05 July 2020

News Flash

आजच्या तरुणांचे प्यारव्यार

कैवल्य देशपांडे नामक द्वितीय वर्ष बी. ए.च्या कॉलेजकुमाराच्या अनुभवाचे हे बोल आहेत.

‘सिंगल मिंगल’- श्रीरंजन आवटे

‘सिंगल मिंगल’ ही कादंदंबरी तिच्या शीर्षकामुळे उत्सुकता वाढवणारी आहे. समकालीन तरुणांच्या जगण्याचा हा दस्तावेज आहे. टीव्ही, कॉम्प्युटर व मोबाइलशी खेळत मोठी झालेली ही पिढी असल्याने पाश्र्वभूमीला या समाजमाध्यमांचे नेपथ्य घेऊनच कथा पुढे सरकते. कॉलेजविश्वातील अभ्यास व अभ्यासेतर घडामोडी, तिथले मुक्त वातावरण, मोकळीढाकळी अभिव्यक्ती, मुलामुलींमधील संवादातील बिनधास्त थेटपणा, फंडा क्लीअर करणारे मित्रमत्रिणींचे नातेसंबंध आणि ‘दुनियादारी’चे कडू-गोड अनुभव यात ओघवत्या शैलीत आले आहेत. अभ्यास, परीक्षा, करीअर इत्यादी ताणांनी व्यापलेल्या आयुष्याकडे महाविद्यालयीन युवक-युवती कसे बघतात, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.

कैवल्य देशपांडे नामक द्वितीय वर्ष बी. ए.च्या कॉलेजकुमाराच्या अनुभवाचे हे बोल आहेत. १९-२० वर्षांचा कैवल्य हा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी. संप्रेरकांचा अनिवार कोलाहल असणाऱ्या वयाच्या अतिशय उत्फुल्ल काळात त्याच्या आयुष्यात आलेल्या तरुण मुली, मित्र, प्राध्यापक आणि त्याआसपासचे वातावरण ही या कादंबरीची मूलद्रव्ये आहेत. कैवल्य हा संवेदनशील मुलगा. रेवा, मृणाल, नेहा, अनुप्रीता इत्यादी मत्रिणींसोबतचे त्याचे आपुलकी, आकर्षण, मोह, ओढ, प्रेम वा तत्सम काहीतरी तो कसे निभावतो, त्यात कसा रममाण होतो, हे पाहणे म्हणजे आजच्या कॉलेज कॅम्पसची सफर करणे आहे.

‘व्हर्जिनिटी इज नॉट डिग्निटी. इट इज जस्ट लॅक ऑफ अ‍ॅपोच्र्युनिटी..’ हे कैवल्यचं फेसबुक स्टेटस वाचून नेहा त्याच्या आयुष्यात येते. नव्हे, अगदी जवळ येते. पण ‘नात्याचाच इतका ताण होतो, की ते निभावण्याचं ओझं होतं,’ असे म्हणत एक स्वखुशीचे ओझे त्याने अंगावर घेतलेले असते. रेवा आपल्या टाईपची मुलगी नाही, हे कळूनही तो तिच्यात गुरफटत जातो. आणि त्याला आवडणारी मृणाल मात्र दुसऱ्यावर जीव लावून बसलेली असते. प्रेमभावनेचा हा लपंडाव कादंबरीभर पिच्छा पुरवतो. ‘गर्लफ्रेंड असणं ही अभिमानाची बाब आहे का? आणि कोणीच पर्याय नाही म्हणून रेवासोबतचं माझं रिलेशन डेव्हलप झालं आहे का?’ असा प्रश्न मनात असूनही तो रेवाला मत्रीच्या प्रेमळ धाग्यात बांधत राहतो. अशा काहीशा तकलादू पायावर त्यांची ‘रिलेशनशिप’ तोल सांभाळत होती. तरी ‘रेवाच्या प्रेमाचा रिमाइंडर लावायला हवा,’ असे स्वत:ला बजावत तो रेटत राहतो. बिनधास्त आईकडून नेहाला मिळालेले संस्कार, शैलेंद्र नामक चाळिशी ओलांडलेल्या माणसाबरोबरचे तिचे लंगिक संबंध इत्यादी गोष्टी कैवल्य सहन करतो. पण तिचे मत्सराने इतरांच्या प्रेमप्रकरणांत बिब्बा घालण्याचे विघ्नसंतोषी प्रकार पाहून अखेर नेहापासून ब्रेकअप घेण्यातच शहाणपणा असल्याचे त्याला उमगते. लेखकाने कुठलाही आडपडदा न ठेवता, तसेच भाषेचे सोवळेओवळे न पाळता हे सारे मांडले आहे.

‘सिंगल िमगल’ हा कैवल्यने केलेला एक दीर्घ संवाद आहे. समाजमाध्यमांवरला तरुणांचा मुक्त आविष्कार, भावना उद्दीपित करणारी वक्तव्ये, स्माईली आणि इमोजींच्या सूचक करामती अशा आभासी जगात रमणारी ही मंडळी वास्तवातसुद्धा तेवढीच मुक्तपणे वागू-बोलू लागली आहेत हे दर्शवते, ही कादंबरी. अतिशय थेट, सहज आणि अनलंकृत आहे त्यांची भाषा. कारण हीच तरुणाईची अभिव्यक्ती आहे. या तरुणांच्या बोलण्यात लगडून येणाऱ्या शिव्या, पिढीतील अंतर दर्शवणारे प्रसंग, िमग्लिश-िहग्लिश शब्दांची पखरण, लंगिक संदर्भ, खास तरुणांनी केलेले शब्दांचे शॉर्टकट्स हे सारे असल्याने तरुण वाचक या लेखनाला लगेच ‘कनेक्ट’ होतो. व्हॅलेंटाईन डे, ब्रेकअप पार्टी, त्यात दारू पिणं, चित्रपटगृहातील कामलीला, मिठय़ा आणि चुंबनाचे रसभरीत वर्णन इत्यादी गोष्टी ‘चालू’ जमान्याचे कवडसे पकडणाऱ्या आहेत. भिन्निलगी आकर्षण, लंगिकता ही आदिम प्रेरणा आहे. या प्रबळ प्रेरणेच्या विरेचनासाठी मात्र आपल्या समाजात फारशा सुविधा नि शक्यता नाहीत. कैवल्य म्हणतो, ‘स्साला प्रेम करायला जागा नाही.’ ही कोंडी फोडायची कशी? नीतिमत्तेच्या बेगडी मखरात निसर्गाचा हा खेळ खेळायचा कसा? हार्मोन्सचा कोलाहल मांडायचा कुठे? नातेसंबंधांविषयी संवाद साधायचा कोणाशी? पालकांना वेळ नाही. घरात संवादाला स्थान नाही. शिक्षकांना फुरसत नाही. तरुणांच्या मनातील साचलेपणाला आऊटलेटच नाही. लेखकाने तरुणांची हीच दुखरी नस पकडली आहे.

गेल्या १०-१२ वर्षांत समाजमाध्यमांनी, विशेषत: मोबाइलने मराठीला नव्याने बहाल केलेले आणि आताशा मराठीत रुळून एकजीव होऊ पाहणारे अनेक तारुण्यसुलभ शब्द वाचताना आजच्या भाषेचे बदलते स्वरूपही पाहायला मिळते. अशाप्रकारे हा समकालीन संदर्भाचा चालताबोलता इतिहास आहे. इतिहास म्हणजे केवळ सत्तासंघर्ष, सामाजिक चळवळी आणि आíथक उलाढाली इत्यादी नव्हेत. इतिहासात सामान्य माणसांच्या जगण्यातील साधे-सरळ तपशीलही यायला हवेत. तरुणांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाचे संदर्भही हवेत. ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’ या आजच्या परवलीच्या शब्दामागचा अवकाश जाणून घ्यायला हवा. व्हर्जिनिटी, पातिव्रत्य, एकनिष्ठा, विवाहसंस्था या गोष्टींतील बंदिस्तपणा ढासळून तो कालबाह्य होत चालल्याच्या वास्तवाला भिडता यायला हवे.

कैवल्य हा तत्त्वज्ञानाचा हुशार विद्यार्थी. तो शिक्षकांमध्येही लाडका. तो कवी आहे. तो डायरीही लिहितो. छान छान कविता आणि भावपूर्ण पत्रेही तो लिहितो. त्याचे वाचन अफाट आहे. त्या वाचनाचे संदर्भ कादंबरीभर विखुरले आहेत. त्याचा आवाका नाटक, वक्तृत्व, प्रबंधवाचन अशा अनेक उपक्रमांतून दिसतो. विविध साहित्यकृती, सामाजिक वास्तव, राजकीय मुत्सद्देगिरी, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, नक्षलवाद, मूलतत्त्ववाद आदी अनेक विषयांवर तो जाता जाता भाष्य करतो. याशिवाय जगण्यातून त्याला कळलेली त्याची म्हणून काही आकलने आहेत, काही नोंदी आहेत, काही अर्थपूर्ण विधाने आहेत. आजचा तरुण बेजबाबदार आहे, उथळ आहे, असे आधीची पिढी म्हणत असते; पण हे पूर्णत: सत्य नाही. आजचा तरुणसुद्धा जबाबदार आहे. चतुर आहे. स्मार्ट आहे. आणि मुख्य म्हणजे वेळप्रसंगी गंभीरपणे विचार करणारा आहे, हे लेखकाने दाखवून दिले आहे. ‘समष्टीशी कम्पॅटिबल होता येत नाही’ किंवा ‘परात्मतेच्या तिठय़ावर वेड लागण्याची अवस्था’ असले काही गहन, सखोल आणि प्रौढ, पक्व विचार ‘एसवाय’ला शिकणारा १९-२० वर्षांचा युवक करत असेल का, असा प्रश्न मात्र पडतो. स्वत:चे अध्ययनविषय लेखक कादंबरीत पेरतो, त्याच्यातला तत्त्वज्ञानाचा स्नातक सतत त्यात डोकावत राहतो असे वाटते.

एकूणच आजच्या तरुणांचे ‘दिलविल प्यारव्यार’ आणि डोक्यातील केमिकल लोचा जाणून घेण्यासाठी हे पुस्तक तरुणांसह प्रौढांनी, विशेषत: पालक-शिक्षकांनी वाचायला हवे.

‘सिंगल मिंगल’- श्रीरंजन आवटे

राजहंस प्रकाशन, पुणे.

पृष्ठे-२०८, मूल्य-२०० रुपये.

आश्लेषा महाजन ashlesha27mahajan@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2017 2:05 am

Web Title: shriranjan awate marathi book single mingle
Next Stories
1 समग्र आयुष्याचा ‘व्यामोह’
2 फुले परंपरेची मर्मग्राही चिकित्सा
3 सोंगाडय़ा तमाशा पार्टी
Just Now!
X