संध्या टाकसाळे

थेट जगण्यातून आलेले अनुभव नेहमीच रसरशीत असतात. ‘कल्पनेच्याही पलीकडे वास्तव जातं’ असं म्हणतात ते काही चूक नाही. वाचकांनाही बऱ्याच वेळेला काल्पनिक कथा, कादंबरीपेक्षा अनुभवकथन वाचायला आवडतं. कोणत्या परिस्थितीतून माणसं जातात, त्यात तग धरतात, शहाणी होतात हा भाग गुंगवून ठेवणारा आणि वाचकाला विश्वासात घेऊन कानगोष्टी करणारा असतो. जगणं कळून घ्यायला त्यातून मदत होते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

विद्या पोळ-जगताप यांनीही आपल्या अनुभवांवर आधारित ‘जगणं कळतं तेव्हा’ हे पुस्तक लिहिलं आहे. विशेष म्हणजे हे जसेच्या तसे अनुभव नाहीत. त्यावर संस्करण करून, ललित अंगानं तयार झालेली ही वेगळी कृती आहे. त्याला कादंबरी वा अनुभव न म्हणता ‘कुटुंबकथा’ असंच ब्लर्बमध्ये म्हटलं आहे. लेखिका मनोगतात म्हणते की, ‘या कथेसाठी मी पूर्णपणे काल्पनिक व्यासपीठ निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे.’ म्हणजे एरवी जे लिहिलेलं असतं की- ‘पात्रं आणि प्रसंग पूर्णपणे काल्पनिक. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा’ असं इथे नाही.

लहान गावात राहणाऱ्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली ही गोष्ट. निवेदक आहे घरातली थोरली मुलगी. मुलांच्या नजरेतूनच घटना आपल्यासमोर उलगडत जातात. लहान शाळकरी वयापासून ही मुलगी मोठी होत जाते आणि पुढे कॉलेज, नोकरी, लग्न आणि स्वत: आई होणं या प्रत्येक टप्प्यातली तिची आंदोलनं समोर येतात. अनेक धारदार, खडतर वळणं घेत असताना जगणं ज्या पद्धतीनं तिला कळत जातं त्याचा हा आलेख आहे. एका सरळमार्गी कुटुंबात वडिलांचं दारू पिणं आणि आई-वडिलांमधला विसंवाद काय काय उलथापालथ घडवतो, हे ती सांगते.

दिवाळीसाठी मूळ गावी किंवा खरं तर वस्तीवर गेलेलं हे कुटुंब आणि तिथला सगळा गोतावळा, बायाबापडय़ा, शेतं, गुरंढोरं यांच्यापासून ही कथा सुरू होते. त्या जगाचं अतिशय प्रामाणिक आणि अस्सल वर्णन इथं येतं. २५-३० वर्षांपूर्वीचा, दूरदर्शनची एकहाती सत्ता होती तेव्हाचा हा काळ! नेमके तपशील माणसांच्या स्वभावासह रंजकपणे सांगण्याची हातोटी लेखिकेकडे आहे. या निवेदनाला एक नर्मविनोदाचेही अस्तर आहे. मुक्ताचे- म्हणजे या कथानकाच्या निवेदिकेचे- वडील जवळच्या गावात शिक्षक असतात. हा पेशा मनापासून आवडणारे हाडाचे शिक्षक! त्यांना सगळे ‘भाऊ’ या नावानं हाक मारतात. भाऊ आणि त्यांचं कुटुंब यांनी काही मूल्यं आणि तत्त्वं जपली आहेत. आपल्या पहिल्या मुलीचं नाव ‘मुक्ता’ ठेवून ते पेढे वाटतात. ‘मुलींना शिकवून काय करायचं’ असं म्हणणाऱ्या आजीला ते जुमानत नाहीत. चाकोरीबाहेर जाऊन काही गोष्टी करतात. मुलांवर जिवापाड प्रेम करतात.

या सगळ्या सुसंस्कृत पाश्र्वभूमीवर भाऊंचं दारूच्या व्यसनात अडकणं एक विरोधाभासी वास्तव घेऊन येतं. दारू पिऊन आल्यावर ते असे वागत, की सगळं होत्याचं नव्हतं होत असे. अनेकदा निश्चय करूनही त्यांना ती सोडता आली नाही. यात ढवळून निघतं आणि पणाला लागतं ते या कुटुंबाचं शांत- सरळ जगणं आणि समाजातलं स्थान. एकमेकांना धरून राहून ही भावंडं त्याला कशी सामोरी जातात, हे थोरल्या मुलीच्या नजरेतून आपल्याला कळतं.

