‘पाकिस्तानसंबंधी विचार’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ. पाकिस्तानची निर्मिती होऊन सात दशके होत आलेली असताना आणि भारतात लोकशाही अपेक्षेहून चांगल्या पद्धतीने काम करीत असतानाही या ग्रंथाचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, ‘राष्ट्रवाद’, ‘भारतमाता’ या संकल्पनांवरून हिंसक वाद सुरू असतानाच्या, ‘राष्ट्र’ या संकल्पनेला धार्मिक अधिष्ठान देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाच्या आजच्या या कठीण काळात या ग्रंथाकडे वळणे आत्यंतिक निकडीचे झाले आहे.
‘काळ तर मोठा कठीण आला आहे..!’ हे तसे कोणत्याही काळाबद्दल म्हणता येते. परंतु सध्याचा काळ खरोखरच कठीण भासतो आहे, हे खरे. केंद्रात सत्तेवर हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे, काँग्रेसने दारुण पराभवामुळे हाय खाल्ली आहे, ‘कन्हैया आयेगा, नयी रोशनी लायेगा’ या इन्कलाबी स्वप्नात डावी मंडळी रंगलेली आहेत, आणि देशातील ‘बिगरभक्त’ हिंदू, दलित आणि मुस्लीम भेलकांडलेल्या अवस्थेत आहेत. राष्ट्रवाद, देशप्रेम, राजद्रोह या आज जीवन-मरणाच्या गोष्टी बनलेल्या आहेत. धार्मिक राष्ट्रवाद आणि अतिरेकी धर्मवाद उग्र स्वरूपात पुन्हा एकदा उभा राहू पाहतो आहे. पुन्हा एकदा देशात हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील तालिबानी प्रवृत्ती जोर करून उभ्या राहिलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या लढय़ाचा इतिहास ठाऊक असलेल्यांना हे वातावरण नवखे नसावे. ही कदाचित अतिशयोक्तीही होईल; परंतु फाळणीपूर्वी देशात अशीच काहीशी वैचारिक परिस्थिती असावी. तेव्हा देशातील मुस्लिमांमधील कडव्या धर्मवादाला प्रतिक्रिया म्हणून हिंदू धर्मवाद अतिरेकी स्वरूपात उभा ठाकला होता. आज फरक एवढाच, की मुस्लिमांतील कडव्या धर्मवादाने जागतिक स्वरूप धारण केलेले आहे आणि देशातील सत्तेत कडव्या हिंदूंची बहुसंख्या दिसते आहे. या सर्व उन्मादाच्या उगमस्थानी असंख्य मुद्दे असले तरी त्यामागे एक चालू वर्तमान आणि वेदनामय इतिहासही आहेच. हे वर्तमान देशातील अल्पसंख्याकांचे- त्यातही प्रामुख्याने मुसलमानांचे नेमके काय करायचे, या प्रश्नाचे आहे; आणि इतिहास फाळणीचा आहे. हे सर्व वातावरण समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाकिस्तानविषयक ग्रंथाकडे जावे लागेल. याचे कारण या देशातील मुस्लीम प्रश्नाकडे आणि त्यानिमित्ताने ‘हिंदुस्थान- एक राष्ट्र’ या संकल्पनेकडे लाल, हिरवा, भगवा अशा कोणत्याही चष्म्याऐवजी निखळ निर्दोष नजरेने त्या काळात कोणी पाहिले असेल, तर ते डॉ. आंबेडकरांनीच! त्यांचा ‘पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया’ हा ग्रंथ याची ग्वाही देतो.
या ग्रंथाचा काळ आधी लक्षात घेतला पाहिजे. मुस्लीम लीगने मार्च १९४० मध्ये लाहोर अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव मंजूर केला. त्यानंतर नऊ महिन्यांत हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्याचीच दुसरी सुधारित आवृत्ती म्हणजे ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’! ती १९४५ मधली! पण आजही हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. ‘राष्ट्रवाद’, ‘भारतमाता’ अशा संकल्पनांवरून जोरदार आणि प्रसंगी हिंसक वाद सुरू असतानाच्या, ‘राष्ट्र’ या संकल्पनेला धार्मिक अधिष्ठान देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाच्या आजच्या या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाकडे वळण्याशिवाय पर्याय नाही.
हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा त्याने अनेकांना धक्का दिला होता. तेव्हा तो हिंदूंनीही नाकारला, आणि मुसलमानांनीही तो स्वीकारला नाही. या दोघांनाही तो आवडला नाही, असे डॉ. आंबेडकरांनी दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. आजही या ग्रंथात तसाच धक्का देण्याची क्षमता आहे. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत बरेच अंतर आहे, हे खरे. पाकिस्तानच्या निर्मितीलाही आता सात दशके होत आली आहेत. त्यामुळे आज बसणारा धक्का जरा वेगळ्या कारणांसाठी आहे. त्यातले एक कारण म्हणजे- हा ग्रंथ फाळणीच्या गुन्हेगारांविषयीच्या लोकप्रिय समजांनाच सुरुंग लावणारा आहे. महात्मा गांधी यांच्यामुळे देशाचे तुकडे पडले, पं. जवाहरलाल नेहरू यांना सत्ताप्राप्तीची घाई झाली होती, तेव्हा फाळणीचे जे काही गुन्हेगार आहेत ते या दोघांसह काँग्रेसचे अन्य नेते आहेत, असे मानणारा वर्ग आजही या देशात मोठय़ा प्रमाणावर आहे. फाळणीबद्दल ते जेव्हा तावातावाने बोलत असतात तेव्हा त्यांच्या तोंडी बॅ. जीना यांचे नाव क्वचितच येते. किंवा फाळणी रोखण्यासाठी जनमत तयार करण्याऐवजी तेव्हाचे फाळणीविरोधक फाळणीला पोषक वातावरणच निर्माण करीत होते- या गोष्टी त्यांच्या गावीही नसतात. म्हणून काही हा वर्ग अज्ञानी आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. उलट, तो फार हुशार आहे. त्यामुळे त्याने फाळणीचे पाप हे ती होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या माथी बरोब्बर मारले. डॉ. आंबेडकरांनी फाळणीची ही जी संकल्पना प्रचलित आहे, तिच्यातील हवाच आपल्या या ग्रंथाच्या प्रस्तावनेद्वारे काढून टाकली आहे. फाळणी एका राष्ट्राची होते. पण हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे, ही कल्पनाच भ्रामक असल्याचे त्यांचे मत आहे. पाकिस्तानची मागणी पुढे येण्याचे एक कारण म्हणजे मुस्लिमांचा देशात एक केंद्र शासन स्थापण्यास विरोध होता. कारण त्यामुळे मुस्लीमबहुल प्रांतांना हिंदू सत्तेखाली यावे लागले असते. पण आंबेडकर विचारतात- येथील हिंदू प्रांतांना तरी कुठे एकमेकांबद्दल प्रेम होते? सांस्कृतिकदृष्टय़ा ते एकाच कुटुंबाचे घटक आहेत असे म्हणता येणार नाही. मराठय़ांपुरते बोलायचे झाले तर त्यांना हे आठवतही नाही, की भारतातील मुस्लीम साम्राज्याचा नाश करण्यासाठी बाहेर पडलेल्या मराठय़ांनी सुमारे शतकभर अन्य हिंदूंचा छळ करून त्यांना आपले गुलाम बनविले होते. अन्य हिंदूंसाठी ते आपत्तीजनक ठरले होते,’ असे आंबेडकर सांगतात, तेव्हा हिंदुस्थान हे एक राष्ट्र असल्याची कल्पनाच ते नामंजूर करतात. आणि हिंदुस्थान हे एक राष्ट्र नसेल, तर त्याची फाळणी झाली, हे म्हणण्यात तरी काय राजकीय अर्थ उरतो?
