चोरी, तस्करी, अपहरणे आणि १२४ जणांच्या पाशवी हत्या- अशी भीषण कृत्ये करून सतत २० वर्षे तीन राज्यांच्या पोलीस दलांना गुंगारा देणाऱ्या क्रुरकर्मा वीरप्पनला यमसदनाला धाडणारे पोलीस अधिकारी के. विजय कुमार लिखित आणि डॉ. सदानंद बोरसे अनुवादीत ‘वीरप्पन विरुद्ध विजय कुमार’ हे पुस्तक लवकरच राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील निवडक भाग..

ऑक्टोबर, २००४.

‘‘सर आनंदाची बातमी.’’ उत्साहानं फुललेला कण्णन धावतच माझ्या खोलीत शिरला अन् सांगू लागला, ‘‘वीरप्पनच्या टोळीनं ‘क्ष’शी पुन्हा संपर्क साधलाय. त्यांनी त्याला निरोप दिलाय की, धर्मपुरीतल्या एका चहाच्या दुकानात त्यांच्या जासुदाची भेट घ्यावी.’’

मी चमकून वर पाहिलं. वीरप्पनला भेटण्याचा दुराईचा दुसराही प्रयत्न अयशस्वी ठरला होता, त्याला आता दोन महिने उलटून गेले हाते.

मधल्या काळात दुसऱ्या एका प्रकरणात ‘क्ष’नी आम्हाला मदत केली होती अन् स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली होती. त्या प्रकरणात आमचा प्रतिनिधी म्हणून काम करणारी व्यक्ती दूरान्वयानंही एसटीएफशी संबंधित दिसणारी असू नये, अशी आमची योजना होती. मग आम्ही आमचा प्रतिनिधी म्हणून निवड केली – कण्णनच्या वडिलांची. कण्णनचे वडील नवनीत कृष्णन भारतीय हवाईदलातील निवृत्त अधिकारी होते. वयाची साठी ओलांडली असली, तरी तब्येतीनं तंदुरुस्त अन् डोक्यानं तल्लख होते. एक पाकीट एका विशिष्ट व्यक्तीकडून एका विशिष्ट स्थळाहून आणण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ते पाकीट घेतलं, आपला पाठलाग होत नाही ना याची योग्य प्रकारे खात्री करून घेतली आणि ते पाकीट योग्य हाती सोपवून कामगिरी यशस्वी केली. एखाद्या निष्णात गुप्तहेराच्या सफाईनं त्यांनी हे काम केलं.

कण्णननं आता आणलेल्या बातमीनं आमची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली.

‘‘त्यांचा निरोप आणला कुणी?’’ मी विचारलं.

‘‘सर, तुम्हाला ‘ब्लँकेट’ आठवतोय?’’ कण्णन सांगू लागला, ‘‘त्याच्या मुलाच्या शिक्षणाची अन् संगोपनाची जबाबदारी आपण घेतली तर खबऱ्या म्हणून काम करायची त्यानं तयारी दाखवली होती. आपल्या सुदैवानं ‘क्ष’ला निरोप पाठवायला वीरपन्न टोळीनं नेमकी ब्लँकेटची निवड केली. ब्लँकेटनं लगेच आपल्याला ही बातमी दिली आणि हो, ‘क्ष’नीसुद्धा आपणहून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्याला दोघांकडून ही बातमी कळलीये आणि त्यांना मात्र आपसात दुसऱ्या कुणी ती बातमी सांगितल्याचा पत्ता नाहीये. या खबरीच्या पक्केपणाचा याहून चांगला पुरावा काय असणार?’’

‘‘याचा अर्थ वीरप्पननं ट्रेडरला या सगळ्याच्या बाहेर ठेवायचं ठरवलेलं दिसतंय.’’ मी अंदाज केला, ‘‘आपण धर्मपुरीत ‘क्ष’वर नजर ठेवू. साध्या वेशातल्या पोलिसांची त्याच्यावर सावलीसारखी पाळत ठेवा. मात्र तोच तोच माणूस सारखा त्याच्या अवतीभोवती वावरताना आढळणार नाही याची काळजी घ्या.’’

