|| मुकुंद संगोराम

संगीताला भाषेचे बंधन नसतं आणि ते सातासमुद्रापार सहजपणे पोहोचू शकतं, हे जेवढं खरं; तेवढंच संगीताला त्या- त्या परिसरातील संस्कृतीची पाळंमुळं घट्ट धरून ठेवत असतात, हेही खरं. नाही तर पंजाबी संगीतातील शब्द आणि माळव्यातील लोकधुना किंवा कर्नाटक संगीतातील राग-तान-पल्लवी आणि उत्तरेतील कव्वाली यांचे वेगळेपण टिकूच शकलं नसतं. ते संगीतच असलं तरीही त्याला त्या- त्या प्रांतातील संस्कृतीचा सुगंध असतो. ते संगीत तिथल्या मातीतून आलेलं असतं. त्यात तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्या घटकांमधून काही ना काही मिसळलेलं असतं. महाराष्ट्रातील संगीतात कीर्तन, भजन परंपरेतून वर आलेल्या संगीतशैलीतील बिनीचे शिलेदार असलेल्या सुधीर फडके यांच्या सांगीतिक कर्तृत्वाकडे या नजरेनं पाहिलं तर त्याचं मोल सहज कळू शकतं. त्यांच्या शैलीला ज्या नाटय़संगीताची पार्श्वभूमी आहे, ती त्यांनी अधिक ललित पद्धतीनं विकसित केली आणि त्यामध्ये स्वत:च्या प्रतिभेनं मोलाची भर घातली. शब्द आणि स्वर यांचा नाटय़संगीताच्या निमित्ताने झालेला शुभसंकर सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी अधिक विस्तृत केला. सुंदर काव्य आणि ते सहजपणे समजू शकेल अशी स्वररचना ही नाटय़संगीताची देणगी.

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
abhidnya bhave enjoys vacation in goa with husband and sayali sanjeev
मच्छी थाळी, समुद्रकिनारा अन्…; अभिज्ञा भावे नवऱ्यासह पोहोचली गोव्यात, सोबतीला आहे ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा

पण हे होत असताना आणखी एक सांगीतिक घटना घडत होती. ती म्हणजे विविध क्षेत्रांतील संगीतावर होणारा मराठी संस्कृतीचा संस्कार. अण्णासाहेब किर्लोस्करांनी कर्नाटकातील अनेक गीतं आणि अभिजात संगीतातील अनेक बंदिशी संगीत नाटकात आणताना त्यांना जो साज दिला, तो अस्सल मराठी होता. त्यामुळे संगीत नाटकामधील संगीत हे अस्सल मराठी राहिलं आणि त्यामुळेच ते प्रचंड लोकप्रियही झालं. बाबूजींनी ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतलेली होती. त्या अर्थानं ते अभिजात संगीताशी उत्तमरीत्या परिचित होते. तरीही त्यांनी अभिजात संगीत न करता ललित संगीताची कास धरली आणि त्यामध्ये असामान्य कामगिरी केली. त्यांची लोकप्रियता अत्युच्च शिखरावर पोहोचली, तरीही ते मात्र ढळले नाहीत. याचं कारण त्यांना नेमकं काय करायचं आहे, याचं भान होतं. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी संगीतातील ललित संगीतात त्यांनी जे प्रयोग केले, ते त्या काळातील नव्याने उभरणाऱ्या नागर संस्कृतीच्या पाऊलखुणा ओळखणारे होते. मध्यमवर्गीय म्हणून जो वर्ग नव्याने तयार होत होता, त्याच्या नव्या जाणिवांनाही परंपरेची शालीन झालर होती. ती टिकवून ठेवतानाच बाबूजींनी आपल्या गायनात जे गंधर्वतत्त्व अनुसरलं, त्यामुळे त्यांच्या संगीताला नवीनच झळाळी प्राप्त झाली. अस्सल मराठीपणा जाणवू शकेल अशा स्वरलडींचा उपयोग त्यांच्या संगीतात जागोजागी दिसतो. तीच त्यांची ओळख ठरली आणि तेच त्यांच्या यशाचं गमकही. बालगंधर्व या नावाचं महाराष्ट्राला असलेलं वेड हे मुख्यत: सांगीतिक होतं. त्यांच्या संगीतातून स्वरांच्या ज्या लकबी पाझरत होत्या, त्यामध्ये अभिजातताही होती आणि ललित सौंदर्यही होतं. बालगंधर्वाना हे सारं कसं जमत होतं, याचं कोडं त्या काळातील अनेक दिग्गज संगीतकारांनाही पडत होतं. अभिजात संगीत इतकं सोपं, सुलभ होऊन तुमच्यापुढं सौंदर्याच्या नाना खुणा उमटवू लागतं तेव्हा तुमचं भान हरपतं आणि ते तुमचं सुखनिधान बनतं. बालगंधर्वाना ही किमया साधली होती. त्यांच्या लकबी बाबूजींनी इतक्या खुबीने आपल्या संगीतात आणल्या, की त्यातील गंधर्वतत्त्वानं साऱ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा वेड लावलं.

