उन्हाळा, हिवाळा ॠतू कसे होतात? उत्तरायण-दक्षिणायन म्हणजे काय? ग्रहणे कशी होतात? चंद्रावर वस्ती शक्य आहे काय? पृथ्वीवरील मानवाला शेजारी आहेत काय? हे व असे अनेक प्रश्न चौकस मनांना पडत असतात. त्यांची उत्तरे मिळतात ती खगोलशास्त्रात. मात्र क्लिष्टतेमुळे अनेकजण त्या विषयाच्या वाटेला जातच नाहीत. अशांसाठी ‘मला उमजलेले खगोलशास्त्र’ हे एन. आर. म्हात्रे यांचे छोटेखानी पुस्तक उपयुक्त ठरू शकते. म्हात्रे यांनी खगोलशास्त्रातील वरील प्रश्नांची उत्तरे सुलभ भाषेत या पुस्तकात दिली आहेतच, शिवाय सुरुवातीलाच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन या पंचमहाभूतांविषयी थोडक्यात सांगून पुस्तकाच्या पुढील भागात काही महत्त्वाच्या खगोलीय घटना-संकल्पनांविषयी लिहिले आहे. त्यात चंद्राच्या कला, अक्षांश-रेखांश, ग्रहणे, तिथी व कालगणना, तारे-ग्रह, मानवाची उत्पत्ती, समुद्राची भरती-ओहोटी, सूर्यमाला आदींविषयी सोप्या भाषेत माहिती मिळते. मुख्य म्हणजे त्या त्या विषयासंबंधीची चित्रे आणि आकडेवारीही तपशिलासह दिली असल्याने माहिती-वर्णन आकलनास आणखी सुलभ झाले आहे.

  • ‘मला उमजलेले खगोलशास्त्र’- एन. आर. म्हात्रे,
  • दर्पण प्रकाशन, पृष्ठे- ७५, मूल्य- १२० रुपये

 

मालवणी नाटकांचा विवेचक आढावा

‘मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकांची समीक्षा’ हे डॉ. बाळकृष्ण लळीत यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. याआधी १९९४ साली ‘मालवणी रंगभूमी आणि वस्त्रहरण’ हे डॉ. लळीत यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या छोटेखानी पुस्तकात डॉ. लळीत यांनी १९२८ पासून पुढील काळात मराठी नाटय़लेखनात मालवणी बोली बोलणारी पात्रे आणि संवाद कसे येत गेले, याचे विवेचन केले होते.  त्या विवेचनाचा पुढचा आणि नव्या माहितीसह विस्तारित भाग म्हणून त्यांच्या या नव्या पुस्तकाकडे पाहता येईल. एक बोली म्हणून मराठी नाटय़वाङ्मयात मालवणीच्या स्थानाचा विवेचक शोध डॉ. लळीत यांनी या पुस्तकात मांडला आहे.

मालवणी बोलीच्या लयदार ढंगामुळे नागर प्रेक्षक मालवणी नाटकांकडे आकर्षित झाल्याने पुढील काळात या नाटकांच्या छापील संहिताही प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यामुळे मालवणी साहित्यप्रवाहालाही गती मिळाली. या बाबी नोंदवत डॉ. लळीत यांनी पुस्तकात सुरुवातीलाच मालवणी नाटकांच्या वाटचालीचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. लोकनाटय़, नभोनाटय़, मुक्तनाटय़ यांतील मालवणी बोलीची नोंद घेत मालवणी एकांकिकांचीही  थोडक्यात माहिती दिली आहे. तसेच मालवणी नाटकांचे विषयवैविध्य व वैशिष्टय़े सांगत तब्बल ४९  नाटके व पाच एकपात्री संहितांची यादी दिली आहे. त्यातील ‘वस्त्रहरण’ व इतर महत्त्वाच्या नाटकांविषयी डॉ. लळीत यांनी विस्ताराने लिहिले आहे. एकूणच मालवणी नाटकांची संहिता आणि नाटय़प्रयोग यांच्यासंदर्भातील हा चिकित्सक आढावा नाटय़-अभ्यासकांबरोबरच सामान्य वाचकांसाठीही उद्बोधक ठरणारा आहे.

  • ‘मराठी रंगभूमीवरील मालवणी नाटकांची समीक्षा’- डॉ. बाळकृष्ण लळीत
  • स्नेहवर्धन प्रकाशन, पृष्ठे- १०४, मूल्य- ११० रुपये