१६ ऑक्टोबर रोजी ठरलेल्या वेळी ‘क्ष’ धर्मपुरीत त्या चहाच्या दुकानात पोहोचला. आपली आर्थिक संपन्नता तिथे कुणाला जाणवणार नाही, याची त्यानं काळजी घेतली होती. काही वेळानं अचानक लाल्या ‘क्ष’पाशी आला अन् विचारू लागला, ‘‘इकडच्या बाजूच्या खुर्चीवर कुणी बसलंय का?’’ ‘क्ष’नं ‘नाही’ म्हणून सांगितल्यावर लाल्या तिथे बसला. लाल्यानं एक कप चहाची ऑर्डर दिली. या सगळ्या वेळात त्यानं ‘क्ष’कडे ढुंकूनही पाहिलं नाही. थोडय़ा वेळानं लाल्याचा चहा आला. चहाचे एक-दोन घुटके घेतल्यावर लाल्या ‘क्ष’ला म्हणाला, ‘‘तुमच्या समोरची ती साखरेची वाटी जरा सरकवता का?’’ ‘क्ष’नी वाटी त्याच्या पुढय़ात दिली.

‘‘तुम्ही या गावात नवखे दिसता, हो ना?’’ लाल्यानं विचारलं.

‘‘हो, मी एका कामासाठी चाललोय. वाटेत इथे थोडा वेळ थांबलो.’’ ‘क्ष’ही लाल्याचाच सूर पकडून बोलू लागला. दोन अनोळखी माणसं हवापाण्याच्या गप्पा मारताहेत, असंच पाहणाऱ्याला वाटलं असतं.

थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर लाल्यानं पवित्रा बदलला. ‘क्ष’च्या जवळ झुकून तो कुजबुजला, ‘‘अण्णा बाहेर यायला तयार आहेत.’’

‘‘अरे, पण तो लेकाचा आहे कुठे?’’ ‘क्ष’नं विचारलं, ‘‘आणि मी धाडलेल्या माणसाला तो भेटला का नाही?’’

लाल्यानं खांदे उडवले अन् म्हणाला, ‘‘अण्णांचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे. कुठलीही गोष्ट ते दोन-दोन, तीन-तीन वेळा तपासून खात्री करून घेतात. या माणसावर आपण पुरा भरवसा ठेवू शकतो, हे त्यांना पक्कं करून घ्यायचं असतं. त्यांची लांबूनसुद्धा त्या माणसावर बारीक नजर असते. तुमच्या माणसाबद्दल त्यांची खात्री पटलीय. पण तो जेव्हा जंगलात आला होता तेव्हा आजूबाजूला खूप एसटीएफवाले फिरत होते. आता त्यांचं प्रमाण बरंच कमी झालंय.’’

‘‘आणि अगदी सुरुवातीला ज्यानं मला निरोप दिला, तो कुठाय?’’ ‘क्ष’ ट्रेडरबद्दल चौकशी करत होता.

‘‘त्याचं काम संपलंय. अण्णांच्या पुढच्या बेताबद्दल त्याला जास्त काही सांगायची गरज नाही.’’ लाल्यानं काहीसं तुटकपणे सांगितलं, ‘‘आता तुमचं सगळं विचारून संपलं असेल, तर मी तुम्हाला अण्णांचा निरोप सांगतो.’’

‘‘हो हो, माझ्यासाठी तोच तर महत्त्वाचा आहे.’’ ‘क्ष’ घाईघाईनं नरमाईच्या सुरात म्हणाला, ‘‘काय सांगितलंय अण्णांनी?’’

‘‘अण्णा १८ ऑक्टोबरला जंगलातून बाहेर येतील. पापरापट्टी पोलीस स्टेशनजवळ चौकात रात्री दहा वाजता तुमच्या माणसाला थांबायला सांगा. जर त्या दिवशी त्याला कुणी भेटलं नाही तर त्यानं २० ऑक्टोबरला परत यावं. २० तारखेलाही कुणी भेटलं नाही, तर २२ ऑक्टोबरला. तुमच्या माणसाची अण्णांशी भेट होईल.’’

मग आजूबाजूला आपल्यावर कुणी नजर ठेवून नाही ना, याची लाल्यानं खात्री करून घेतली आणि खिशातून एक लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. ते तिकीट त्यानं ‘क्ष’ला दाखवलं. त्याच्यावरचा क्रमांक होता- ‘००७७१०’. त्यानं एक नाटय़पूर्ण आविर्भाव करून त्या तिकिटाचे दोन तुकडे केले आणि त्यातला एक तुकडा ‘क्ष’च्या हाती सोपवला. ‘क्ष’च्या तुकडय़ावरचा नंबर होता ‘००७’, तर लाल्याकडे राहिलेल्या तुकडय़ावरचा नंबर होता ‘७१०’.

लाल्या म्हणाला, ‘‘हे अण्णांच्या प्रवासाचं तिकीट आहे. जेव्हा तुमचा माणूस आमच्या माणसाला भेटेल तेव्हा हे दोन्ही तुकडे जुळवून ताडून पाहतील आणि हो, चार जणांसाठी योग्य अशी गाडी ठरवा.’’