भावगीत हा संगीतप्रकार ही महाराष्ट्राची संगीताला मिळालेली देणगी आहे. काव्य आणि स्वर यांचा हा संगम त्यापूर्वी अनेक पातळ्यांवर होत राहिला. पण त्यात कोणता तरी एक पक्ष सतत वरचढ ठरला. शब्दसंगीतात या दोन्ही पक्षांना समान न्याय मिळण्यासाठी जी नवीन भावगीतांची परंपरा सुरू झाली, तिलाही नाटय़संगीतच कारणीभूत ठरलं. जी. एन. जोशी यांच्यापासून गजानन वाटवे यांच्यापर्यंतच्या सगळ्या भावगीत गायकांनी हे समान न्यायाचं तत्त्व कसोशीनं पाळलं. त्यामुळे नाटय़संगीताचा लोप होत असतानाच मराठी माणसाला त्याच्या हृदयात साठवता येणारं नवं संगीत मिळालं. पण बाबूजींनी त्यामध्ये बालगंधर्वाची जी लकब मिसळली, तिने ते अधिकच झळाळून उठलं. बालगंधर्वाच्या शैलीचं हे ललित रूप समृद्ध परंपरेची आठवण करून देणारं होतं. ‘भावगीत म्हणजे सुधीर फडके’ हे समीकरण महाराष्ट्रात किमान पाच दशकं तरी टिकून राहिलं. स्वातंत्र्याच्या लढय़ात संपूर्ण देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसर ढवळून निघत असतानाच बाबूजींनीसंगीताच्या दुनियेत प्रवेश केला होता. त्यामुळे नंतरच्या काळात सर्वच क्षेत्रांत जी प्रचंड उलथापालथ होत गेली, त्याचे ते जाणते साक्षीदार होते. नावीन्याच्या ध्यासाशी या स्वातंत्र्याचं जवळचं नातं होतं आणि त्याचं भान त्यांच्यापाशी होतं. उत्तम काव्याला असलेलं संगीताचं अस्तर शोधून त्याचं कलाकृतीत रूपांतर करण्याची सर्जनशीलता त्यांच्याकडे होती. परिणामी नवं आणि परिणामकारक असं एक नवं रसायन रसिकांना पाहायला मिळालं. ‘गीतरामायण’ या कलाकृतीचं यश नेमकं त्यात आहे.

‘नाच-नाचुनि अति मी दमले, थकले रे नंदलाला..’या ओळीनंतर येणारी आकारातील स्वरांची एक सुंदर लड आठवून पहा.. ‘दशरथा, घे हे पायस दान..’मधील ‘पायस’ आणि ‘दान’ या दोन शब्दांमधील स्वराकृती आठवा.. ‘आज चांदणे उन्हात हसले..’या गीतातील ‘तुझ्यामुळे’ या शब्दानंतरचे स्वरांचे गोलाकार आठवा.. बाबूजींच्या गीतांमध्ये अशा मोहरणाऱ्या खुणा जागोजागी दिसतात. तीच त्यांची व्यवच्छेदक खूण. त्यातून सहजपणे व्यक्त होणारे भाव आणि त्याला त्यांनी दिलेली वागणूक यामुळे ते त्यांच्या आधीच्या संगीतकारांपेक्षा वेगळे ठरले. रागसंगीताच्या परिघात राहूनच आलापी, बोलताना, ताना, हरकती, मुरकतींना फाटा देत सादर केलेले काव्य या भावगीताच्या ओळखीत बाबूजींनी भावदर्शनाची भर घातली. अभिजात संगीतातील रागाच्या विकासासाठीचे स्वातंत्र्य भावगीतात साकारू शकत नव्हते. कारण ते पूर्णपणे पूर्वरचित संगीत होते. त्यातील प्रत्येक जागा, त्यातील अर्थगर्भ स्तब्धता, वाद्यमेळाच्या साह्यने त्या स्वररचनेला मिळणारी झळाळी यामुळे बाबूजींची भावगीतातील शब्दांच्या अर्थच्छटा स्वरांमधून सहजपणे पोहोचवण्याची किमया रसिकांसाठी फारच लोभसवाणी ठरली. घराघरांत त्यांची गीतं प्रत्येकाच्या ओठी आली, यामागे त्यांचं हे सृजन कारणीभूत ठरलं. सुधीर फडके या नावाला लोकप्रियतेचं वलय प्राप्त झालं आणि अस्सल मराठी मातीतल्या संगीताचा ललितसुंदर भावगर्भ आविष्कार ज्याच्या त्याच्या काना-मनात रुंजी घालू लागला. आज इतक्या वर्षांनंतरही त्या काळातील समाजसंस्कृतीचं देखणं दर्शन घडवणारी त्यांची गीतं त्यामुळेच टिकून राहिली.