यात मौज अशी, की हे केवळ आंबेडकरच म्हणत आहेत असे नाही, तर मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांचेही ‘हिंदुस्थान एक राष्ट्र नाही’ या म्हणण्यावर एकमत आहे. या देशात मुस्लिमांचे भिन्न राष्ट्र आहे, हे बॅ. मोहम्मद अली जीना सांगत होते यात काहीच आश्चर्य नाही. कारण त्या कल्पनेच्या पायावरच पाकिस्तानचा पुढचा सगळा डोलारा उभा होता. पण हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनातील स्वा. वि. दा. सावरकर यांच्या भाषणातील एक उतारा उद्धृत करून आंबेडकर म्हणतात, ‘हे कदाचित विचित्र वाटेल, पण एक राष्ट्र विरुद्ध द्विराष्ट्र या मुद्दय़ावर श्री. सावरकर आणि श्री. जीना यांचा एकमेकांना विरोध असण्याऐवजी त्यांच्यात त्यावर एकमत आहे.’ एकदा येथे दोन राष्ट्रे आहेत असे म्हटले, की मग प्रश्न उरतो- त्यांना बांधून कसे ठेवायचे, हा? त्यातील कोणा एकाचीही त्याला तयारी नसेल तर पुढचे सगळेच प्रयत्न फोल ठरतात.
‘पाकिस्तानसंबंधी विचार’ या ग्रंथात त्यांनी फाळणीचे जोरदार समर्थन केले आहे, हे म्हणताना ते प्रखर भारतवादी होते, हे क्षणभरही विसरता येणार नाही. या ग्रंथाची ‘पाकिस्तान अथवा भारताची फाळणी’ ही दुसरी आवृत्ती सुमारे पाच वर्षांनी आली. त्यात त्यांनी आणखी एका भागाची भर घातली. ‘पाकिस्तान व्हायलाच हवा का?’ हे त्याचे शीर्षक. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या मागणीसाठी केले जाणारे युक्तिवाद, तर्क हे कसे फोल आहेत हे दाखवून मुस्लिमांना फाळणीच्या मागणीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात हिंदू-राज येईल असा मोठाच भयगंड मुस्लिमांच्या मनात तयार करण्यात आला होता. पण ते भय चुकीचे आहे आणि ‘हिंदू राज्याचे ते भूत गाडण्याचा परिणामकारक उपाय फाळणी हा नाही,’ हे ते सांगत होते. वेगळे पर्याय समोर ठेवत होते. हिंदू आणि मुस्लीम यांचे युक्तिवाद खोडून काढत होते. मात्र, असे असले तरी ‘मुसलमानांची इच्छा’ असेल तर त्यांना पाकिस्तान देऊन टाकावे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. याची कारणे अन्य कशाहीपेक्षा डॉ. आंबेडकर भारताच्या हिताचा जो विचार करीत होते, त्यात आहेत. फाळणीला पाठिंबा देताना ते मुसलमानांच्या भावना हा मुद्दा जसा विचारात घेत होते, तसाच भारताच्या संरक्षणाचा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा मानत होते. आंबेडकरांच्या पाकिस्तानविषयक विचारातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदू आणि मुस्लीम ही दोन ‘राष्ट्रे’ एकत्र राहिली आणि उद्या अशा भारतावर परकीय शक्तींचे आक्रमण झाले तर भारतीय लष्करातील मुस्लिमांवर विश्वास ठेवता येईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर लष्करातील मुस्लिमांत द्विराष्ट्र सिद्धान्ताचा किती प्रादुर्भाव झाला आहे, यावर अवलंबून आहे. जर स्वतंत्र भारताचे लष्कर अ-राजकीय असेल, त्याच्यावर पाकिस्तानच्या मागणीच्या विषाचा परिणाम झालेला नसेल तरच ते भारताचे संरक्षण करू शकेल, असे बाबासाहेबांचे म्हणणे आहे. आज येथील एखादा मुस्लीम तरुण आयसिससारख्या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी निघतो, किंवा येथील मुस्लीम समाज पॅन-इस्लामिझमच्या गोष्टी करू लागतो तेव्हा बाबासाहेबांच्या मनातील ही भीती मूर्तिमंत होताना दिसते. मुस्लिमांनी तर हे लक्षात घेतले पाहिजेच; पण लष्कराचे धार्मिक आधारावर राजकीयीकरण करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांनीही हे ध्यानी घेतले पाहिजे.