‘‘अरे, त्यांच्याबरोबर माझा माणूस अन् गाडीचा ड्रायव्हर पण असणार ना? म्हणजे एकूण सहाजण झाले. म्हणजे गाडी मोठीच हवी.’’ थोडा विचार करून ‘क्ष’नं सुचवलं, ‘‘अँब्युलन्स? अँब्युलन्स ठरवू का? अँब्युलन्सनं वेगानं जाता येईल. कोणाला संशय येणार नाही. पोलीसही अँब्युलन्स रोखण्याची शक्यता खूप कमी.’’

‘क्ष’नं अँब्युलन्सची सूचना कण्णन अन् माझ्या सांगण्यावरून केली होती. वीरप्पनला जंगलातून बाहेर पडल्यावर प्रवासासाठी एखादं वाहन लागणारच, असा अंदाज आम्ही बांधला होता. त्यासाठी अनेक पर्यायांचा आम्ही विचार केला- कार, जीप, एसयूव्ही.. गाडीवर ‘प्रेस’ किंवा ‘शासन’ असं लेबल चिकटवावं का, असाही आम्ही विचार केला होता. एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा गाडीवर झळकवावा का, याची चर्चा आम्ही केली होती. अशा लेबलवाल्या किंवा झेंडावाल्या वाहनाची तपासणी करायला पोलीस बहुतेकवेळा अनुत्सुक असतात. अखेर खूप खल करून आम्ही निर्णय घेतला- अँब्युलन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. आम्ही तिचं सांकेतिक नावही ठरवून टाकलं – ‘ककून’ (कोश)! वीरप्पन या कोशात अडकून पडेल आणि मग दूर उडून जाऊ शकणार नाही, अशी आम्हाला आशा होती.

म्हणूनच ‘क्ष’नं चर्चेत अँब्युलन्सचा पर्याय सुचवावा, असं आम्ही ठरवलं.

त्याप्रमाणे ‘क्ष’नं अँब्युलन्सचा प्रस्ताव मांडला. लाल्यानं पसंतीची मान हलवली, ‘‘ही चांगली कल्पना आहे. आता ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी तुमचा माणूस अन् गाडी ठरलेल्या ठिकाणी थांबलेली असेल, एवढी काळजी घ्या.’’

मग दोघांनी दुसऱ्या साध्या कागदी कपटय़ांवर लॉटरी तिकिटावरचा पूर्ण आकडा लिहून घेतला. लाल्यानं आपला उरलेला चहा संपवला अन् जसा अचानक आला होता तसा तो अचानक गायब झाला.

‘क्ष’ आपल्या गाडीनं धर्मपुरीबाहेर पडला. एका खाजगी ओम्नी व्हॅनमधून एसटीएफची एक तुकडी त्याच्या पाठोपाठ निघाली. बरंच अंतर गेल्यावर ओम्नीनं त्याची गाडी गाठली अन् एका निर्जन ठिकाणी त्याला थांबण्याची खूण केली.

ओम्नीतून उतरून ‘क्ष’पाशी जात कण्णननं विचारलं, ‘‘काय? कशी झाली भेट?’’

‘क्ष’नी थोडक्यात सगळी हकीगत सांगितली अन् आपल्याजवळचा लॉटरी तिकिटाचा तुकडा कण्णनच्या हाती सोपावला. हात जोडून कण्णनला विनवत तो म्हणाला, ‘‘माझं काम मी पुरं केलंय. आता मला यात ओढू नका.’’

तिकिटावरची ‘००७’ ही संख्या बघून कण्णनच्या तोंडावर स्मित उमटलं. पुन्हा एकदा ती संख्या अन् शेवटचे दोन आकडे- ‘०७’- पाहून त्यानं ‘क्ष’ला विचारलं, ‘‘उरलेल्या तिकिटावरचे पहिले दोन आकडे काय आहेत?’’

‘क्ष’ हा प्रश्न ऐकून गोंधळला. जवळचा कागदी कपटा पाहून त्यानं सांगितलं, ‘‘सात आणि एक. का? काय झालं?’’

कण्णनच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी फाकलं, पण तो ‘क्ष’ला काही बोलला नाही.

कण्णननं नंतर मला सांगितलं, ‘‘माझ्या वडिलांच्या पहिल्या कारचा क्रमांक होता- ‘शून्य सात सात एक’. कित्येक वर्षे आमच्या दिमतीला होती ती गाडी. आणि त्या सगळ्या काळात एकदाही तिच्यात बिघाड झाला नाही. तिकिटाचे दोन तुकडे जुळवणारे आकडे तेच आहेत- ‘शून्य सात सात एक’. हा सगळा मला चांगला योग वाटतोय.’’