इथे ताण आहे तो फक्तव्यसनाचा नाही. काही चुका पालकांच्या हातून मुळीच घडू नयेत असं मुलांना वाटत असतं. आई-वडिलांच्या नात्यातला विसंवाद हा यापैकी एक. नातं विस्कटलं तरी केवळ समाजाच्या दबावाखाली ते अगतिकपणे चालू राहिलं तर त्याचे परिणाम सगळय़ांवरच होतात. मुलांचं सगळं अस्तित्वच त्यामुळे ढवळून निघतं. या संदर्भात लेखिकेनं पुस्तकाला लिहिलेली अर्पणपत्रिका बोलकी आहे- ‘स्वत:चे दुभंगलेले संसार सांभाळत, आपल्या मुलांसाठी एकमेकांना सहन करणाऱ्या आईवडिलांना!’

तणाव निर्माण करणारी दुसरी गोष्ट म्हणजे, चाकोरीबाहेर जाऊन मुलांसाठी नितळ मायेनं अनेक गोष्टी करणारे वडील आतून खूप चांगले आहेत आणि याची मुलांनाही साक्ष पटलेली आहे. मात्र त्यांचं व्यसन, वागणं यातून मुलांच्या वाटय़ाला प्रचंड असुरक्षितता आणि दडपण येतं. गावात मानहानी होते. हे सगळं दुसऱ्या बाजूला! दोन्ही गोष्टी तेवढय़ाच खऱ्या, म्हणून तडफडही जास्त. या दोन टोकांतला संघर्ष आणि हेलकावे पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यात होणारी मुलांची ओढाताण कमालीचा सच्चेपणा घेऊन येते आणि वाचकांपर्यंत पोहचते.

अशा परिस्थितीत ही भावंडे वास्तवाला भिडतात. चटके बसले तरी अनेक गोष्टी शिकतात. ही गोष्ट एका कुटुंबाची असली, तरी ती वैयक्तिक न राहता सामाजिक होते. सांगण्याची पद्धत आणि गुंफलेले संदर्भ यांमुळे ती प्रातिनिधिक होऊन जाते.

‘शहाण्या’ आणि जगणं उमगलेल्या बायका हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणता येईल. मुक्ताची आजी, शेजारी राहणारी आणि नंतर जणू घरातलीच झालेली अरुणाताई, मुक्ता आणि तिची धाकटी बहीण भक्ती, त्यांची आई यांचे संवाद यासाठी बघण्यासारखे आहेत.

एका प्रसंगात आजी (आईची आई, तिला सगळे ‘काकू’ म्हणतात.) मुक्ताला म्हणते, ‘‘आपण कसं व्हायचं ते आपणच ठरवायचं. जगाला काय, नुसतं सांगून त्यांचं काम संपतं.. येडी आहेस. अगं, आई-बाप झाले म्हणजे सगळं त्यान्लाच कळतं का? आणि आईवडिलांनी नाही शिकवलं, तर पोरं काय शिकायची राहत्यात का? जो तो माणूस आपलं आपणच शिकतो. ज्ञानोबा माऊलीला कुठं आई-बाप होते शिकवायला?’’ मुक्ताला त्या क्षणी जाणवतं, ‘‘या आजीचा नि:स्पृह, निर्मोही जगण्याचा पस एवढा मोठा होता, की निव्वळ पुस्तकी तत्त्वज्ञान त्यापुढे फिकं पडावं. कुठून आणि कशी शिकली असेल ही असं साधं-सरळ जगायला?’’

अस्वस्थ मुक्ताची समजूत घालताना अरुणाताई एके ठिकाणी म्हणते, ‘‘बरं मोर नाही झालीस ते. त्यापेक्षा गरुड व्हायचं ध्येय ठेव आणि स्वप्नं आकाशात उडवत बसण्यापेक्षा स्वत: आभाळाला गवसणी घालायचं बघ. कशाला सारखा कुणाचातरी आधार पाहिजे गं? आणि हे बघ, आधार ‘पुरुषार्था’चा घ्यावा, ‘पुरुषाचा’ नव्हे. अशा बारीकसारीक प्रसंगांतून आपण कणखर व्हायला शिकायचं असतं. आपल्याला त्रास देणारी माणसं तिथंच राहतात आणि आपण मात्र अधिक दृढ आणि भक्कम होत जातो.’’

आत्मवृत्त किंवा अनुभवकथन या ठरावीक वळणानं न जाता ही ‘कुटुंबकथा’ आपल्याशी असा संवाद साधत आपल्याबरोबर घेऊन जाते. हळूहळू जगणं कळत गेलेल्या मुक्ताच्या प्रवासात हे पुस्तक आपल्याला सामील करतं.

‘जगणं कळतं तेव्हा’- विद्या पोळ-जगताप                                             

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- २५५, मूल्य – २०० रुपये.