Untitled-9‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या नियतकालिकांचे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने..
‘सत्यकथा’ मासिक नव्यानं नावारूपाला येत होतं त्या काळात आम्ही नुकतेच महाविद्यालयात प्रवेश केलेले विद्यार्थी होतो. सत्यकथेचं आधीचं जुनं रूप आमच्या पाहण्यात नव्हतं. ‘वाङ्मयशोभा’, ‘यशवंत’, ‘वसंत’, ‘चित्रमय जगत’, ‘ध्रुव’, ‘किलरेस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘प्रसाद, ‘अभिरुची’ अशी अनेक मासिकं तेव्हा वाचनालयात पाहायला मिळायची. ‘सत्यकथा’ मासिक आमच्यापुढे आलं ते साहित्याच्या क्षेत्रातील नवे प्रवाह, नव्या प्रवृत्ती, नवे प्रतिभावंत यांनी साहित्यात निर्माण केलेलं चैतन्याचं नवं वातावरण घेऊनच. ‘सत्यकथा’ आणि नवं वारं असं एक समीकरणच तेव्हा आमच्या मनात होऊन बसलं. त्याबरोबरच श्री. पु. भागवत हे नवं नाव आम्हा साहित्यप्रेमी तरुणांच्या कानांवर त्या काळात येऊ लागलं.
युद्धात चढाई करणाऱ्या युद्धनौकेच्या माथ्यावर हवाई छत्राचं संरक्षण असतं तसं ‘सत्यकथे’च्या नव्या वाटचालीला हवाई छत्र (एअर कव्हर) होतं ते ‘मौज’ साप्ताहिकाचं! नवसाहित्यासंबंधीचे सगळे कडाक्याचे वाद आणि त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया रंगायच्या त्या ‘मौज’ साप्ताहिकातील लेखांतून आणि वाचकांच्या पत्रांतून. एकूणच वातावरण इतकं उमेदीचं आणि हिरीरीचं होतं, की ‘सत्यकथे’च्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक ताज्या अंकाबरोबरच प्रत्येक अंकाच्या संपादकीयात नंतरच्या अंकात प्रसिद्ध व्हावयाच्या वेचक साहित्याबद्दल जे टिपण असायचं, त्याबद्दलची रसिकांच्या मनात तितकीच उत्कंठा आणि कुतूहल असायचं.
थोडय़ाच काळात ‘सत्यकथे’चा मोठा दबदबा निर्माण झाला. दिग्गज साहित्यिकांची प्रभावळ ‘सत्यकथे’तून झळाळू लागली आणि संपादक श्री. पु. भागवत या नावाभोवतीही ‘वलय’ निर्माण झालं.
एम. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माधव मनोहरांच्या सांगण्यावरून मी एकदा सत्यकथेच्या कचेरीत गेलो आणि श्रीपुंना भेटलो. साहित्यात तेव्हा नुकतीच उमेदवारी करू लागलेल्या माझ्यासारख्यांचं त्यांनी ज्या सौजन्यानं स्वागत केलं, त्यानं तर मी भारावूनच गेलो. त्यानंतर ‘मौजे’त पुस्तक परीक्षण लिहू लागलो. ‘सत्यकथे’त माझ्या कविताही येऊ लागल्या. हळूहळू मौज-सत्यकथेशी माझे अनुबंध जुळत गेले, दृढ होत गेले.
या पाश्र्वभूमीवर काही निरीक्षणे सूत्ररूपाने मांडत आहे. या निरीक्षणांना संदर्भ आहे तो अर्थातच श्री. पु. भागवत यांचा; आणि अप्रत्यक्षपणे त्या कालखंडात आकारत असलेल्या वाङ्मयीन संस्कृतीचा!
१९४५ च्या सुमारास मराठी साहित्यात ज्या नव्या प्रवृत्ती आणि नवे उन्मेष बहरू लागले होते त्यांचं स्वागत, संगोपन आणि संवर्धन ‘सत्यकथा’ मासिक, ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘मौज प्रकाशन’ या तीन माध्यमांतून प्रकर्षांने झालेलं आढळतं. केवळ नव्याचं स्वागत करायचं असा उथळ उत्साह त्यामागे नव्हता. नव्याची अपरिहार्यता जाणून घेणारी आणि त्याचं सामथ्र्य अजमावणारी रसिकता आणि सौंदर्यदृष्टी संपादनात असल्यामुळे नव्या प्रवृत्तीचं दर्शन सुसंघटित स्वरूपात मराठी रसिकांना घडलं आणि एकूणच मराठी साहित्यावर आणि रसिकतेवर नव्या प्रवृत्तीचा प्रभाव जाणवू लागला. साहित्यनिर्मिती आणि साहित्यविषयक विचारांमध्ये मोठं स्थित्यंतर घडून आलं.
साहित्यनिर्मिती हा एक सर्जनशील व्यापार आहे, या जाणिवेतून साहित्याचे सौंदर्य, विविध घटक, संघटनेची तत्त्वे, साहित्याची स्वायत्तता इत्यादी विषयांचा विचार आणि शोध यांना ‘सत्यकथे’ने अग्रक्रमानं प्राधान्य दिलं. नवकाव्य आणि नवकथेतील प्रयोगामागील एक अंग ‘निर्मिती’च्या कुतूहलानं व्यापलेलं आढळेल. ‘कलेकरिता कला’ की ‘जीवनाकरिता कला’ या आधीच्या कालखंडात गाजलेल्या वादापेक्षा किंवा ‘पुरोगामी साहित्य’, ‘नवमतवाद’, ‘अश्लील साहित्य’, ‘साहित्य कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ?’ अशा आधीच्या काळातील प्रश्नांपेक्षा साहित्यासंबंधीचा मूलगामी विचार आताच्या प्रयत्नांत गर्भित होता. त्याच दिशेने प्रश्न उपस्थित केले जात होते. अनेक कसोटय़ांपेक्षा ‘निर्मिती’ या निकषावर साहित्यकृतीचं सौंदर्य लक्षात घेतलं जात होतं.
ग्रंथनिर्मिती हादेखील साहित्यनिर्मितीसारखाच एक सर्जनशील व्यापार आहे, ही जाणीव ‘मौज प्रकाशन’ने निदान आमच्या पिढीच्या मनावर चांगली बिंबवली. टाईप, कागद, स्पेसिंग, अलाइनमेंट, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, रेखाटने, बाइंडिंग ही सगळी साहित्यवस्तूची अविभाज्य अंगं असतात. साहित्यवस्तूचा सौंदर्याकार या अंगांतून मूर्त होत असतो, ही जाणीव अत्यंत साक्षेपाने ‘मौज प्रकाशन’ने रसिकांपर्यंत नेली. केवळ टाईप योग्य नाही (म्हणजे त्या विशिष्ट आशयाला साजेसा नाही) हे लक्षात आल्यावर सगळा फॉर्म रद्द करून नव्याने छापल्याच्या कथा विष्णुपंत भागवतांच्या बाबतीत आम्ही त्या काळात ऐकल्या आहेत. ग्रंथनिर्मितीच्या या साक्षेपाच्या बाबतीत श्रीपु-विष्णुपंत हे आम्हाला एक अद्वैतच वाटायचं. ‘मौज प्रकाशन’चं नवं पुस्तक बाहेर पडलं की घरातल्या छोटय़ा टीपॉयवर नजरेसमोर ठेवून ते हाताळताना नवजात अर्भकाचं वात्सल्याने कौतुक करावं इतकं हळुवार होताना मी श्रीपुंना पाहिलं आहे. नजरचुकीने एखादी उणीव राहिली असली, एखादा दोष राहिलेला आढळला तर चेहऱ्यावर प्रकट होणारी खंत आणि अस्वस्थताही पाहिली आहे.
