14 August 2020

News Flash

सोंगाडय़ा तमाशा पार्टी

महाराष्ट्रातील लोकाश्रयावर चालणाऱ्या तमाशावर पंधरा वर्षांपूर्वी मी संशोधन केले होते.

संदेश भंडारे यांना तमाशावर संशोधन करण्याकरिता ‘इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्ट’ या बंगळुरूस्थित संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

प्रख्यात छायाचित्रकार आणि विविध लोककलाप्रकारांचा अभ्यास करणारे संदेश भंडारे यांना तमाशावर संशोधन करण्याकरिता ‘इंडिया फाऊंडेशन फॉर द आर्ट’ या बंगळुरूस्थित संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या अभ्यासांतर्गत त्यांनी खानदेशातील सोंगाडय़ा तमाशा पार्टी या आगळ्यावेगळ्या तमाशा खेळाचे रेखाटलेले हे चित्र..

महाराष्ट्रातील लोकाश्रयावर चालणाऱ्या तमाशावर पंधरा वर्षांपूर्वी मी संशोधन केले होते. पुढे त्या विषयावर माझे ‘तमाशा : एक रांगडी गंमत’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ते पुस्तक पाहून मला एक पोस्टकार्ड पाठवले. त्यात ‘तुमच्या पुस्तकात खानदेशातील तमाशाचा उल्लेख का नाही?’ असे अत्यंत प्रेमाने त्यांनी खडसावले होते. त्यावेळी मला खानदेशातील तमाशा त्याच्या खास वैशिष्टय़ांसह पाहायला मिळाला नव्हता. त्याची बोच मला तेव्हापासून आजतागायत आहे. गुजरातमधील कल्लेश्वरी मेळ्यात मला पूर्व खानदेशात होणाऱ्या सोंगाडय़ा तमाशाची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन हा तमाशा कोणत्याही परिस्थितीत पाहायचाच असा निश्चय केला आणि रायसिंग पाडवी या सोंगाडय़ाशी मी त्वरित संपर्क साधला. महाशिवरात्र असल्याने देवमोगरा येथे त्यांचा तमाशा होता. ते ‘तमाशा पाहायला या,’ असे म्हणाले. पश्चिम खानदेशातील हा भिल्ल तमाशा आता तरी पाहायला मिळेल म्हणून मला आनंद झाला.

ढोलकी फडाच्या तमाशातील लावणी अनेकांना आवडत असल्याने त्यातील लावणी बाजूला काढून त्याचे शोज् शहरांतून करण्याचा नवा ट्रेन्ड गेले काही वष्रे पुण्या-मुंबईत रुजला आहे. त्यातूनच ‘लावणीचा कार्यक्रम म्हणजेच तमाशा’ असा समज प्रसार माध्यमांमध्ये आणि अभिजनवर्गात रूढ झाला. त्यामुळे तमाशाला ‘लावणी’ हेच नाव काही भागांत पडले. खानदेशाच्या पश्चिम भागात तमाशात सोंग घेणारा व प्रेक्षकांना हसवणारा सोंगाडय़ाच जास्त प्रसिद्ध असल्याने या भागात तमाशाला ‘सोंगाडय़ा तमाशा पार्टी’ हे नाव पडले आहे.

मी गुजरातमधून अक्कलकुवा येथे पोहोचलो. रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर होती. देवमोगऱ्याची महाशिवरात्रीची यात्रा संपवून माणसांनी खचाखच भरलेल्या जीपमधून व त्यांच्या टपावरून प्रवास करताना अनेक आदिवासी दिसत होते. गावच्या वार्षिक जत्रांना किती महत्त्व असते याच्या खाणाखुणा जागोजागी दिसत होत्या. संध्याकाळी नवापूरला पोहोचलो. नवापूरपासून २२ कि. मी. अंतरावर सुकवेल गावात याहा मोगी देवीची वार्षकि जत्रा भरली होती. तेथे मोठा बाजार भरला होता. मी रात्री आठ वाजता तेथे पोहोचलो. साडेअकरा वाजता सोंगाडय़ा तमाशा सुरू होणार होता.

जत्रेत बाजाराच्या शेजारील शेतात मध्यभागी एक मातीचा चौथरा तयार केला होता. त्या चौथऱ्यावर प्लास्टिकचा गालिचा अंथरला होता. त्यावर १५ फूट रुंदीचा मंडप घातला होता. हेच तमाशाचे स्टेज. त्यावर टय़ूबलाइट्स लावल्या होत्या. या मातीच्या रंगमंचासमोर प्रेक्षक येऊन बसायला हळूहळू सुरुवात झाली होती. सुप्रसिद्ध सोंगाडय़ा रायसिंगमामा सोनारेकर यांचा तमाशा पाहायला बलगाडय़ा, ट्रॅक्टरमधून प्रेक्षक येत होते. प्रेक्षकांत मुलेमुली, बायकांची संख्या लक्षणीय होती.

प्रेक्षकांच्या गर्दीने भरलेले रान पाहून मी एका ग्रामस्थाला म्हटले,  ‘चांगलीच गर्दी झाली आहे!’ तर तो म्हणाला, ‘या वेळेस गर्दी कमी आहे. कारण या गावातले आदिवासी मोठय़ा संख्येने मजुरीवर सुरत, नर्मदा जिल्ह्यत भातलावणीच्या कामाला गेले आहेत.’

नवापूर परिसरात साधारणपणे बारा ते पंधरा सोंगाडय़ा पाटर्य़ा आहेत. एका शोकरिता बारा ते पंधरा हजारांची सुपारी त्यांना मिळते. पार्टीत असलेले कलाकार रोजचा खर्च वजा करून झालेला फायदा बाराजणांत समान वाटून घेतात, हे येथील खास वैशिष्टय़!

रायसिंगमामांचा सोंगाडय़ा तमाशा एवढा प्रसिद्ध आहे की महाराष्ट्रातील जळगावचा प्रसिद्ध भिका-भिमा तमाशा आणि रायसिंगमामा सोंगाडय़ा तमाशा एकाच यात्रेत असले तर रायसिंगच्या सोंगाडय़ा पार्टीला जास्त गर्दी होते ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी भिका-भिमा रायसिंगमामांना त्यांचा शो रात्री उशिरा- अकरानंतर सुरू करायची विनंती करतो. साडेनऊ-दहापर्यंत त्यांच्या तमाशांची तिकीट विक्री झालेली असते. आणि एकदा का रायसिंगमामाची सोंगाडय़ा पार्टी उभी राहिली, की भिका-भिमाच्या तमाशाला आलेले प्रेक्षक कनात उचलून रायसिंगमामाच्या तमाशाला निघून जाणार, हे त्यांना चांगलेच माहीत असते.

विदर्भातील खडी गंमत तमाशाप्रमाणे या सोंगाडय़ा तमाशात स्त्री-पार्टीच काम करतात. म्हणजे पुरुषच स्त्री-कलाकाराचा अभिनय करतात. या तमाशाची सुरुवात गणाने होते. यात गवळण नसते. त्यानंतर दोन तास ‘रुडाली’ सुरू असते. येथे प्रेमगीतांना ‘रुडाली’ हा शब्द वापरतात. रात्री दोननंतर रंगमंचावर मुख्य सोंगाडय़ाचा प्रवेश होतो. सोंगाडय़ा काही फार्स सादर करतो आणि पहाटे वगनाटय़ाने तमाशा संपतो. या सोंगाडय़ा तमाशात वगनाटय़ाला जास्त महत्त्व असते.

या पाश्र्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात तमाशात वग सुरू झाला की गावकरी उठून जातात असे दृश्य नित्याचे झाले आहे. गेली काही वष्रे वगनाटय़ाची मागणी कमी झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी असे वातावरण नव्हते. नारायणगावात गुढी पाडव्याला सुरू होणाऱ्या तमाशा-राहुटय़ांमध्ये विविध सामाजिक विषयांना स्पर्श करणाऱ्या वगनाटय़ांचे बॅनर मोठय़ा आकारात लावलेले असायचे. ‘भ्रष्ट केली लोकशाही’, ‘मुंबईची केळेवाली’, ‘गाढवाचं लग्न’,  ‘गाव तसं चांगलं, पण पुढाऱ्यानं हेरलं’ अशा विविध राजकीय व सामाजिक विषयांची हाताळणी केलेले मोठे बॅनर दर्शनी भागात ठळकपणे मांडलेले असत. यात्रा आयोजन समितीचे प्रमुख गावकरी बॅनर पाहून चांगले वगनाटय़ करणाऱ्या तमाशा फडाची निवड करतात. यात्रेकरिता तमाशाची सुपारी पक्की करायचा निर्णय घेतात. रघुवीर खेडकर यांच्या तमाशात २००८ साली मराठवाडय़ातील घोडे माळेगावच्या जत्रेत ‘खैरलांजी हत्याकांड’ हा ज्वलंत विषय तमाशातील वगनाटय़ात हाताळलेला मी पाहिला होता.

यावर्षी गुढी पाडव्याच्या एक महिना आधीच नारायणगावात राहुटय़ा लागल्या आहेत. यात्रेकरिता त्यांना बुकिंगदेखील चांगले मिळत आहे. यावर्षी तिथे वगनाटय़ाचे एकही बॅनर लागलेले दिसत नाही.  फक्त लावण्या गाणाऱ्या व सादर करणाऱ्यांचेच पोस्टर दिसतात. ‘महाराष्ट्रातील तमाशा संपला..’ असे मी अनेक वष्रे ऐकत व वाचत होतो; पण तेव्हासुद्धा सामाजिक भाष्य करणारे बतावणी, फार्स व वगनाटय़ सादर केले जायचे. गावातील नेत्याच्या वागण्या-बोलण्यातील विरोधाभासावर भाष्य केले जायचे. आपल्या मनातील विचारच तमाशातील सोंगाडय़ा बोलतो आहे याचा आनंद प्रेक्षकांना व्हायचा. खरे म्हणजे तमाशामध्ये सामाजिक असमानतेवर, तत्कालिन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले जायचे. असे भाष्य करण्याची क्षमता तमाशातील कलाकारांत आहे. या त्यांच्या वैशिष्टय़ाचेच देशभरात कौतुक होत असे.

कथकली, भरतनाटय़म्, यक्षगान तसेच इतर भारतीय लोककलाप्रकारांत पौराणिक कथांद्वारे लोकांचे मनोरंजन केले जाते. तमाशामध्येदेखील पूर्वी पौराणिक विषय असायचे. पण पुढे फुल्यांच्या सत्यशोधकी तमाशाने दिशा बदलली. भाऊ फक्कड या शाहिराने आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आपल्या तमाशात केला. अण्णाभाऊ साठे,  शाहीर अमरशेख, वामनदादा कर्डक या व अशा अनेक कलाकारांनी आपली शाहिरी कष्टकऱ्यांकरिता राबविली. या त्याच्या कालानुरूप सतत बदलत्या स्वरूपामुळेच हा लोककलाप्रकार महाराष्ट्रात लोकाश्रयावर टिकून राहिलेला व वाढलेला आपणास दिसतो.

धडगाव, नवापूर, नंदुरबार, तळोदा, साक्री, अक्कलकुवा, शहादा आदी गावांत भिल भाषा मोठय़ा प्रमाणात बोलली जाते. त्यामुळे तेथे भिल भाषेत तमाशा होतो. इतर ठिकाणी प्रेक्षकांच्या गरजेप्रमाणे गुजराती, िहदी, मराठी, अहिराणी भाषेत तमाशा केला जातो. महाराष्ट्रातील इतर भागांत जरी रायसिंगमामा यांच्या कलागुणांची कदर नसली तरी ते या भागातले स्टार कलाकार आहेत. भाद्रपद ते चत्र या आठ महिन्यांत रायसिंगमामांना १८५ ते १९० गावांत सुपाऱ्या मिळतात. या काळात एक दिवसदेखील त्यांना रात्रीची शांत झोप मिळत नाही.

सुकवेल गावात मंदिराशेजारील एका घरात रात्री नऊ वाजल्यापासून तमाशातील कलाकारांचा मेकअप सुरू होतो. आधुनिक स्त्री-वेशभूषेबरोबर पारंपरिक आदिवासी वेशभूषा करण्याची लगबग सुरू असते. तोपर्यंत इतर कलाकार विश्रांती घेताना दिसत होते. चार स्त्रीपार्टी, दोन गायक, पेटीमास्टर, दोन ढोलकीवाले, दोन ज्युनिअर सोंगाडे व मुख्य सोंगाडय़ा अशी एकूण बारा लोकांची सोंगाडय़ा पार्टी तयार होऊन शेतातील बांधावरून अंधारात चालत अकरा वाजता रंगमंचावर पोहोचते. बरोबर रात्री साडेअकरा वाजता गण सुरू होतो. गवळणीऐवजी आदिवासी गाणी म्हटली जातात. त्याला लोक ‘रुडाली’ असे म्हणतात. हा तमाशाचा कार्यक्रम भिल भाषेत होता. पण मधेच मराठी, िहदी शब्दांमुळे अंदाजानेच कळत होते. रायसिंगमामांचा जगदिश नावाचा मुलगा भिल भाषेतील तमाशा मराठीत समजावून सांगत होता.

गाणी सुरू असताना आयोजक व गावकरी प्रेक्षकांतून सोंगाडय़ाला प्रवेश घेण्याची मागणी करत होते. शेवटी रात्री दोन वाजता रायसिंगमामा या मुख्य सोंगाडय़ाने रंगमंचावर प्रवेश केला. आणि मग मदानात काही झोपलेले प्रेक्षक उठून वगनाटय़ पाहायला लागले. रायसिंगमामांच्या प्रत्येक एंट्रीला प्रेक्षक हास्यात बुडून जात होते. या तमाशातील सोंगाडय़ांची प्रेक्षकांवर चांगलीच पकड दिसत होती. त्यांच्या कोणत्याही कृतीवर प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता.

एका गाण्यानंतर मुख्य वगाला सुरुवात झाली. रायसिंगमामा आठवडे बाजारात खरेदी करायला निघालेत असा प्रसंग होता.बाजारात त्यांनी खिशातून दोन हजार रुपयांची नोट काढली. सुटय़ा पशांच्या कमतरतेमुळे आठवडे बाजारात उडालेला गोंधळाचा प्रसंग त्यांनी वगात गुंफला होता. खो-खो हसत प्रेक्षक त्याला प्रतिसाद देत होते.

दारूबंदी, प्रेमविवाह, सावत्र आई असे विविध विषय वगनाटय़ात हाताळणारे रायसिंगमामा दोन-तीन महिन्यांपूर्वीच्या या ताज्या विषयावरही भाष्य करीत होते. भल्याभल्यांना ‘नोटबंदी’ या विषयावर भाष्य करायचे धाडस होत नव्हते. गेली चाळीस वष्रे तमाशा करणाऱ्या या पाचवी पास झालेल्या सोंगाडय़ाला सामान्य लोकांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते आहे हे आजूबाजूला दिसत होते, जाणवत होते. त्यातून या विषयाला तो आपल्या क्षमतेने सामोरा जात होता. नोटबंदीमुळे उभा राहिलेला प्रश्न प्रेक्षकांसमोर उपहासात्मक पद्धतीने मांडत होता.

नारायणगाव अथवा इतरत्र होणारा तमाशा जरी फक्त आणि फक्त मनोरंजनात बुडाला असला तरी रायसिंगमामांचा हा वग- महाराष्ट्रातील तमाशाची जादू अजूनही काही ठिकाणी जिवंत आहे, याची ग्वाही देत होता. पुढील वर्षभर तमाशा कुठे आणि कसा टिकला आहे अथवा कुठे संपला आहे, त्याची कारणे काय आहेत? तमाशा फडमालक, सोंगाडे, तमाशाचे आयोजन करणारे आणि आश्रयदाते यांच्याशी संवाद साधून होणाऱ्या या ऱ्हासाला जबाबदार कोण, हे शोधणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या बदलाचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनावर काय परिणाम होत आहे, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

अकरा वर्षांपूर्वी माझ्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा शेवट करताना दिलीप चित्रे यांनी तमाशाच्या भवितव्याच्या  विषयी अस्वस्थ होऊन एक महत्त्वाची टिप्पणी केली होती- ‘तमाशाचा आश्रयदाता असलेला हा बहुजन समाज निश्चेष्ट गिऱ्हाईक होऊन पिळला जाणार, की भानावर येऊन कसदार नाटय़ानुभवाची मागणी उंचावर नेणार यावर अवलंबून आहे.’ याची प्रकर्षांने आठवण येते.

संदेश भंडारे  sandeshbhandare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2017 1:33 am

Web Title: sandesh bhandare get scholarships by india foundation for the arts to research tamasha
Next Stories
1 व्रतस्थ आणि वृत्तस्थ
2 अग्रलेखाबाहेरचे गोविंदराव!
3 भार्गवमामा : रत्नजडित ‘कटय़ार’!
Just Now!
X