मराठी चित्रपटांमधील त्यांची संगीत दिग्दर्शनाची कारकीर्द याच भावगीत परंपरेला चिकटून राहणारी होती. त्यात त्यांना ग. दि. माडगूळकर यांच्यासारख्या शब्दप्रभूंची संगत लाभली होती. त्याच काळात मराठी चित्रपट विषयांच्या बाबतीतही कात टाकत होता आणि त्यात राजा परांजपे यांच्यासारखा अतिशय प्रतिभावान दिग्दर्शक आपली सर्जनशीलता व्यक्त करत होता. या त्रिकुटाने मराठी मनावर जे अधिराज्य गाजवलं, त्यामागे या तिघांच्याही जाणिवांमधील समानता हे खरं सूत्र होतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण टिकवत एकमेकांत मिसळून जाऊ शकत होते, हे त्या सगळ्याच कलाकृतींचं वैशिष्टय़! पाच दशकांहून अधिक काळ आपली प्रतिभा ताजीतवानी ठेवणाऱ्या सुधीर फडके यांनी मराठी माणसावर अनंत उपकार केले आहेत. उपकार अशासाठी म्हणायचं, की त्यांनी सतत नव्याचा शोध घेताना मराठी माणसाच्या मनातली स्पंदनं जाणली होती. नुसतं चकाकणारं आणि क्षणार्धात संपून जाणारं, त्याचा मागमूसही न राहणारं जे ललित संगीत आज आपण ऐकतो आहोत, त्यापेक्षा खूप वेगळं आणि ताकदीचं संगीत त्यांनी निर्माण केलं. ललित संगीतातल्या या फडके घराण्याच्या खाणाखुणा आजही तरळतात तेव्हा हरखून जायला होतं. चित्रपट संगीत आणि भावगीतांच्या दुनियेतील सुधीर फडके यांची सफर प्रत्येकाला पुरेपूर आनंद देणारी ठरली. आपलं प्रत्येक गीत ही एक नक्षीदार कलाकृती व्हावी यासाठी आपली सारी प्रतिभा पणाला लावणाऱ्या बाबूजींनी त्या प्रत्येक गीतात मराठी माणसाचं मराठीपण असं काही ठासून भरलं, की त्याच्यासाठी ते गीत हृदयस्थ होऊन गेलं. काहीच दशकं आधी सुरू झालेल्या या ललित संगीताच्या नव्या परंपरेत त्यांनी केलेली कामगिरी म्हणूनच अपूर्वाईची झाली आणि कीर्तन, भजन, अभंग, लावणी या दीर्घ परंपरेतल्या संगीताला अभिजातता मिळवून देणाऱ्या परंपरेचे सुधीर फडके हे नायक ठरले. संगीतातील लालित्य किती सुंदर आणि सामथ्र्यवान असू शकतं याचं बाबूजींनी घडवलेलं दर्शन म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील अत्तराची कुपीच. म्हणूनच बालगंधर्वाच्या गायकीला आणखी पुढे नेऊन तिचं सोनं करणाऱ्या बाबूजींना त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं कुíनसात करायलाच हवा!

mukund.sangoram@expressindia.com