‘सत्यकथा’ हे नवसाहित्याचं व्यासपीठ बनलं होतं, पण विरोधी भूमिकेलादेखील तितकंच आदराचं आणि प्रतिष्ठेचं स्थान ‘सत्यकथे’त दिलं जात होतं. असं करण्यात सगळ्याच बाजू छापायच्या, असा सोयीस्कर, उदार आणि दिशाहीन भोंगळपणा त्यात नव्हता. संपादकाची नैतिकता आणि एकूण साहित्यव्यवहाराचा ‘तोल’ सांभाळण्याची जबाबदारी या गोष्टींची पक्की जाण त्यामागे होती. याच दृष्टीने श्री. के. क्षीरसागर, रा. श्री. जोग, दि. के. बेडेकर, कुसुमावती देशपांडे इत्यादी समीक्षकांचं नवसाहित्याचा प्रतिवाद करणारं टीकालेखन ‘सत्यकथे’नं आवर्जून प्रसिद्ध केलं.
‘‘सत्यकथे’त कथा प्रसिद्ध होण्यापूर्वी ‘रिपेरिंग’ खात्यात ती पाठविण्यात येते,’ हा एक केला जाणारा विनोद अनेकांना ठाऊक असेल. पण खरं तर साहित्यिकाच्या सर्जनशील व्यापारात इतक्या जाणकारीने सहकंप पावणारं, सहसंवादी होणारं लेखक-संपादकातलं सर्जनशील नातं ही मला एक अत्यंत दुर्मीळ आणि मोलाची गोष्ट वाटते. लेखकाचा अहंकार न दुखावता ही क्रिया साधणं हा तर अत्यंत अवघड भाग. कथेच्याच बाबतीतच नव्हे, तर कविता- किंबहुना सर्वच साहित्याबाबत हा लेखक-संपादक संवाद ‘सत्यकथे’त चालत होता. श्रीपुंप्रमाणेच राम पटवर्धन, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ही परंपरा चालू ठेवली. साहित्य प्रकाशनाच्या व्यवहारात संपादकाच्या सर्जक संवेदनशीलतेचा इतका सहभाग क्वचितच पाहावयास मिळेल.
‘सत्यकथे’ने साहित्यकृती आणि साहित्यविचार या दोहोंकडे अनुभव आणि विचारांच्या निरनिराळ्या ‘शक्यता’ म्हणून पाहिले. ‘ठणकावून’ सांगण्याचा किंवा ‘बजावण्या’चा बाणा कधीच दाखविला नाही. साहित्याच्या बाबतीत आपण निरनिराळ्या शक्यतांच्या क्षेत्रात वावरत असतो; ही जाणीव इतक्या प्रमाणात आधी कोणी बिंबवलेली आढळत नाही. बहुधा म्हणूनच ‘सत्यकथे’तली विधाने ‘विध्यर्थी’ शैलीत मांडलेली आढळतात. (‘हे असं असावं’, ‘हे व्हावं’ इत्यादी) ही शैली नव्यानेच साहित्यव्यवहारात येत होती. मात्र, या शैलीलादेखील तिची म्हणून एक धार आणि तीक्ष्णता आहे. ‘ठणकावून’ किंवा ‘बजावून’ सांगितलं नाही तर ते मिळमिळीतच असतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती निश्चितच चुकीची ठरेल.. नव्हे, ‘ठरावी’! या शैलीतल्या श्रीपुंच्या काही प्रतिक्रिया प्रसंगी तीव्र आणि तिखट, झणझणीतही असायच्या.
साहित्यातील नव्या प्रवृत्तींना प्रारंभी जसा विरोध होतो तसेच त्या प्रवृत्ती एकदा प्रभावी आणि सुप्रतिष्ठित झाल्या की नंतरच्या काळात त्यांचं सवंग, कृत्रिम अनुकरण करण्याची प्रवृत्तीही त्यातूनच उदयाला येते. नव्या प्रवृत्ती बिंबवण्यासाठी सवंग अनुकरणाचं तणदेखील पेलवून घेणं नियतकालिकांना भाग पडतं. ‘सत्यकथा’ याला अपवाद नव्हती. साहित्याची ‘विशुद्धता’, ‘स्वायत्तता’ यासंबंधीच्या विकृत आणि बंदिस्त कल्पना उराशी बाळगून त्यातून नि:सत्त्व साहित्याची निपज झाल्याची उदाहरणेही ‘सत्यकथे’तून दाखविता येतील. तीच गत समीक्षेच्या बाबतीतही. त्यामुळे ‘विशिष्ट प्रकारच्या साहित्याचा संकुचित संप्रदाय’ मौज-सत्यकथेने निर्माण केला, असाही आरोप केला गेला. ‘आकृतिबंध’ इत्यादी ‘सत्यकथे’ने रूढ केलेल्या टीकेतील पारिभाषिक संज्ञांची किंवा ‘हेच त्या लेखकाचे सामथ्र्य आणि मर्यादाही’ अशासारख्या उक्तींची काही वर्तुळांतून टिंगलटवाळीही झाली.
पण हे खरं नाही. त्या काळाच्या विशिष्ट पाश्र्वभूमीवर ‘सत्यकथे’ने नवसाहित्यावरच झगझगीत प्रकाशझोत टाकल्याचं आपणास जाणवत असलं, तरी आता शांतपणे मागे वळून पाहिल्यास नवसाहित्याच्या जोडीला अन्य आविष्कारांची बूजदेखील ‘सत्यकथे’ने तितक्याच प्रमाणात राखल्याचं जुने अंक चाळून पाहिल्यास सहज लक्षात येईल. ‘सत्यकथा’ मासिक, ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘मौज’ प्रकाशन या तिघांचा एकत्र विचार केल्यास नव्या-जुन्या साहित्याच्या प्रमाणाबाबत या तिघांमध्ये विशिष्ट प्रकारची वाटणी वा विभागणी योजनापूर्वक केली गेलेली आढळेल. प्रकाशनांची सूची नजरेखालून घातली तर ‘संकुचित संप्रदाया’चा आरोप टिकणं कठीण आहे, इतके विविध प्रकारचे विषय आणि विविध प्रकारचे आविष्कार दिसून येतील. तिन्ही प्रकारची प्रकाशने मिळून साहित्य- व्यवहाराचा एकूण तोल आणि कस सांभाळण्याची दृष्टी या प्रकाशनामागे असल्याचं जाणवतं. त्यात परस्परपूरकता आहे.
पॉल व्हॅलरी या आपल्या आवडत्या फ्रेंच टीकाकाराचा हवाला देऊन एके ठिकाणी श्री. पुं.नी म्हटलं आहे, ‘‘सहृदय रसिक पुन:पुन्हा काय वाचतो, कोणती चित्रे व शिल्पे वारंवार पाहतो, कोणते संगीत फिरून फिरून ऐकतो, या गोष्टीला खरोखर पक्क्या मूल्यांचे महत्त्व आहे.’’
पॉल व्हॅलरीचे हे उद्गार श्रीपु आपल्या अनेक (नव्हे, जी काही मोजकीच केली असतील त्या मोजक्याच) भाषणांमधून तसेच लेखनातूनही आवर्जून नमूद करत असतात. श्रीपुंबरोबर थोडा काळ वावरणाऱ्यालाही त्यांच्या मनात साहित्याबरोबरच अन्य कलांचे संदर्भ कसे सतत जागे असतात, ते लक्षात यायला वेळ लागत नाही. त्यावरून श्रीपुंना कोणत्या वाङ्मयीन संस्कृतीचा निदिध्यास आहे याची आपणास कल्पना करता येते. किंबहुना, पॉल व्हॅलरीला अभिप्रेत असलेल्या त्या व्यापक वाङ्मयीन संस्कृतीचे श्रीपु हे स्वत:च एक निष्ठावंत उपासक ठरतात. त्यांच्या साहित्यसेवेचे मर्मही आपणास त्यांच्या या वृत्तीविशेषात शोधता येते.
प्रतिभेची सर्जकता साहित्यनिर्मिती इतकीच- अगदी अपवादात्मकरीत्या ग्रंथनिर्मिती, संपादन वा प्रकाशन यांसारख्या साहित्यव्यापारातून कधी प्रकट होऊ शकत असली आणि साक्षात् साहित्यनिर्मितीच्या तोडीची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा धारण करत असली, तर याची पहिली जाण देणारा संपादक म्हणून श्रीपुंचंच नाव डोळ्यासमोर येईल. या अर्थाने श्रीपु नि:संशयपणे एक सर्जक संपादक आहेत.
(लोकरंग – ११ एप्रिल १९९९)