आंबेडकरांचा फाळणीला पाठिंबा होता, फाळणी होणे हे अंतिमत: भारताच्या हिताचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. अखंड हिंदुस्थानचे दिवास्वप्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत आजवर ही बाब अंजन घालू शकलेली नाही; तेव्हा पुढेही त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल असे मानण्यात अर्थ नाही. अखंड हिंदुस्थानचा अर्थ पाकिस्तान, बांगलादेश यांचा हिंदुस्थानात समावेश. तो करताना त्या देशातील मुस्लिमांचे आपण काय करणार? त्यांना दुय्यम नागरिकत्व देणार की अरबी समुद्रात बुडवणार? आणि हे दोन मुस्लीम देश भारतात आल्यानंतर येथील हिंदूंची अवस्था काय होईल याचा काय विचार? पण दिवास्वप्न पाहणाऱ्यांना त्याची काय तमा? काश्मीर प्रश्नावर ही नवराष्ट्रवादी मंडळी अधिकच संवेदनशील असतात. जेएनयूमधील वादातून याचे प्रत्यंतर आलेच आहे. मुसलमानांची इच्छा असेल तर त्यांना पाकिस्तान तोडून द्यावे, ही जी आंबेडकरांची पाकिस्तानविषयक भूमिका आहे, तिचे संलग्नत्व त्यांच्या काश्मीरविषयक भूमिकेशी आहे, हे या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी फार पूर्वीच ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. ही भूमिका विवाद्य खरी; पण त्यावरून आज आंबेडकरांना आपण देशद्रोही ठरवणार आहोत काय, याचा विचार एकदा या नवराष्ट्रवाद्यांनी करावा. हे नवराष्ट्रवादी पाहत असलेले दुसरे स्वप्न म्हणजे हिंदुराष्ट्राचे! या ग्रंथात डॉ. बाबासाहेबांनी त्याबाबतही अत्यंत कडक इशारा दिलेला आहे. ते लिहितात, ‘जर हिंदू राज्य प्रत्यक्षात उतरले तर या देशावर कोसळलेली ती एक महाभयंकर आपत्ती असेल.’ बाबासाहेब म्हणतात, ‘हिंदू लोक काहीही म्हणोत, हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांच्या विरोधी आहे. म्हणून तो लोकशाहीशी मुळातच विसंगत आहे. कितीही किंमत द्यावी लागली तरी चालेल, पण हिंदुराज्याला विरोधच केला पाहिजे.’ हा इशारा दिल्यानंतर ते सांगतात की, ‘हिंदुराजचे हे भूत गाडण्याचा परिणामकारक उपाय फाळणी हा नाही. त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मुस्लीम लीग बरखास्त करून हिंदू आणि मुस्लिमांचा एक पक्ष स्थापन करणे.’ राजकारणात जातीयवादी पक्षांना बंदी घालण्याचा हा उपाय आहे. तो तेव्हा जितका उपयुक्त होता, तेवढाच आजही आहे, हे ध्यानी घेतले पाहिजे.
या देशातील जमातवादी राजकारणाने देशाची फाळणी केली. आज याच जमातवादी पक्षांच्या माध्यमातून राष्ट्रवादाला धार्मिक चेहरा देण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. देश पुन्हा एकदा फाळणीच्या काळात जातो की काय, अशी भयशंका निर्माण करणारी ही परिस्थिती आहे. ती का निर्माण होते, कशातून होते, आणि तिचा मुकाबला करायचा तर त्यासाठी तर्काची कोणती शस्त्रे परजली पाहिजेत, हे समजून घ्यायचे असेल तर डॉ. आंबेडकरांच्या या विचारांचा विचार करणे आवश्यक आहे.
रवि आमले  – ravi.amale@expressindia.com

INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी