्नास (हिंदी व मराठी मिळून) चित्रपटांमध्ये हे अवघड काम सहजपणे करून दाखवलं आहे. एखाद् दुसऱ्या चित्रपटात हाती येणाऱ्या एखाद्या क्षणाच्या दृश्याचं त्यांनी सोनं केलं आहे.

इथे जे. पी. दत्ता यांच्या ‘गुलामी’ या चित्रपटातला एक प्रभावी प्रसंग आठवतो. सावकाराच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आणि बंदूक हाती घेणाऱ्या शेतकरी नायकाची आई दीदींनी या चित्रपटात साकारली आहे. नायकाच्या अनुपस्थितीत क्रूर (आणि भेकड) सावकार त्याच्या कुटुंबीयांना इतकं छळतो, की त्या असहाय स्त्रीला वेड लागतं. तिचा मुलगा परत येतो तेव्हा ती त्याला ओळखतच नाही. तो सावकारच आहे असं समजून भयभीत झालेली ती जिवाच्या आकांताने ओरडत राहते, त्याला निघून जायला सांगते. या प्रसंगातला दीदींचा चेहरा, त्यांच्या नजरेतलं भय आणि प्रतिकाराचा आवेश इतका जिवंत उतरला आहे, की मन एकाच वेळी सुन्न आणि संतप्त होतं. या वृद्ध ग्रामीण स्त्रीचा आकांत जसा जीवघेणा आहे, तसाच ‘सुजाता’मधल्या शहरी, मध्यमवर्गीय आईची उलघाल हृदयाला भिडणारी आहे. या स्त्रीचा सज्जन नवरा एका अस्पृश्य तान्ह्य़ा मुलीला घरी आणतो, स्वत:च्या मुलीसारखा सांभाळ करतो. पोटच्या पोरीपेक्षा या मुलीला झुकतं माप देऊन तिला वाढवतो. त्याच्या पत्नीच्या मनातही या मुलीबद्दल दयाभाव आहे, मात्र प्रेम नाही. तिला त्या मुलीच्या जातीपातीशी देणंघेणं नाही. परंतु घराबाहेरच्या मुलीला आपल्या लेकीपेक्षा मिळणारं महत्त्व तिला खटकतं. काळजी लावतं. मूळच्या चांगल्या, पण मायेनं साशंक झालेल्या या स्त्रीची मन:स्थिती व्यक्त करताना दीदी टिपं गाळत नाहीत किंवा आदळआपट करत नाहीत. नजरेतली नाराजी, चेहऱ्यावरचा हिरमुसला भाव सारं काही तोंडानं न बोलता सांगून जातात. लक्षात राहणारे असे क्षण मोजके असतात. परंतु खऱ्या कलाकाराची ओळख पटवायला ते पुरेसे असतात.

बेळगावजवळच्या एका आडगावात वाढलेली, सिनेमाच्या वेडामुळे त्यांच्या जाहिरातींच्या गाडीमागे धावणारी, शिक्षणाशी बेताचा संबंध आलेली सुलोचना लाटकर नावाची अत्यंत सुस्वरूप, पण बुजरी स्त्री २५० चित्रपटांचा पल्ला गाठते, कारण लावण्याप्रमाणेच अभिनय ही तिला मिळालेली देवदत्त देणगी आहे. पण नुसत्या देणगीच्या बळावर एवढी कर्तबगारी दाखवता येत नाही, की जनमानसात अढळ स्थान मिळवता येत नाही. त्याकरता अपार कष्ट करावे लागतात. अमाप सहन करावं लागतं. दीदींनी हे केलं. निष्ठेनं केलं. त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. दीदींचे गुरू भालजी पेंढारकर यांनी दीदींची भाषा सुधारावी म्हणून एक संस्कृत मासिक त्यांच्याकरता लावलं. ते वाचणं हे चांगलंच क्लिष्ट काम होतं. पण त्याबद्दल तक्रारीचा चकार शब्द न काढता दीदी चिकाटीनं त्या भाषादिव्यातून गेल्या. त्यांची थट्टा व नक्कल करणारे महाभाग ‘पारिजातक’च्या चित्रिकरणाच्या वेळी दीदी संस्कृतप्रचुर संवाद अस्खलितपणे बोलताना पाहून थक्क झाले आणि दिलदारपणे शाबासकीही देते झाले.

मराठी चित्रपटांतच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात ‘सुलोचना’ या नावाबद्दल अथांग आपुलकी व आदर आहे. ही दीदींची खास कमाई आहे. पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या कलाकारांना पडद्यामागे एवढा मान, एवढा आदर मिळतोच असं नाही. कलाकाराचा पडद्यावरचा आणि त्यामागचा चेहरा एकसारखा असतो असंही नाही. मात्र, दीदींच्या या दोन्ही रूपांमध्ये फरक नाही. त्यामुळे हे घडलं आहे.

पडद्यावर कारुण्यमूर्ती म्हणून दिसणाऱ्या दीदी प्रत्यक्षात सतत हसत असतात. त्यांच्या घरी फोन केला तर ‘त्या पूजेत / अंघोळीत आहेत’ अशी ठराविक उत्तरं कधी ऐकावी लागत नाहीत. ‘त्या सिनेमा बघताहेत’ हे मिळणारं उत्तर मला बेहद्द आवडतं आणि मग त्या भेटल्या नाहीत तरी निराशा होत नाही. त्या भेटतात तेव्हा कमी बोलतात आणि जास्त हसतात. या हास्यात नितळपणा असतो. नव्या-जुन्यांबद्दल टीका-टिप्पणी नसते. हास्यविनोदाच्या नावाखाली मनातला विखार बाहेर पडत नसतो.

‘एकटी’चं प्रीमियर दादरच्या ‘कोहिनूर’ थिएटरमध्ये झालं तेव्हा मीनाकुमारी उपस्थित होती. ती दहा-पंधरा मिनिटंच थांबणार होती. पण चित्रपटात इतकी रमली, की शेवटपर्यंत थांबली. मध्यंतरात पत्रकारांनी विचारलं, ‘‘चित्रपट बघताना भाषेची अडचण वाटते का?’’ तेव्हा दीदींच्या दिशेनं बघत मीनाकुमार उत्तरली, ‘‘चांगला चित्रपट आणि चांगला अभिनय कळण्यासाठी भाषेची गरजच कुठे असते? अभिनय की भाषा नहीं होती!’’ ‘वहिनीच्या बांगडय़ा’वरून निघणाऱ्या ‘भाभी की चुडिया’चं काम सुरू होण्यापूर्वी मीनाकुमारीला मूळ चित्रपट दाखवण्यात आला. तो पाहिल्यावर मीनाकुमारीनं म्हटलं, ‘‘या भाभीनंतर दुसरी कुणी भाभी लोक स्वीकारतील असं नाही वाटत!’’

‘मुक्ती’मध्ये घर सोडून जाणाऱ्या नायकाला थांबवण्याकरता एक लांबलचक संवाद बोलायचा होता. दीदींनी त्याची सुरुवात हिंदीतून केली आणि अर्धा भाग त्या मराठीत बोलल्या. हे लक्षात आलं तेव्हा मोतीलालना त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या लक्षात आलं नाही, पण तुमच्या तर आलं असणार! मला थांबवलं का नाहीत?’’ मोतीलाल स्निग्ध हसून म्हणाले, ‘‘तुम्ही इतकं मनापासून बोलत होता, मीही हरवून गेलो. लक्षातच आलं नाही. खरं म्हणजे हा ‘पीस’ असाच ठेवायला हवा!’’

दीदींना भेटलं की असे सुंदर किस्से ऐकायला मिळतात. तिथे क्षुद्र उखाळ्यापाखाळ्याच काय, आत्मचरित्रात्मक आठवणींना आणि भूतकाळालाही थारा नसतो. त्यांनी मराठीतल्या किती जणांना काय काय मदत केली, हे जगजाहीर आहे. त्यांच्या निखळ चांगुलपणाचा उल्लेख करायलाच हवा. त्यामुळे आणि माणसांच्या लळ्यामुळेच आयुष्याच्या नव्वदीपर्यंत येणं जमलं असणार त्यांना! पण सगळ्या चांगल्या गोष्टींत एक अपूर्णता असते, तशी इथेही आहेच. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ साधारणत: ८० व्या वर्षांनंतर देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. दीदींना शतायुषी झालेल्या पाहायला मिळावं म्हणून हा सन्मान थांबवून ठेवला आहे का?